(आदेश पारित व्दारा - श्री शेखर पी मुळे , मा. अध्यक्ष)
- आदेश -
( पारित दिनांक – 17 नोव्हेबर 2015 )
- तकारकर्त्याने त्याच्या गाडीचे 4 ही सदोष टायर बदलवुन मिळण्याकरिता किंवा त्याची किंमत मिळण्याकरिता ही तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे.
- तक्रारकर्त्याने दिनांक 7.6.2012 ला विरुध्द पक्ष क्रं.2 कडुन मर्सडीझ बेन्झ कंपनीचे चारचाकी मोटरकार क्रं.एम एच -27 ए आर 3535, चेसिस नं.WDD-2120036L020938 खरेदी केली होती. विरुध्द पक्ष क्रं.2 हे विरुध्द पक्ष क्रं.1 चे अधिकृत विक्रेते आहे. विरुध्द पक्ष क्रं.1 ही मर्सडीझ बेन्झ हे चारचाकी वाहन निर्माण करणारी कंपनी आहे. त्या वाहनाचे टायर विरुध्द पक्ष क्रं.3 या कंपनीने तयार केले होते. सदर वाहनाचा विमा दिनांक 31/5/2013 ते 30/5/2014 या कालावधी करिता वैध होता. मे-जुन 2013 मधे तक्रारकर्त्याचे असे लक्षात आले की, त्याच्या वाहनाचे चारही टायर मधे दोष आहे तोपर्यत त्यांचे वाहन 1500 किलोमिटर चालले होते. त्याच्या वाहनाचे 4 ही टायरला अॅग्रेशन काही कारण नसतांना दिसुन आले. त्यांनी ही बाब विरुध्द पक्षाचे लक्षात आणुन दिली व टायर बदलवुन देण्याची मागणी केली. वाहन चालविण्यामधे किंवा त्याचा वापरामधे कुठलाही दोष नव्हता.
- दिनांक 26/6/2013 ला विरुध्द पक्ष क्रं.3 कडुन अधिकारी श्री लक्ष्मीकांत तक्रारकर्त्याचे घरी आले व त्यांनी त्यांच्या वाहनाच्या चारही टायरची तपासणी केली. तपासणी केल्यावर त्यांनी अहवाल दिला की “ Aggression on the sidewall of tyres is due to continuous and repeated contact with any external sharp object.”. परंतु या अहवालाशी तक्रारकर्ता सहमत नव्हता. त्यांचा वाहन तपासणी करण्यामधे एकतर बराच विलंब झाला होता. त्याप्रमाणे त्यांनी विरुध्द पक्षाला कळविले. तक्रारकर्त्याला दिनांक 22/8/2013 ला विरुध्द पक्ष कं.2 कडुन एक ई-मेल मिळाला. त्यात असे कळविले होती की त्यांच्या वाहनाचे टायर ला काही बोथट वस्तुचे सतत घर्षण झाल्यामुळे टायरवर अॅग्रेशन आले आहे व हा दोष बाहेरच्या कारणमुळे झाला असल्यामुळे तो निर्मीती दोष आहे असे म्हणता येणार नाही आणि त्यामुळे टायरला झालेला दोष हा वॉरन्टी मधे येत नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला अशी विनंती केली की, त्यांच्या वाहनाचे टायर तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे परंतु ती विनंती मान्य करण्यात आली नाही. तसेच त्यांनी वाहनाचे टायर बदलवनु मिळणे किंवा टायरची किंमत मिळण्याकरिता विरुध्द पक्षाला केलेली विंनती पण मान्य करण्यात आली नाही, म्हणुन तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष क्रं.1 ला आदेशीत करण्यात यावे त्यांनी त्यांच्या वाहनाचे चारही सदोष टायर बदलवुन द्यावे किंवा त्यांची किंमत रुपये 72000/- द्यावे. तसेच नुकसान भरपाई दाखल रुपये 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- द्यावे.
- यात विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांना नोटीस जारी करण्यात आली. परंतु विरुध्द पक्ष क्रं.2 नोटीस मिळुनही हजर न झाल्याने त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्यात आले.
- विरुध्द पक्ष क्रं.1 ने त्यांचा लेखी जवाब निशाणी-14 खाली आणि विरुध्दपक्ष क्रं.3 ने त्यांचा लेखी जवाब निशाणी- 20 खाली दाखल केला.विरुध्द पक्ष क्र.1 चे जवाबानुसार विरुध्द पक्ष कं.2 हे अधिकृत विक्रेता नसुन ते विरुध्द पक्ष क्रं.1 कंपनीचे चारचाकी वाहन विकुन विक्रीपश्चात सेवा देण्याचे कार्य करतात. विरुध्द पक्ष क्रं.2 ही एक स्वतंत्र कंपनी असुन विरुध्द पक्ष क्रं.1 चे प्रतिनीधी नाही. विरुध्द पक्ष क्रं.1 ने निर्माण केलेले वाहन हे जागतिक दर्जाचे असुन ते सुरक्षा, सुखसोई व तांत्रिक दृष्टया श्रेष्ठ असतात. तक्रारकर्त्याच्या वाहनाचे टायरमधे झालेला दोष हा बाह्य कारणमुळे झालेला असुन तो निर्मिती दोष नाही. त्या वाहनाचे टायरची निर्मीती ही एक नावाजलेली कंपनी करते. टायरला असलेल्या वॉरन्टीनुसार जर टायरला काही बाहेरील कारणामुळे दोष उद्भवला तर तो वॉरन्टी मधे येत नाही. टायर निर्मीती करणारी कंपनी विरुध्द पक्षक्रं.3 यांनी तपासणी अहवालावरुन तक्रारकर्त्याचा दावा नामंजूर केला होता. तसेच वाहनाचे टायरला झालेला दोष निर्मीती दोष नसल्यामुळे ही तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
- विरुध्द पक्ष क्रं.3 यांनी आपले लेखी जवाबात त्यांचे विरुध्द केलेले सर्व आरोप फेटाळले आहे. पुढे असे म्हटले आहे की, विरुध्द पक्ष क्रं.3 ही टायर निर्माण करणारी आंतरराष्ट्रीय कंपनी असुन विरुध्द पक्ष क्रं.1 या कंपनीला टायर पुरवितात. तक्रारकर्त्याचे वाहनाचे टायरला जे अॅग्रेशन दिसून आले ते विरुध्द पक्ष क्रं.3 ने कबुल केले आहे. परंतु तो निर्मीती दोष असल्याचे स्पष्टपणे नाकारलेले आहे. विरुध्द पक्ष क्रं.3 ने ते टायर तपासणी करुन घेतले होते व त्या अहवालाची प्रत तक्रारकर्त्याला दिली होती. टायरची तपासणी त्यांचे अधिकृत टेक्नीशियन कडुन करण्यात आली होती. तक्रारकर्त्याला सूचना दिली होती की, त्यांनी वाहनचा सतत वापर केल्याने टायरला आलेले अॅग्रेशन अधिक प्रमाणत नुकसान पोहचवू शकते. परंतु तक्रारकर्त्याने त्या म्हणण्याकडे दुर्लेक्ष केले. वॉरन्टी नियमाप्रमाणे जर टायरला बाहेरील कारणामुळे इजा झाली असेल तर ती वॉरन्टी नियमात येत नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
- दोन्ही पक्षाने आपले कथनाचे समर्थनार्थ काही दस्तऐवज दाखल केले आहे त्याचे अवलोकन केल्यानंतर तसेच दोन्ही पक्षांचा युक्तीवाद एैकल्यानंतर खालीलप्रमाणे निष्कर्ष देण्यात येतो.
//*// निष्कर्ष //*//
- तक्रारकर्त्याने मर्सडीझ बेन्झ कंपनीचे वाहन विरुध्द पक्ष क्रं.2 कडुन खरेदी केले हे कुठल्याही विरुध्द पक्षाने नाकबुल केलेले नाही. तसेच तक्रारकर्त्याच्या वाहनाचे चारही टायर ला बाजुने अॅग्रेशन दिसून आले व ते वाहन खरेदी केल्यावर एक वर्षाचे आत झाले याबद्दल पण विरुध्द पक्षाने हरकत घेतली नाही. सबब केवळ एकच प्रश्न उपस्थित होतो की, वाहनाचे टायर मधे जो दोष उत्पन्न झाला तो काही बाहेरील कारणामुळे होता की तो एक निर्मीर्ती दोष होता.
- टायर तपासणी दिनांक 26/6/2013 ला झाली तोपर्यत ते वाहन 6000 किलोमीटर चालले होते आणि खरेदी करुन केवळ एकच वर्ष झाले होते. परंतु टायरमधील उत्पन्न झालेला दोष हा मे-जुन 2013 मधे लक्षात आला होता त्यावेळी वाहन केवळ 1500 किलोमिटर चालले होते. तक्रारकर्त्याची ही बाब विरुध्द पक्षाने त्यांचे लेखी जवाबात किंवा युक्तीवादात नाकारलेली नाही. त्यामुळे असे म्हणता येईल की विरुध्द पक्ष हे मान्य करतात की, वाहन खरेदी केल्यापासून एक वर्षाचे आतच वाहनाचे टायर मधे दोष उत्पन्न झाला. विरुध्द पक्ष क्रं.3 चे अधिकृत टेक्नीशियनने तपासणी केल्यावर असा अहवाल दिला होता की टायर मधे उत्पन्न झालेला दोष हा काही बाहेरील कारणामुळे, म्हणजे तिक्ष्ण वस्तुचे घर्षणामुळे झाला असल्याचे नमुद केले आहे. यावर तक्रारकर्त्याने पण त्यांचे वाहनाची तपासणी दोन टेक्नीशियनकडुन करुन घेतली होती. त्यांचे तपासणी नुसार त्यांना अशी कुठलीही बाहेरील वस्तु दिसून आली नाही ज्यामुळे त्यांचे वाहनाचे टायरला दोष उत्पन्न होईल. तसेच वाहनाच्या चाकाचे अलाईनमेंन्ट योग्य होते. म्हणुन त्यांचे मते टायरमधे जो दोष उत्पन्न झाला जो चारही टायरमधे सारख्याच प्रकारचा होता, त्यामुळे तो बाहेरील काही कारणामुळे झाला असण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली व तो दोष एक निर्मीती दोष असल्याचे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. याप्रमाणे अभिलेखावर दोन वेगवेगळे तपासणी अहवाल सादर करण्यात आले.
- वाहनाचे चारही टायर मधे जो दोष उत्पन्न झाला त्याचा प्रकार पाहता आणि दोन्ही बाजुंचा युक्तीवाद एैकल्यानंतर विरुध्द पक्षाने जो तपासणी अहवाल दाखल केला आहे, त्यावर विश्वास ठेवुन तो मंजूर करण्यास काही अंशी कठीण वाटते. चारही टायर्स, मधे एकाच वेळी आणि एकाच प्रकारचा दोष काही बाहेरील कारणामुळे होईल अशी शक्यता फार कमी असते.
- जर एकाच बाजूच्या किंवा एकाच टायरला काही दोष उत्पन्न झाला असता तर विरुध्द पक्षाचे म्हणणे काही अंशी मंजूर करण्या लायक होते. परंतु चारही टायर्सला एकाच वेळी आणि एकाच प्रकारचा दोष उत्पन्न होणे ही बाब निर्मीती दोष नाही असे म्हणता येणार नाही. विरुध्द पक्षाचे तपासणी अहवालामधे कुठल्या प्रकारचे तीक्ष्ण किंवा बोथट वस्तु लागली किंवा चारही टायर्सला अॅग्रेशन नेमके कशामुळे झाले या बद्दलचा खुलासा नाही. विरुध्द पक्षाने ज्यांचेकडुन तपासणी करुन घेतली त्यांची साक्ष घेणे आवश्यक होते ज्याव्दारे हे सिध्द होऊ शकले असते की टायरमधे उत्पन्न झालेला दोष हा निर्मीती दोष नव्हता. त्या टेक्नीशियनचे शपथपत्र पण अभिलेखावर दाखल केले नाही. अशा परिस्थितीत त्यांनी दिलेला तपासणी अहवालावर विश्वास ठेवून तो मंजूर करणे योग्य वाटत नाही. या ठिकाणी आम्ही मा. राष्ट्रीय आयोगाचे एका निकालाचा आधार घेत आहोत. MRF LTD. VS. Sanapan Deshmukh I (2008)CPJ 165 NC या प्रकरणातील व आमच्या समोरील तक्रारीतील वस्तुस्थिती ही जवळपास सारख्याच प्रकारची आहे. त्या प्रकरणात पण वॉरन्टी मुदतीत तक्रारकत्याचे वाहनाचे टायर मधे दोष उत्पन्न झाला होता आणि वाहन निर्मीती करणा-या कंपनीचा असा दावा होता की, तो निर्मीती दोष नव्हता. त्यासाठी त्यांनी त्याचा अधिकृत तंज्ञाकडुन केलेल्या तपासणीवर आपली भिस्त ठेवली होती. मा.राष्ट्रीय आयोगाने आपल्या निकालात असे नमुद केले आहे की जर टायर कंपनीचा असा दावा होता की, टायरमधे उत्पन्न झालेला दोष हा काही बाहेरील कारणामुळे झालेला होता तर ही बाब सिध्द करण्याची जबाबदारी टायर कंपनीची होती. त्यांनी कोणाचीही साक्ष घेतली नव्हती. त्याचप्रमाणे ज्यांनी तपासणी केली त्यांचे शपथपत्र किंवा साक्ष दाखल केली नव्हती. वरील न्यायनिवाडयाचा आधार घेता आमच्या मते विरुध्द पक्ष हया प्रकरणात ही बाब सिध्द करण्यास पुर्णपणे अपयशी ठरले की तक्रारकर्त्याचे वाहनाचे टायरमधे उत्पन्न झालेला दोष हा निर्मीती दोष नव्हता. उलटपक्षी चारही टायर्समधे एकाच प्रकारचा दोष आणि तो ही एकाच वेळेस उत्पन्न झाला. त्यावरुन सकृतदर्शनी असे दिसून येते की तो एक निर्मीती दोष होता.
- विरुध्द पक्ष क्रं.3 चे वतीने असा युक्तीवाद करण्यात आला की त्यांचे विरुध्द तक्रारीमधे कुठलीही मागणी केलेली नाही त्यामुळे त्यांना या तक्रारीतुन मुक्त करण्यात यावे. या युक्तीवादाशी आम्ही सहमत नाही. तक्रारकर्त्याने जरी टायर बदलवुन मिळण्याची किंवा त्यांची किंमत मिळण्याची मागणी विरुध्द पक्ष क्रं.1 विरुध्द केलेली आहे. तरीही विरुध्द पक्ष क्रं.3 जी टायर निर्मीती करणारी कंपनी आहे. ती सुध्दा जबाबदार आहे. अशोक ए खान वि. अब्दुल खान IV 2005 CPJ 12 (NC) या प्रकरणात पण याच प्रकारचा युक्तीवाद डिलर /एजन्सी कडुन करण्यात आला की निर्मीती दोष जर असेल तर डिलर किंवा एजंटला निर्मीती करणा-या कंपनी सोबत वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या जबाबदार धरता येणार नाही. पण तो मुद्दा खोडुन काढण्यात आला व असा निष्कर्ष देण्यात आला की वाहन विकत घेणारा ग्राहक हा केवळ अधिकृत विक्रेत्याला ओळखतो. त्याची वाहन निर्मीती करणारी कंपनीशी ओळख नसते. ग्राहक आणि अधिकृत विक्रेता यामधे “ प्रिव्हीटी आफ कॉन्टॅक्ट ” असतो. हा अधिकृत विक्रेता आणि ग्राहक यांचेमधील दुवा असतो. कॉन्ट्रॅक्ट अॅक्टचे कलम 226 व 237 नुसार अधिकृत विक्रेता कीवा एजंट हा निर्मीती करणा-या कंपनी सोबत वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या जबाबदार असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही निर्मीती दोषाकरिता जबाबदार ही निर्मीती करणारी कंपनी असते. म्हणुन जरी विरुध्द पक्ष क्रं.3 विरुध्द मागणी केलेली नसली तरी याचा अर्थ असा होत नाही की त्याला वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या जबाबदार धरता येणार नाही व म्हणुन मुक्त करता येईल. प्रस्तुत प्रकरणात टायर निर्माण करणारी कंपनी ही विरुध्द पक्ष क्रं.3 आहे. तक्रारकर्त्याने हे वाहन विरुध्द पक्ष क्रं.2 अधिकृत विक्रेत्याकडुन विकत घेतले म्हणुन वाहनाची निर्मीती करणारी कंपनी व टायर निर्माण करणारी कंपनी दोघेही या प्रकरणात सारखेच जबाबदार आहे
- वरील सर्व वस्तुस्थितीवरुन खालीप्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
-अं ती म आ दे श -
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष क्रं.1-3 निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याच्या
मर्सडीझ बेन्झ चारचाकी मोटरकार क्रं. एम एच-27 ए आर 3535,
चेसिस नं. WDD-2120036L020938 या वाहनाचे चारही दोषपुर्ण टायर
बदलवुन द्यावे. किंवा चारही टायरची किंमत रुपये 72,000/-
तक्रारकर्त्यास अदा करावी.
3. तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रुपये 10,000/-(रुपये दहा हजार फक्त)आणि तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 5,000/-(रुपये पाच हजार फक्त) असे एकुण रुपये 15,000/-
(रुपये पंधरा हजार फक्त)एवढी रक्कम तक्रारकर्त्यांस द्यावी.
4. वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्ष क्रं.1 ते 3 यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या करावे.
5. आदेशाच्या प्रती उभयपक्षकरांना नि:शुल्क पाठविण्यात याव्या.