नि.26 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 176/2010 नोंदणी तारीख – 2/7/2010 निकाल तारीख – 20/10/2010 निकाल कालावधी – 108 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री सुभाष भबुतमल संघवी रा.99, बुधवार पेठ, कराड जि.सातारा -415 110 ----- अर्जदार (अभियोक्ता श्री आर.सी.शहा) विरुध्द 1. जनरल मॅनेजर महिंद्रा रनॉल्ट प्रा.लि. अशोकनगर, कांदीवली ईस्ट, मुंबई ----- जाबदार क्र.1 (अभियोक्ता श्री राजीव अत्रे) 2. ग्लोबल गॅलरी एजन्सीज प्रा.लि. सर्व्हे नं.7/7, काशीली व्हीलेज ता.भिवंडी, जि.ठाणे ----- जाबदार क्र.2 (अभियोक्ता अपराजिता कुलथे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार क्र.1 यांनी उत्पादित केलेले महिंद्र लोगन कंपनीचे वाहन जाबदार क्र.2 यांचेकडून खरेदी घेतले आहे. सदरचे वाहन हे कुटुंबाचे वापरासाठी घेतलेने त्याचे दैनंदिन सुरक्षितता व संभाव्य अपघातामुळे सुरक्षितता यांचा विचार करुन अर्जदार यांनी सदरचे वाहन घेतले होते. सदरचे वाहनाव दि.1/2/09 रोजी अपघात झाला. परंतु जाबदार यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचे वाहन हे कसोटीस उतरले नाही. त्यातील एअरबॅगचा फायदा वाहन चालकाचे शारिरिक नुकसान वाचविण्यास झाला नाही. जाबदार यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रायव्हर सीटचे एअरबॅग व्यवस्थित उघडले असते व त्यात छिद्र नसते तर अर्जदारचे मुलास शारिरिक अपंगत्व आले नसते. सदरचे अपंगत्वामुळे अर्जदारास प्रचंड मानसिक त्रास झाला. अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली असता त्यास जाबदार यांनी तकलादू माहितीचे उत्तर जाबदार यांनी दिले. सबब वाहनाचे विक्री पश्चात झालेल्या उत्पादन दोषामुळे झालेल्या नुकसानीपोटी रु.एकोणीस लाख व्याजासह मिळावेत, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार क्र.1 यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.16 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार यांचे मुलास अपघातामुळे जखमा झाल्या असल्याकारणाने अर्जदार यांनी मोटार अपघात न्यायाधीकरण यांचेकडे दाद मागणे आवश्यक आहे. तसेच वाहनाचे नुकसान झाले असल्यास त्याबाबत विमा कंपनीकडे दाद मागणे आवश्यक आहे. अर्जदारचे मुलाने निष्काळजीपणे वाहन चालविल्याने अपघात झाला आहे सबब त्याचे अपंगत्वास तो स्वतःच जबाबदार आहे. एअर बॅगला छिद्र असणे आवश्यक आहे. कारण या छिद्रातून गॅसेस बाहेर पडतात व त्यामुळे एअर बॅग फुगीर होते. एअरबॅगला छिद्र नसते तर एअरबॅग टणक झाली असती व अपघातात जो धक्का बसतो तो धक्का ड्रायव्हरला बसला असता. अर्जदारने सादर केलेल्या फोटोमध्ये एअरबॅग उघडलेली दिसत आहे. अर्जदारने त्याचा मुलाचे जखमांबाबत व उपचारांबाबत काहीही तपशील अर्जात नमूद केलेला नाही. अर्जदारचे मुलाने सीट बेल्टचा वापर केलेला नाही. सदरच्या अपघातास सर्वस्वी अर्जदारचे मुलास जबाबदार धरुन पोलिसांनी त्याचेविरुध्द फौजदारी केस दाखल केली आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. जाबदार क्र.2 यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.13 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. नियमानुसार सदरचे वाहनाविषयी काही तक्रार असल्यास फक्त बृहन्मुंबई न्यायालयास अधिकार आहेत व तसे सर्व्हिस बुकलेटमध्ये नमूद आहे. जाबदार क्र.2 यांचा कोणताही दोष दिसून येत नाही. सबब जाबदार क्र.2 यांना या अर्जातून वगळण्यात यावे. सदरच्या तक्रारीमध्ये प्रगट झालेल्या परिस्थितीशी जाबदार जबाबदार राहू शकत नाही कारण जाबदार क्र.2 हे अधिकृत विक्रेते आहेत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 4. जाबदार क्र.1 तर्फे वकील श्री अत्रे यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. जाबदार क्र.2 यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद नि.23 पाहिला तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 5. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 6. अर्जदार यांचे तक्रारअर्जातील कथन पाहता असे दिसून येते की त्यांनी जाबदार क्र.1 यांनी उत्पादित केलेले वाहन जाबदार क्र.2 या अधिकृत विक्रत्याकडून खरेदी घेतलेले आहे. सदरचे वाहन अर्जदारचा मुलगा श्रेणिक चालवित असताना सदरचे वाहनास अपघात होवून श्रेणिक हा जखमी झाला व त्यास अपंगत्व आले आहे. सदरचे वाहनामध्ये बसविलेल्या एअरबँगमध्ये छिद्र असल्याकारणाने ती उघडली नाही व त्यामुळे अर्जदारचे मुलाचे शारिरिक नुकसान होवून त्यास अपंगत्व आले आहे अशी अर्जदारची तक्रार आहे. 7. अर्जदारचे कथनानुसार वाहनामध्ये असलेल्या एअरबॅगला छिद्र नसते परंतु अर्जदारचे वाहनातील एअरबॅगला छिद्र असल्याकारणाने ती उघडली नाही व त्यामुळे शारिरिक नुकसान झाले. परंतु जाबदार क्र.1 यांनी असे कथन केले आहे की एअर बॅगला छिद्र असणे आवश्यक आहे कारण या छिद्रातून गॅसेस बाहेर पडतात व त्यामुळे एअर बॅग फुगीर होते. एअरबॅगला छिद्र नसते तर एअरबॅग टणक झाली असती व अपघातात जो धक्का बसतो तो धक्का ड्रायव्हरला बसला असता. अर्जदार यांनी एअरबॅगला छिद्र नसते व त्यामुळे अर्जदारचे वाहनातील एअरबॅग अपघातानंतर उघडली नाही हे दर्शविणारा वाहनक्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचा अहवाल, शपथपत्र वा फोटोग्राफस इ. तत्सम ठोस पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी नि.5 सोबत अपघातग्रस्त वाहनाचे फोटोग्राफस दाखल केले आहेत परंतु सदरचे फोटोग्राफसवरुन एअर बॅग सदोष होती तसेच वाहनामध्ये उत्पादित दोष होता ही बाब आजिबात स्पष्ट होत नाही. सबब एअरबॅगला छिद्र नसते, परंतु अर्जदारचे वाहनातील एअरबॅगला छिद्र होते व त्यामुळे अपघातानंतर ती उघडली नाही या अर्जदारचे कथनावर योग्य पुराव्याअभावी विश्वास ठेवता येणार नाही. वरील कारणांचा विचार होता वाहनामध्ये उत्पादित दोष होता अगर एअरबॅग सदोष होती ही बाब अर्जदार शाबीत करु शकलेले नाहीत असे या मंचाचे मत आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 8. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 20/10/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |