तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले क्र. 1 : एकतर्फा.
सामनेवाले क्र. 2 : रद्द करण्यात आलेले आहे.
निकालपत्रः- श्री.एस.एस.व्यवहारे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
न्यायनिर्णय
1. सा.वाले भ्रमणध्वनी उपकरणाचे निर्माते/उत्पादक असून त्यांचे कार्यालय तक्रारीत नमुद केलेल्या ठिकाणी दिल्ली येथे आहे.
2. तक्रारदार हे व्यवसायाने डॉक्टर असून घाटकोपर (पश्चिम) मुंबई येथे राहातात. दिनांक 11.4.2013 रेाजी तक्रारदार यांनी मायक्रोमॅक्स कंपनीचा भ्रमणध्वनी रु.12,000/- येवढया किंमतीचा राजल मोबाईल शॉप, घाटकोपर येथून विकत घेतला होता. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, सदर भ्रमणध्वनी विकत घेतल्याचे पासून दोन आठवडयाचे आत सदर भ्रमणध्वनीमध्ये तक्रारी आढळून आल्या. सदर भ्रमणध्वनी चालु अथवा बंद केला असता तो होत नव्हता. तसेच भ्रमणध्वनी सुरु असताना भ्रमणध्वनीच्या पडद्या वरील चित्र अडकत असे. तक्रारदारांनी सदर भ्रमणध्वनीतील बॅटरी देखील बदलून बघीतली. असे करुन देखील भ्रमणध्वनीच्या कार्यक्षमतेत सुधारणा न झाल्यामुळे घाटकोपर येथील युनायटेड टेक्नोलॉजीस्ट यांचेकडे तक्रारदार यांनी सदर भ्रमणध्वनी दुरुस्तीसाठी दिला. युनायटेड टेक्नोलॉजीस्ट हे सा.वाले क्र. 1 यांचे सेवा सुविधा पुरविणारे केंद्र असल्यामुळे भ्रमणध्वनीच्या दुरुस्तीसाठी तक्रारदारांनी आपला भ्रमणध्वनी युनायटेड टेक्नोलॉजीस्ट यांचेकडे दिला. सदर भ्रमणध्वनी 15 दिवसाचे आत दुरुस्त करुन देण्याचे सदर सेवा केंद्राने कबुल केले. परंतु 15 दिवस होऊनसुध्दा तक्रारदार यांचा भ्रमणध्वनी सदर दुरुस्तीब सेवा केंद्राने परत न दिल्याने तक्रारदार हे सदर दुरुस्ती केंद्रावर गेले असता सदर दुरुस्ती केंद्र बंद केल्याचे आढळले. या बाबत तक्रारदारांनी सा.वाले क्र. 1 यांचेकडे तक्रार केली. परंतु सदर सेवा दुरुस्ती क्रेद्राच्या चालकाचा पत्ता मिळाला नाही. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी विकत घेतलेला भ्रमणध्वनी हा दोषीत स्वरुपाचा असल्यामुळे व त्यात सुरुवाती पासुनच उत्पादित दोष असल्यामुळे सदर भ्रमणध्वनी उत्पादित करण्याची सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येते. म्हणून तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल करुन नुकसान भरपाईपोटी रु.50,000/- व्याजासह मागीतलेले आहे.
3. सा.वाले यांना नोटीसची बजावणी होऊन देखील मंचासमोर गैरहजर राहील्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारदार यांना पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल करण्यात सांगण्यात आले. त्या प्रमाणे तक्रारदारांनी आपले पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद, भ्रमणध्वनी विकत घेतल्याची पावती, भ्रमणध्वनी दुरुस्तीसाठी दिल्या बाबत जॉबशिटची प्रत व सा.वाले यांचे सोबत झालेल्या पत्र व्यवहारांच्या प्रती दाखल केल्या. सा.वाले यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आल्यामुळे तक्रारदारांचा लेखी पुरावा व दाखल केलेले कागदपत्र यातील मजकुर अबाधित राहातो. त्यामुळे तो स्विकारण्यास मंचास कोणतीही हरकत नाही. सबब तक्रारदार यांचा लेखी व कागदोपत्री पुरावा स्विकारुन सा.वाले यांनी तक्रारदारांना मुलभूत दोष असलेला भ्रमणध्वनी विकण्याची सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत मानुन हे मंच तक्रारदारांना त्यांनी मागीतल्या प्रमाणे नुकसान भरपाईपोटी रु.25,000/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून 10 टक्के दराने होणारे व्याज व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- अदा करावे असे आदेश मंच सा.वाले यांना देत आहे.
4. वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 47/2015 ही मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले यांनी तक्रारदार यांना मुलभूत दोष असलेला भ्रमणध्वनी
विकून सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सा.वाले यांनी तक्रारदार यांना मुलभूत दोष असलेला भ्रमणध्वनी
विकल्या बद्दल नुकसान भरपाई म्हणून रु.25,000/- व सदर
रक्कमेवर नुकसान भरपाईची रक्कम वसुल होईपावेतो 10 टक्के दराने
होणारे व्याज व तक्रारीचा खर्च रु.5,000/- अदा करावा असे आदेश
मंच पारीत करीत आहे.
4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 10/03/2016