आदेशाची ता. 06/07/2012
साई अनुसया को-ऑपरेटीव्ह हौसिंग-
सोसायटी,लि.,तर्फे श्री.ए.जे.बेलेल,
वय-41, धंदा-व्यापार,
सत्यनारायण मंदीरा जवळ,खारेगांव,
बी.पी.रोड,भाईंदर (ईस्ट) 401 105...............................तक्रारदार.
विरूध्द
मिरा भाईंदर महानगरपालिका,
मुख्य कार्यालय भाईंदर,
पाणी पुरवठा विभाग,
तर्फे-कार्यकारी अभियंता,
स्व.इंदिरा गांधी भवन,छत्रपती शिवाजी-
महाराज मार्ग,भाईंदर (प),
ता.जि.ठाणे-401101.................................................. सामनेवाला.
समक्ष - श्री.आर.बी.सोमाणी - मा. अध्यक्ष
श्रीमती. ज्योती अय्यर - मा.सदस्या
आदेश
(06/07/2012)
द्वारा श्री.आर.बी.सोमाणी - मा. अध्यक्ष
1. प्रस्तुत अंतरीम अर्जाव्दारे तक्रारदार यांनी विनंती केली की, त्यांच्या कडील पाणी पुरवठा बंद केलेला असुन तो पुर्ववत करुन दयावा, सोबत तक्रार क्रमांक-268/2012 दाखल आहे.
2. तक्रारदार यांचे कथन थोडक्यात असे की,तक्रारदार ही सहकारी संस्था असुन त्यांनी सामनेवाला मिरा भाईंदर महानगर पालिका यांच्याकडे ता.14.06.2006 रोजी आणि ता.28.03.2008 रोजी पाणी पुरवठा व्यवसायीक तत्वावर घेतला आहे. सदर पाणी पुरवठा जोडणी ही बिल्डर यांनी करुन दयावयास हवी होती.
3. सामनेवाला यांनी ता.24.04.2012 रोजी तक्रारदारास नोटीस पाठवून कळविले की,त्यांनी दिवाणी दवा क्रमांक-13/2003 प्रलंबीत असल्याबददल सामनेवाला यांना काहीही माहिती दिलेली नाही आणि म्हणून त्यांनी सामनेवालाशी विश्वासघात केला आहे. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी ता.25.04.2012 रोजी सुनावणी करीता बोलावले वरुन तक्रारदारांचे पदाधिकारी हजर झाले त्यांनी दावा क्रमांक-13/2003 बददल माहिती नसल्याने (नळ जोडणी करीता केलेल्या अर्जात माहिती दिली नव्हती) तसेच तक्रारदार हे त्या दाव्यामध्ये पक्षकार नव्हते. म्हणून
4. सामनेवाला यांच्या नोटीसेस विलंबाने मिळाल्या आहेत. सामनेवाला यांनी गैरकायदेशीर रित्या चुकीचे मुददे उपस्थित करुन पाणी पुरवठा कनेक्शन बंद केलेला आहे. तक्रारदार यांनी ता.22.05.2012 रोजी पुर्नजोडणीसाठी विनंती अर्ज केला तो त्यांनी पाठविलेला आहे. दोन्हीही नळ जोडणी जिवनावश्यक आहे. तक्रारदार यांना बिल्डरने ओ.सी. (O. C) न मिळवून दिल्यामुळे व्यवसायीक तत्वावर तक्रारदार यांना पाणी जोडणी दिली गेली आहे. सामनेवाला यांचे पाणी जोडणी कपात करण्याची सदरील कृती ही बेकायदेशीर आहे. नळ जोडणी न मिळाल्यास तक्रारदाराचे अतोनात नुकसान होईल आणि म्हणून अंतरीम अर्जाव्दारे विनंती केली की,जोडणी क्रमांक-जेजी-04101055 किंवा जेजी-04101126 पैंकी कोणतीही एक जोडणी पुर्ववत करुन मिळावी अशी विनंती केलेली आहे. सोबत शपथपत्र दाखल केलेले आहे आणि मा.राष्ट्रीय आयोग व मा.राज्य आयोग यांचे निवाडे दाखल केलेले आहेत.
5. मंचाव्दारे सामनेवाला यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली त्यावर सामनेवाला यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले आणि नमुद केले की, तक्रारदारास प्रस्तुत तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण नाही. प्रस्तुत तक्रार खोटी असुन रु.25,000/- कॉस्टसह खारीज होण्यास पात्र आहे. सामनेवाला यांनी दिलेल्या सुचनेनुसार तक्रारदार सुनावणीसाठी कधीही हजर झाले नाहीत आणि त्यांना काहीही म्हणणे नाही असे ग्राहय धरुन सामनेवाला यांनी कायदेशीर रित्या योग्य निर्णय घेतलेला आहे.
6. सामनेवाला यांची कोणतीही कृती गैरकायदेशीर नाही. Equitable Relief मिळण्यासाठी मंचासमक्ष,मंचासमोर स्वच्छ हाताने येणे आवश्यक आहे. तक्रारदार स्वतः चुक करतात व खोटी मागणी करीत आहे. सामनेवाला यांनी यादी ता.05.07.2012 सोबत एकूण-5 दस्ताऐवज दाखल केलेले आहेत. त्यामध्ये नविन नळ कनेक्शन मिळण्यासाठीचे अर्ज,केलेला करारनामा, पाणी बील आणि इतर कागदपत्र दाखल केलेले आहेत तसेच तक्रारदार यांनी महाराष्ट्र जिवन अॅथोरिटी Act 1976 चे 2(32) ची नोंद दाखल केलेली आहे.
7. उभय पक्षांना सदर अर्जावर ऐकण्यात आले, सामनेवाला यांनी ठामपणे नमुद केले की,तक्रारदार यांनी खोटी माहिती दिलेली आहे आणि म्हणून ते कोणतीही दाद मिळण्यास पात्र नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्याव्दारे ता.05.06.2012 आणि ता.02.02.2008 चे तक्रारदार यांचे वतीने शपथपत्र / करारनामा तसेच नळ जोडणी करीता वर्ष सन-2006-08 चे अर्ज तसेच तेथील रहिवासी श्रीमती कल्पना परब यांचे नळ जोडणी बददलचे बील दाखल करुन युक्तीवाद केला की,तक्रारदार यांनी खोटी माहिती देऊन पाणी पुरवठा घेतलेला आहे आणि अशा स्थितीत करार नाम्यानुसार नळ जोडणी कपात करण्याचा अधिकार सामनेवाला यांना तक्रारदाराची दिलेला आहे आणि म्हणून सामनेवाला यांची कृती कायदेशीर आहे.
8. तक्रारदार यांनी युक्तीवाद केला की,पाणी ही अत्यावश्यक गरज आणि ती लोकांच्या दैनंदिन जिवनाचा भाग आहे. तसेच सामनेवाला यांची कृती ही दोषपुर्ण सेवा आहे. सदर इमारतीत अनेक फ्लॅट असुन त्यामध्ये बरेच लोक राहतात आणि दिवाणी दावा हा तक्रारदार व महानगरपालिका यांच्यात नसुन तक्रारदार यांच्या इमारतीचे बिल्डर व महानगरपालिका यांच्यामध्ये असुन त्याबददल या तक्रारदारास कोणतीही माहिती नव्हती आणि म्हणून याबददल कॉलम नंबर-12 मध्ये (नविन नळ कनेक्शन मिळण्या बाबतचे अर्ज) यामध्ये काहीही माहिती भरलेली नाही तसेच तक्रारदार हे नियमीतपणे बील भरतात आणि थकीत बीलापोटी नळ कनेक्शन कपात केल्याची तक्रार नाही.
9. मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला, तक्रारदार हे ग्राहक आहेत आणि सामनेवाला यांची सदर पुरवठा देण्याची प्राथमिक जबाबदारी आहे. मंचाने दस्तऐवजांचे अवलोकन करुन सुक्ष्मपणे वाचन केले तसेच निवाडयांचे वाचन करण्यात आले आणि मंचाच्या मते सामनेवाला यांना तक्रारदार यांनी जोडणी मिळण्या करीता दोन वेगवेगळे अर्ज केलेले आहेत. सदर अर्जात अनेक रकाने रिकामे आहेत आणि सदर अर्जास अनुसरुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्याकडून करारनामा करुन घेऊन पाणी जोडणी दिलेली आहे. सन-2008 पासुन सन-2012 पर्यंत ही बाब सामनेवाला यांच्या लक्षात आलेली नाही की, सामनेवाला यांच्या विरुध्द सदर मारतीच्या बिल्डरने 13/2003 असा दिवाणी दावा दाखल केलेला आहे असे स्पष्ट होते.
10. असे जरी असले तरी तक्रारदार यांच्या शपथपत्रावरुन असे सिध्द होते की,तक्रारदार सदर दाव्यामध्ये वादी किंवा प्रतिवादी नव्हते आणि म्हणून दाव्याबददल त्यांना माहिती असणे शक्य नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. मंचाच्या मते तक्रारदार यांना सामनेवाला यांनी नळ जोडणी देण्यापुर्वी संपुर्ण माहिती घेणे आवश्यक होते. परंतु सामनेवाला यांनी अर्ज माहिती व करारपत्राच्या आधारे नळ जोडणी दिलेली आहे आणि ते आता तक्रारदार यांच्यावर आक्षेप करुन सदर नळ जोडणी खंडीत करु शकत नाही असे मंचाचे मत झालेले आहे. कारण सामनेवाला हे स्वतःच्या कृतीने स्वतःवर बंधन घालून घेत आहे. कारण त्यांनी बराचकाळ कोणतीही कार्यवाही न करता नळ जोडणी सुरळीत चालू ठेवलेली आहे आणि तुर्त मंचाच्या मते प्रस्तुत तक्रार निकाली होई पर्यंत तक्रारदार यांना दोन्ही नळ जोडणीपैंकी एक नळ जोडणी जिवनावश्यक व अत्यावश्यक वस्तु असल्याने पुर्ववत सुरु करुन देण्याचे मंचाव्दारे आदेश करणे कायदेशीर व न्यायोचित राहिल असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
सबब आम्ही खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
--- आ दे श ---
(1) तक्रारदार यांचा अंतरीम अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
(2) सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा ता.14.06.2006 चे नळ जोडणी क्रमांक-जेजी-04101055
मंचाचे आदेश मिळाल्यापासुन 72 तासांच्या आंत पुर्ववत सुरु करुन दयावे व तक्रार प्रलंबीत
असतांना याच कारणावर पुन्हा नळ जोडणी खंडीत करण्यात येऊ नये.
(3) खर्चाबददल कोणतेही आदेश नाहीत.
(4) तक्रारदारास निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी सदर आदेशाची प्रत सामनेवाला यांना देऊन
त्याची पोहोच घ्यावी व पोहोच घेतल्याबददल पुरावा शपथपत्रासह मंचात दाखल करावा.
ता.06.07.2012.