निकालपत्र :- (दि.30/11/2013)(द्वारा-श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये मोबाईल हॅन्डसेटची नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.पक्ष क्र. 1 व 2 यांचेविरुध्द नोटीसचा आदेश झाला. वि.पक्ष क्र. 2 यांना नोटीसा लागू होऊन यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांचेविरुध्द दि. 13-08-2013 रोजी एकतर्फा आदेश पारीत करणेत आले. वि.पक्ष क्र. 1 यांना नोटीसा लागू होऊन यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांचेविरुध्द दि. 20-11-2013 रोजी एकतर्फा आदेश पारीत करणेत आले. तक्रारदार यांनी युक्तिवाद केला. वि.पक्ष क्र. 1 व 2 गैरहजर. प्रस्तुतचे प्रकरण गुणदोषावर निकाली करणेत येत आहे.
2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
तक्रारदार यांनी दि. 30-08-2012 रोजी मे. एस.एस. कम्युनिकेशन्स अॅन्ड सर्व्हिसेस यांचेकडून मायक्रोमॅक्स ए 44 या मॉडेलचा मोबाईल हॅन्डसेट बिल क्र. 12695 ने किंमत रक्कम रु. 5,000/- ला विकत घेतला आहे. मोबाईल हॅन्डसेटला 12 महिन्याची कंपनीची गॅरंटी आहे असे मोबाईल विक्रेत्याने सांगितले व त्याप्रमाणे वॉरंटी कार्ड दिले. मोबाईल हॅन्डसेट खरेदी केलेनंतर 4-5 महिने व्यवस्थित चालला व त्यानंतर बंद पडलेमुळे दि. 01-02-2013 रोजी वि.प. नं. 2 सर्व्हिस सेंटर यांचेकडे दुरुस्तीसाठी दिला. त्याची वि.प. नं. 2 यांनी रितसर पावती दिली. मोबाईल हॅन्डसेट वॉरंटी काळातील असलेमुळे कोणताही खर्च येणार नसलेचे तक्रारदारांना सांगितले. तक्रारदार 4 दिवसानंतर दुरुस्त केलेला मोबाईल हॅन्डसेट आणणेसाठी गेले असता हॅन्डसेट अजून दुरुस्त झालेला नसलेचे सांगणेत आले. व वि.प. नं. 2 यांनी हॅन्डसेट कंपनीकडे पाठविला असलेचे सांगितले. कंपनीकडून हॅन्डसेट आलेनंतर देतो असे सांगून तक्रारदाराचा हॅन्डसेट परत केलेला नाही, त्यानंतर तक्रारदारांनी दि. 08-04-2013 रोजी वि.प. 1 व 2 यांना वकिलामार्फत नोटीस पाठवून मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करुन किंवा बदलून द्यावा अशी कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस स्विकारणेस नकार देऊन परत करण्यात आली. तक्रारदारांचा हॅन्डसेट दुरुस्त अथवा बदलून दिलेला नाही. वि.प. 1 व 2 यांनी तक्रारदारांना हॅन्डसेट दुरस्त अथवा बदलून न देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, तक्रारदारांनी वि.प. 1 व 2 यांचेकडून मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करुन द्यावा किंवा त्याऐवजी दुसरा नवीन त्याच मॉडेलचा हॅन्डसेट बदलून द्यावा किंवा हॅन्डसेटची घेतलेली रक्कम रु. 5,000/- परत करणेबाबत वि.प.1 व 2 यांना वैयक्तीक व संयुक्तीकरित्या आदेश व्हावेत व मानसिक व शारीरिक त्रास, नुकसान भरपाईपोटी रु. 5,000/- व नोटीस फी खर्च रु. 1000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- वि.प.कडून मिळावेत अशी विनंती केली आहे.
3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत मे. एस.एस. कम्युनिकेशनस अॅन्ड सर्व्हिसेस, कोल्हापूर यांचेकडून विकत घेतलेले मोबाईल खरेदीचे बिल नं. 12695 दि. 30-08-2012, मोबाईल हॅन्डसेट वि.प. नं. 1 ने दिलेली वॉरंटी कार्ड, वि.प. 2 यांनी मोबाईल दुरुस्तीसाठी स्विकारलेचे दिलेली पावती, तक्रारदारांनी वि.प. 1 यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस दि. 08-04-2013, नोटीसीची पोस्टाची पावती, व वि.प. यांनी न स्विकारलेला नोटीसीचा पोस्टाचे लिफाफा इत्यादीच्या सत्यप्रती व तक्रार अर्ज व तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे.
4) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे व तक्रारदार यांचा युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी मंचापुढे उपस्थित होतात.
मुद्दे
1. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
ठेवली आहे काय ? ----- होय
2. तक्रारदार कोणता अनुतोष/नुकसानभरपाई
मिळणेस पात्र आहेत ? ----- होय
3. काय आदेश ? ------ अंतिम आदेशाप्रमाणे.
वि वे च न
मुद्दा क्र. 1:
तक्रारदार यांनी वि. पक्ष नं. 1 उत्पादित कंपनीचा मायक्रोमॅक्स ए 44 हा मोबाईल हँन्डसेट मे. एस.एस. कम्युनिकेशनस अॅन्ड सर्व्हिसेस, कोल्हापूर यांचेकडून दि. 30-08-2012 रोजी खरेदी केलेला होता व आहे. मोबाईल हँन्डसेट खरेदी केलेनंतर 4-5 महिन्यात मोबाईल हॅन्डसेटमध्ये तक्रारी येऊ लागलेने तक्रारदार यांनी वि.प. नं. 1 चे अधिकृत सर्व्हिस सेंटर वि.प. नं. 2 यांचेकडे मोबाईल दि. 01-02-2013 रोजी दुरुस्तीसाठी दिल्यानंतर 4 दिवसांनी तक्रारदार मोबाईल हॅन्डसेट दुरुस्तीबाबत चौकशी करणेस गेले असता अद्याप हँन्डसेट दुरुस्त झाला नसलेचे सांगणेत आले. सदरचा मोबाईल हॅन्डसेट कंपनीकडे पाठविला असलेचे सांगणेत आले. बरेच दिवस झाल्यानंतर तक्रारदारांना मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करुन मिळालेला नाही त्यामुळे तक्रारदारांनी वि.प. नं. 1 व 2 यांना वकिलामार्फत नोटीस पाठवून वि.प. 1 प 2 यांनी नोटीसा स्विकालेल्या नाहीत. तक्रारदारांना त्यांचे नादुरुस्त मोबाईलबाबत कोणतेही उत्तर अथवा प्रतिसाद वि.प. यांनी दिलेला नाही. अथवा मोबाईल दुरुस्त झाल्याचेसुध्दा कळविलेले नाही. तक्रारदारांनी वि.प. 1 कंपनीचा मॉडेल नं. मायक्रोमॅक्स ए 44 हा मोबाईल हँन्डसेट वि.पक्ष नं. 1 यांचे विक्रेतामे. एस.एस. कम्युनिकेशनस अॅन्ड सर्व्हिसेस, कोल्हापूर यांचेकडून दि. 30-08-2012 रोजी खरेदी केला आहे. सदर मोबाईल हॅन्डसेट विक्रेता यांना तक्रारदारांनी तक्रारीत पक्षकार केलेले नाही. तक्रारदाराने तक्रारीसोबत नि. 3/1 वर दाखल केलेल्या मे. एस.एस. कम्युनिकेशनस अॅन्ड सर्व्हिसेस, कोल्हापूर यांच्याकडून मोबाईल खरेदीच्या बिल दाखल केलेले आहे असे त्यांचे बिलावरुन दिसून येते. व त्या बिलावर हॅन्डसेट 12 महिने वॉरंटी, बॅटरी चार्जर 6 महिने गॅरंटी असे नमूद आहे. तक्रारदारांनी खरेदी केलेला मोबाईल हँन्डसेट हा वॉरंटी कालावधीत आहे. त्यामुळे वि.प. 1 कंपनी यांनी तक्रारदारांना मोबाईल दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी होती. तक्रारदारांनी वि.प. 2 कंपनीचे सर्व्हिस सेंटर यांना मोबाईल हॅन्डसेट दुरुस्तीसाठी दिले. परंतु वि.प. 2 यांनी तक्रारदारांना दुरुस्त करुन दिले नाही व तसेच मोबाईलदेखील परत दिलेला नाही. वि.प. यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कसूर केली आहे असे दिसून येते व वि.पक्ष यांनी सेवेतील त्रुटी केली आहे, तसेच वि. प. यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हे मंच या निष्कर्षात येते की, वि.पक्ष क्र. 1 ही मोबाईल हॅन्डसेटची उत्पादक कंपनी असून सदर हॅन्डसेट दुरुस्त करुन सर्वस्वी जबाबदारी वि.प. कंपनीची आहे. वि. प. 2 हे वि.प. 1 कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. त्यामुळे वि.प. 1 व 2 यांनी तक्रारदारास मोबाईल हँन्डसेट मायक्रोमॅक्स ए 44 या मॉडेलचा दुसरा नवीन हॅन्डसेट बदलून द्यावा किंवा मोबाईल हॅन्डसेटची किंमत रु. 5,000/- परत करावी. व त्यावर सदर मोबाईल हॅन्डसेट दि. 01-02-2013 रोजी दुरुस्तीसाठी दिलेपासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे म्हणून मुद्दा क्र .1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत
मुद्दा क्र. 2 : तक्रारदार यांनी मायक्रोमॅक्स ए 44 हा मोबाईल हँन्डसेट दुरुस्तीसाठी वि.प. 2 अधिकृत सर्व्हिस सेंटर यांचेकडे दिला असताना त्यांनी मोबाईलच्या दुरुस्तीबाबत तक्रारदारांना काहीही कळविले नाही अथवा तक्रारदारांना त्यांचा हॅन्डसेटदेखील परत केलेला नाही, त्यामुळे तक्रारदारांना खरेदी केलेल्या हॅन्डसेटचा उपयोग करता आला नाही त्यामुळे तक्रारदारांना मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला आहे व सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे, म्हणून तक्रारदार हे मायक्रोमॅक्स ए 44 चा दुसरा नवीन मोबाईल हॅन्डसेट द्यावा किंवा मोबाईल हॅन्डसेटची किंमत रु. 5,000/- तक्रारदारास मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,00/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 500/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3- सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि.प. 1 व 2 यांनी तक्रारदारास मोबाईल हॅन्डसेट मायक्रोमॅक्स ए 44 हयाच मॉडेलचा नवीन हॅन्डसेट बदलून द्यावा. किंवा मोबाईल हॅन्डसेटची किंमत रक्कम रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अदा करावी. त्यावर सदर मोबाईल हॅन्डसेट दि. 01-02-2013 रोजी दुरुस्तीसाठी दिलेपासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे अदा करावेत.
3. वि.प. 1 व 2 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 500/-(अक्षरी रुपये पाचशे फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 500/-(अक्षरी रुपये पाचशे फक्त) अदा करावेत.
4. सदर निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.