निकालपत्र :- (दि. 26/08/2013)(द्वारा-श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये मोबाईल हॅन्डसेटची नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केलेला आहे.
1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.पक्ष क्र. 1 ते 3 यांचेविरुध्द नोटीसचा आदेश झाला. वि.पक्ष क्र. 1 ते 3 यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांचेविरुध्द दि.17-07-2013 रोजी एकतर्फा आदेश पारीत करणेत आले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार तर्फे वकिलांनी युक्तिवाद केला. वि.पक्ष गैरहजर.
2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी,
तक्रारदार हे इचलकरंजी येथे राहतात. वि.पक्ष नं. 1 ही उत्पादित कंपनी आहे. वि.पक्ष नं. 2 हे वि.पक्ष नं. 1 चे कोल्हापूर येथील अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. वि.प. नं. 3 हे विक्रेता व वितरक आहेत. तक्रारदार यांनी वि. पक्ष नं. 1 उत्पादित कंपनीचा मॉडेल नं. Micromax Ninja A 89 हा मोबाईल हँन्डसेट वि.पक्ष नं. 3 यांचेकडून दि. 10-02-2013 खरेदी केला होता. सदरचा मोबाईल हँन्डसेट खरेदी केलेनंतर हॅन्डसेटमध्ये विविध तांत्रिक अडचणी, रिंगटोन न वाजणे, आवाज न येणे, स्पिकर प्रॉब्लेम, रिंगर प्रॉब्लेम, मोबाईल गरम होणे, बॅटरी लवकर संपणे व हँन्डसेट बंद पडणे इ. तक्रारी येऊन लागलेने तक्रार वि.पक्ष क्र. 3 यांना सांगितली. वि.प. 3 यांनी मोबाईलच्या बाबतीत आम्ही काही करु शकत नाही. वि.प. नं. 2 यांचेकडे मोबाईल घेऊन जाणेस सांगितले. सदरचा सदोष हँन्डसेट दि. 11-03-2013 रोजी वि. प. नं. 2 यांचेकडे देऊन अडचण सांगितली. व तक्रारदार यांना 12 दिवसानंतर चौकशी करणेस सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी 12 दिवसानंतर चौकशी केली असता अद्याप हँन्डसेट दुरुस्त झाला नाही. तक्रारदार यांनी अद्याप मोबाईल दुरुस्त झाले नसलेबाबत चौकशी केली असता त्यांना उध्दट उत्तरे दिली. त्यानंतर तक्रारदारांनी वि.प. क्र. 1 यांना दिल्ली येथे फोन केला असता त्यांचेकडूनही उध्दट उत्तरे देण्यात आली. तक्रारदारांना अद्याप वि.प. नं. 2 कडून मोबाईल हॅन्डसेट परत मिळालेला नाही. तक्रारदार यांचे मोबाईलमध्ये अडचणी येत असलेमुळे मोबाईल रिपेअरीसाठी दिलेने त्यांना वि. पक्ष यांचेकडून उध्दट उत्तरे मिळत होती त्यामुळे तक्रारदारांचे मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे तक्रारदारांनी वि.प. नं. 1 ते 3 यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवून नविन मोबाईल हँन्डसेट अथवा मोबाईलची किंमत परत देणेबाबत कळविले आहे. परंतु वि.प. यांनी सदर नोटीसीस उत्तरही दिले नाही. तक्रारदार यांना मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. वि.प. कडून नवीन मोबाईल हॅन्डसेट देणेत यावा किंवा मोबाईलची बिलाप्रमाणे असणारी किंमत व मानसिक, शारिरीक, आर्थिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु. 5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 3,500/- वि.प. 1 ते 3 यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तीकरित्या मिळावेत अशी विनंती केली आहे.
3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत मोबाईल खरेदीची पावती, मोबाईल वि.प. नं. 2 कडे दुरुस्तीस दिलेबाबत पोहच, तक्रारदार यांनी वकिलामार्फत पाठविलेली नोटीस दि. 28-03-2013, वि.प. यांनी नोटीस न स्विकारलेने परत आलेला लखोटा, वि.प. नं. 3 व 4 यांनी स्विकारलेल्या पोच पावती इत्यादीच्या झेरॉक्स प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
4) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे व तक्रारदार यांचे वकिलांचा युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी मंचापुढे उपस्थित होतात.
मुद्दे
1. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
ठेवेली आहे काय ? ----- होय
2. तक्रारदार कोणता अनुतोष/नुकसानभरपाई
मिळणेस पात्र आहेत ? ----- होय
3. काय आदेश ? ------ अंतिम आदेशाप्रमाणे.
वि वे च न
मुद्दा क्र. 1:
तक्रारदार यांनी वि. पक्ष नं. 1 उत्पादित कंपनीचा मॉडेल नं. Micromax Ninja A 89 हा मोबाईल हँन्डसेट वि.पक्ष नं. 3 यांचेकडून दि. 10-02-2013 खरेदी केला होता. मोबाईल हँन्डसेट खरेदी केलेनंतर हॅन्डसेटमध्ये तांत्रिक अडचणी, रिंगटोन न वाजणे, आवाज न येणे, स्पिकर प्रॉब्लेम, रिंगर प्रॉब्लेम, मोबाईल गरम होणे, बॅटरी लवकर संपणे व हँन्डसेट बंद पडणे इ. तक्रारी येऊन लागलेने तक्रार वि.प. नं. 1 अधिकृत सर्व्हिस सेंटर वि.प. नं. 2 यांचेकडे मोबाईल दि. 11-03-2013 रोजी दुरुस्तीसाठी दिल्यानंतर 12 दिवसांनी चौकशी करणेस सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी 12 दिवसानंतर चौकशी केली असता अद्याप हँन्डसेट दुरुस्त झाला नसलेचे सांगणेत आले. तक्रारदारांनी वि.प. नं. 1 ही दिल्ली येथील उत्पादक कंपनीमध्ये मोबाईलच्या तक्रारीबाबत फोन करुनसुध्दा त्यांचेकडून तक्रारदारांना उध्दट उत्तरे मिळत होती. तक्रारदारांना त्यांचे नादुरुस्त मोबाईलबाबत कोणतेही उत्तर वि.प. यांनी दिलेली नाहीत. अथवा मोबाईल दुरुस्त झाल्याचेसुध्दा कळविलेले नाही. तक्रारदारांनी वि.प. 1 कंपनीचा मॉडेल नं. Micromax Ninja A 89 हा मोबाईल हँन्डसेट वि.पक्ष नं. 3 यांचेकडून दि. 10-02-2013 खरेदी केला आहे हे तक्रारदाराने तक्रारीसोबत नि. 3/1 कडील दाखल केलेल्या वि.प. नं. 3 यांच्या मोबाईलच्या बिलावरुन स्पष्ट होते. तक्रारदारांनी खरेदी केलेला मोबाईल हँन्डसेट हा वॉरंटी कालावधीत आहे. त्यामुळे वि.प. यांनी तक्रारदारांना मोबाईल दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी होती. तक्रारदारांनी दुरुस्तीसाठी दिलेला हॅन्डसेटसुध्दा वि.प. 2 यांनी तक्रारदारांना परत दिलेला नाही. अथवा नवीन हॅन्डसेट दिला नाही वि.प. यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कसूर केली आहे असे दिसून येते व वि.पक्ष यांनी सेवेतील त्रुटी केली आहे. तसेच वि. प. नं. 1 ते 3 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते. वि.प. 3 हे विक्रेते आहेत. कोणत्याही उत्पादनाची विक्री करीत असताना विक्रीपश्चात असणारी सेवा देणेची जबाबदारी ही विक्रेत्यांची राहते. प्रिव्हीटी ऑफ कॉन्ट्रक्ट (privity of contract) हा खरेदीदार व उत्पादक कंपनी यांचेमध्ये होत नाही. विक्रेता यांनी उत्पादक कंपनीने केलेल्या उत्पादनाबाबत काही दोष निर्माण झाले असतील तर उत्पादक कंपनीकडे त्यांनी संपर्क साधणे आवश्यक असते. ग्राहकांना परस्पर कंपनीची जबाबदारी आहे असे सांगून स्वत:ची जबाबदारी झटकणे ही वृत्ती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी आहे. विक्रेत्याची जबाबदारी ही केवळ उत्पादन विक्री करण्याएवढीच मर्यादित नसून त्या उत्पादनाबाबत विक्रीपश्चात सेवा देणेही विक्रेत्याची जबाबदारी असते, त्यामुळे मोबाईल हॅन्डसेट वि.पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारास वैयक्तीक व संयुक्तरित्या मोबाईल हँन्डसेट मॉडेल नं. Micromax Ninja A 89 दुसरा नवीन हॅन्डसेट बदलून द्यावा किंवा ते शक्य नसल्यास मोबाईल हॅन्डसेटची किंमत रु. 6,300/- परत करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे म्हणून मुद्दा क्र .1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत
मुद्दा क्र. 2 : तक्रारदार यांनी वि.प. 1 कंपनीचा मॉडेल नं. Micromax Ninja A 89 हा मोबाईल हँन्डसेट नादुरुस्त असलेमुळे दुरुस्तीसाठी वि.प. 1 चे वि.प. 2 हे सर्व्हिस सेंटर यांचेकडे दिला असताना त्यांनी त्याबाबत काहीही कळविले नाही अथवा तक्रारदारांना हॅन्डसेटदेखील परत केलेला नाही, म्हणून तक्रारदारांना मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे व सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. म्हणून तक्रारदार हे Micromax Ninja A 89 चा दुसरा नवीन मोबाईल हॅन्डसेट किंवा मोबाईल हॅन्डसेटची किंमत रु. 6,300/- मिळण्यास पात्र आहे तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 500/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3- सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि.प. 1 ते 3 यांनी संयुक्तरित्या तक्रारदारास मोबाईल हॅन्डसेट मॉडेल नं. Micromax Ninja A 89 हयाच मॉडेलचा नवीन बदलून द्यावा. अथवा मोबाईल हॅन्डसेटची किंमत रक्कम रु. 6,300/- (अक्षरी रुपये सहा हजार तीनशे फक्त) 30 दिवसांत अदा करावेत.
3. वि.प. 1 ते 3 यांनी तक्रारदारास संयुक्तरित्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 500/-(अक्षरी रुपये पाचशे फक्त) अदा करावेत.
4. सदर निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.