(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे,मा.सदस्य)
(पारीत दिनांक-27 ऑक्टोंबर, 2021)
01. तक्रारकर्ता यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019च्या कलम 35खाली विरुध्दपक्ष क्रं-1 स्थानीक भ्रमणध्वनी सर्व्हीस सेंटर, भंडारा आणि विरुध्दपक्ष क्रं 2 भ्रमणध्वनी निर्माता कंपनी यांचे विरुध्द खरेदी केलेल्या भ्रमणध्वनी संबधात दोषपूर्ण सेवा दिल्या बाबत जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रं 2 निर्मित कंपनीचा रेड-मी नोट-3 करडया रंगाचा भ्रमणध्वनी ऑन लाईन विकत घेतला. सदर भ्रमणध्वनीचा I.M.E.I. No-861645036524981 असा असून इन्व्हाईस दिनांक-2016-06-14 असा आहे. यातील विरुध्दपक्ष क्रं 1 हे सदर भ्रमणध्वनीचे भंडारा येथील स्थानिक सर्व्हीस सेंटर आहे तर विरुध्दपक्ष क्रं 2 भ्रमणध्वनी संबधात क्सिओमी कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. सदरहू विकत घेतलेला भ्रमणध्वनी हा व्यवस्थीत सुरु होता परंतु सदर भ्रमणध्वनी अपग्रेड करताना अचानक पूर्णपणे बंद पडल्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचेकडे भ्रमणध्वनी तपासणी करण्या करीता दिनांक-24.09.2020 रोजी नेला असता विरुध्दपक्ष यांनी सदर भ्रमणध्वनी अपडेट दरम्यान बंद पडला असल्याचे सांगून फॉल्ट डिक्स्रीप्शन मध्ये एस.डब्ल्यु. अपडेट बाय कस्टमर रिक्वेस्ट असे सुध्दा लिहिले. परंतु सदर भ्रमणध्वनी दुरुस्त करण्यास विरुध्दपक्ष हे अपयशी ठरले व मदर बोर्ड पाहिजे असा शेरा विरुध्दपक्ष यांचे सर्व्हीस रेकॉर्ड मधील इन्स्पेक्शन रिमार्क मध्ये नमुद केला. परंतु सदर भ्रमणध्वनी हा बंद होता किंवा तो क्षतीग्रस्त होता असा कोणताही शेरा विरुध्दपक्ष यांनी नमुद केलेला नाही. याचाच अर्थ असा निघतो की, सदर्हू भ्रमणध्वनी हा विरुदपक्षा कडे दिलेला असताना सुरु होता. सदर्हू सर्व्हीस रेकॉर्ड नुसार विरुध्दपक्ष यांनी पार्ट नेम मध्ये Main board assy redmi असे नमुद करुन त्याची किम्मत रुपये-3302/- दर्शविली व सेवाशुल्क सुध्दा घेतले आहे. तक्रारकर्ता यांना सदर्हू सर्व्हीस रेकॉर्ड दिनांक-25.09.2020 रोजी देण्यात आला परंतु भ्रमणध्वनी न दुरुस्त होण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण विरुध्दपक्ष यांनी सर्व्हीस रेकार्ड मध्ये दिलेले नाही व ही बाब दोषपूर्ण सेवा/ सेवेतील त्रुटी या संकल्पनेत येते.
तक्रारकर्ता यांनी पुढे असे नमुद केले की, ज्याअर्थी विरुध्दपक्ष कंपनीचा भ्रमणध्वनी आहे, त्या अर्थी विरुध्दपक्ष यांनी सदर भ्रमणध्वनीचे सुटे भाग ठेवणे तसेच सदर भ्रमणध्वनी दुरुस्त करुन देणे गरजेचे होते कारण विरुध्दपक्ष हे सेवा पुरविणारे या सज्ञेत मोडतात. आजचे आधुनिक व विकसनशिल जगात तसेच वकीली क्षेत्रात भ्रमणध्वनी असणे अत्यावश्यक आहे. विरुध्दपक्ष यांनी भ्रमणध्वनी दुरुस्त करुन न दिल्याने सेवा पुरविण्यात कसूर केलेला आहे, जे ग्राहक संरक्षण कायदयाचे तरतुदीचे अनुषंगाने चुकीचे व गैरकायदेशीर आहे. सदर भ्रमणध्वनी विरुध्दपक्ष यांचे कडे नेला असता त्यावेळी सदर्हू भ्रमणध्वनी मध्ये कोणताही फीजीकल डॅमेज नव्हता. सॉफ्टवेअर अपडेट हा भ्रमणध्वनी सुरळीत पणे चालविण्या करीता अत्यावश्यक व न टाळता येणारा (Mandatory & Inevitable) भाग आहे. सॉफ्टवेअर प्रॉब्लेम असल्यास सॉफ्टवेअर अपग्रेड करुन भ्रमणध्वनी सुरु करुन देण्याची जबाबदारी ही विरुदपक्ष यांची होती. सदर्हू भ्रमणध्वनीची वॉरन्टी जरी गेली असली तरी सदर भ्रमणध्वनी जेंव्हा विरुध्दपक्ष यांचेकडे नेला तेंव्हा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डॅमेज नसल्याने सॉफ्टवेअर अपडेट करुन देणे ही विरुध्दपक्ष यांची जबाबदारी होती, जी त्यांनी पार पाडण्यास कसूर केल्याने ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदीच्या अनुषंगाने विरुध्दपक्ष हे भ्रमणध्वनीची पूर्ण रक्कम परत करण्यास व दंड देण्यास पात्र आहेत. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष भ्रमणध्वनी कंपनी कडे सदर भ्रमणध्वनीचा सॉफ्टवेअर अपग्रेड करताना तो बंद पडल्याची तक्रार ई मेल व्दारे केली होती परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. सदर भ्रमणध्वनीचा सर्व्हीस रेकॉर्ड व ईमेलचे अवलोकन करुन तक्रारकर्ता यांना न्याय मिळवून दयावा अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचे विरुध्द केलेल्या मागण्या या खालील प्रमाणे आहेत-
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना सेवा पुरविण्यात कसुर केल्याने तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष यांनी नविन भ्रमणध्वनी देण्याचे आदेशित व्हावे.
- सदर मोबाईल खरेदी नंतर तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष यांचेकडे अनेकदा भेटी दयाव्या लागल्याने झालेल्या बौध्दीक व शारिरीक त्रास व प्रताडना या करीता विरुध्दपक्ष यांचेवर दंडात्मक रक्कम रुपये-20,000/- लादण्यात यावे.
- सदर्हू तक्रारीचा संपूर्ण खर्च किमान रुपये-10,000/- तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष यांनी दयावा असे आदेशित करण्यात यावे.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 (Mi Authorized Service Centre Bhandara) वादातील भ्रमणध्वनी अधिकृत सर्व्हीस सेंटर भंडारा यांना जिल्हा ग्राहक आयोगाची रजिस्टर पोस्टाव्दारे पाठविलेली नोटीस मिळाल्या बाबत पोस्टाचा ट्रॅक रिपोर्ट दाखल केला, त्यावरुन विरुध्दपक्ष क्रं 1 ला जिल्हा ग्राहक आयोगाची नोटीस मिळाल्याचे दिसून येते परंतु तरीही विरुध्दपक्ष क्रं 1 जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे दिनांक-26.02.2021 रोजी पारीत करण्यात आला.
04. विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी दिनांक-26.02.2021 रोजी प्रस्तुत तक्रार खारीज होण्यासाठी शपथे वर अर्ज दाखल केला. त्यांनी सदर अर्जामध्ये नमुद केले की, तक्रारकर्ता हे भ्रमणध्वनी खरेदी केल्या पासून चार वर्षा नंतर विरुध्दपक्ष क्रं 1 सर्व्हीस सेंटर मध्ये आलेत जेंव्हा की, भ्रमणध्वनी वर खरेदी पासून एक वर्षा पर्यंत वॉरन्टी असते. वि.प.क्रं 1 चे तंत्रज्ञानी भ्रमणध्वनीची पाहणी करुन खर्चाचे अंदाजपत्रक दिले परंतु तक्रारकर्ता यांनी त्यास नकार दिला. तक्रारकर्ता यांनी उत्पादकीय दोषा बाबत कोणताही तज्ञांचा पुरावा दिलेला नाही. सदर अर्जावर उभय पक्षांचे महणणे ऐकल्या नंतर सदर अर्ज हा अंतीम युक्तीवादाचे वेळी विचारात घेतल्या जाईल असे आदेशित करण्यात आले.
05. विरुध्दपक्ष क्रं 2 भ्रमणध्वनी निर्माता कंपनी तर्फे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करण्यात आले. वि.प.क्रं 2 भ्रमणध्वनी निर्माता कंपनीने आपले लेखी उत्तरात तक्रारकर्ता यांनी त्यांचे कंपनीव्दारे उत्पादीत रेड-मी-3 भ्रमणध्वनी हॅन्डसेट दिनांक-14 जून, 2016 रोजी खरेदी केल्याचे मान्य करुन सदर भ्रमणध्वनीची वॉरन्टी ही एक वर्षाची असलयाने ती जून-2017 मध्ये संपल्याचे नमुद केले. तक्रारकर्ता हे पहिल्यांदा त्यांचे ऑथोराईज्ड सर्व्हीस सेंटर मध्ये दिनांक-25 सप्टेंबर, 2020 रोजी आले म्हणजेच वॉरन्टी पिरियेड एक वर्षाचा संपल्या नंतर पासून तीन वर्षानी आले. तक्रारकर्ता यांनी सर्व्हीस सेंटर मध्ये तक्रार केल्या नंतर तेथील तंत्रज्ञाने भ्रमणध्वनीची पाहणी करुन येणा-या खर्चा बाबत माहिती दिली कारण की वॉरन्टी संपल्याने मोफत
सर्व्हीस बंद झाली होती. भ्रमणध्वनी दुरुस्ती बाबत तंत्रज्ञाने पाहणी केली परंतु तक्रारकर्ता यांनी दुरुस्ती करण्यास नकार दिला त्यामुळे सदर भ्रमणध्वनी तक्रारकर्ता यांना परत करण्यात आला. ते या सोबत सर्व्हीस जॉब शीट आणि इन्सपेक्शन शिट दाखल करीत आहेत. तक्रारकर्ता यांनी त्यांचे विरुध्द केलेले आरोप चुकीचे, दुषीत हेतूने केलेले असून निष्कारण वि.प.क्रं 2 यांना त्रास दिलेला आहे. त्यांनी तक्रारकर्ता यांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. भ्रमणध्वनीची मोफत दुरुस्ती ही भ्रमणध्वनी खरेदी केल्या पासून वॉरन्टीचे एक वर्षाचे कालावधीत करण्यात येते परंतु त्यानंतर शुल्क आकारल्या जाते. त्यामुळे भ्रमणध्वनी खरेदी केल्या पासून 04 वर्षा नंतर तक्रारकर्ता हे मोफत सर्व्हीसची मागणी करु शकत नाही. त्यांचे विरुध्द तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही करीता तक्रार खारीज करण्यात यावी. विरुध्दपक्ष क्रं 1 हे विरुध्दपक्ष क्रं 2 भ्रमणध्वनी उत्पादक कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटर आहे. तक्रारकर्ता यांचे भ्रमणध्वनीचा IMEI No-861645036524981 असा आहे. ते वॉरन्टीचे दस्तऐवज दाखल करीत आहेत. दिनांक-25 सप्टेंबर, 2020 रोजी त.क. यांचे भ्रमणध्वनीची एक वर्षाची वॉरन्टी संपल्या नंतर 03 वर्ष झालेले आहेत. तक्रारकर्ता हे दिनांक-25 सप्टेंबर, 2020 रोजी पहिल्यांदा विरुध्दपक्ष क्रं-1 कंपनीचे सर्व्हीस सेंटर मध्ये आलेत तेंव्हा तेथील तंत्रज्ञाने भ्रमणध्वनी संबधात नोंद केली, त्यावेळी तंत्रज्ञाचे लक्षात आले की, भ्रमणध्वनीचा एक वर्षाचा वॉरन्टी पिरिएड संपलेला आहे त्यामुळे अंदाजीत दुरुस्ती खर्चाची माहिती तंत्रज्ञाने तक्रारकर्ता यांना दिली परंतु तक्रारकर्ता यांनी भ्रमणध्वनी दुरुस्त करुन देण्यास नकार दिला त्यामुळे तक्रारकर्ता यांना त्यांचा भ्रमणध्वनी परत करण्यात आला. त्यांचे निर्मित भ्रमणध्वनी मध्ये कोणताही उत्पादकीय दोष नाही कारण तक्रारकर्ता हे गेल्या चार वर्षा पासून भ्रमणध्वनी वापरीत आहेत. तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. वॉरन्टी प्रमाणे हार्डवेअर प्रॉडक्टची एक वर्षाची वॉरन्टी असून बॅटरीची 06 महिन्याची वॉरन्टी आहे . एक वर्षाचे वॉरन्टी पिरियेड मध्ये मोफत दुरुस्ती आणि नादुरुस्त पार्ट बदलवून देण्यात येतील असे नमुद आहे. आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ त्यांनी पुढील मा. सर्वोच्च न्यायालयाचे निवाडयावर भिस्त ठेवली-
(1) Hon’ble Supreme Court- Maruti Udyog Limited-Versus-Susheel Kumar Gabgotra (2006) 4 SCC-644 , at paragraphs 10 and 11 that where a warranty condition is specifically stated, a contrary implied warranty cannot be imputed. (2) Bharat Knitting –Versus-D.H.L. worldwide (1996) 4 SCC 704, the Hon’ble Supreme Court had held that in case of specific term in the contract, the parties will be bound by the terms of the contract.
तक्रारकर्ता यांनी फक्त विरुध्दपक्षां विरुध्द आरोप केलेले आहेत परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 निर्मित भ्रमणध्वनी मध्ये उत्पादकीय दोष असल्या बाबत कोणतीही बाब पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीने खालील मा.राज्य ग्राहक आयोगाचे निवाडयावर भिस्त ठेवली-
In Raj Kumar-Versus-Rana Communications & Anr.-III (2019) CPJ 6 C (CN) (HP) , the Hon’ble State Forum held that: Sole Affidavit of Complainant is not sufficient to hold that there was manufacturing defect in the mobile handset because Complainant is not expert. No reasons assigned by Complainant as to why Complainant did not file any affidavit of expert in order to prove that there was manufacturing defect in mobile handset in question. Automatic presumption of manufacturing defect in the product without report of expert is not permissible under Consumer Protection Act.
तक्रारकर्ता यांनी असे कोणतेही दस्तऐवज पुराव्या दाखल सादर केलेले नाहीत ज्यावरुन ही बाब सिध्द होईल की, विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनी तर्फे उत्पादीत भ्रमणध्वनी मध्ये उत्पादकीय दोष आहे. तक्रारकर्ता यांनी कोणत्याही तंत्रज्ञांचा अहवाल दाखल केलेला नाही ज्यावरुन ही बाब सिध्द होईल की, विरुध्दपक्ष क्रं 2 कंपनी निर्मित भ्रमणध्वनी मध्ये उत्पादकीय दोष आहे.
विरुध्दपक्ष क्रं 2 भ्रमणध्वनी निर्माता कंपनीने त्यांचे लेखी उत्तरा मध्ये या शिवाय खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांवर आपली भिस्त ठेवली-
- Hon’ble State Consumer Commission Punjab Chandigarh- Vipan Kumar –Versus- M/S Flextronics Technology- The terms and conditions of warranty are the basic part of the contract.
- Reliance Retails Limited-Versus-Pradeep Kumar-III, (2019) CPJ 1B (CN (HP) State Commission is of the opinion that Complainant has asserted the fact there was manufacturing defect in the mobile phone handset in question. It is well settled law that onus to prove that fact lies upon a person who asserts particular fact before the learned Distt. Forum or State Commission.
- Royal Enfield Motors Ltd.-Verus-Kulwant Singh Chauhan-(2011) 4 CPR 208 held that –It was the duty of the Complainant to establish his cases that the motorcycle was suffering with any sort of manufacturing defect.
वि.प.क्रं 2 भ्रमणध्वनी निर्माता कंपनीने तक्रारी मध्ये नमुद केलेली वस्तुस्थिती, आणि मा.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे लक्षात घेता तसेच भ्रमणध्वनी मध्ये उत्पादकीय दोष असल्या बाबत कोणताही तंत्रज्ञाचा पुरावा नसल्याने तक्रार खारीज करावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 भ्रमणध्वनी निर्माता कंपनी तर्फे लेखी उततरा मध्ये करण्यात आली.
06. उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवज, साक्षी पुरावे ईत्यादीचे जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे काळजीपूर्वक अवलोकन केले, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्रं | मुद्दा | उत्तर |
1 | त.क. यांनी खरेदी केलेल्या वि.प.क्रं 2 निर्मित भ्रमणध्वनी मध्ये उत्पादकीय दोष असल्याची बाब सिध्द होते काय | नाही |
2 | वि.प.क्रं 1 भ्रमणध्वनी स्थानिक अधिकृत सर्व्हीस सेंटर भंडारा यांनी त.क.यांचा नादुरुस्त भ्रमणध्वनी दुरुस्त करुन न दिल्याने दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय | नाही |
3 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
मुद्दा क्रं 1 ते 3
07. तक्रारकर्ता यांचे तक्रारी प्रमाणे वादातील भ्रमणध्वनी हा व्यवस्थीत सुरु होता परंतु तो अपग्रेड करताना अचानक पूर्णपणे बंद पडल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 स्थानीक सर्व्हीस सेंटर, जे वि.प.क्रं 2 भ्रमणध्वनी निर्माता कंपनीचे आहे, त्यांचेकडे दिनांक-24.09.2020 रोजी तपासणी साठी नेला असता तेथील तंत्रज्ञाने सदर भ्रमणध्वनी अपडेट दरम्यान बंद पडला असल्याचे सांगून फॉल्ट डिक्स्रीप्शन मध्ये एस.डब्ल्यु. अपडेट बाय कस्टमर रिक्वेस्ट असे लिहिले. परंतु भ्रमणध्वनी दुरुस्त करुन दिला नाही व मदर बोर्ड पाहिजे असा शेरा सर्व्हीस रेकॉर्ड मधील इन्स्पेक्शन रिमार्क मध्ये नमुद केला. परंतु सदर भ्रमणध्वनी हा बंद होता किंवा तो क्षतीग्रस्त होता असा कोणताही शेरा विरुध्दपक्ष यांनी नमुद केलेला नाही. याचाच अर्थ असा निघतो की, सदर्हू भ्रमणध्वनी हा विरुदपक्षा कडे दिलेला असताना सुरु होता. तक्रारकर्ता यांचे असे म्हणणे आहे की, सदर तंत्रज्ञाने दुरुस्तीचा खर्च रुपये-3302/- व सेवाशुल्काची मागणी केली. तक्रारकर्ता यांना सदर्हू सर्व्हीस रेकॉर्ड दिनांक-25.09.2020 रोजी देण्यात आला परंतु भ्रमणध्वनी न दुरुस्त होण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण विरुध्दपक्ष यांनी सर्व्हीस रेकार्ड मध्ये दिलेले नाही व ही बाब दोषपूर्ण सेवा/ सेवेतील त्रुटी या संकल्पनेत येते.
08. या उलट वि.प.क्रं 2 भ्रमणध्वनी निर्माता कंपनीने तक्रारकर्ता यांनी त्यांचे कंपनीव्दारे उत्पादीत रेड-मी-3 भ्रमणध्वनी हॅन्डसेट दिनांक-14 जून, 2016 रोजी खरेदी केला होता व सदर भ्रमणध्वनीची वॉरन्टी ही एक वर्षाची असल्याने ती जून-2017 मध्ये संपुष्टात आली होती . तक्रारकर्ता हे पहिल्यांदा त्यांचे ऑथोराईज्ड सर्व्हीस सेंटर मध्ये दिनांक-25 सप्टेंबर, 2020 रोजी आले म्हणजेच वॉरन्टी पिरियेड संपल्या नंतर तीन वर्षानी आले. तेथील तंत्रज्ञाने भ्रमणध्वनीची पाहणी करुन येणा-या खर्चा बाबत माहिती दिली कारण की वॉरन्टी संपल्याने मोफत सर्व्हीस बंद झाली होती. परंतु तक्रारकर्ता यांनी दुरुस्ती करण्यास नकार दिला त्यामुळे सदर भ्रमणध्वनी तक्रारकर्ता यांना परत करण्यात आला. ते या सोबत सर्व्हीस जॉब शीट आणि इन्सपेक्शन शिट दाखल करीत आहेत. विरुध्दपक्ष क्रं 1 हे विरुध्दपक्ष क्रं 2 भ्रमणध्वनी उत्पादक कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटर आहे. त्यांचे निर्मित भ्रमणध्वनी मध्ये कोणताही उत्पादकीय दोष नाही कारण तक्रारकर्ता हे गेल्या चार वर्षा पासून भ्रमणध्वनी वापरीत आहेत.
09. जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे विरुध्दपक्ष क्रं 1 सर्व्हीस सेंटर यांनी दिलेल्या सर्व्हीस रेकॉर्डची पाहणी केली, त्यावरुन असे दिसून येते की, दिनांक-25.09.2020 रोजी तक्रारकर्ता यांनी भ्रमणध्वनी टाकला होता, त्या रेकॉर्ड मध्ये खालीलप्रमाणे नमुद केलेल आहे
Create Date | 25/09/2020 |
Service Type | Warranty Expired |
Fault Description from Customer | SW Update By Customer Request |
Inspection Remarks | Mainboard required |
Service Charge including SGST | 3302.82 |
यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ता यांचे विनंती वरुन विरुध्दपक्ष क्रं 1 सर्व्हीस सेंटर वरील तंत्रज्ञाने सदर भ्रमणध्वनीचे पाहणी केली आणि इन्स्पेक्शन रिमॉर्क्स वरुन मेन बोर्ड रिक्वायर्ड असे नमुद केलेले आहे. सदर दोष दुरुस्त करण्यासाठी रुपये-3302.82 एवढया खर्चाचे अंदाजपत्रक दिल्याचे दिसून येते.
10. तक्रारकर्ता यांचे म्हणण्या प्रमाणे, त्यांनी ज्यावेळी विरुदपक्ष क्रं 1 सर्व्हीस सेंटर मध्ये भ्रमणध्वनी तपासणीसाठी नेला होता त्यावेळी तो कोणताही डॅमेज/क्षतीग्रस्त नव्हता. विरुदपक्ष क्रं 1 सर्व्हीस सेंटरने सदर भ्रमणध्वनी पूर्ववत सुरु करुन न देता तो तसाच परत केला. याउलट विरुध्दपक्ष क्रं 2
निर्माता कंपनीचा असा युक्तीवाद आहे की, भ्रमणध्वनीची वॉरन्टी ही खरेदी पासून एक वर्षाची होती परंतु वॉरन्टी पिरियेड संपलया नंतरही तीन वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे, याचाच अर्थ असा होतो की, भ्रमणध्वनी खरेदी केल्या पासून जवळपास चार वर्षाचा कालावधी निघून गेलेला आहे आणि तक्रारकर्ता यांनी भ्रमणध्वनी खरेदी दिनांका पासून चार वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतर भ्रमणध्वनी दुरुस्तीसाठी आणला, याचाच अर्थ तो भ्रमणध्वनी चांगला होता, त्यामध्ये कोणताही उत्पादकीय दोष नव्हता. भ्रमणध्वनी मध्ये उत्पादकीय दोष असल्या बाबत कोणत्याही तज्ञांचा पुरावा तक्रारकर्ता यांनी दाखल केलेला नाही, केवळ शपथपत्रावर तक्रार चालू शकत नाही. या संदर्भात वेळोवेळी मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांवर विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीने आपली भिस्त ठेवली.
11. जिल्हा ग्राहक आयोगाचे मते विरुध्दपक्ष क्रं 1 सर्व्हीस सेंटर मधील तंत्रज्ञानी भ्रमणध्वनी पाहणी करुन सर्व्हीस रेकॉर्ड मध्ये मेन बोर्ड आवश्यक असल्याचा शेरा नमुद केलेला आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचा युक्तीवाद असा आहे की, भ्रमणध्वनी खरेदी पासून फक्त वॉरन्टी पिरियेड एक वर्षाचा असतो आणि तक्रारकर्ता यांनी खरेदी पासून चार वर्षा नंतर भ्रमणध्वनी दुरुस्तीसाठी आणला आणि सदर कालावधी हा वॉरन्टी पिरीयेडच्या बाहेर
असल्याने त्यांचे तंत्रज्ञानी सेवाशुल्काची मागणी केल्याने तक्रारकर्ता यांनी सदर भ्रमणध्वनी तसाच परत नेला. जिल्हा ग्राहक आयोगाचे मते तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीव्दारे उत्पादीत रेड-मी-3 भ्रमणध्वनी हॅन्डसेट दिनांक-14 जून, 2016 रोजी खरेदी केला होता आणि त्यानंतर तक्रारकर्ता हे वि.प.क्रं 1 यांचे कडे पहिल्यांदा जे वि.प.क्रं 2 निर्माता कंपनीचे ऑथोराईज्ड सर्व्हीस सेंटर आहे तेथे दिनांक-25 सप्टेंबर, 2020 रोजी भ्रमणध्वनी दुरुस्ती बाबत गेलेत, यावरुन ही बाब सिध्द होते की, त्यांनी भ्रमणध्वनी खरेदी केल्या नंतर जवळपास 04 वर्षा नंतर ते भ्रमणध्वनी दुरुस्तीसाठी गेलेत, त्यापूर्वी त्यांना सदर भ्रमणध्वनी बाबत कोणतीही समस्या नव्हती व त्यांचा सदर भ्रमणध्वनी चार वर्षा पर्यंत सुव्यवस्थीत आणि चांगला चालला होता. भ्रमणध्वनी ज्या वेळी दुरुस्तीसाठी दिला त्यावेळी तो कोणत्याही प्रकारे डॅमेज नव्हता असे खुद्द तक्रारकर्ता यांचे म्हणणे आहे. भ्रमणध्वनी मध्ये उत्पादकीय दोष होता अशी सुध्दा तक्रारकर्ता यांची तक्रार नाही. तसेच भ्रमणध्वनी मधील दोष हा मेन बोर्ड टाकून दुरुस्त होऊ शकतो असा शेरा विरुध्दपक्ष क्रं 1 सर्व्हीस सेंटर मधील तंत्रज्ञांनी मांडलेला आहे. कोणतीही ईलेक्ट्रानिक वस्तु खरेदी केल्या नंतर त्याची वॉरन्टी ही एक वर्षाची असते वॉरन्टी पिरियेड संपल्या नंतर मोफत दुरुस्ती संबधीत उत्पादक/विक्रेता/सर्व्हीस सेंटर यांनी करुन दयावी असे अभिप्रेत नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 सर्व्हीस सेंटरचे तंत्रज्ञानी तक्रारकर्ता यांचे भ्रमणध्वनीची पाहणी केल्या नंतर आणि वॉरन्टी पिरियेड संपूनही 03 वर्ष झालेले असल्याने भ्रमण्ध्वनी दुरुस्तीसाठी लागणारे भागाचे आणि सर्व्हीस शुल्क म्हणून रुपये-3302.82 एवढया रकमेची मागणी केली त्यात जिल्हा ग्राहक आयोगास कोणतेही गैर दिसून येत नाही परंतु असे दिसून येते की, तक्रारकर्ता यांनी कोणतेही भ्रमणध्वनी दुरुस्ती करीता शुल्क वि.प.क्रं 1 कडे जमा केलेले नाही आणि भ्रमणध्वनी दुरुस्त न करता ते तसेच निघून गेले. तक्रारकर्ता यांचे भ्रमणध्वनी मध्ये उत्पादकीय दोष होता असे तक्रारकर्ता यांचे म्हणणे नाही वा त्यांनी त्या संबधात कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 व 2 याचे उत्तर “नकारार्थी” नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 व क्रं 2 चे उत्तर “नकारार्थी” आल्याने मुद्दा क्रं 3 अनुसार तक्रारकर्ता यांची विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
1. तक्रारकर्ता श्री अमोल अशोकराव भुजाडे यांची विरुध्दपक्ष क्रं-1) Mi Authorized Service Centre, Bandara विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे अधिकृत स्थानीक भ्रमणध्वनी सर्व्हीस सेंटर आणि विरुध्दपक्ष क्रं 2) Xiaomi Technology India Private Limited, Bangalore, Karanataka भ्रमणध्वनी निर्माता कंपनी यांचे विरुध्दची भ्रमणध्वनी IMEI No-861645036524981 संबधातील तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
4. उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्यात.