::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 25/09/2019)
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12
अन्वये दाखल केली आहे. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्तीला बजाज ऑटो लिमि.ची बजाज पल्सर 150 डिटीएस ही मोटारसायकल विकत घ्यायची होती व त्यावेळी त्याची किंमत अंदाजे रू.85,000/- होती. त्यामुळे तक्रारकर्तीने वि.प.यांचेकडे रू.30,000/- जमा करून उर्वरीत रक्कम रू.55,000/- करिता, त्यांचेकडून कर्ज घेऊन सदर दुचाकी वाहन विकत घेतले व सदर कर्जाबाबत वि.प.यांचेमध्ये दि.24/6/2015 रोजी करारनामा झाला असून त्यानुसार तक्रारकर्तीस कर्जाची रक्कम रू.55,000/- ही व्याजासह दरमहा रू.3,000/- ने 26 महिन्यापर्यंत परतफेड करायची होती. तक्रारकर्ती ही सदर कर्जाच्या किस्तीची रक्कम नियमितपणे वि.प. यांचेकडे भरणा करत होती व खंड पडल्यास दोन महिन्याची किस्त एकावेळेस वि.प. यांना देत होती वा त्यांच्या खात्यात जमा करत होती. वि.प. हे तक्रारकर्तीस सदर कर्जाच्या रकमेवर अतिरिक्त दंडाची रक्कम बेकायदेशीररीत्या लावत होते व तक्रारकर्तीने करारनामा व किती रक्कम दिली व आज किती बाकी आहे याबाबत अहवाल मागितला असता वि.प.यांनी करारनामा व अहवाल दिला नाही. उलट वि.प.यांनी दि.4/8/2016 चे पत्रान्वये तक्रारकर्तीस थकीत रक्कम रू.19,440/- ची मागणी केली व सदर रक्कम 15 दिवसात न भरल्यास सदर वाहन जप्त केल्या जाईल असे कळविले. त्यामुळे तक्रारकर्तीने दि.11/8/2016 रोजी वि.प.यांना नोटीस पाठवून सदर थकबाकी रकमेचा तपशील मागितला. सदर नोटीस वि.प.यांना प्राप्त झाला तरीसुध्दा त्यांनी सुडबुध्दिने तक्रारकर्ती ही बाहेरगावी असतांना सदर वाहन जप्त केले व तक्रारकर्ती परत आल्यावर तक्रारकर्तीने नाईलाजास्तव वि.प. यांचे सांगण्याप्रमाणे पत्र लिहून दिले व दि.24/8/2016 रोजी रू.19,440/- पैकी रू.9,000/- वि.प.यांचे खात्यात जमा केल्यावर वि.प.यांनी सदर वाहन तक्रारकर्तीस परत दिले. वि.प.यांनी तक्रारकर्तीस दि.4/8/2016 रोजी दिलेल्या पत्रानुसार रू.19,440/- रू.थकबाकी रक्कम होती त्यापैकी दि.24/8/2016 रोजी तक्रारकर्तीने रू.9000/- खात्यात जमा केले व त्यानंतर पुढील तारखेला काही रक्कम ही नगदी तर काही रक्कम वि.प. यांचे बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये असलेल्या खाता क्र.60178789425 मध्ये जमा केली. तक्रारकर्तीस ज्या तारखा व रकमा लक्षात आहेत त्याचाच उल्लेख तक्रारकर्तीने केला आहे असे तक्रारकर्तीने एकूण रू.80,000/- ते रू.90,000/- वि.प. यांना दिले तरी त्यानंतर दि.28/8/2017 रोजी वि.प.यांनी वाहन जप्त करू नये म्हणून तक्रारकर्तीस रू.9,000/- जमा करण्यास भाग पाडले. वि.प.यांनी तक्रारकर्तीकडून दि.4/8/2016 चे पत्रानुसार व तिने घेतलेल्या कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम दिली आहे तरीसुध्दा वि.प.यांनी दि.21/8/2017 रोजी तक्रारकर्तीस पत्र देऊन थकबाकी रक्कम रू.42,612/- ची मागणी करून तक्रारकर्तीप्रती अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याने तक्रारकर्तीने वि.प.यांनी सदर वाहन जप्त करू नये म्हणून वि.प. यांचेविरूध्द विद्यमान मंचामध्ये प्रकरण दाखल केल्यानंतर वि.प.यांनी दि.23/11/2017 रोजी बेकायदेशीररीत्या तक्रारकर्तीचे उपरोक्त वाहन जप्त करून अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याने तक्रारकर्तीने मुळ तक्रारअर्जामध्ये विद्यमान मंचाचे आदेशान्वये दुरूस्ती करून सदर तक्रारअर्जामध्ये वि.प. यांचेविरूध्द अशी मागणी केली की वि.प. यांचे दि.4/8/2016 व दि.21/8/2016 चे पत्र अनुचीत व्यापार पध्दतीचे घोषीत करावे तसेच वि.प.यांनी दि.23/11/2017 रोजी जप्त केलेले उपरोक्त वाहन तक्रारकर्तीस परत करावे वा सदर वाहनाची किंमत रू.90,000/- व्याजासह तक्रारकर्तीस परत द्यावे आणि सदर वाहनाचे नादेय प्रमाणपत्र तक्रारकर्तीस द्यावे तसेच शारिरीक वमानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई रू.50,000/- व इतर योग्य तो आदेश तक्रारकर्तीचे बाजूने द्यावा अशी विनंती केली.
3. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्षाविरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष हे हजर होवून त्यांनी लेखी उत्तर प्राथमीक आक्षेपासह दाखल करून त्यामध्ये तक्रारकर्तीने वि.प. यांचेकडून वाहन खरेदी करण्याकरिता कर्ज घेतले होते व सदर कर्जाची थकबाकी आहे ही बाब तक्रारकर्तीस मान्य असल्याने प्राथमिकदृष्टया तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे असा प्राथमीक आक्षेप घेऊन पुढे आपल्या लेखी कथनामध्ये नमूद केले की तक्रारकर्तीने बजाज पल्सर 150 डिटीएस हे मॉडेल असलेली मोटारसायकल विकत घेण्याकरीता जून,2015 मध्ये वि.प.यांचेकडून कर्ज घेतले होते व सदर कर्जाबाबत उभय पक्षांमध्ये दि.24/6/2015 रोजी करारनामा झाला होता सदर बाबी वि.प.यांनी मान्य केल्या असून उर्वरीत कथन नाकबूल करून पुढे नमूद केले की वि.प. यांनी तक्रारकर्तीस एकूण कर्ज रक्कम रू.55,800/- मंजूर केले. त्यापैकी रू.50,000/- हे तक्रारकर्तीने दिलेल्या कोटेशननुसार लक्ष्मी ऑटो, चंद्रपूर यांचे नावे तक्रारकर्तीस बॅंक ऑफ महाराष्ट्र चा दि.24/6/2015 रोजी धनादेश दिला व रू.5,800/- हे तक्रारकर्तीस नगदी दिले. सदर करारनाम्यानुसार तक्रारकर्तीस कर्जाची रक्कम रू.55,800/- ची व्याजासह एकूण रक्कम रू.77,562/- ची दरमहा रू.2,990/- प्रमाणे प्रत्येक महिन्याच्या 23 तारखेला एकूण 25 महिन्यात व शेवटच्या 26 व्या महिन्यात उर्वरीत रकमेचा भरणा करण्याचे तक्रारकर्तीने कबूल केले व त्यावेळीच वि.प.यांनी तक्रारर्तीस सदर करारनाम्याची प्रत दिली असून तसा करारनामा मिळाल्याची पावती तक्रारकर्तीने वि.प.यांना लिहून दिली. तक्रारकर्ती ही सदर कर्जाच्या हप्त्यांची नियमितपणे भरणा करत नसल्याने दि.4/8/2016 रोजी कर्जाच्या हप्त्याची रक्कम रू.19,440/- देणे लागत असल्याने तिला दि.4/8/2016 रोजी पंजीबध्द डाकेने नोटीस पाठवून रू.19,440/- भरणा करण्याचे व न केल्यास सदर वाहन जप्त केल्या जाणार असल्याचे सुचीत केले व तशी पोलीस स्टेशन बल्लारशा यांना माहिती दिली. तक्रारकर्तीने दि.19/8/2016 पर्यंत थकीत रक्कम न भरल्याने परत दि.21/8/2017 रोजी तिला पुन्हा पंजीबध्द डाकेने पत्रान्वये संपूर्ण कर्ज व्याजासह भरणा करण्याचे सुचीत केले. परंतु तरीही तक्रारकर्तीने सदर थकीत रकमेचा भरणा न केल्याने वि.प.यांनी दि.23/8/2016 रोजी पोलीस स्टेशन, बल्लारपूरला पंजीबध्द डाकेने सदर वाहन जप्तीबाबत माहिती दिल्यानंतर वि.प.यांचे सिजर श्री.निरज पटेल यांनी दि.23/8/2016 रोजी सदर वाहन जप्त केले. त्यानंतर दि.24/8/2016 रोजी वि.प.यांचेकडे अर्ज करून रू.9,000/- भरण्याची व उर्वरीत रक्कम रू.10,440/- दि.23/9/2016 रोजी भरणा करणार व उर्वरीत रक्कम हप्त्यानुसार भरणा करणार व दि.23/9/2016 रोजी रोजी भरणा न केल्यास वि.प.हे तक्रारकर्तीचे वाहन जप्त करू शकेल असा तक्रारकर्तीने अर्ज दिला. त्यामुळे वि.प.यांनी तक्रारकर्तीकडून रू.9,000/- स्विकारून तिला जप्त केलेले वाहन पुढील कर्जाची रक्कम नियमित भरण्याचे अटीवर परत केले. परंतु पुन्हा तक्रारकर्तीने कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्याने वि.प.यांनी दि.25/10/2017 रोजी तक्रारकर्तीस पंजीबध्द डाकेने नोटीस पाठविला. तरीही तक्रारकर्तीने थकीत रक्कम न भरल्याने वि.प. यांनी दि.8/11/2017 रोजी पोलीस स्टेशन, बल्लारपूरला पंजीबध्द डाकेने सदर वाहन जप्तीबाबत माहिती दिल्यानंतर वि.प.यांचे सिजर श्री.निखील मानकर यांनी दि.23/11/2017 रोजी सदर वाहन जप्त करून ताब्यात घेतले. दि.4/8/2016 चे पत्रानुसार तक्रारकर्ती ही रू.9,440/- एवढी रक्कम देणे लागत होती परंतु ही रक्कम पूर्ण थकीत कर्जाची नसून फक्त थकीत कर्ज हप्त्यांची होती. वास्तवीक दि.23/8/2017 रोजीच तक्रारकर्तीचे कर्जाच्या परतफेडीची मुदत संपली असून दि.23/8/2017 पर्यंत तक्रारकर्तीकडे पुढील व्याजाचे व्यतिरीक्त रू.33,612/- कर्जाची थकबाकी आहे. तक्रारकर्ती ही सदर थकीत रकमेचा भरणा करण्यास टाळाटाळ करीत आहे. आजही तक्रारकर्ती ही व्याजासह सदर थकबाकी रकमेचा भरणा करण्यास तयार असल्यास वि.प. हे सदर मोटार सायकल परत करण्यास तयार आहेत. तक्रारकर्तीने सत्य परिस्थिती विद्यमान मंचापासून लपवून वि.प. यांचेविरूध्द खोटी तक्रार दाखल केली असल्याने ग्रा.स.कायद्याचे कलम 26 अंतर्गत खर्च बसवून ती खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
4. तक्रारकर्तीची सुधारीत तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, लेखी युक्तीवाद व विरूध्द पक्षाचे अनुषंगीक सुधारीत लेखी म्हणणे, दस्तावेज, शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद आणी तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीप्रती अनुचित व्यापार पध्दतीचा : होय
अवलंब करून न्युनता पूर्ण सेवा दिली आहे काय ?
2) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. तक्रारकर्ती हिने बजाज ऑटो लिमि.ची बजाज पल्सर 150 डिटीएस हे मॉडेल विकत घेण्याकरिता वि.प.यांचेकडून रू.55,800/- चे अर्थसहाय्य घेतले ही बाब विरूध्द पक्ष यांना मान्य असल्याने तक्रारकर्ती ही विरूध्द पक्ष यांची ग्राहक आहे ही बाब निर्विवाद आहे.
6. सदर कर्जाबाबत उभय पक्षांमध्ये दि.24/6/2015 रोजी करारनामा झाला असून त्यानुसार तक्रारकर्तीस कर्जाची रक्कम रू.55,000/- ही व्याजासह दरमहा रू.2,990/- प्रमाणे 26 महिन्यापर्यंत दि.23/7/2015 ते दि.23/8/2017 या कालावधीमध्ये एकूण रक्कम रू.77,562/- ची परतफेड करायची होती. वि.प. यांनी दि.4/8/2016 चे पत्रान्वये तक्रारकर्तीस कर्जाची रक्कम रू.19,440/- ची मागणी केली. सदर नोटीसमध्ये वि.प. यांनी कोणत्या महिन्याची मागणी केली याचा उल्लेख नाही व तिथे महिने न लिहीता कोरी जागा सोडली आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने दि.9/8/2016 रोजी वि.प. यांना नोटीस पाठवून सदर कर्जासंबंधीच्या करारनाम्याची प्रत व दि.4/8/2016 चे पत्रामध्ये किती महिन्याचे कर्ज बाकी आहे याबाबत उल्लेख नसल्याने खातेउतारा विवरणपत्र (Statement of accounts) व तक्रारकर्तीने भरणा केलेल्या दंड व इंस्टॉलमेंटच्या पावत्या तसेच सदर पत्रान्वये कर्जाची रक्कम रू.19,940/- ची केलेली मागणी कोणत्या आधारे व कशी काढण्यात आली याबाबतचा तपशील मागितला. सदर नोटीस वि.प.यांना प्राप्त झाला. सदर नोटीस, पोस्टाची पावती व पोचपावती तक्रारकर्तीने नि.क्र.5 वर दस्त क्र.2 ते 4 वर दाखल केलेली आहे.
7. तक्रारकर्तीने दि.9/8/2016 रोजी पाठवलेली नोटीस वि.प.यांना प्राप्त झालेली असतांना सुध्दा सदर नोटीसमधील मागणीची पुर्तता न करताच वि.प. यांचे सिजर श्री.निरल पटेल यांनी दि.23/8/2016 रोजी तक्रारकर्तीकडून उपरोक्त वाहन जप्त केले व तक्रारकर्तीने वि.प.यांचेकडे रू.9,000/- चा भरणा केल्यानंतर वि.प.यांनी तक्रारकर्तीस जप्त केलेले वाहन परत केले. परंतु पुन्हा वि.प.यांनी दि.21/8/2017 रोजी तक्रारकर्तीस नोटीस पाठवून सदर कर्जाची रक्कम रू.42,612/- ची मागणी केली व सदर रकमेचा भरणा न केल्याने वि.प.यांचे सिजर श्री.निखील मानकर यांनी दि.23/11/2017 रोजी सदर वाहन पुन्हा जप्त करून ताब्यात घेतले. मात्र तक्रारकर्तीने वि.प.यांना सदर वाहन जप्त करण्यापूर्वी दि.9/8/2016 रोजीच्या नोटीसन्वये मागणी केलेल्या कर्जासंबंधीचा करारनामा प्रत स्टेटमेंट ऑफ अकाऊंट (खातेउतारा विवरणपत्र) ची प्रत व तपशिलवार माहिती व दस्तावेज तक्रारकर्तीस दिले होते याबाबत कोणताही पुरावा व दस्तावेज दाखल केलेले नाहीत. तसेच वि.प.यांनी तक्रारकर्तीस सदर करारनाम्याची प्रत दिली होती व तशी तक्रारकर्तीने पोचपावती दिली हया त्यांच्या कथनापुष्टयर्थ कोणताही दस्तावेज दाखल न केल्याने सदर कथन ग्राहय धरण्यायोग्य नाही. तक्रारकर्तीने सदर कर्जाची किती रक्कम दिली व किती बाकी आहे याबाबतचे कर्जखात्याचे विवरणपत्र (Statement of accounts) वि.प.यांनी दाखल केलेले नाही.
8. सदर कर्जाच्या करारनाम्याची प्रत, स्टेटमेंट ऑफ अकाऊंट (खातेउतारा विवरणपत्र) ची प्रत व त्याबाबत संपूर्ण माहिती मिळणे हा तक्रारकर्तीचा अधिकार असतांनासुध्दा व तक्रारकर्तीने दि.9/8/2016 चे नोटीसद्वारे मागणी केल्यानंतरही वि.प.यांनी सदर दस्तावेज व माहिती देऊन त्याची पूर्तता न करताच सदर वाहन जप्त करून तक्रारकर्तीप्रती न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्ती ही वि.प.यांचेकडून सदर जप्त केलेले वाहन परत मिळण्यांस तसेच वाहन जप्त केल्याने झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
9. वरील मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्तीची तक्रार क्र. 173/2017 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला तिची जप्त केलेली बजाज
पल्सर 150 डिटीएस हे वाहन परत करावे.
(3) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला शारिरीक व मानसीक त्रासाबद्दल
नुकसान भरपाई तसेच तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रीत रक्कम
रू.20,000/- द्यावेत.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.