(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांनी मेट्रो इलेक्ट्रॉनिक्स / सामनेवाले नं. 2 यांच्या कडुन मायक्रोमॅक्स कंपनीचा ‘कॅन्व्हास ज्युस’ – ए 177 या मॉडेलचा मोबाईल ता. 16/05/2014 रोजी विकत घेतला. सदर मोबाईल करीता मायक्रोमॅक्स कंपनीने एक वर्षाच्या कालावधीसाठी हमी दिली आहे.
2. तक्रारदारांचा मोबाईल विकत घेतल्यानंतर केवळ 4 महिन्यातच सप्टेंबर 2014 मध्ये नादुरूस्त झाला. मोबाईलमध्ये डिस्पलेचा प्रॉब्लेम असल्यामुळे ता. 06/09/2014 रोजी दुरूस्तीसाठी सामनेवाले नं. 2 यांचेकडे दिला. सामनेवाले नं. 2 यांनी सदर मोबाईल दुरूस्तीसाठी सामनेवाले नं. 1 यांचेकडे ता. 15/09/2014 रोजी दिला.
3. सामनेवाले नं. 2 यांनी ता. 11/11/2014 रोजी मोबाईल दुरूस्त झाल्याचे फोन वर सांगितले व सदर मोबाईल सामनेवाले नं. 1 यांचेकडुन घेण्याबाबत सुचना केली.
4. तक्रारदार सामनेवाले नं. 1 यांचेकडे मोबाईल घेण्यासाठी गेले असता तक्रारदारांच्या मोबाईलची दुरूस्ती होवु शकत नसल्यामुळे कंपनीने दुसरा मोबाईल बदलून पाठविल्याचे सांगितले. तक्रारदारांनी दुस-या मोबाईलची पाहणी केली असता सदर मोबाईल जुना असल्याचे आढळले. त्यामुळे तक्रारदारांनी जुना मोबाईल घेण्यास नकार दिला.
5. तक्रारदारांनी त्यानंतर सामनेवाले नं. 1 यांचेकडे व सामनेवाले नं. 2 यांचेकडे संपर्क केला. तथापी तक्रारदारांच्या मोबाईलची दुरूस्ती होवू शकली नाही. तसेच मोबाईलची दुरूस्ती होवु शकत नसल्यास नविन मोबाईल ही बदलून अद्यापपर्यंत प्राप्त झाला नाही. सामनेवाले 1 व 2 यांनी तक्रारदारांची फसवणूक केली असुन वॉरंटी कालावधीत मोबाईल नादुरूस्त झालेला असुनही नवीन मोबाईल बदलून न देता जुना मोबाईल देण्याचा प्रयत्न केला. सामनेवाले नं. 1 व 2 यांची सदरची कृती व्यापाराची अनुचित पध्दती आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
6. सामनेवाले नं. 1 व 2 यांना मंचाची नोटिस प्राप्त होवुनही गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्द ‘एकतर्फा’ आदेश पारित करण्यात आला. तक्रादारांनी पुरावाशपथपत्र दाखल केले. पुरावा शपथपत्र हाच लेखी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरशिस दाखल केली. तक्रारदारांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. त्यावरुन खालील प्रमाणे मंच निष्कर्ष काढत आहे.
7. कारण मिमांसा
अ) तक्रारदारांनी मेट्रो इलेक्ट्रॉनिक्स सामनेवाले नं 2 यांचेकडुन ता. 16/05/2014 रोजी मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल रक्कम रु. 8,000/- चा विकत घेतल्याबाबतची पावती मंचात दाखल आहे.
ब) तक्रारदारांच्या मोबाईलचे ता.15/09/2014 रोजीचे जॉब शिट मंचात दाखल आहे. सदर जॉब शिट नुसार तक्रारदारांच्या मोबाईलमध्ये “4101 POWER DOES NOT SWITCH ON” प्राब्लेम रिर्पोटेड झाल्याचे नमुद केले आहे. सामनेवाले कँपनीने ता. 20/10/2014 रोजीच्या इमेलद्वारे जॉबशीटची प्रत पाठविण्याबाबत नमुद केले आहे. व त्यानंतर ता. 22/11/2014 राजीच्या इमेलद्वारे जॉबशीट WO 30506091412182344 बंद झालेली असुन पुढील कार्यवाहीसाठी संपर्क करण्याबाबत सूचना केल्याचे दिसुन येते. यावरुन तक्रारदारांचा मोबाईल वॉरंटी कालावधीत नादुरूस्त झाल्याचे स्पष्ट होते.
क) तक्रारदारांनी मोबाईल विकत घेतल्यानंतर केवळ 4 महिन्याच्या कालावधीत नादुरूस्त झाला. त्यानंतर सामनेवाले कंपनीने मोबाईलची दुरूस्ती वॉरंटी कालाधीत होवू शकत नसल्यामुळे मोबाईल बदलून देण्याची तयारी दर्शवली. अशा परिस्थितीत सदर मोबाईलमध्ये ‘उत्पादकीय दोष’ असल्याचे स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले कंपनीने नवीन मोबाईल बदलून देण्याचे ऐवजी जूना मोबाईल देण्याचा प्रयत्न केला. तक्रारदारांनी जूना मोबाईल घेण्यास नकार दिला. तक्रारदाराच्या मोबाईलचा मदर बोर्ड खराब झाल्याचे सामनेवाले नं. 1 व 2 यांनी सांगितले. यावरुन तक्रारदारांच्या मोबाईलच्या बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम असल्याची शक्यता नाही. तथापी जुन्या मॉडेलमध्ये मदरबोर्ड बसवुन देण्याचा प्रयत्न सामनेवाले नं. 1 व 2 यांनी केला आहे. सामनेवाले नं. 1 व 2 यांची सदरची कृती व्यापाराची अनुचित पध्दती असल्याचे स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे.
ड) प्रस्तुत प्रकरणात सामनेवाले यांचा आक्षेप दाखल नाही. तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे. सबब तक्रारदारांना सामनेवाले यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या दोषयुक्त मोबाईल बदलून नवीन मोबाईल वॉरंटीसहीत देणे अथवा मोबाईलची किंमत रु. 8,000/- तक्रारदारांना देणे न्यायोचित आहे असे मंचाचे मत आहे.
8. उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्र. 685/2014 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले 1 व 2 यांनी तक्रारदारांना उत्पादकीय दोषयुक्त मोबाईलची विक्री करुन सदोष सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले 1 व 2 यांना वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तिकरित्या आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना जुना दोषयुक्त मोबाईल बदलुन ‘कॅन्व्हास ज्युस’ – ए 177 या मॉडेलचा नवीन सिलबंद मोबाईल वॉरंटी सहीत ता. 30/09/2016 पर्यंत द्यावा.
अथवा
4) सामनेववाले 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मोबाईलची किंमत रु. 8,000/-(रु. आठ हजार फक्त) ता. 16/05/2014 पासुन ता. 30/09/2016 पर्यंत 6% व्याजदराने द्यावी. तसे न केल्यास ता. 16/05/2014 पासुन आदेशाच्या पुर्ततेपर्यंत 9% व्याजदराने द्यावी.
5) सामनेवाले 1 व 2 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु. 2,500/- (रु. दोन हजार पाचशे फक्त) व तक्रारीचा खर्चाची रक्कम रु. 2,500/- (रु. दोन हजार पाचशे फक्त) ता. 30/09/2016 पर्यंत द्यावी.
6) आदेशाच्या प्रती उभय पक्षकाराना विनाविलंब, विनाशुल्क पाठविण्यात याव्यात.
7) तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदारांना परत करावेत.
ठिकाण – ठाणे.
दिनांक – 18/06/2016