(पारीत दिनांक : 15 एप्रिल, 2019)
आदेश पारीत व्दारा – श्रीमती स्मिता एन.चांदेकर, सदस्या -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम – 12 अन्वये तक्रारकर्त्याने या तक्रारीव्दारे विरुध्दपक्षा विरुध्द त्याने सेवेत कमतरता ठेवली म्हणून सदर तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता वकीलीचा व्यवसाय करीत असुन त्याकरीता तसेच वैयक्तिक वापराकरीता त्याला ड्युअल सिम कार्ड मोबाईल घ्यावयाचा होता. तक्रारकर्त्याला त्याच्या वापरा योग्य मोबाईल सॅमसंग कंपनीचे गॅलक्सी मॉडेल मध्ये उपलब्ध असल्यामुळे त्याने विरुध्दपक्ष क्रं.2 याचेकडे सॅमसंग मोबाईलची मागणी केली. परंतु, विरुध्दपक्ष क्रं.2 यांनी तक्रारकर्त्याला “Micromax CANVAS NITRO” या मोबाईलमध्ये सॅमसंग कंपनीच्या मोबाईल पेक्षा जास्त वैशिष्टे असुन तो कमी किंमतीत मिळेल असे सांगितले व मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल घेण्यास प्रवृत्त केले. विरुध्दपक्ष क्रं.2 च्या म्हणण्यावर विश्वास ठेवून तक्रारकर्त्याने दिनाक 4.8.2015 रोजी “Micromax CANVAS NITRO” हा मोबाईल रुपये 9,370/- मध्ये खरेदी केला. सरुवातीला काही दिवस मोबाईल व्यवस्थित काम करीत होता, परंतु थोड्याच दिवसात मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्टीविटीचा त्रास सुरु झाला. तक्रारकर्त्याला कोणतीही साईट ओपन करण्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यामुळे फार काळ वाट पाहावी लागत होती. त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये लाऊडस्पिकर मोडवर आवाज न येणे, Crashing of applications व टच स्क्रिन काम न करणे तसेच रिंगीग टोनमध्ये बिघाड निर्माण झाले, त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर मोबाईल दिनांक 29.10.2015 रोजी विरुध्दपक्ष क्रं.3 कडे दुरुस्तीला दिला. विरुध्दपक्ष क्रं.3 यांनी तक्रारकर्त्याला मोबाईलची जॉबशिट दिली व काही दिवसांनी येण्यास सांगितले. त्याचप्रमाणे मोबाईल वॉरंटीच्या कालावधीत असतांनाही मोबाईलमध्ये मोठा बिघाड झाल्यामुळे लेवल थ्री चार्जेस रुपये 250/- तक्रारकर्त्याला दुरुस्तीकरीता द्यावे लागतील असे सांगण्यात आले.
3. तक्रारकर्ता पुढे असे नमुद करतो की, त्याने विरुध्दपक्ष क्रं.3 ला मोबाईलमधील सर्व बिघाडाबद्दल सांगितल्यावरही विरुध्दपक्ष क्रं.3 ने केवळ रिंगीग टोनमध्ये बिघाड असल्याचे जॉबशिटमध्ये नमुद केले आहे. सदर मोबाईल हा विरुध्दपक्ष क्रं.1 कडे दुरुस्तीकरीता पाठविण्यात येणार असल्यामुळे मोबाईल परत केंव्हा मिळेल याबाबत विरुध्दपक्ष क्रं.3 ने तक्रारकर्त्याला निश्चितपणे न सांगता व काही दिवसांनी चौकशी करण्यास सांगितले. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला मोबाईल परत न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 24.12.2015 रोजी ई-मेल व्दारे नोटीस पाठवून विरुध्दपक्ष क्रं.1 ला मोबाईलची किंमत परत करण्यास कळविले. परंतु, विरुध्दपक्ष क्रं.1 ने तक्रारकर्त्याला 24 तासात प्रतिसाद देतो असे कळवून कुठलेही उत्तर दिले नाही तसेच तक्रारकर्त्याला त्याचा मोबाईल परत केला नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल केली असुन विरुध्दपक्षांनी सेवेत त्रुटी केल्यामुळे त्याला मोबाईलची किंमत रुपये 9,370/- दिनांक 4.8.2015 पासुन 18 % व्याजाने परत करावे, तसेच नुकसान भरपाईपोटी रुपये 50,000/- द्यावेत अशी मागणी केलेली आहे.
4. मंचाव्दारे पाठविलेला नोटीस विरुध्दपक्ष क्रं.1 व 3 यांना प्राप्त होऊनही ते मंचासमक्ष हजर झाले नाही त्यामुळे प्रकरण विरुध्दपक्ष क्रं.1 व 3 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
5. विरुध्दपक्ष क्रं.2 ने त्यांचे लेखीउत्तर नि.क्र.12 वर दाखल केले आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 4.8.2015 रोजी रुपये 9,370/- मध्ये “Micromax CANVAS NITRO” हा मोबाईल घेतल्याची बाब मान्य केली आहे. सदर विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील इतर परिच्छेद निहाय् कथन अमान्य केलेले असुन त्याच्या विशेष कथनात असे नमुद केले आहे की, ते विविध कंपनीचे मोबाईल ग्राहकांना विकतात तसेच मोबाईल देतांना तपासुन दिला जातो. सदर मोबाईल ग्राहकांना दिल्यावर विरुध्दपक्ष क्रं.2 यांची जबाबदारी संपते. मोबाईलमध्ये काही बिघाड आल्यास ग्राहक कंपनीच्या अधिकृत सेवा केंद्रातुन दुरुस्त करुन घेऊ शकतात. मोबाईल विकल्यानंतर त्यामधील कुठल्याही तांत्रिक तथा यांत्रिक बिघाडाकरीता विरुध्दपक्ष क्रं.2 जबाबदार नसतो असे त्याच्या लेखीउत्तरात नमुद केले आहे.
6. तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीच्या पृष्ठ्यर्थ मोबाईलचे बिल, तसेच दुरुस्तीला दिल्याचे जॉबकार्ड, ई-मेल व्दारे पाठविलेल्या नोटीसच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहेत.
7. तक्रारकर्ताचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. युक्तिवादाचे दरम्यान विरुध्दपक्ष क्रं.2 गैरहजर. मंचासमोर अभिलेखावर दाखल दस्तऐवज, उत्तर, प्रतीउत्तर, व लेखीयुक्तिवादाचे अवलोकन केले असता मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे.
// निष्कर्ष //
8. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं.2 कडून “Micromax CANVAS NITRO” मोबाईल रुपये 9,370/- दिनांक 4.8.2015 रोजी खरेदी केला ही बाब अभिलेखावर दाखल टॅक्स इनवॉईस वरुन स्पष्ट होते. त्याचप्रमाणे सदर मोबाईलमध्ये बिघाड आल्यामुळे त्याने विरुध्दपक्ष क्रं.3 मायक्रोमॅक्स कंपनीच्या अधिकृत सेवा केंद्रात दुरुस्तीकरीता दिला ही बाब देखील अभिलेखावरील जॉबशिटवरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्ष क्रं.3 ने मोबाईल दुरुस्त करुन न दिल्यामुळे त्याने विरुध्दपक्ष क्रं.1 ला ई-मेल व्दारे नोटीस पाठविला होता. सदर नोटीसची प्रत तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेली आहे. त्याचप्रमाणे सदर नोटीस विरुध्दपक्ष क्रं.1 यांना प्राप्त झाल्याबाबत विरुध्दपक्ष क्रं.1 ने तक्रारकर्त्याच्या वकीलाला पाठविलेल्या ई-मेलची प्रत देखी अभिलेखावर दाखल केली आहे. सदर ई-मेल मध्ये विरुध्दपक्ष क्रं.1 ने तक्रारकर्त्याच्या तक्रारीस 24 तासात प्रतिसाद देण्यात येईल असे कळविल्याचे दिसुन येते. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्ष क्रं.1 ने त्यानंतर त्याला कुठलेही उत्तर दिले नाही तसेच त्याचा मोबाईल देखील दुरुस्त करुन परत दिलेला नाही. विरुध्दपक्ष क्रं.1 व 3 ने तक्रारकर्त्याचे सदर म्हणणे हे खोडून काढलेले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन हे अबाधित राहाते.
9. अभिलेखावरील कागदपत्रांवरुन असे दिसुन येते की, तक्रारकर्त्याचा मोबाईल खरेदी केल्यापासुन दोन महिन्यातच वॉरंटी कालावधीमध्ये बिघडलेला आहे त्यामुळे सदर मोबाईल विनामुल्य दुरुस्त करुन देणेही विरुध्दपक्ष क्रं.1 व 3 ची जबाबदारी होती, परंतु तसे न करुन विरुध्दपक्ष क्रं.1 व 3 यांनी सेवेत त्रुटी केली असे मंचाचे मत आहे.
10. त्यामुळे तक्रारकर्ता हा त्याचे मागणीनुसार मोबाईलची किंमत रुपये 9,370/- मोबाईल खरेदीचा दिनांक 4.8.2015 पासुन द.सा.द.शे.6 % व्याजाने मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्यास देखील पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं.2 हे मोबाईल विक्रेता असुन त्यांनी सेवेत त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही त्यामुळे त्यांचे विरुध्द तक्रार खारीज करण्यात येते. सबब, खालील प्रमाणे आदेश देण्यात येते.
- आदेश –
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्रं.1 व 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला मोबाईलची किंमत रुपये 9,370/- दिनांक 4.8.2015 पासुन प्रत्यक्ष अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 6% व्याज दराने परत करावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष क्रं.1 व 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 3000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष क्रं.1 व 3 यांनी सदर आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आंत करावी.
(5) विरुध्दपक्ष क्रं.2 विरुध्द तक्रार खारीज करण्यात येते.
(6) उभय पक्षकारांना निकालपत्राची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.