तक्रार दाखल तारीख – 18/5/16 तक्रार निकाली तारीख – 30/12/17 | |
|
न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
वि.प.क्र.1 ही स्मार्ट फोनची निर्मिती करणारी कंपनी असून वि.प.क्र.2 हे सदर कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे तर वि.प.क्र. क्र.3 हे वि.प.क्र.1 यांचे स्थानिक विक्रेते आहेत. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांनी उत्पादित केलेला स्मार्ट फोन वि.प.क्र.3 यांचेकडून रक्कम रु.6,100/- या किंमतीस दि.29/5/2015 रोजी खरेदी केला आहे. सदर फोन खरेदी केल्यानंतर वापरण्यास सुरुवात करताच महिनाभरातच त्यामध्ये दोष दिसून येवू लागले व त्यामध्ये बिघाड निर्माण होवून त्याचे आऊटगोइंग व इनकमिंग व्हॉइसवर परिणाम झाला. म्हणून तक्रारदार यांनी दि.3/08/2015 रोजी वि.प.क्र.2 यांचेशी संपर्क साधला व फोन तातडीने दुरुस्त करुन अथवा नवीन फोन बदलून देणेची मागणी केली. त्यावर वि.प.क्र.2 यांनी सदरचा फोन जमा करुन घेतला. तथापि तदनंतर सदर स्मार्ट फोनमधील “on 03/08/15 & 14/08/15 – Poor Outgoing Audio quality and no incoming audio, charging, battery backup, battery empty, on 01/01/2016 – Phone locks up – not responding. On 09/01/2016 – Power does not switch on” इ. दोषांमुळे गेले सहा महिन्यांपासून सदर स्मार्टफोनवर वारंवार वि.प.क्र.2 यांचेकडून दुरुस्ती करणेत आलेली आहे. परंतु तरी देखील सदरचे दोष दूर होवू शकलेले नाही. त्यामुळे तक्रारदारास प्रचंड आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागले आहे. तक्रारदारांनी सदर फोनची रक्कम परत करणेविषयी वि.प.यांचेकडे मागणी केली असता ते रक्कम परत देणेस टाळाटाळ करीत आहेत. तक्रारदारास फोनची अत्यंत आवश्यकता असल्याने तिने दुसरा फोन खरेदी केला आहे. अशा प्रकारे फोनची रक्कम परत करण्यास टाळाटाळ करुन वि.प. यांनी तक्रारदार यास सेवात्रुटी केलेली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. सबब, सदर फोनची खरेदी किंमत रक्कम रु.6,100/- वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तरित्या परत मिळावी व सदर रकेवर दि.29/5/2015 पासून संपूर्ण रक्कम वसुल होऊन मिळेपावेतो द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज मिळावे, मानसिक व आर्थिक त्रासाबाबत भरपाई म्हणून रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत फोन इन्व्हॉईस, फोन दुरुस्तीस टाकल्याबाबतचे जॉबशीट्स इ. एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने हॅण्डसेटचे पैसे परत मिळण्याकरिता वि.प.क्र.1 यांना पाठविलेला मेल व त्यास आलेले उत्तर याच्या प्रती तसेच वि.प.क्र.1 कंपनीस पाठविलेल्या नोटीसीचे पोस्टल रेकॉर्ड दाखल केले आहे. तसेच तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
3. वि.प.क्र.1 यांनी याकामी ता.27/07/17 रोजी म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. वि.प.क्र. 1 चे कथनानुसार वि.प.क्र.1 ही ग्राहाकाना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करुन देत असताते. ज्यावेळी तक्रारदार हे वि.प.क्र.2 यांचेकडे दुरुस्तीकरिता आले, त्याचदिवशी वि.प.क्र.2 यांनी वि.प.क्र.1 यांना सदर स्मार्टफोनची माहिती दिली असता वि.प.क्र.2 यांनी सदरचा स्मार्टफोन बदलून मिळेल असेही तक्रारदार यांना सांगितले. आजही वि.प.क्र.1 हे फोन बदलून देण्यास तयार आहेत. केवळ वि.प.क्र.1 यांना त्रास देणेच्या उद्देशाने तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. ज्या ज्यावेळी तक्रारदाराने फोन दुरुस्तीकरिता वि.प.क्र.2 कडे जमा केला, त्या त्या वेळी वि.प.क्र.2 यांनी तो दुरुस्त करुन दिलेला आहे. तक्रारदाराने केलेल्या मागण्या वि.प.क्र.1 यांना मान्य नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी मागणी वि.प. क्र.1 यांनी केली आहे. वि.प.क्र.1 यांनी जे म्हणणे दाखल केले आहे तोच त्यांचा पुरावा समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली आहे.
4. वि.प. क्र.2 यांना या तक्रार अर्जाची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, प्रस्तुतचे प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फा चालविणेचा आदेश दि.31/05/2017 रोजी नि.1 वर पारीत करण्यात आला.
5. वि.प.क्र.3 यांना याकामी मे. मंचाचे दि.22/11/16 रोजीचे आदेशाने वगळणेत आले आहे.
6. वर नमूद तक्रारदार यांची तक्रार व वि.प.क्र.1 यांनी दाखल केलेले म्हणणे व दाखल कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार हे सदर स्मार्टफोनची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर |
कारणमिमांसा–
मुद्दा क्र. 1 –
7. प्रस्तुत कामी वि.प.क्र.1 ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची व स्मार्ट फोनची निर्मिती करणारी कंपनी असून वि.प.क्र.2 ही अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. वि.प.क्र.3 हे वि.प.क्र.1 या कंपनीच्या स्मार्टफोनची विक्री करणारे स्थानिक विक्रेते आहेत. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 कंपनीने उत्पादित केलेला स्मार्टफोन वि.प.क्र.3 यांचेकडून दि.29/5/15 रोजी खरेदी केलेला आहे. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. ता. 29/5/2015 रोजी तक्रारदार यांनी रक्कम रु.6,100/- इतक्या किंमतीचा स्मार्टफोन Micromax Q 371 खरेदी केलेला असून सदरची पावती तक्रादार यांनी तक्रारीसोबत दाखल केली आहे. तसेच ता.03/08/15, ता.14/08/15, ता. 06/10/15, ता.09/01/16 रोजी सदरचा स्मार्टफोन वि.प.क्र.2 यांचेकडे दुरुस्तीकरिता दिल्याचे सर्व्हिस जॉबशीट दाखल आहेत. सदरचे सर्व्हिस जॉबशीटचे अवलोकन केले असता, ता.03/08/2015 आणि 14/08/2015 रोजी AUDIO NO OUTGOING AUDIO, AUDIO POOR, INCOMING AUDIO QUALITY, POOR AUDIO OUTGOING QUALITY, NO INCOMING AUDIO, BATTERY BACK UP BATTERY EMPLTY इत्यादी दोषांमुळे सदरचा स्मार्टफोन वि.प.क्र.2 यांचेकडे तक्रारदार यांनी दिलेचा दिसून येतो. सदरचे जॉब शीटवरुन वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष स्मार्ट फोन दिलेचे शाबीत होते. तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्राचे या मंचाने अवलोकन केले असता सदरचे स्मार्टफोन रिप्लेसमेंट बाबत तक्रारदाराने वि.प. यांना वारंवार विनंती करुनही वि.प. यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. तसेच सदरचे निर्मिती दोषामुळे दुरुस्तीकरीता सदरचा स्मार्टफोन वि.प.क्र.2 यांचेकडे सतत न्यावा लागलेने व मागणी करुनही रिप्लेस करुन न दिलेने तक्रारदारांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले. प्रस्तुतकामी वि.प.क्र.2 यांना नोटीस मिळूनही सदरकामी ते हजर नाहीत. वि.प.क्र.2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झाला आहे. वि.प.क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदार हया वि.प.क्र.2 यांचेकडे दुरुस्तीकरिता आल्या, त्याचदिवशी वि.प.क्र.2 यांनी वि.प.क्र.1 यांना सदरचे स्मार्टफोनची माहिती दिली व सदरचा स्मार्टफोन बदलून मिळेल असेही सांगितले. वि.प.क्र.2 यांनी सदरचा स्मार्टफोन तक्रारदारांना बदलून देणेस तयार असलेचे मान्य केलेले आहे. वि.प.क्र.2 यांचे सदरचे कथनावरुन सदरचे स्मार्टफोनमध्ये दोष असलेचे अप्रत्यक्षरित्या मान्य केलेचे शाबीत होते. तथापि दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांना सदरचा स्मार्टफोन खरेदी केलेपासून आजपावेतो नीटपणे वापरण्यास मिळालेला नसलेचे दिसून येते. कोणत्याही उत्पादनाची विक्री करीत असताना विक्रीपश्चात असणारी सेवा देणेची जबाबदारी प्रिव्हीटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट (Privity of contract) या तत्वानुसार उत्पादित कंपनी व त्यांचे विक्रेत्याची असते. सदरची जबाबदारी केवळ उत्पादन विक्री करणेपुरती मर्यादीत नसून विक्रीपश्चात सेवा देण्याची असते. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या सदरचा सदोष स्मार्टफोन तक्रारदारांना देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 व 3
8. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुतकामी वि.प.क्र.2 यांनी सदरचा स्मार्टफोन बदलून देणेचे मान्य केलेले आहे. तथापि तक्रारदारांनी सदरचे स्मार्टफोनची खरेदीचे रकमेची मागणी या मंचात केलेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदार हे वि.प.क्र.1 व 2 यांचेडून संयुक्तिकरित्या सदरचे स्मार्टफोनची रक्कम रु.6,100/- मिळणेस पात्र आहे. तसेच सदर रकमेवर दि.29/05/2015 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना झाले मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारास सदोष स्मार्टफोनची खरेदीची किंमत रक्कम रु.6,100/- अदा करावी. तसेच सदर रकमेवर ता.29/05/2015 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्केप्रमाणे व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदाराला रक्कम रु. 3,000/- (रक्कम रुपये तीन हजार मात्र) अदा करावी.
4) तक्रारअर्जाचे खर्चापोटी वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदाराला रक्कम रु.2,000/- (रक्कम रुपये दोन हजार मात्र) अदा करावी.
5) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. 1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.