::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 20.01.2017 )
आदरणीय अध्यक्षा श्रीमती एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार
1. तक्रारदार यांनी सदरहु तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये, विरुध्दपक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदार यांची तक्रार, विरुध्दपक्षाचा संयुक्तीक लेखी जबाब, उभय पक्षांनी दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारदार यांचे प्रतिउत्तर व प्रतिज्ञालेख, तक्रारदार यांचा लेखी युक्तीवाद व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला.
तक्रारदार यांचा असा युक्तीवाद आहे की, विरुध्दपक्ष हे वैद्यकीय तथा अभियांत्रिकी प्रवेश परिक्षेकरिता मार्गदर्शक सेवा पुरवितात व खाजगी शिकवणी वर्ग चालवितात. तक्रारदाराने माहे डिसेंबर 2014 मध्ये विरुध्दपक्षाच्या शिकवणी वर्गात प्रवेश मिळण्याकरिता प्रवेश परिक्षा दिली होती व ती पास झाल्यामुळे तक्रारदाराचा विरुध्दपक्षाच्या खाजगी शिकवणी वर्गात प्रवेश निश्चित झाला होता, म्हणून विरुध्दपक्षाने सांगितल्यानुसार दि. 12/1/2015 रोजी रु. 20,000/- अनामत रक्कम म्हणून विरुध्दपक्षाकडे जमा केली, त्यानंतर दि. 9/4/2015 रोजी रु. 20,000/- पुन्हा जमा केले, अशा प्रकारे तक्रारदाराने एकूण रक्कम रु. 40,000/- विरुध्दपक्षाकडे जमा केले आहे. विरुध्दपक्षाने असे आश्वासन दिले होते की, प्रत्येक विभागाचे स्वतंत्र वर्ग घेण्यात येतील व प्रत्येक बॅच मध्ये 80 विद्यार्थी राहतील. पुर्ण शिकवणी फी एकूण रु. 1,10,000/- होती. फी संदर्भात निश्चित बाब प्रकाशित करण्यात आली नव्हती, परंतु विद्यार्थ्यांना आकर्षीत करण्यासाठी उच्च प्रतीची सेवा दिली जाईल, असे भासवुन प्रवेश परिक्षेकरिता पॉम्पलेट, वर्तमान पत्राद्वारे जाहीरात प्रकाशीत करण्यात आली होती. दि. 6/4/2015 पासून सदर शिकवणी वर्गाला सुरुवात झाली, तेंव्हा तक्रारदाराच्या असे लक्षात आले की, विरुध्दपक्षातर्फे योग्य सेवा देण्यात येत नव्हती, ती निकृष्ठ दर्जाची होती. शिक्षक हे त्या त्या विषयातील तज्ञ नव्हते व एका बँच मध्ये 120 पेक्षा जास्त विद्यार्थी घेतल्यामुळे गोंगाट होत होता. ही बाब विरुध्दपक्षाच्या लक्षात आणून दिली होती, परंतु त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे दि. 1/5/2015 रोजी तक्रारदाराने शिकवणी वर्ग सोडला. विरुध्दपक्षाला आवश्यक ती रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम परत करण्याविषयी अर्ज, कायदेशिर नोटीस पाठविली, परंतु विरुध्दपक्षाने रक्कम दिली नाही. तक्रारदार विरुध्दपक्षाची ग्राहक आहे, त्यामुळे ही विरुध्दपक्षाची सेवा न्युनता व व्यापारातील अनुचित प्रथा ठरते. तक्रारदाराने विरुध्दपक्षाच्या शिकवणी वर्गातुन प्रवेश मागे घेतल्यामुळे विरुध्दपक्षाचे कोणतेही नुकसान झाले नाही, सबब तक्रार प्रार्थनेनुसार मंजुर करावी.
यावर, विरुध्दपक्षाचा युक्तीवाद असा आहे की, तक्रादाराने विरुध्दपक्षाकडे दि. 12/1/2015 रोजी 11 वी चे भौतीकशास्त्र, रसायनशास्त्र व जिवशास्त्र या तीन विषयाच्या शिकवणी करिता प्रवेश निश्चित केला व रु. 20,000/- पार्ट फी म्हणून भरली, त्यावेळेस तक्रारदाराच्या वडीलांना रु. 1,10,000/- फी घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, तसेच उपलब्ध शिक्षकांची माहीती दिली होती. तक्रारदाराने जी रक्कम विरुध्दपक्षाकडे भरली, ती शिकवणीच्या फी पोटी भरलेली होती. तक्रारदार काही दिवस शिकवणीसाठी हजर राहीली, मात्र दि. 5/5/2015 पासून सतत गैरहजर राहीली. तक्रारदाराच्या वडीलांना गैरअर्जदाराकडून दिल्या जात असलेल्या दर्जेदार शिक्षणाचे प्रत्यक्षपणे अनुभव घडवुन दिले होते, मात्र तक्रारदारामध्ये शिक्षणाबाबत न्युनगंड होता, त्यामुळे तिने मधातच शिकवणी वर्ग सोडला, वर्ग सुरु झाले असल्या कारणाने एका विद्यार्थ्याची जागा एका सत्रामध्ये कायमची खाली राहत असल्याकारणाने, विरुध्दपक्षाचे उर्वरित रु. 70,000/- चे नुकसान झाले आहे. विरुध्दपक्षाचे शिकवणी वर्ग अद्यावत व वातानुकुलीत आहे, मोठे ग्रंथालय आहे, नावाजलेले शिकवणी वर्ग असून, नामांकित कुटूबांच्या मुला व मुलींनी 11 वी, 12 वी, पीईटी, पीएमटी व अभियांत्रिकी प्रवेश परिक्षेमध्ये घवघवीत यश मिळविलेले आहे, प्रवेश संख्या मर्यादीत असल्यामुळे तक्रारदाराच्या चुकीमुळे एका होतकरु विद्यार्थ्याला प्रवेशास मुकावे लागले आहे. तक्रारदार ही विरुध्दपक्षाची ग्राहक होवू शकत नाही. विरुध्दपक्ष शिक्षण सेवा देतात, त्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन नाही. तक्रारदाराने एकूण रु.40,000/- दोन टप्प्यात विरुध्दपक्षाकडे भरलेले आहेत.
अशा प्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व दाखल सर्व दस्त तपासल्यानंतर मंचाचे असे मत आहे की, विरुध्दपक्षाला हे कबुल आहे की, तक्रारदाराने विरुध्दपक्षाच्या शिकवणी वर्गात प्रवेश घेतला होता व दाखल पावत्यांनुसार नमुद तारखेला एकूण रक्कम रु. 40,000/- दोन टप्प्यात भरली आहे, तसेच विरुध्दपक्षाने हे कबुल केले की, ते शिक्षण सेवा देत असून, त्यांचा कोणताही व्यावयायिक दृष्टीकोन नाही, मात्र ह्यावरुन असे सिध्द होते की, विरुध्दपक्ष हे रक्कम स्विकारुन सेवा देतात, म्हणून तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या तरतुदीनुसार विरुध्दपक्षाची ग्राहक होते, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
तक्रारदार यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या पावत्यांनुसार असे दिसते की, तक्रारदाराने दि. 12/1/2015 रोजी विरुध्दपक्षाकडे रु. 20,000/- रक्कम ही advance payment on a/c of XI PCB होती व दि. 9/4/2015 रोजी च्या पावतीनुसार जी रक्कम रु. 20,000/- विरुध्दपक्षाकडे भरली होती ती part payment म्हणून होती, असे पावत्यांवरुन दिसुन येते. उभय पक्षात ही बाब मान्य आहे की, तक्रारदाराने विरुध्दपक्षाच्या शिकवणी वर्गात फक्त एकूण 25 दिवस पुर्ण करुन तेथील शिक्षण घेतले होते. तक्रारदार यांनी दि. 5/5/2015 रोजी विरुध्दपक्षाकडे केलेला विनंती अर्ज रेकॉर्डवर दाखल आहे, मात्र त्यातील कथन व तक्रारीतील कथन हे वेगवेगळे आहे. कारण तक्रारदाराच्या वडीलांनी दि. 5/5/2015 रोजी विरुध्दपक्षाकडे विनंती अर्ज देवून असे कळविले होते की, “ माझ्या मुलीला आपणाकडील क्लासेसमध्ये आपण जे शिकविता ते लक्षातच येत नाही, ही बाब तिने मला मागील दहा दिवसांअगोदर सांगितली होती. त्यानंतर वेळोवेळी तिने मला मोबाईलद्वारे सांगितले की, क्लासमध्ये आपण जे शिकविता ते तिच्या लक्षात येत नाही व ते तिला समजत नाही. म्हणून दि. 01/05/2015 रोजी मी आपणास प्रत्यक्ष भेटलो व कु. वैष्णवी हिला आपल्या शिकवणी वर्गात लक्षात येत नाही, या बद्दल बोललो. कु. वैष्णवी हिला आपल्या शिकवणी वर्गात लक्षात येत नसल्यामुळे मी तिला माझ्या सोबत परत शेगांव येथे आणले, ही बाबही आपणास माहीत आहे.” पंरतु तक्रारीत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाविरुध्द आरोप केले आहेत, म्हणून मंचाचे मत असे आहे की, तक्रारदाराने स्वतःहून विरुध्दपक्षाचा शिकवणी वर्ग सोडला आहे, त्यामुळे दि. 9/4/2015 रोजी पार्ट पेमेंट म्हणून भरलेली रक्कम रु. 20,000/- विरुध्दपक्षाकडून वापस मिळण्यास तक्रारदार पात्र नाही. परंतु दि. 12/1/2015 रोजी विरुध्दपक्षाकडे जी रक्कम रु. 20,000/- तक्रारदाराने भरली, ती advance payment म्हणून पुर्ण शिकवणी वर्गासाठी भरली होती, ती विरुध्दपक्षाने तक्रारदारास सव्याज परत करावी, कारण विरुध्दपक्षाने त्यांच्या शिकवणी वर्गाच्या फी बद्दलचा आराखडा व एका बॅच मध्ये नक्की किती सिटस् असतात, हे दर्शविणारे दस्त मंचात दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारदाराने मधातच शिकवणी वर्ग सोडला म्हणून विरुध्दपक्षाकडे एका विद्यार्थ्याची जागा एका सत्रामध्ये कायमची खाली राहून, विरुध्दपक्षाचे नुकसान झाले हा विरुध्दपक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरता येणार नाही. अशा प्रकारे तक्रारदार विरुध्दपक्षाकडून रक्कम रु. 20,000/- सव्याज परत मिळण्यास पात्र आहे. मात्र इतर नुकसान भरपाई व प्रकरणाचा न्यायिक खर्च मिळण्यास पात्र नाही, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. सबब अंतीम आदेश खालील प्रमाणे पारीत केला.
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास दि. 12/1/2015 रोजी भरलेली advance payment on a/c of XI PCB शिकवणी वर्गाची रक्कम रु. 20,000/- ( रुपये विस हजार फक्त ) द.सा.द.शे. 8 टक्के व्याज दराने दि. 5/5/2015 ( विनंती अर्ज ) पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदाईपर्यंत व्याजासहीत द्यावी.
- सदर आदेशाची पुर्तता, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावी.
- तक्रारदाराच्या इतर मागण्या फेटाळण्यात येत आहेत.
- न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारीत नाही.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.