सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 31/2015
तक्रार दाखल दि.10-02-2013.
तक्रार निकाली दि.09-09-2015.
श्री. कुमार पांडूरंग पाटील,
रा. नांदगांव, ता. कराड, जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
1. मॅनेजर,
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमीटेड,
प्लॉट नं. जी-9, प्रकाशगड,
प्लॉट अनंत कान्हेकर मार्ग,,
बांद्रा (ई), मुंबई – 400 051.
2. सहाय्यक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमीटेड,
शाखा विजयनगर (मुंढे), ता. कराड,जि. सातारा
3. कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमीटेड,
शाखा ओगलेवाडी, ता. कराड,जि. सातारा .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.एस.एम. पाटील.
जाबदार क्र.1 ते 3 तर्फे – अँड.आर.सी.शहा.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे नांदगाव, ता. कराड, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तसेच तक्रारदार हे जाबदार कंपनीचे ग्राहक आहेत. त्यांचा ग्राहक क्र. 197920002810 असा आहे. जाबदार ही विज वितरण कंपनी असून संपूर्ण महाराष्ट्रात योग्य चार्ज घेवून वीज पुरवठा करणेचे काम जाबदार करतात. तक्रारदार हे शेतकरी असून मौजे नांदगांव, ता. कराड, जि.सातारा येथील गट नं. 26 अ मध्ये जमीनीत बोअर मारलेल्या बोअरवेलचे पाणी उचलण्यासाठी तक्रारदाराने लाईट मोटारसाठी जाबदार कंपनीकडे दि.24/8/2013 रोजी मागणीपत्र दिले. त्यास मंजूरी दि.28/8/2013 रोजी दिली आहे. त्यावेळीच जाबदाराने तक्रारदाराला ग्राहक म्हणून स्विकारले आहे. सदर मंजूरीनंतर पावती क्र.6295568 या पावतीने दि. 11/10/2013 रोजी रक्कम रु.5,200/- (रुपये पाच हजार दोनशे मात्र) जाबदाराने तक्रारदाराकडून भरुन घेतले होते व मोटार टिलेपेटी, बटणपेटी,केबल वगैरे बसवून घ्या, त्याच्या पावत्या आम्हाला दाखवा असे जाबदाराने तक्रारदाराला सांगितले. तक्रारदाराने जाबदारावर विश्वास ठेवून तीन एच.पी.ची इलेक्ट्रीक मोटर, टिलेपेटी,बटणपेटी, केबल वगैरे वेगवेगळया दुकानातून सुमारे रक्कम रु.50,000/- खर्च करुन खरेदी केले व सर्व तयारी करुन ठेवली व जमीन पाण्याखाली येणार म्हणून विविध स्वरुपाचा खर्च केला होता. यासर्व गोष्टींना दीड वर्षाचा कालखंड उलटून गेलेला आहे. तरीही जाबदाराने वीज कनेक्शन दिले नाही त्यामुळे तक्रारदाराचे 2 एकर शेतातील ऊसाचे लावणीचे पाणी न मिळाल्याने रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) चे नुकसान झाले आहे. प्रस्तुत नुकसानीस जाबदार वीज कंपनीच नुकसानभरपाईस कारणीभूत आहे. तक्रारदाराने जाबदार कंपनीकडे हेलपाटे मारुनही तक्रारदाराला जाबदाराने वीज कनेक्शन दिले नाही व अखेरीस तक्रारदाराने दि.14/7/2014 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठवली. परंतू जाबदाराने काहीतरी कारणे सांगून वीज कनेक्शन देणेचे नाकारले आहे व त्या तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने मौजे नांदगांव तालुका गट नं.26 अ मधील बोअरला ग्राहक क्रमांक 197920002810 च्या पावती नंबर 6295568 ने घेतलेल्या पैशाप्रमाणे वीज कनेक्शन देणेचा जाबदार यांना हुकूम व्हावा. तक्रारदार यांना झाले मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.2,00,000/- जाबदारकडून मिळावेत व अर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि. 5/11 कडे अनुक्रमे तक्रारदाराने खरेदी केलेल्या मालाच्या पावत्या, राजेश बोअरवेलची पावती, वीजकंपनीची पैसे भरलेची पावती, यश पॉवर या मीटर टेस्टींग पावती, जाबदाराची बील सेक्शनची झेरॉक्स, वीजमंडळाचा टेस्टींग रिपोर्ट, वकीलांमार्फत नोटीस पाठवविण्याची झेरॉक्स, नि. 14 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 16 चे कागदयादीसोबत नि. 16/1 ते 16/7 कडे अनुक्रमे तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेले नोटीसची स्थळप्रत, बियाणाचे खरेदी पावती, गणेश एन्टरप्रायझेसच्या मीटरपेटीचे साहीत्याची पावती, मोटारची पावती, बटन पेटीतील साहित्याची पावती, राजेश बोअरवेलची पावती, जाबदाराकडे डिपॉझीट भरलेची पावती, नि. 18 कडे तक्रारदाराचा पुरावा संपलेची पावती, नि. 19 कडे लेखी युक्तीवाद, नि. 21 चे कागदयादीसोबत जाबदाराकडे डिपॉझीट जमा केलेची मूळ पावती, जाबदार क्र.1 विरुध्द तक्रारदाराने वेगवेगळया डिपार्टमेंटला केलेल्या तक्रारीच्या पोहोचपावती वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केले आहेत.
4. जाबदार क्र. 1 ते 3 हे याकामी हजर झाले परंतू त्यांना योग्य संधी देऊनही जाबदाराने म्हणणे दाखल केलेले नाही सबब या जाबदार यांचेविरुध्द ‘म्हणणे नाही’ आदेश पारीत झालेला आहे. त्यामुळे जाबदाराने याकामी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथने खोडून काढलेली नसल्यामुळे त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविणेत आले.
5. प्रस्तुत कामी वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ मे. मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे तक्रारदाराचे गट नं. 26 अ, नांदगांव, जि.सातारा येथे बोअरवेलचे पाणी उचलण्यासाठी बोअरवर लाईट मोटार बसविण्यासाठी मंजूरी मिळावी म्हणून जाबदार यांचेकडे अर्ज दिला. जाबदार यांनी प्रस्तुत अर्जास मंजूरी दिली व जाबदाराने तक्रारदार यांचा ग्राहक क्र. 197920002810 असा आहे. प्रस्तुत मंजूरीनुसार तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे वीज कनेक्शनसाठी रक्कम रु.5,200/- (रुपये पाच हजार दोनशे मात्र) जमा केले आहेत. त्याची रितसर पावती क्र. 6295568, नि.5/7 कडे दाखल आहे. म्हणजेच तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत हे निर्विवादपणे सिध्द झाले आहे. तसेच प्रस्तुत जाबदाराने तक्रारदाराला बोअरवेलवर मोटार बसविणेस परवानगी दिलेने तक्रारदार यांनी तीन एच.पी.ची इलेक्ट्रीक मोटार, टिलेपेटी, बटणपेटी, केबल असे वेगवेगळया दुकानातून सर्व साहित्य रक्कम रु.50,000/- खर्च करुन खरेदी केले. परंतू जाबदार यांनी तक्रारदार यांचे बोअरवेलसाठी लाईट मोटरचे वीज कनेक्शन तक्रारदाराने वारंवार हेलपाटे मारले. तसेच जाबदाराचे सांगणेनुसार सर्व साहित्य खरेदी केले. तरीही आजअखेर जाबदार यांनी तक्रारदार यांना बोअरवेलसाठी वीज कनेक्शन दिले नाही. तक्रारदाराने शेजा-याकडून पाणी घेवून सुमारे दोन एकर ऊस लावण केली परंतू जाबदाराने तक्रारदार यांना बोअरवेलवरील मोटरसाठी वीज कनेक्शन दिले नाही. त्यामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून दि.11/10/2013 रोजी रक्कम रु.5,200/- विज कनेक्शनसाठी पावती क्र. 6295568 ने डिपॉझीट भरुन घेतलेचे नि. 5/7 कडील पावतीवरुन सिध्द होते. तसेच तक्रारदाराने प्रस्तुत बोअरवेलचे मोटार आणि लागणारे वीजकनेक्शनसाठी लागणारे सर्व साहित्यांची खरेदी केलेल्या मूळ पावत्या नि. 16 चे कागदयादीसोबत दाखल आहेत. प्रस्तुत कामी तक्रारदाराने त्याचे शेतात ऊस लावण केलेबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच सदर ऊस लावणीचे रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) चे पाण्याअभावी नुकसान झालेबाबतचा पुरावाही तक्रारदाराने मे. मंचात दाखल केलेला नाही. परंतू मोटारसाठी व वीजकनेक्शनसाठी लागणारे सर्व साहित्य जाबदाराचे सांगणेवरुन तक्रारदाराने खरेदी केलेचे दाखल पावत्यावरुन शाबीत होते. याकामी जाबदार क्र. 1 ते 3 यांचेतर्फे अँड आर.सी.शहा हे हजर झाले. परंतू प्रस्तुत जाबदार क्र. 1 ते 3 यांनी याकामी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे प्रस्तुत जाबदार क्र. 1 ते 3 यांचेविरुध्द दि. 2/6/2015 रोजी म्हणणे नाही (N0-Say) आदेश पारीत झालेला आहे. जाबदाराने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केले कथनास पुष्ठी मिळते. सबब जाबदार यांनी तक्रारदार यांना बोअरवेलसाठी वीजकनेक्शन आजअखेर न देवून तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी/कमतरता केली असून तक्रारदाराला सदोष सेवा पुरवली आहे हे स्पष्ट व सिध्द होते. सबब आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले कागदपत्रांवरुन तक्रारदाराचे ऊस पिकाचे रक्कम रु.1,00,000/- चे नुकसान झालेचे तक्रारदार शाबीत करु शकलेला नाही. परंतू जाबदार यांनी प्रस्तुत तक्रारदाराचे अर्जातील कोणतेही कथन फेटाळलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांना जाबदाराने वेळेवर वीज कनेक्शन न दिल्यामुळे तक्रारदाराचे पिकांचे नुकसान नक्कीच झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तक्रारदार यांना या गोष्टीमुळे मानसीक, शारिरीक व आर्थिकत्रास होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मानसीक, शारिरीकत्रास व नुकसानभरपाई म्हणून तक्रारदाराला जाबदाराने रक्कम रु.35,000/- (रुपये पस्तीस हजार फक्त) व मानसिकत्रासापोटी रक्कम रु.15,000/-(रुपये पंधरा हजार फक्त) अदा करणे न्यायोचीत होईल.
7. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांचे मौजे नांदगांव, तालुका कराड,
जि.सातारा येथील गट नं. 26 अ मधील बोअरला ग्राहक क्र.197920002810
च्या पावती नंबर 6295568 ने वीज कनेक्शनसाठी डिपॉझीट भरुन घेतले
आहे. त्यामुळे तक्रारदार यांना जाबदाराने प्रस्तुत बोआवेलसाठी मोटारसाठी
वीज कनेक्शन ताबडतोब द्यावे.
3. तक्रारदाराला झाले आर्थीक नुकसानीपोटी जाबदार क्र.1 ते 3 यांनी कंपनीने
तक्रारदार यांना रक्कम रु.35,000/- (रुपये पस्तीस हजार मात्र) अदा करावेत
व मानसिक व शारिरीकत्रासापोटी रक्कम रु.15,000/- (रुपये पंधरा हजार मात्र)
अदा करावेत.
4. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी अर्जाचे खर्चापोटी तक्रारदारांना रक्कम रु.5,000/-
(रुपये पाच हजार मात्र) अदा करावेत
5. वरील नमूद आदेशातील क्र. 2 व 3 आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 ते 3
यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावे.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
8. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 09-09-2015.
सौ.सुरेखा हजारे श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.