::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 20.04.2017 )
आदरणीय अध्यक्षा श्रीमती एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार
1. तक्रारदार यांनी सदरहु तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये, विरुध्दपक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, दाखल केलेले सर्व दस्तऐवज व तक्रारकर्ते यांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील प्रमाणे निकाल पारीत केला, कारण सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त होवूनही ते मंचासमोर हजर न झाल्याने, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला होता.
तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त, मोबाईल खरेदी बिल, यावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांनी दि. 27/7/2015 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 निर्मीत मोबाईल, ज्याचा मॉडेल नंबर व इतर वर्णन त्यात नमुद असल्याप्रमाणे, विरुध्दपक्ष क्र. 1 कडून रक्कम रु. 8400/- देवून खरेदी केला होता, अशा परिस्थितीत तक्रारकर्ते विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचे ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. दाखल दस्त Customer Receipt दि. 22/6/2016 रोजीची, यावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांनी सदर मोबाईल दि. 22/6/2016 रोजी पॅनासोनिक सर्व्हीस सेंटर कडे, सदर फोन बंद पडला ( No Power on ) या दोषामुळे दुरुस्तीसाठी जमा केला होता. दाखल वॉरंन्टी कार्डवरुन, तेंव्हा सदर फोन हा वॉरंन्टी कालावधीत होता, असे दिसते. तक्रारकर्त्याच्या मते सदर फोन हा वॉरन्टी कालावधीत पुर्णपणे बंद पडला होता व तो वरील सर्वीस सेंटरकडे दुरुस्तीसाठी जमा केला होता, परंतु त्यांच्या सांगण्यानुसार एक महिन्याने तक्रारकर्ता फोन घेण्यास गेला असता, तेथील कर्मचा-याने सांगितले की, फोन दुरुस्त होवू शकत नाही, काय कारण आहे ते नमुद केले नाही, त्यामुळे फोन मध्ये निर्मिती दोष आहे. सदर फोन बदली करुन देण्याची विनंती केली असता, त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, म्हणून कायदेशिर नोटीस पाठविली, ती मिळूनही विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी कोणतीही पुर्तता केली नाही. म्हणून तक्रारीत नमुद त्रासामुळे, तक्रार प्रार्थनेनुसार मंजुर करावी.
यावर, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 तर्फे कोणतेही नकारार्थी कथन रेकॉर्डवर उपलब्ध नाही. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या दस्तानुसार तक्रारकर्ते यांच्या युक्तीवादात मंचाला तथ्य आढळले आहे, म्हणुन विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना असे आदेश देण्यात येतात की, त्यांनी तक्रारकर्ते यांच्या जवळुन मोबाईल परत घेवून, त्यानंतर तक्रारकर्त्यास सदर मोबाईल फोनची किंमत रु. 8400/- सव्याज, इतर नुकसान भरपाई रक्कम व प्रकरण खर्चाची रक्कम, अंतीम आदेशात नमुद केल्यानुसार द्यावी.
सबब अंतीम आदेश खालील प्रमाणे पारीत केला.
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तीकरित्या वा वेगवेगळेपणे तक्रारकर्त्यास, त्यांच्या जवळील वादातील मोबाईल परत घेवून, त्यानंतर रक्कम रु. 8400/- ( रुपये आठ हजार चारशे फक्त ) द.सा.द.शे. 8 टक्के व्याज दराने दि. 28/7/2016 ( नोटीस पाठविल्याची तारीख ) पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदाई करे पर्यंत व्याजासहीत द्यावी, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी, प्रकरण खर्चासहीत रक्कम रु. 5000/- ( रुपये पाच हजार फक्त ) द्यावी.
- सदर आदेशाचे पालन, निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.