निकाल
पारीत दिनांकः- 26/04/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदार, सक्सेस एनग्रेव्हर्स या युनिटचे श्री केदार कानिटकर हे डायरेक्टर आहेत. जाने. 2010 मध्ये अहमदाबाद येथे लागलेल्या “Indinox 2010” या प्रदर्शनामध्ये जाबदेणारांचा स्टॉल होता, त्यामध्ये प्लाझ्मा मशिनसह अनेक मशिन्स होत्या. जाबदेणारांच्या प्रतिनिधीने तक्रारदारास प्लाझ्मा मशिन मॉडेल क्र. PL1325 चे डेमोन्स्ट्रेशन दाखविले. तक्रारदारांना ही मशिन आवडल्यामुळे त्यांनी खरेदी करण्याचे ठरविले. पुण्यामध्ये परतल्यानंतर तक्रारदारांनी या मशिनविषयी चौकशी केली असता, जाबदेणारांनी दि. 19/10/2010 रोजेचे कोटेशन आणि माहितीपुस्तक (Brochure) तक्रारदारास पाठविले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्या माहितीपुस्तकामध्ये धोक्याचा इशारा देणारी म्हणजे वेल्डिंग व कटींग करताना त्यातून येणार्या धुरासंबंधी सुचना नमुद केलेली नव्हती. तक्रारदारांनी कोटेशन मिळाल्यानंतर या मशिनसाठी पर्चेस ऑर्डर दिली. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणारांच्या खात्यामध्ये दि. 15/5/2010 रोजी रक्कम रु. 50,000/-, दि. 12/6/2010 रोजी रक्कम रु. 83,200/- आणि दि. 21/6/2010 रोजी रु. 66,800/- चे चेक जमा केले व युनियन बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा रक्कम रु. 6,00,000/- चा डी.डी. जाबदेणारास दिला. जाबदेणारांना मशिनची रक्कम मिळाल्यानंतर त्यांनी दि. 2/7/2010 रोजी सदरची मशिन व त्याची उपसाधने (Accessories) तक्रारदारांना पाठविली. दि. 17/7/2010 रोजी जाबदेणारांचे इंजिनिअर श्री जितेंद्र पटेल यांनी सदरची मशिन बसविली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, मशिनचे पार्टस पाहताना त्यांच्या असे लक्षात आले की, मशिनच्या सर्वात मोठ्या पार्टवर धोक्याचा इशारा देणारी सुचना लिहिलेली होती. त्या सुचनेमध्ये Hypotherm Powermax 45, वेल्डिंग व कटींग करताना त्यातून येणारा धुर हा आरोग्यास हानीकारक आहे असे नमुद केले होते. “Warning – This product, when used for welding or cutting,
produces fumes or gases which contain chemicals known
to the state California to cause birth defects and, in some
cases cancer.”
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ही सुचना जाबदेणारांनी त्यांना चौकशीच्या वेळी सांगितलेली नव्हती, तसेच माहितीपुस्तकामध्येही सदरची सुचना नमुद केलेली नव्हती. त्यानंतर तक्रारदारांनी, जाबदेणारांचे इंजिनिअर श्री पटेल यांच्यासमोर ही मशिन सिल केली आणि जाबदेणारांना दि. 22/7/2010 रोजी पत्र पाठविले व त्यामध्ये जोपर्यंत वॉर्निंगचा मुद्दा सोडविला जात नाही, तोपर्यंत ते मशिन वापरणार नाहीत असे नमुद केले. जाबदेणारांना सदरचे पत्र मिळूनही त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही. तक्रारदारांना सदरच्या मशिनद्वारे प्रतिमहिना रक्कम रु. 50,000/- मिळाले असते, परंतु तक्रारदारास ते मिळाले नाहीत, तसेच तक्रारदारास रक्कम रु. 7000/- भाड्यापोटी खर्च करावे लागत आहेत आणि या मशिनकरीता त्यांनी रक्कम रु. 80,000/- किंमतीचा कॉम्प्रेसरही खरेदी केलेला आहे. म्हणून तक्रारदारांनी दि. 8/8/2010 रोजी जाबदेणारांना कायदेशिर नोटीस पाठविली. जाबदेणारांनी या नोटीशीस चुकीचे उत्तर दिले. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून मशिनची किंमत रक्कम रु. 8,00,000/- द.सा.द.शे. 18% व्याजदराने, रक्कम रु. 1,00,000/- नुकसान भरपाई द.सा.द.शे. 18% व्याजदराने व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये त्यांना रक्कम रु. 50,000/- नफ्याचे नुकसान झालेले आहे असे नमुद केले आहे म्हणून ते ग्राहक संरक्षण कायदा, 1986, नुसार ते ‘ग्राहक’ नाहीत, कारण त्यांनी सदरची मशिन ही ‘व्यावसायिक कारणासाठी’ (Commercial Purpose) खरेदी केलेले आहे. तसेच तक्रारदारांनी सदरची मशिन ही अहमदाबाद येथून खरेदी केलेली आहे व इनव्हॉईसवर स्पष्ट “Subject to Ahmedabad Jurisdiction” असे नमुद केले आहे, त्यामुळे या मंचास प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र नाही. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी सदरचे मशिन “Indinox 2010” या प्रदर्शनामधून पाहूनच खरेदी केलेले आहे, त्यावेळी जाबदेणारांनी त्यांना सर्व माहिती सांगितली होती, त्याचप्रमाणे त्याचे डेमॉन्स्ट्रेशनही दिले होते, त्यावेळी त्या मशिनवर धोक्याचा इशारा देणारी सुचना लिहिलेली होती व या सुचनेसंदर्भात चर्चाही झालेली होती आणि या चर्चेमध्ये तक्रारदारांनी वेल्डिंगच्या वेळी आणि कटींगच्यावेळी आरोग्यास धोकादायक धूर/वायू बाहेर पडतो हे मान्य केले होते. अशा प्रकारचा व्यवसाय करणार्यांना याबद्दल माहिती असते. या मशिनचा वापर करताना थोडीफार जोखीम पत्करावी लागते, तसेच सुरक्षा साधने वापरुन ही मशिन वापरता येते, असे मशिनच्या मॅन्युअलमध्ये नमुद केलेले आहे. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, माहितीपुस्तकामध्ये फक्त मशिनच्या वापराबद्दल माहिती पुरविलेली असते, सुरक्षेच्या किंवा धोक्याचा बाबतीत माहिती दिलेली नसते. तक्रारदारांची प्रस्तुतची तक्रार ही पश्चात बुद्धीची (After thought) आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासहित नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणारांकडून प्लाझ्मा मशिन खरेदी केली होती. ती बसवितेवेळी, सिल उघडल्यानंतर त्यांना त्यावर ‘धोक्याची सुचना’ (Warning) दिसून आली. ही मशिन वापरल्यानंतर birth defects किंवा कॅन्सर होऊ शकतो, असे कळल्यामुळे तक्रारदारांनी सावधगिरी म्हणून अशा प्रकारची मशिन वापरु शकत नसल्याचे जाबदेणारांना कळविले. तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, मशिनची ऑर्डर देतेवेळी किंवा डेमॉन्स्ट्रेशनच्या वेळी जाबदेणारांनी ही वॉर्निंग दाखविली नव्हती. तर यावर जाबदेणार यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार हे वेल्डिंगचा व्यवसाय करतात, त्यांना अशा प्रकारच्या मशिन्स वापरण्याबद्दल, त्यतून निघणारा धूर हा आरोग्यास घातक असल्याबद्दल माहिती आहे. तसेच अशा मशिन्स ज्यांनी-ज्यांनी घेलेलेल्या आहेत त्यांना हा करार रद्द केलेला नाही. यावर मंचाचे असे म्हणणे आहे की, प्रत्येक ग्राहकास, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार धोकादायक वस्तु/सेवांपासून संरक्षणाचा अधिकार आहे. ही मशिन वापरल्यानंतर जर धोकादायक धूर निघत असतील व ज्यापासून birth defects किंवा कॅन्सर होऊ शकणार असेल तर तक्रारदारास ती मशिन परत करण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी बजावला. वास्तविक पाहता, जाबदेणारांनी वस्तू/सेवा विक्री करताना अशा प्रकारची धोक्याची सुचना प्रथम ग्राहकांना सांगितली पाहिजे, हे त्यांचे कर्तव्य असते. हे तर त्यांनी तक्रारदारास सांगितले नाहीच, उलट तक्रारदारास हे माहितच असले पाहिजे असे म्हणतात. म्हणजे मशिनची विक्री करतान त्यांनी हे तक्रारदारास सांगितले नव्हते हे स्पष्ट होते. कुठलीही सुजाण, समंजस व्यक्ती अशी जोखीम घेणार नाही. मशिनवरील धोक्याच्या सुचनेमध्ये, ही धोक्याची सुचना कॅलिफोर्निया स्टेटमध्ये माहिती आहे, असे नमुद केले आहे. ही मशिन अमेरिकेची आहे, तेथील मशिन बनविणारे त्यावर अशा प्रकारची धोक्याची सुचना देतात आणि तेथील राज्यात त्याची माहिती आहे, हे ही नमुद करतात. आपल्याकडे मात्र आधी धोक्याच्या सुचनेबद्दल सांगितलेच नाही आणि वर तक्रारदार अशा प्रकारची कामे करतात, त्यामुळे त्यांना ही सुचना माहिती असेलच असे गृहीत धरतात. यावरुन जाबदेणारांनी अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचे आढळून येते.
तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या प्रतिनिधीसमक्ष मशिनचे सिल पुन्हा बंद केले. ती मशिन त्यांनी वापरलेलीच नाही, त्यामुळे तक्रारदार त्यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मुळे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार वरील कारणामुले मशिन परत करुन त्याची रक्कम परत मागू शकतात. त्याचप्रमाणे जाबदेणारांनी या मशिनची रक्कम परत करणे ही त्यांची जबाबदारी ठरते. यापुढे जाबदेणारांनी प्रथम अशा प्रकारच्या मशिनमधून निघणार्या धोकादायक धूरासंबंधी माहिती ग्राहकास द्यावी, मशिनच्या समोरील/दर्शनी भागावर त्याची/धोक्याची सुचना (Warning) लिहावी, जेणेकरुन ग्राहकाची फसवणूक होणार नाही, त्यांच्या जिवाशी खेळले जाणार नाही.
तक्रारदारांनी सदरची मशिन ही व्यावसायिक कारणासाठी खरेदी केलेली आहे, हे जाबदेणारांनी सिद्ध केलेले नाही, म्हणून तक्रारदार हे ‘ग्राहक’ ठरतात. त्याचप्रमाणे जाबदेणारांनी सदरची मशिन तक्रारदारास पुण्यास आणून दिली, त्यामुळे या मंचास प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र आहे, असे मंचाचे मत आहे.
धोक्याचा इशारा देणारी सुचना न सांगितल्यामुळे, तक्रारदारांनी मशिन खरेदी केली व ती त्यांना परत करावी लागली. या सर्वांमुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला असेल, म्हणून तक्रारदार रक्कम रु. 10,000/- नुकसान भरपाई व रक्कम रु. 1000/- तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र ठरतात.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारास मशिनची किंमत रक्कम
रु. 8,00,000/- (रु. आठ लाख फक्त) द.सा.द.शे.
9% व्याजदराने दि. 02/07/2010 पासून ते रक्कम
अदा करेपर्यंत व रक्कम रु. 10,000/- (रु. दहा हजार
फक्त) नुकसान भरपाई आणि रक्कम रु. 1000/- (रु.
एक हजार फक्त) तक्रारीचा खर्च म्हणून या आदेशाची
प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या द्यावी.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.