::: आ दे श :::
( पारित दिनांक : 30/12/2017 )
मा. अध्यक्षा, सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात विरुध्द पक्षांकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
2) तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा संयुक्त लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ता यांचे प्रतिऊत्तर, व उभय पक्षाचा लेखी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालीलप्रमाणे आदेश पारित केला, तो येणेप्रमाणे.
उभय पक्षात याबद्दल वाद नाही की, तक्रारकर्ते संगणकीय फोटोग्राफची लेबॉरटरीव्दारे फोटो तयार करण्याचा इ. संबंधीत स्वयंरोजगार करतात. सन 2002 पासुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला विज पुरवठा दिलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ते विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
3) तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, विरुध्द पक्षाने रितसर पाहणी करुन तक्रारकर्त्याला LT-VA या टेरीफचा विज पुरवठा दिला होता. त्यानुसार देण्यात आलेल्या विद्युत देयकांचा भरणा तक्रारकर्त्याने वेळोवेळी केला आहे. मात्र सप्टेंबर 2013 मध्ये विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला रुपये 12,200/- चे LT-IIA या टेरीफचे देयक दिले. याबद्दल तक्रार केली असता, विरुध्द पक्षाने सदर देयक दुरुस्त करुन मिळेल, असे आश्वासन दिले. मात्र त्यापुढील महिन्याचे देयक सुध्दा LT-IIA स्वरुपाचे दिले. हे नियमबाह्य आहे. विरुध्द पक्षाची ही कृती एकतर्फी आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान होत आहे. शिवाय हे देयक न भरल्यास, विरुध्द पक्ष विज पुरवठा खंडित करतील. म्हणून तक्रार प्रार्थनेनुसार मंजूर करुन, अंतरीम अर्ज देखील मजूर करावा, अशी विनंती तक्रारकर्त्याने मंचास केली आहे.
4) यावर विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ते यांना जे LT-IIA स्वरुपाचे विज देयक दिले, ते नियमानुसार देण्यात आले व त्यांचा वापर त्या स्वरुपाचा आहे. यात विरुध्द पक्षाची सेवा न्युनता नाही. त्यामुळे तक्रार खारिज करावी.
5) अशाप्रकारे उभय पक्षांचे कथन व दाखल दस्त तपासले असता असे दिसते की, तक्रारकर्ते यांचा व्यवसाय हा फोटोग्राफी लॅबचा आहे व त्याची स्मॉल स्केल इंडस्ट्रिज नुसार कायम नोंदणी झालेली आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्ते यांना आधी LT-VA या टेरीफनुसार विज पुरवठ्याचे देयक दिले. मात्र सप्टेंबर 2013 मध्ये टेरीफ बदलून LT-IIA नुसार देयक देण्यात आले, कारण विरुध्द पक्षाने दाखल केलेले दस्त – Approved Tariff schedule with effect from August 1, 2012 नुसार non industrial premises / non-residential / Commercial premises मधील विज पुरवठा जर तो फोटो लेबॉरटरीज करिता वापरण्यात येत असेल तर त्या विज पुरवठ्याला Category LT-IIA नुसार टेरीफ आकारण्यात येतो, असे दिसून येते. त्यामुळे विरुध्द पक्षाने वापरानुसार विजेचे दर निश्चित केले आहेत, असे दिसते. म्हणून विरुध्द पक्षाची ही कृती विद्युत कायदा 2003 चे कलम 126 अंतर्गत मोडते. म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र यु.पी.पॉवर कार्पोरेशन X अनिस अहमद, निकाल ता. 01 जुलै 2013 चे निर्देशानुसार, मंचाला हा वाद ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदी अंतर्गत तपासण्याची मुभा नाही. सबब तक्रारकर्ते यांची तक्रार, खारिज करणे क्रमप्राप्त ठरते.
म्हणून अंतिम आदेश, खालीलप्रमाणे पारित केला.
:: अंतीम आदेश ::
1. तक्रारकर्ता यांची तक्रार खारिज करण्यात येते.
2. न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारित करण्यात येत नाही.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri