(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून खरेदी केलेला मोबाईल हँडसेट क्यु 75 ची किंमत रु.5100/- सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून देववावी, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून मिळावेत व इतर हुकूम व्हावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला नं.1अ,2 व 3 हे न्यायमंचाची नोटीस लागूनही मंचात हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांचेविरुध्द दि.30/11/2011 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आले.
अर्जदार यांच्या दि.19/01/2012 रोजीच्या पान क्र.22 च्या अर्जावरील आदेशाप्रमाणे सामनेवाला नं.1ब यांचे नाव या तक्रार अर्जातून कमी करण्यात आलेले आहे.
अर्जदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय. अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-होय.
3) अर्जदार हे सामनेवाला नं.1अ व 2 यांचेकडून मोबाईलच्या किंमतीपोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. अर्जदार हे सामनेवाला क्र.1अ व 2 यांचेकडून मोबाईलची रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत.
4) अर्जदार हे मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. अर्जदार हे सामनेवाला क्र.1अ व 2 यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत.
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1अ व 2 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे व सामनेवाला क्र.3 यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
याकामी अर्जदार यांचे वतीने पान क्र.23 लगत तक्रार व शपथपत्र यातील मजकूर हाच युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केलेली आहे. तसेच अर्जदार यांनी स्वतः तोंडी युक्तीवाद केलेला आहे.
अर्जदार यांनी सामनेवाला क्र.3 यांचेकडून दि.01/09/2010 रोजी मायक्रोमॅक्स क्यु 75 हॅण्डसेट रक्कम रु.5100/- ला विकत घेतल्याची मुळ अस्सल पावती पान क्र.5 लगत हजर केलेली आहे. सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणे दाखल करुन त्यांचेकडून मोबाईल घेतल्याची बाब नाकारलेली नाही. सामनेवाला क्र.1 हे मोबाईल उत्पादक कंपनी आहेत व सामनेवाला क्र.2 हे मोबाईल दुरुस्त करणारे सर्व्हीस सेंटर आहे. सामनेवाला क्र.3 हे मोबाईल विक्रेते आहेत. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र व पान क्र.5 ची पावती यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी पान क्र.5 लगत सामनेवाला क्र.3 यांची मोबाईल खरेदीची रक्कम रु.5100/- ची पावती हजर केलेली आहे तसेच पान क्र.6 लगत कस्टमर डिटेल्स कम वारंटी कार्ड व पान क्र.7 लगत सर्व्हीस सेंटरमधील काऊंटर स्टाफने लिहून दिलेली नोट ची प्रत दाखल केलेली आहेत.
अर्जदार यांनी वादातील मोबाईल मंचासमोर दाखवण्यासाठी हजर केलेला होता. या मोबाईलची पाहाणी मंचाचे अध्यक्ष व सदस्या यांनी स्वतः केली असता वादातील मोबाईल हा बंद अवस्थेत आढळून आलेला आहे. अर्जदार यांनी दि.01/09/2010 रोजी खरेदी केलेला मोबाईल दि.30/10/2010 रोजी म्हणजे सुमारे 1 महिन्याचे आतच नादुरुस्त झालेला आहे. हा मोबाईल योग्य प्रकारे दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.1अ व 2 यांचेवर होती आहे. अर्जदार यांचा मोबाईल पान क्र.6 चे वारंटी कार्डप्रमाणे वारंटी मुदतीच खराब झालेला आहे हे स्पष्ट होत आहे. परंतु सामनेवाला 1 अ व 2 यांनी वादातील मोबाईल अर्जदार यांना दुरुस्त करुन परत दिलेला नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.1 अ व 2 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी मोबाईलची किंमत रु.5100/- सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून परत मिळावी अशी मागणी केलेली आहे. पान क्र.5 चे पावतीचा विचार होता अर्जदार यांनी रक्कम रु.5100/- देवून वादातील मोबाईल खरेदी घेतलेला आहे हे स्पष्ट होत आहे. पान क्र.5 चे पावतीचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1अ व 2 यांचेकडून वैय्यक्तीक व संयुक्तीकरित्या मोबाईलची किंमत म्हणून रक्कम रु.5100/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून वादातील मोबाईल किंमत मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. यामुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1अ व 2 यांचेकडून वैय्यक्तीक व संयुक्तीक रित्या मानसिक त्रासापोटी रु.2500/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये सामनेवाला क्र.3 यांचेविरुध्द कोणतीही मागणी केलेली नाही यामुळे अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.3 यांचेविरुध्द नामंजूर करण्यात यावा असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, युक्तीवादाबाबतची पुरसीस व तोंडी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.3 यांचेविरुध्द नामंजूर करण्यात
येत आहे.
2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1अ व 2 यांचेविरुध्द अंशतः मंजूर
करण्यात येत आहे.
3) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला क्र.1अ व 2 यांनी वैय्यक्तीक व
संयुक्तीक रित्या अर्जदार यांना मोबाईलचे किंमतीपोटी रक्कम रु.5100/-
द्यावेत.
4) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1अ व 2 यांनी वैय्यक्तीक
व संयुक्तीक रित्या अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
अ) मानसिक त्रासापोटी रु.2500/- द्यावेत.
ब) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.