तक्रार दाखल दि.14.07.2016
तक्रार निकाल दि.14.10.2016
न्यायनिर्णय
द्वारा मा. अध्यक्षा – सौ.सविता पी.भोसले
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे कोल्हापूर येथील कायमचे रहिवाशी असून ते एका छोटया उद्योगधंद्याद्वारे त्यांचा व कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. वि.प.क्र.1 ही नोकीया विविध प्रकारचे मोबाईल फोन उत्पादन करणारे कंपनीचे मुख्यालय आहे. वि.प.क्र.2 हे नोकीयाचे अधिकृत विक्रेते आहेत. वि.प.क्र.3 हे मायक्रोसॉफ्ट नोकीयाचे सेवा देणारे (सर्व्हिस सेंटर) आहे.
तक्रारदाराने त्यांचे मित्र प्रवीण भिमराव ढोले (कुलमुखात्यार धारक) यांना भेट देणेसाठी मोबाईल फोनची खरेदी करण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने, वि.प.क्र.2 यांचे लक्ष्मीपूरी, कोल्हापूर येथील मोबाईल मॉल दि.08.06.2015 रोजी मोबाईल नोकीया 1520 (35834205078764) अॅन्ड्राईड फोन खरेदी केला व त्याचा मोबाईल म्हणून रक्कम रु.32,000/- वि.प.क्र.2 यांना अदा केले. प्रस्तुत मोबाईल खरेदी केलेनंतर त्यामध्ये वारंवार दोष दिसून आले. त्याचा डिस्प्ले क्लीयर नसणे, चालू फोन अचानक बंद पडणे, व्हाईस ब्रेक होणे, अशा अनेक तक्रारीं दिसून येऊ लागल्या. त्यामुळे मोबाईलचा वापर करणारे कुलमुखत्यार प्रविण ढोले यांनी वि.प.क्र.2 यांचेकडे सदर मोबाईल खराब असलेबाबत तक्रारी मांडल्या असता, त्यांनी मोबाईल वॉंरंटीमध्ये असलेने वि.प.क्र.3 यांचेकडे दाखवा असे सांगितलेने तक्रारदार यांनी सदरचा मोबाईल वि.प.क्र.3 कडे मोबाईल दाखवला असता, त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात सदर मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करुन दिला. परंतु पुन्हा पुन्हा सदर मोबाईलच्या तक्रारी वाढत गेल्या व मोबाईल हॅन्डसेट पूर्ण निकामी झाला. पुन्हा तक्रारदाराने सदर मोबाईल वि.प.क्र.3 कडे दुरुस्तीसाठी दिला व त्यानंतर वारंवार हेलपाटे मारुनही वि.प.क्र.3 ने मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही तर तो वि.प.क्र.1 यांचेकडे बदलून मागवणेसाठी पाठविला असल्याचे सांगितले व सदरचा मोबाईल आजअखेर वि.प.यांचे ताब्यात आहे तो अद्याप वि.प.ने तक्रारदार यांना दुरुस्त करुन अथवा बदलून दिलेला नाही. अशा प्रकारे तक्रारदारांना वि.प.यांनी सेवात्रुटी दिलेमुळे तक्रारदाराला प्रचंड मानसिक त्रास झालेला आहे. सबब, सदर मोबाईल हॅन्डसेटची किंमत रु.32,000/- वि.प.कडून परत मिळाणेत अथवा त्याच मॉडेलचा नवा मोबाईल हॅन्डसेट बदलून मिळावा यासाठी प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने मे.मंचात दाखल केला आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5चे कागदयादी सोबत नि.5/1 ते नि.5/3 कडे अनुक्रमे मोबाईल खरेदीची पावती, जॉब सर्व्हीसशीटची प्रत, कुलमुखत्यारपत्र, पुराव्याचे शपथपत्र, वि.प.क्र.1 ला नोटीस बजावणी झालेचे पोस्ट खात्याचा डिलीव्हरी रिपोर्ट, पुराव्याचे शपथपत्र हाच लेखी पुरावा समजणे यावा म्हणून पुरशीस, वगैरे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. वि.प.क्र.1 ते 3 यांना नोटीस लागू होऊनही प्रस्तुत वि.प.हे सदर कामी मे.मंचात उपस्थित राहीलेले नाहीत. सबब, वि.प.क्र.1 ते 3 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश निशाणी-1 वर पारीत झाला आहे. वि.प.यांनी प्रस्तुत कामी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.
5. वर नमुद तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | अंतिम आदेश काय ? | खालील नमुद आदेशाप्रमाणे |
विवेचन :-
6. मुद्दा क्र.1 ते 3 :- वर नमुद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने वि.प.यांचेकडून वादातीत मोबाईल हॅन्डसेट खरेदी केलेची पावती दाखल केली आहे. तसेच मोबाईल दुरुस्तीची जॉबशीट दाखल केली आहे. त्याचप्रमाणे वि.प.क्र.1 ते 3 यांना नोटीस लागू होऊनही प्रस्तुत वि.प.क्र.1 ते 3 हे मे.मंचात या कामी हजर राहीलेले नाहीत. सबब, वि.प.क्र.1 ते 3 विरुध्द निशाणी-1 वर एकतर्फा आदेश पारीत झाला आहे. वि.प.यांनी तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब, तक्रारदाराने तक्रार अर्ज व पुराव्याचे शपथपत्रात केलेले सर्व कथनांवर विश्वासार्हता दाखवणे न्यायोचित होईल. तसेच वि.प.यांनी तक्रारदाराचा मोबाईल हॅन्डसेट व्यवस्थित दुरुस्त करुन दिला नाही अथवा बदलून दिलेला नाही. अद्याप तक्रादाराचा वादातीत मोबार्इल हॅन्डसेट वि.प.यांचेच ताब्यात आहे. अशाप्रकारे सदोष मोबाईल हॅन्डसेटची तक्रारदाराला विक्री करुन तसेच तो व्यवस्थित दुरुस्त करुन न दिलेने अथवा नवीन मोबाईल हॅन्डसेट बदलून न दिलेने वि.प.यांनी तक्रारदाराला अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदोष सेवा पुरविली आहे ही बाब निर्विवादपणे सिध्द झाली आहे. सबब, आम्हीं मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वरील सर्व कागदपत्रे, विवेचन यांचा ऊहापोह करता, तक्रारदारा हे वि.प.यांचेकडून वादातीत मोबाईल हॅन्डसेटची किंमत रु.32,000/-, 9टक्के व्याजासहीत अथवा सदर मॉडेलचाचा नवीन हॅन्डसेट मिळणेस पात्र आहेत. तसेच मानसिक, शारिरीक त्रास म्हणून रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.3000/- मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे.
8. सबब, सदर कामी आम्हीं खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत आला.
2 वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराला वादातीत मोबाईल हॅन्डसेटची किंमत रक्कम रु.32,000/- (अक्षरी रक्कम रुपये बत्तीस हजार फक्त), दि.08.06.2015 पासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह अदा करावी.
अथवा
वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराला नमुद मॉडेलचाच नवीन मोबाईल हॅन्डसेट अदा करावा.
3 वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रक्कम दहा हजार फक्त) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रक्कम रुपये तीन हजार फक्त) अदा करावेत.
4 वरील सर्व आदेशांची पुर्तता आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत वि.प.यांनी अदा करावी.
5 विहीत मुदतीत वि.प.यांनी आदेशांचे पालन न केलेस तक्रारदाराला वि.प.यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
6 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.