(घोषित दि. 01.11.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
गैरअर्जदारांनी सदोष बियाणे विक्री केले म्हणून तक्रारदारांनी ही तक्रार केली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे शेतकरी असून सुमारे 15 एकर जमिनिवर शेती करतात. त्यांची मौजे. सारवाडी नेर येथे गट नंबर 135 मध्ये जमिन आहे.
दिनांक 07.06.2011 रोजी राजा हायब्रीडस्, मामा चौक, जालना येथून (गैरअर्जदार कमांक 2) तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांनी उत्पादित केलेले जे.एस.335 जातीचे 8 बॅग सोयाबिन बियाणे रुपये 7,000/- देवून खरेदी केले होते.
दिनांक 10.07.2011 रोजी तक्रारदारांनी ते सोयाबीनचे बी आपल्या शेतात पेरले. परंतू 8 – 10 दिवस झाले तरी त्याला अंकुर शक्ती दिसून आली नाही. तक्रारदार हे वाड-वडिलांपासून शेती करतात व 6 ते 7 वर्षांपासून सोयाबिन पिक घेतात. तक्रारदार प्रतिवादी क्रमांक 2 कडे याबाबत लेखी तक्रार द्यायला गेले तेव्हा त्यांनी बॅगचे टॅग क्रमांक लिहून घेतले व तुम्हाला नुकसान भरपाई मिळवून देतो असे त्यांनी अश्वासन दिले.
शेवटी दिनांक 30.08.2011 रोजी तक्रारदारांनी कृषी विकास अधिकारी, जालना यांचेकडे तक्रार दिली. त्यानुसार कृषी सहाय्यक वीरेगाव यांनी पंचनामा करुन अहवाल दिला. त्यात उगवण शक्ती 5 ते 10 टक्के ऐवढीच दिसून आली.
अपेक्षित पीक न आल्याने तक्रारदारांचे सुमारे रुपये 1,92,000/- ऐवढे आर्थिक नुकसान झाले म्हणून तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारी सोबत बियाणे विकत घेतल्याची पावती, बॅगचे टॅग, पंचनाम्याची प्रत, कृषी अधिकारी यांना दिलेली तक्रार, जमिनीचा 7/12 उतारा, माती पृथक्करण अहवाल इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या म्हणण्याप्रमाणे ते सोयाबिन जे.एस.335 या वाणाचे उत्पादन करतात. सदरचे बीज प्रमाणिकरण यंत्रणेने तपासून ते विक्रीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र देवूनच संपूर्ण राज्यात विक्री करण्यात आली आहे. गैरअर्जदारांनी महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यांनी दिलेला मुक्तता अहवाल दाखल केलेला आहे. बियाणाची उगवण शक्ती, पाऊस, हवामान, जमिनीची प्रत, अंतर मशागत इत्यादी इतर घटकांवर देखील अवलंबून असते. तक्रारदारांनी दिनांक 07.06.2011 रोजी बियाणे आणले व दिनांक 10.07.2011 रोजी पेरले. या काळात त्याची हाताळणी कशी झाली याचा उल्लेख नाही. सोयाबिनचे बियाणे नाजूक असते त्याचे नाकान डॅमेज झाला तर उगवण शक्तीवर परिणाम होतो. तक्रारदारांनी बियाण्याबाबत कृषी अधिकरी, पंचायत समिती यांचेकडे तक्रार केली. परंतु तक्रारदाराच्या पिकाची पाहणी जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने केलेली नाही. तक्रारदारांनी जो पंचनामा दाखल केला आहे तो कृषी सहाय्यक वीरेगाव यांनी केला आहे त्यात जमिनीची पोत, खताचे प्रमाण या शास्त्रीय माहितीचा अंतर्भाव नाही. तक्रारदारास विकलेले बियाणे दोषास्पद नव्हते. त्याने त्याच्या नुकसानीबाबत केलेली विधानेही अवास्तव व खोटी आहेत. सबब तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या लेखी जबाबात म्हटले आहे की, त्यांचा बियाणे विक्रीचा व्यवसाय आहे व ते गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादित केलेले बियाणे विक्रीसाठी ठेवतात. तक्रारदारांना गैरअर्जदार क्रमांक 2 यांना दिनांक 23.09.2011 रोजी नोटीस देवून बियाण्याबाबत तक्रार केली म्हणजे सोयाबिनचे पीक जेव्हा काढले जाते तेव्हा ही नोटीस दिली. त्यापूर्वी कधीही तक्रारदाराने तक्रार केलेली नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 यांना बदनाम करण्याच्या हेतूनेच तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार केली आहे. सबब त्यांची तक्रार फेटाळण्यात यावी.
दोनही पक्षांच्या कथनावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
मुद्दा उत्तर
1.गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादित केलेले
सोयाबिन बियाणे सदोष असल्याचे तक्रारदारांनी
सिध्द केले आहे का ? नाही
2.काय आदेश ? अंतिम आदेश प्रमाणे
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी - तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.एस.के.देशमुख हे सलग तीन तारखांना सुनावणीसाठी गैरहजर होते. सबब तक्रार गुणवत्तेवर निकाली करण्यात येत आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे वकील श्री. प्रदीप कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून खरेदी केलेले सोयाबिनचे बियाणे सदोष असल्याचे सिध्द करण्यासाठी तक्रारदारांनी दिनांक 21.07.2011 रोजी कृषी सहाय्यक वीरेगाव यांनी केलेला पंचनामा दाखल केला आहे. परंतु या पंचनाम्यात केवळ सोयाबिनची उगवण केवळ 5 ते 10 टक्के झाली एवढाच उल्लेख आहे. पंचनाम्यात कोठेही बियाणे सदोष असल्याचा उल्लेख नाही. बियाणामध्ये दोष आहे किंवा नाही याबाबत जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने तक्रारदारांच्या शेताची पाहणी केली किंवा कसे हे दाखल कागदपत्रांवरुन दिसत नाही. या समितीच्या अहवालाशिवाय बियाणे सदोष असल्याचे ठरवता येत नाही. तक्रारदारांनी जिल्हा कृषी अधिकारी, जालना यांचा 2011 च्या सोयाबिन उगवण तक्रारी संदर्भात नुकसान भरपाई द्यावयास सांगणारा दिनांक 24.11.2011 चा आदेश दाखल केला आहे. परंतु त्यासोबत गाव निहाय शेतक-यांची यादी दाखल केलेली नाही. त्यामुळे त्या यादीत तक्रारदारांचा उल्लेख आहे किंवा नाही या गोष्टीचा उलगडा होत नाही. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन गैरअर्जदार क्रमांक 1 ने उत्पादन केलेले सोयाबिन बियाणे सदोष होते ही गोष्ट तक्रारदार सिध्द करु शकलेला नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाही.