श्री. अविनाश प्रभुणे, मा. सदस्य यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये वि.प.च्या सेवेतील त्रुटीबद्दल दाखल केलेली आहे. मायक्रोमॅक्स इंफॉर्मेटीक्स लिमिटेड ही निर्माता कंपनी असून वि.प.क्र. 2 हे त्यांचे नागपूर येथील अधिकृत सेवा केंद्र आहे.
2. तक्रारकर्त्याने मायक्रोमॅक्स इंफॉर्मेटीक्स लिमिटेड निर्मित मोबाईल फोन Mocromax A 104 Canvas Fire 2 (IMEI No. 911416955122821) दि.09.04.2015 रोजी ऑनलाईन खरेदी केला. दि.14.04.2015 रोजी त्याला तो प्राप्त झाला. निर्माता कंपनीने सदर मोबाईलला एक वर्षाची वारंटी दिली होती. दि.28.03.2016 रोजी सदर मोबाईलच्या सॉफ्टवेअरमध्ये दोष निर्माण झाला, म्हणून तक्रारकर्त्याने सदर मोबाईल वि.प.क्र. 2 कडे दाखविला असता त्यांनी साफ्टवेअरचा दोष आहे असे सांगून मोबाईल दुरुस्तीकरीता ठेवून घेतला व तांत्रिक कारणास्तव छापील जॉब शिट न देाता त्याला हस्तलिखित पोच दिली. दि.07.04.2016 ला तक्रारकर्ता वि.प.क्र. 2 कडे गेला असता त्यांनी मोबाईल डेड आहे व सुरु होत नसल्याने कंपनीकडे न्यु दिल्ली पाठविण्यात येणार असल्याचे सांगून संगणकीय छापील जॉब शिट दिली. मे, 2016 व जून, 2016 ला विचारणा केली असता त्याला दुसरा मोबाईल फोन देण्यात येणार असल्याचे सांगितले. जुलै, 2016 ला त्याला दुसराच मोबाईल देऊन तो आधिच्या मोबाईलचे बदल्यात देण्यात आला असल्याचे सांगितले. परंतू या मोबाईलमध्ये नेटवर्कचा प्रश्न निर्माण होत असल्याने तोही दुरुस्तीस पाठविण्यात आला व तो एक आठवडयाचे आत मिळणार असल्याचे सांगितले. तसेच निर्माता कंपनीच्या फ्री कस्टमर केयरला फोन लावला असता त्यांनी मुळ फोनच्या बदल्यात दुसरा फोन मिळणार नसल्याचे सांगितले. तक्रारकर्ता वि.प.क्र. 2 कडे गेला असता त्यांनी तिसराच वेगळा मोबाईल त्याला दिला. तक्रारकर्त्याने IMEI No. तपासून पहिला असता तो त्याचा मोबाईल नव्हता, तसेच तो क्षतिग्रस्त झालेला व वापरलेला मोबाईल होता, म्हणून त्याने स्विकारण्यास नकार दिला. कंपनीच्या फ्री कस्टमर केयरला फोन लावला असता त्यांनी 24 तासाचे आत कळविण्याचे आश्वासन दिले. मात्र पुढे तक्रारकर्त्याला काहीही कळविले नाही. तक्रारकर्त्याने दोघांनाही नोटीस पाठविली असता त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. तक्रारकर्त्याला मोबाईल अद्यापही वि.प.च्या ताब्यात आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक आणि शारिरीक त्रास सहन करावा लागला, म्हणून तक्रारकर्त्याने मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन मोबाईलची किंमत, मानसिक आणि शारिरीक त्रासाबाबत भरपाई आणि कार्यवाहीच्या खर्चाबाबत एकूण रु.60,000/- वर 18 टक्के व्याजाची मागणी केलेली आहे.
3. वि.प.क्र. 1 ला नोटीस तामिल झाला नाही व तक्रारकर्त्याने नोटीस तामिल होण्याबाबत कुठलीही पाऊले उचलली नाही. तसेच दि.23.04.2019 ला व दि.09.02.2018 चे निवेदनानुसार वि.प.क्र. 1 बाबत त्यांची कुठलीही मागणी नाही व ते सदर प्रकरणी दोषी नसल्याने व तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 विरुध्द कुठलीही मागणी केली नाही. वि.प.क्र. 2 ला नोटीस मिळाल्यावर त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले.
4. वि.प.क्र. 2 च्या मते तक्रारकर्त्याने त्यांचेविरुध्द तक्रारीस कोणतेही कारण नसतांना सदर तक्रार दाखल केलेली आहे. वि.प.क्र. 2 ने ही बाब मान्य केली की ते मोबाईल निर्माता कंपनीचे अधिकृत सेवा केंद्र असून तक्रारकर्त्याच्या मोबाईलमध्ये निर्मिती दोष असल्याने त्यांनी तो निर्माता कंपनीकडे पाठविण्याचे कबूल केले होते. त्यामुळे वि.प.क्र. 2 ची जबाबदारी संपुष्टात आली. मोबाईलमध्ये मुलतः दोष होता हे तक्रारकर्त्याला माहित होते आणि त्या बदल्यात मिळण्या-या मोबाईलमध्ये हा सुध्दा त्याच गुणवत्तेचा राहील हे तक्रारकर्त्याने मान्य केले होते. त्यामुळे वि.प.क्र. 2 हा अनुचित व्यापार प्रथेकरीता जबाबदार धरल्या जाऊ शकत नाही. वि.प.क्र. 1 निर्माता कंपनीने जो मोबाईल त्या बदल्यात पाठविला तो त्यांनी तक्रारकर्त्याला दिला आणि तक्रारकर्ता तो स्विकारण्यास तयार नव्हता. तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेले कथन वि.प.क्र. 2 ने अमान्य करुन सदर तक्रार खारिज करण्याची मागणी व त्यांनी तक्रारीतून वगळण्याची मागणी केली.
5. सदर प्रकरण तोंडी युक्तीवादाकरीता आल्यावर वि.प.क्र. 2 व त्यांचे वकील गैरहजर. तक्रारकर्ता हजर. त्यांचा युक्तीवाद ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
6. मंचाने सदर प्रकरण तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता तक्रारीचे पृ.क्र. 12 वरील रीटेल ईनव्हाईसचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याने Mocromax A 104 Canvas Fire 2 (IMEI No. 911416955122821) दि.09.04.2015 रोजी मोबाईल रु.5,800/- किंमतीमध्ये खरेदी केल्याचे दिसून येते. तसेच पृ.क्र. 13 वर असलेल्या जॉब शिटवरुन दि.07.04.2016 ला वि.प.क्र. 2 ने विवादित मोबाईल (Item name – without ACC. A104 (B & GLD) हा “POWER DOES NOT SWITCH ON” या दोषाकरीता दुरुस्तीकरीता दिल्याचे दिसून येते. यावरुन तक्रारकर्त्याने तक्रारीत मोबाईलचे जे वर्णन केले आहे ते आणि त्यामध्ये उपस्थित झालेला दोष याबाबत शंका नाही.
7. उपरोक्त दस्तऐवजावरुन तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 2 कडे मोबाईल दुरुस्तीकरीता दिल्याचे स्पष्ट होते. वि.प.क्र. 2 चे म्हणण्यानुसार त्याने दोषयुक्त मोबाईल हा कंपनीकडे पाठविला व त्या बदल्यात तक्रारकर्त्याला दुसरा मोबाईल वापरावयास दिला आणि तक्रारकर्त्याचे दोषयुक्त मोबाईलचे बदल्यात अन्य दुसरा मोबाईल रीप्लेसमेंट मिळणार असल्याचे वि.प.क्र. 2 ने सांगितले. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार वि.प.क्र. 2 ने दिलेल्या सदर मोबाईलमध्ये नेटचा दोष येत असल्यामुळे तो वि.प.क्र. 2 ला परत दिला. त्यानंतर वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्याला आणखी तिसराच मोबाईल दिला, तोदेखील क्षतिग्रस्त झाल्याचे दिसून येत होता. तक्रारकर्त्याने तो स्विकारण्यास नकार दिला आणि निर्माता कंपनीचे कस्टमर केयरला फोन लावून सदर बाब निदर्शसनास आणून दिली असता त्यांनी मोबाईल हा बदलवून किंवा रीप्लेंसमेंट करुन मिळणार नसल्याचे सांगितले. तसेच तशी तरतूद नसल्याचेही त्यांनी सांगितले. वि.प.क्र. 1 च्या अशा सांगण्याने तक्रारकर्त्याला वि.प.क्र. 2 च्या वागणूकीबाबत संशय निर्माण झाला. कारण वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्याचा मोबाईल हा वि.प.क्र. 1 ला बदलवून देण्याकरीता परत पाठविला असल्याचे सांगितले होते. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्याला चुकीची माहिती दिली होती. कारण तक्रारकर्त्याने जेव्हा वि.प.क्र. 1 च्या कस्टमर केयरला चौकशी करण्याकरीता फोन लावला असता त्यांनी याबाबत अनभिज्ञता दर्शवून तक्रारकर्त्याच्या तक्रारीला प्रतिसाद दिला नाही. दोन्ही वि.प.ला तक्रारकर्त्याने नोटीस पाठवून सदर बाबीबाबत विचारणा केली असता त्यांनी कुठलेही लेखी उत्तर नोटीसला दिलेले नाही. तसेच दि.07.04.2016 पासून तर तक्रार मंचामध्ये दाखल करेपर्यंत वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्याचा दोषयुक्त मोबाईल स्विकारुन व तो दुरुस्त किंवा रीप्लेसमेंट करुन परत केलेला नाही. अशाप्रकारे वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्याला सेवा देण्यात उणिव ठेवल्याचे दिसून येते.
8. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार वि.प.क्र. 1 ची सदर प्रकरणात काहीही चूक नसून त्यांचा त्यात सहभाग नाही, कारण त्यांनी मायक्रोमॅक्सच्या नोएडा कार्यालयात फोनद्वारे संभाषण केले असता त्यावरुन वि.प.क्र. 2 हाच सदर सेवेतील त्रुटीस जबाबदार असल्याचे निदर्शनास आले, म्हणून त्यांनी एक मंचासमोर निवेदन सादर करुन वि.प.क्र. 1 वर कुठलीही कारवाई न करण्याबाबत कळविले. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्याने असा आक्षेप घेतल्यावर तो खोडून काढण्याबाबत कुठलाही पुरावा किंवा निवेदन मंचासमोर सादर केलेले नाही. यावरुन तक्रारकर्त्याने जॉब शिटसह घेतलेला आक्षेप आणि मोबाईल न पुरविल्याची बाब सत्य समजण्यास मंचाला हरकत वाटत नाही. वि.प.क्र. 2 ने त्याचे पुरावा सादर करुन खंडन केलेले नाही. तसेच पृ.क्र. 13 वर असलेल्या जॉब शिटनुसार विवादीत मोबाइल ‘In Warranty’ असल्याचे स्पष्ट दिसते त्यामुळे वि.प.क्र. 2 ने विवादीत मोबाइल दुरुस्त करून देणे व शक्य नसल्यास वि.प.क्र. 1 कडे पुढील करवाईसाठी पाठविणे आवश्यक होते पण तसे झाल्याचे दिसत नाही. मंचाचे मते वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्याकडून सदोष मोबाईल स्विकारुन तो दुरुस्त करुन न देता वेगवेगळेच मोबाईल ज्यामध्ये पूर्वीपासून दोष होते त्याला पुरविले आणि म्हणून वि.प.क्र. 2 हा ग्राहकास द्यावयाच्या सेवेत निष्काळजीपणा केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
9. सदर प्रकरणात एक बाब प्रकर्षाने आढळून आली की, वि.प.क्र. 2 ने जरी वि.प.क्र. 1 निर्माता कंपनीकडून सदोष मोबाईल हा रीप्लेसमेंट करुन मिळेल असे सांगितले असले तरी त्याचे म्हणण्याचे समर्थनार्थ कुठलाही पुरावा अथवा दस्तऐवज सादर केलेला नाही. त्यामुळे वि.प.क्र. 2 चे सदर कथन समर्थनीय नाही असे मंचाचे मत आहे आणि म्हणून वि.प.क्र. 1 चा या वादात समावेश नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वि.प.क्र.1 चे विरुध्द कुठलाही आदेश पारित करणे योग्य होणार नाही. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्त करुन किंवा त्याने कबूल केल्याप्रमाणे रीप्लेसमेंट करुन न दिल्याने तक्रारकर्ता मोबाईलची किंमत व्याजासह परत मिळण्यास पात्र आहे. तसेच वि.प.क्र. 2 ने एप्रिल 2016 पासून तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्तीकरीता किंवा रीप्लेसमेंट करण्याकरीता घेऊन परत न केल्याने त्याला मोबाईलचा वापर करण्यापासून वंचित राहावे लागले. परिणामी, त्याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला. सदर त्रासाची क्षतिपूर्ती मिळण्याबाबत तक्रारकर्ता पात्र असल्याचे मंचाचे मत आहे. तसेच वि.प.ला वारंवार दूरध्वनीद्वारे किंवा नोटीस पाठवून मोबाईलबाबत चौकशी करावी लागली व शेवटी मंचासमोर तक्रार दाखल करावी लागल्याने तो सदर कार्यवाहीचा खर्च मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
10. उपरोक्त निष्कर्षावरुन व दाखल दस्तऐवजांवरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
1) तक्रारकर्त्याची अंशतः मंजूर करण्यात येत असून वि.प.क्र. 2 ला आदेश देण्यात येतो की, त्याने तक्रारकर्त्याला मोबाईलची किंमत रु.5,800/- दि. दि.07.04.2016 पासून तर रकमेच्या प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह परत करावी.
2) वि.प.क्र. 2 ने शारिरीक व मानसिक त्रासाच्या क्षतिपूर्तीबाबत रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
3) वि.प.क्र. 1 विरुध्दची तक्रार खारिज करण्यात येते.
4) वि.प.क्र. 2 ने सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
5) आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात याव्या.