निकालपत्र :- (दि. 30/09/2014)(द्वारा-श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये मोबाईल हॅन्डसेटची नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.पक्ष नं. 1 ते 3 यांचेविरुध्द नोटीसचा आदेश झाला. वि.प. 2 व 3 यांना नोटीसा लागू होऊन हजर झाले परंतु त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यांचेविरुध्द दि. 28-07-2014 रोजी ‘एकतर्फा’ चे आदेश पारीत केले. वि.प. नं. 1 यांनी म्हणणे दाखल केले नसलेमुळे त्यांचेविरुध्द दि. 28-07-2014 रोजी ‘नो-से’ आदेश पारीत केले. तक्रारदार तर्फे वकिलांनी युक्तिवाद केला. वि.पक्ष गैरहजर. प्रस्तुतचे प्रकरण गुणदोषांवर निकाली करणेत येत आहे.
2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
वि.प. नं. 1 ही मोबाईल कंपनी असून वि.प. नं. 2 हे मायक्रोमॅक्स मोबाईल कंपनीचे अधिकृत विक्रेता आहेत. वि.प.नं. 3 हे कोल्हापूर येथील कंपनीचे अधिकृत कस्टमर केअर सेंटर आहे. तक्रारदारांनी दि. 20-04-2013 रोजी वि.प. नं. 2 यांचेकडून मायक्रोमॅक्स एक्स- 295 हा मोबाईल संच रक्कम रु‑ 2,350/-, इन्व्हाईस नं. 066 रोख देऊन खरेदी केला आहे. त्याचा आयएमईआय नं. 911250152027826 आहे. तक्रारदार हे गगनबावडा येथे नोकरीस असून त्यांची आई वृध्द असून नेहमी आजारी असते. वि.प.नं. 2 यांनी तक्रारदारांना मोबाईल संच विकत देताना मोबाईल संचास एक वर्षाची वॉरंटी व बॅटरी व चार्जर यास सहा महिन्याची वॉरंटी दिली होती. वॉरंटी कालावधीमध्ये काही तक्रार अथवा बिघाड झालेस तक्रार निवारण करणेची हमी दिली होती. तक्रारदारांनी मोबाईल संच विकत घेतलेपासून एक महिना व्यवस्थित सुरु राहिला. त्यानंतर तो बंद पडू लागला. वि.प. नं. 2 कडे दुरुस्तीसाठी जमा केला. व मोबाईल संचमध्ये किरकोळ दुरुस्ती आहे दोन दिवसांत दुरुस्त करुन देतो असे सांगितले. मोबाईल संच दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा तक्रारी उदभवल्यामुळे पुन्हा वि.प. नं. 2 कडे जमा केला. त्यानंतर तक्रारदारांनी चौकशी केली असता मोबाईल संच दुरुस्तीसाठी केअर सेंटरमध्ये दिलेला आहे. तक्रारदारांनी केअर सेंटरमध्ये जाऊन चौकशी केली असता कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. वि.प. यांनी दुरुस्तीस दिलेल्या मोबाईल संचची मागणी करुनही उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून दि. 28-10-2013 रोजी तक्रारदारांनी वकिलामार्फत रजि. नोटीस पाठवून दुरुस्तीस दिलेल्या मोबाईल संचची मागणी केली. वि.प. यांनी सदर नोटीसीस उत्तर दिले नाही. सबब, वि.प. यांचेकडून नवीन मोबाईल संच मिळावा व मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल रक्कम रु. 50,000/- व तक्रार अर्ज खर्च रु. 7,000/- मिळावा म्हणून तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
3) तक्रारदारांनी तक्रारीसोबत एकूण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. अ.क्र. 1 कडे तक्रारदाराने वि.प. कडून खरेदी केलेल्या हँन्डसेट बिल दि. 20-04-2013, अ.क्र. 2 व 3 कडे तक्रारदार यांनी न्यू महालक्ष्मी मोबाईल्स प्रोपा. विक्रम पाटील यांना दुरुस्तीसाठी दिलेला मोबाईल दुरुस्त करुन मिळावा यासाठी रजि. ए.डी.ने केलेली लेखी मागणी दि. 10-10-2013 व त्या पत्राची पोहच, अ.क्र. 4, 5 व 6 कडे दि. 29-10-2013 रोजी तक्रारदार यांनी वकीलामार्फत पाठविलेली नोटीस दि. 28-10-2013, व वि.प. नं. 2 व 3 यांना नोटीस पोहचलेबाबतची पोच दि. 2-11-2013, अ.क्र. 7 कडे मोबाईल संचाचे वॉरंटी कार्ड दि. 20-04-2013 इत्यादी कागदपत्रे व पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
4) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, शपथपत्र व तक्रारदार यांचा युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी मंचापुढे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
ठेवेली आहे काय ? होय
2. तक्रारदार कोणता अनुतोष/नुकसानभरपाई
मिळणेस पात्र आहेत ? होय
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
वि वे च न
मुद्दा क्र. 1:
तक्रारदार यांनी मायक्रोमॅक्स कंपनीचा मायक्रोमॅक्स एक्स- 295 हा मोबाईल हँन्डसेट वि.प. नं. 2 कडून रक्कम रु. 2,350/- ला खरेदी केला होता. मोबाईल हँन्डसेट खरेदी केलेनंतर 1 महिन्यात मोबाईल हॅन्डसेटमध्ये तक्रारी येऊ लागलेने तक्रारदार यांनी वि.प. कडे हँन्डसेट रिपेअरीसाठी जमा केला. वि.प.नं. 2 यांनी मोबाईल हँन्डसेटमध्ये किरकोळ दुरुस्ती आहे असे वि.प. नं. 2 यांनी सांगितलेने वि.प. नं. 2 कडे दुरुस्तीसाठी जमा केला. व मोबाईल संचमध्ये किरकोळ दुरुस्ती असलेमुळे दोन दिवसात दुरुस्त करुन देतो असे तक्रारदारांना तोंडी सांगितले. मोबाईल संच दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा तक्रारी उदभवल्यामुळे पुन्हा वि.प. नं. 2 कडे जमा केला. त्यानंतर तक्रारदारांनी चौकशी केली असता मोबाईल संच दुरुस्तीसाठी वि.प. नं. 3 केअर सेंटरमध्ये दिलेला आहे. तक्रारदारांनी केअर सेंटरमध्ये जाऊन चौकशी केली असता कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. व वि.प. 3 कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वि.प. यांनी दुरुस्तीस दिलेल्या मोबाईल संचची मागणी करुनही मोबाईल संच तक्रारदारांना दिलेला नसलेमुळे दि. 28-10-2013 रोजी तक्रारदारांनी वकिलामार्फत रजि. नोटीस पाठवून दुरुस्तीस दिलेल्या मोबाईल संचची मागणी केली. वि.प. यांनी सदर नोटीसीस उत्तर दिलेले नाही. वि.प. कंपनीचे सर्व्हीस सेंटर अथवा उत्पादित कंपनीकडे मोबाईल हँन्डसेट रिपेअरीबाबत पाठपुरावा करणे आवश्यक होते. तसे वि.प. 1 व 2 यांनी केलेले नाही, असे दिसून येते. वि.प. 2 यांनी तक्रारदारांना मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही अथवा बदलून दिला नाही. मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त तसेच बदलून देण्याची सर्वस्वी जबाबदारी वि.प. यांची होती. तसेच वि.प. यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कसूर केली आहे असे दिसून येते. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे, तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 :
तक्रारदार यांनी मायक्रोमॅक्स एक्स -295 हा मोबाईल हँन्डसेट दुरुस्तीसाठी वि.प. नं. 2 यांचेकडे दिला असताना मोबाईलच्या दुरुस्तीबाबत तक्रारदारांना काहीही कळविले नाही अथवा दुरुस्ती करुन दिला नाही. त्यामुळे तक्रारदारांना खरेदी केलेल्या हॅन्डसेटचा उपयोग करता आला नाही त्यामुळे तक्रारदारांना मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला आहे व नुकसानही सोसावे लागले. तसेच तक्रार दाखल करणे भाग पडले आहे, म्हणून तक्रारदार हे मायक्रोमॅक्स एक्स .-295 चा दुसरा नवीन मोबाईल हॅन्डसेट मिळण्यास पात्र आहे किंवा मोबाईल हॅन्डसेटची किंमत रु. 2,350/- व त्यावर तक्रार दाखल दि. 19-12-2013 रोजीपासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 1000/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे, म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3- सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि.प. यांनी तक्रारदारास मोबाईल हॅन्डसेट मायक्रोमॅक्स – X- 295 हयाच मॉडेलचा नवीन हॅन्डसेट 30 दिवसांच्या आत बदलून द्यावा. किंवा मोबाईल हॅन्डसेटची किंमत रक्कम रु. 2,350/- (अक्षरी रुपये दोन हजार तीनशे पन्नास फक्त) अदा करावे व त्यावर तक्रार दाखल दि. 19-12-2013 पासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावेत.
3. वि.प. यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) अदा करावेत.
4. सदर निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.