जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
तक्रार क्रमांक:-270/2014
तक्रार दाखल दिनांक:-19/11/2014
तक्रार आदेश दिनांक:-19/08/2015
निकाल कालावधी 0वर्षे10म0दि
उघडे विजयकुमार भगवान(संपादक:दैनिक सोलापूरचा जय हो)
41,भारत हौसिंग सोसायटी,महादेव चौक,सोलापूर.03 ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
1) मायक्रोमॅक्स मोबाईल कंपनी,
एम/एस स्पेकटॅक्युलर मिडिया मार्केटिंक प्रा.लि.
फस्ट फ्लोअर,एमपीयल नं.4948,प्लॉट नं.47,
ऑपोझिट पार्क दरवागनी,नवी दिल्ली.
2) मायक्रोमॅक्स मोबाईल कंपनी,होम शॉपी 18.कॉम
कस्टमर केअर: कॉल-18601800918
3) मायक्रोमॅक्स मोबाईल कंपनी,वी केअर अँथेराईझ्ड सर्व्हिस सेंटर,
शॉप नं.11,ग्राऊंड फ्लोअर,वॉटर फ्रंट पेस-1,
विजापूर रोड,सोलापूर.04 ..विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदार:-स्वत: हजर
विरुध्दपक्ष:-एकतर्फा
-:निकालपत्र:-
(पारीत दिनांक:-19/08/2015)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
(2) त.क्र.270/2014
1. अर्जदाराने गैरअर्जदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
2. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार यांनी विरुध्दपक्ष नं.1 यांनी उत्पादीत केलेला मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल मॉडेल नं.बोल्ट ए-34, त्याचा IMEI No.911326555307161 आणि ESN No.911326555307179 हा रु.3599/- रुपयास विरुध्दपक्ष नं.2 यांचेकडून खरेदी केला. सदरचा मोबाईल वापरताना तो बंद पडत होता. म्हणून विरुध्दपक्ष नं.1 यांचे केअर सेंटर असलेल्या विरुध्दपक्ष नं.3 कडे दुरुस्तीसाठी दिलाअसता तो त्यांनी दुरुस्त करुन दिला. परंतू सदरचा मोबाईल व्यवस्थित दुरुस्त करुन दिला नाही. तो पुन्हा पुन्हा सदरचा मोबाईल बंद पडू लागला म्हणून पुन्हा विरुध्दपक्ष नं.3 कडे गेलेअसता तो त्यांनी वॉरंटीच्या काळात दुरुस्त करुन दिला नाही. म्हणून प्रस्तूत तक्रार विरुध्दपक्ष यांचेविरुध्द दाखल करुन मोबाईलची घेतलेली किंमत रु.3599/- व नुकसान भरपाई रु.80,000/- मिळावेत व मानसिक, शारीरीक त्रासपोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
3. गैरअर्जदार नं.1 ते 3 यांना तक्रार नोंदणी करुन नोटीस काढण्यात आली. सदरची नोटीस गैरअर्जदार नं.1 ते 3 यांना बजावणी झाली त्या निशाणी 5, 6 व 8 वर दाखल आहे. तरीही गैरअर्जदार नं.1 ते 3 हे वि. मंचासमक्ष हजर झाले नाही. त्यामुळे प्रकरण गैरअर्जदार नं.1 ते 3 यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्यात यावे, असा आदेश निशाणी 1 वर पारीत करण्यात आला.
4. अर्जदाराने तक्रार अर्जातील कथनाचे पुष्ठयर्थ निशाणी 3 कडे 2 कागदपत्रे हजर केलेली आहेत. गैरअर्जदार नं.1 ते 3 यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश निशाणी 1 वर पारीत केलेला असल्यामुळे उपलब्ध कागदपत्र, तसेच अर्जदाराची तक्रार, त्यांचा युक्तीवाद व प्रतिज्ञापत्र यावरुन सदर प्रकरण निकाली करणे करीता ठेवण्यात आले.
5. अर्जदाराची तक्रार, दाखल केलेले दस्तावेज व युक्तीवाद यावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? होय
(3) त.क्र.270/2014
2. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना खराब मोबाईल देऊन दुषित सेवा
दिली आहे का ? होय
3. विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्ता हे नुकसान भरपाई किंवा मोबाईलची
किंमत मिळणेस पात्र आहेत का? होय
4. आदेश काय ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारण मिमांसा
6. मुद्दा क्र.1 :- तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष नं.1 यांनी उत्पादीत केलेला मायक्रोमॅक्स कंपनीचा बोल्ट ए-34 या मॉडेलचा मोबाईल रु.3599/- रुपयास दि.21/04/2014 रोजी विरुध्दपक्ष नं.2 मार्फत खरेदी केला आहे हे नि.3/1 वरील पावती वरुन दिसून येत आहे. सदर मोबाईल नादुरुस्त झालेनंतर तो दुरुस्त करणेचा प्रयत्न विरुध्दपक्ष नं.3 यांचे मार्फत करणेत आलेला आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष नं.1 ते 3 यांचे तक्रारकर्ता हे ग्राहक ठरतात. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देणेत येत आहे.
7. मुद्दा क्र.2 व 3:- तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष नं.1 यांनी उत्पादीत केलेला मोबाईल विरुध्दपक्ष नं.2 यांचे मार्फत खरेदी केल्याचे उपलब्ध कागदपत्रावरुन दिसून येते. मोबाईलचा मॉडेल नं.बोल्ट ए-34 असा आहे. सदर मोबाईल मॉडेलचा IMEI No.911326555307161 आणि ESN No.911326555307179 असा आहे. सदर मोबाईल बिघडल्यानंतर तो विरुध्दपक्ष नं.3 यांचेमार्फत दुरुस्त करणेचा प्रयत्न केलेला दिसून येतो. विरुध्दपक्ष नं.3 हे विरुध्द पक्ष नं.1 यांचे अधिकृत सर्व्हीस सेंटर असलयाचे दिसून येते. सदर मोबाईल विरुध्दपक्ष नं.3 यांनी दुरुस्ती करुन दिला. परंतू तो पुन्हा बंद पडला. त्यानंतर तो विरुध्दपक्ष यांनी दुरुस्त करुन दिला नाही अशी तक्रारकर्ताची तक्रार आहे. प्रस्तूत कामी नि.3/2 कडे दाखल कागदपत्रे पाहता सदर मोबाईल व्यवस्थित चालू होत नव्हता तर व्यवस्थित बंदही होत नव्हता. तसेच त्या मोबाईलची बॅटरीमध्ये बिघाड असल्याचे दिसून येते. सदर दोष विरुध्दपक्ष नं.3 यांनी दूर करणेसाठी अनेक पार्टस् बदलले असल्याचे नि.3/2 वरील कागदपत्रावरुन दिसून येते. सदर मोबाईल वॉरंटी कालावधीमध्ये बिघाडलेला असल्याचे दिसून येते. अशा त-हेने सदर मोबाईल दि.23/10/2014 रोजी पुन्हा बिघाडलेनंतर वॉरंटी कालावधी असतांना विरुध्दपक्ष यांनी तो दुरुस्त करुन दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले.
(4) त.क्र.270/2014
मात्र विरुध्दपक्ष नं.1 ते 3 यांनी प्रस्तूत कामी हजर होऊन आपला लेखी खुलासा मांडून तक्रारकर्ताची तक्रारीविषयक मुद्दे खोडून काढले नाहीत. त्यामुळे विरुध्दपक्ष नं.1 ते 3 यांना तक्रारकर्ताची तक्रार मान्य असल्याचे अनुमान वि.मंच काढीत आहे.
8. विरुध्दपक्ष यांनी सदर नादुरुस्त मोबाईलमुळे रु.80,000/- चे नुकसान झालेचे नमूद केले आहे. मात्र त्याबाबत उचीत पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्ताची नुकसान भरपाईची मागणी मान्य करता येणार नाही असे वि.मंचास वाटते.
9. अशा त-हेने अर्जदार हे आपल्या न्याय हक्कासाठी व मोबाईल दुरुस्त होऊन मिळणेसाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे हे सर्व कागदपत्रावरुन दिसून येते. मात्र तरीही गैरअर्जदार यांनी सदर मोबाईल दुरुस्त करुन देणेसाठी कोणतीही कृती केली नाही. एवढेच नव्हे तर वि.मंचाची नोटीस मिळूनही या मंचासमक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडण्याची तसदी गैरअर्जदार यांनी घेतली नाही. यावरुन गैरअर्जदार नं.1 ते यांची नकारात्मक मानसिकता दिसून येते.
10. वरील सर्व विवेचनावरुन मंचाचे स्पष्ट मत आहे की, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना खराब मोबाईल देऊन तसेच विक्री पश्चात योग्य सेवा न देता दुषित व त्रुटीची सेवा दिली असल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे अर्जदाराने खरेदी केलेला मोबाईलची किंमत रु.3599/- परत मिळणेस अर्जदार पात्र आहे, असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
11. अर्जदार यांना झालेल्या मानसिक, शारीरीक त्रासापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.2,000/- मंजूर करावे असे मंचास न्यायोचित वाटते.
12. एकंदरीत वरील कारणे व निष्कर्ष यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात न्युनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे मंचा आलेले असल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
-: आ दे श :-
1. अर्जदार यांचा गैरअर्जदार नं.1 ते 3 विरुध्दचा तक्रार अर्ज अशंत: मंजुर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार नं.1 ते 3 यांनी मोबाईल खरेदीपोटी तक्रारकर्ताकडून स्विकारलेली रक्कम रु.3599/- तक्रारकर्ता यांना परत करावी.
(5) त.क्र.270/2014
3. गैरअर्जदार नं.1 ते 3 यांनी सदर रक्कम परत केलेनंतर तक्रारकर्ता यांनी त्यांचे ताब्यातील मोबाईल गैरअर्जदार यांना परत करावा.
4. गैरअर्जदार नं.1 ते 3 यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक, शारीरीक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) अदा करावेत.
5. गैरअर्जदार नं.1 ते 3 यांनी सदर आदेशाची अंमलबजावणी आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी.
6. निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यांत.
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ. बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
दापांशिंस्वलि0171908150