(घोषित द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदारानी दिनांक 17/11/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून रु 9,700/- देऊन सोनी ईरिक्सन कंपनीचा हॅण्डसेट खरेदी केला. खेरीदी केल्यानंतर एका महिन्यातच त्यामध्ये स्पिकर नादुरुस्त झाला, गैरअर्जदारानी दुरुस्तीसाठी तो स्पिकर कांही दिवस ठेऊन घेतला. त्यानंतर स्पिकर बदलून दिला. पाच महिन्यानंतर कॅमे-याची, स्लायडींगची समस्या त्यात निर्माण झाली. गैरअर्जदारानी त्यासाठी तो चेन्नई येथे दुरुस्तीसाठी पाठवून दिला. 22 दिवसांनी तो दुरुस्त करुन तक्रारदारास दिला. त्यानंतर पुन्हा हॅण्डसेटचा मदर बोर्ड नादुरुस्त झाला. तोही गैरअर्जदारांनी बदलून दिला. तसेच ईएमआय ही बदलून दिला. थोडयाच दिवसात ब्ल्यू टूथ व हॅण्डसेटची बॉडी पूर्णपणे नादुरुस्त झाली. हेडसेट कनेक्ट होत नव्हता म्हणून दिनांक 1/10/2010 रोजी तक्रारदारानी गैरअर्जदाराकडे हॅण्डसेट दुरुस्तीसाठी दिला. गैरअर्जदारांनी 15 दिवस दुरुस्तीसाठी ठेऊन घेतले. तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदारानी हॅण्डसेट दुरुस्तीसाठी वेळोवेळी बदललेले पार्ट्स जुने टाकले. वॉरंटीच्या कालावधीतच त्यांचा हॅण्डसेट सारखा नादुरुस्त होत होता. त्यामुळे गैरअर्जदाराने तो बदलून द्यावा अशी मागणी तक्रारदार करतात. तक्रारदार गैरअर्जदारांकडून हॅण्डसेट बदलून मागतात तसेच नुकसान भरपाई रु 1,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1,2,3 यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश मंचाने पारित केला. तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचाने पाहणी केली. दिनांक 17/11/2009 रोजी रु 9,700/- खर्च करुन सोनी ईरिक्सन हॅण्डसेट खरेदी केला. त्यानंतर महिन्यातच हॅण्डसेटमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. तक्रारदारानी सर्व्हिस सेंटरमध्ये हॅण्डसेट दुरुस्तीसाठी दिला. अनेक दिवस त्यांच्याकडे ठेऊन घेऊन गैरअर्जदारानी तो परत केला. तक्रारदारानी दिनांक 28/11/2009, 24/2/2010, 10/08/2010, 1/10/2010, 4/10/2010, या तारखेचे जॉबशिट दाखल केले आहेत. त्यावरुन तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे हॅण्डसेट खरेदी केल्यापासूनच त्यामध्ये अनेक समस्या दिसून आल्या. जॉबशिटवरुन तक्रारदार म्हणतात त्यानुसार हॅण्डसेटमध्ये उत्पादकीय दोष आहेत हे सिध्द होते. हॅण्डसेट खरेदी केल्यापासून तक्रार दाखल करेपर्यंत मोबाईल बराच काळ दुरुस्तीसाठी गैरअर्जदारांच्या ताब्यात होता हेही स्पष्ट होते म्हणून मंच गैरअर्जदार क्रमांक 1,2,3 यांना असा आदेश देतो की, त्यांनी तक्रारदारास हॅण्डसेट बदलून द्यावा, ती सिरीज आता उपलब्ध नसेल तर हॅण्डसेटची किंमत रु 9,700/- द्यावी तसेच मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल व खर्चाबद्दल रु 2,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत द्यावेत. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश - तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्रमांक 1,2 व 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास हॅण्डसेट बदलून द्यावा, ती सिरीज आता उपलब्ध नसेल तर हॅण्डसेटची किंमत रु 9,700/- द्यावी तसेच मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल व खर्चाबद्दल रु 2,000/- द्यावेत.
(श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |