निकाल
पारीत दिनांकः- 20/01/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी त्यांच्या इसीएचएस पॉलिक्लिनिकसाठी जाबदेणारांकडून सन 2009 मध्ये ‘अॅक्वागार्ड कॉम्पॅक्ट’ खरेदी केला होता. सदरच्या पॉलिक्लिनिकमध्ये रिटायर्ड एक्स-सर्व्हिसमनसाठी एक ते दिड तास गोळ्या देण्याचे काम चालते. येणार्या पेशंटसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तक्रारदारांनी अॅक्वागार्ड खरेदी केला होता. त्याचवेळेस त्यांनी जाबदेणारांकडे दि. 21/6/2009 ते 21/6/2012 पर्यंतचा मेंटेनन्सचा करार केला होता. करार करतेवेळी जाबदेणार यांनी, तक्रारदारांची काही तक्रार असल्यास 24 ते 48 तासांत त्यांचा टेक्निशिअन येऊन त्याचे निवारण करेल, असे सांगितले होते. दि. 30/11/2010 रोजी प्युरीफायरमध्ये बिघाड झाल्यामुळे, तक्रारदारांनी जाबदेणारांच्या कस्टमर केअर सेंटरमध्ये टेलीफोनवरुन तक्रार नोंदविली. अनेकवेळा तक्रारदारांनी तक्रारी नोंदवूनही, 48 तासांत त्यांचा टेक्निशिअन येईल असे सांगण्यात आले. तक्रारदारांनी जाबदेणारांच्या स्टाफमधील, श्री स्वप्नील, श्री अशोक, कु. प्रियांका व सौ. संगिता साळोजकर, कोऑर्डिंटर कस्टमर केअर तसेच कवी एंटरप्राईजेस, समिक्षा एंटरप्राईजेस व रिता सर्व्हिसेस यांच्याकडेही अनेकवेळा तक्रारी केल्या. परंतु तक्रार दाखल करेपर्यंत जाबदेणारांकडून कोणीही वॉटर प्युरीफायर दुरुस्त करण्यासाठी आले नाही. म्हणून तक्रारदारांनी रक्कम रु. 4500/- खर्च करुन दुसरा वॉटर प्युरीफायर खरेदी केला व प्रस्तुतची तक्रार दाखल केली. तक्रारदार जाबदेणारांकडून एकुण रक्कम रु. 24,398/- मागतात.
2] तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता ते मंचासमोर उपस्थित झाले व त्यांच्या लेखी म्हणण्याद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी सत्य परिस्थिती मंचासमोर आणलेली नाही. जाबदेणारांनी सेवेमध्ये त्रुटी ठेवलेली आहे, याकरीता तक्रारदारांनी कुठलाही पुरावा दिलेला नाही. म्हणून सदरील तक्रार नामंजूर करावी अशी मगणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबापुष्ठ्यर्थ शपथपत्र दाखल केले.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दि. 24/7/2009 रोजी रक्कम रु. 3000/- भरुन Annual Maintenance Contract केला होता, हे पावतीवरुन सिद्ध होते. सदरचा करार हा तीन वर्षांकरीता होता. दि. 30/11/2010 रोजी वॉटर प्युरीफायरमध्ये बिघाड झाल्यामुळे, तक्रारदारांनी अनेकवेळा जाबदेणारांकडे तक्रारी केल्या, परंतु जाबदेणारांचे टेक्निशिअन तक्रारदारांकडे गेले नाहीत. जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये तक्रारीसंदर्भात सुस्पष्टपणे, पॅरावाईज उत्तरे दिली नाहीत. लेखी जबाब हा पूर्णपणे संदीग्धपणे दिलेला आहे. परंतु युक्तीवादाच्या वेळी, जाबदेणारांचे वकिल व त्यांचे प्रतिनिधी यांनी मंचासमोर मान्य केले की, त्यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे सर्व्हिस दिलेली नाही. कारण सर्व्हिस देण्याचे काम त्यांनी दुसर्या कंपनीकडे सोपविले होते व त्या आऊटसोर्सिंग कंपनीने हे काम केले नाही. त्याचप्रमाणे त्यांनी नंतर तक्रारदारास वॉटर प्युरीफायर दुरुस्त करुन देतो असे सांगितले, परंतु तक्रारदारांने त्यास नकार दिला. अजूनही ते वॉटर प्युरीफायर दुरुस्त करुन देण्यास तयार आहेत, कारण Annual Maintenance Contract हा सन 2012 पर्यंत आहे. यावरुन तक्रारदारांनी ज्या कारणासाठी तक्रार दाखल केलेली आहे, ते योग्य आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारदारास दुसरा वॉटर प्युरीफायर खरेदी करावा लागला. जाबदेणारांनी तक्रारदारांकडून Annual Maintenance Contract चे रक्कम रु. 3000/- घेऊन, एकदाही सर्व्हिस दिलेली नाही, म्हणून त्यांनी तक्रारदारास रक्कम रु. 3000/- 9% व्याजासह परत करावे. या सर्वांमुळे तक्रारदारास सहाजिकच मानसिक व शारीरिक त्रास झाला असेल म्हणून ते रक्कम रु. 5000/- नुकसान भरपाई व रक्कम रु. 1,000/- तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र ठरतात.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारास रक्कम रु. 3,000/-
(रक्कम रु. तीन हजार फक्त) द.सा.द.शे. 9%
व्याजदराने दि. 24/7/2009 पासून ते रक्कम
अदा करेपर्यंत, रक्कम 5,000/- (रक्कम रु.
पाच हजार फक्त) मानसिक व शारीरिक त्रासापोटी
व रक्कम रु.1,000/- (रक्कम रु.एक हजार फक्त)
तक्रारीचा खर्च म्हणून, या आदेशाची प्रत मिळाल्या
पासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावी.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.