निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार हा मोलमजुरी करुन आपल्या कुटूंबाची उपजिविका करतो. अर्जदारास तीन अपत्ये-एक मुलगा व दोन मुलगी व पत्नी असा परिवार आहे. अर्जदाराच्या पत्नीची कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया करण्यास गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी नकार दिला. कारण अर्जदाराची पत्नी अशक्त व कमजोर होती. म्हणून अर्जदाराने स्वतः गैरअर्जदार यांच्या सल्ल्यानुसार स्वतःवर पुरुष नसबंदी शस्त्रक्रीया करण्याचे निश्चित केले. गैरअर्जदार क्र. 3 यांनी शस्त्रक्रीया सोपी असून घाबरण्याचे कारण नाही असे सांगितले. त्यानुसार दिनांक 02.02.2009 रोजी अर्जदारावर पुरुष नसबंदी ही बिनटाकी शस्त्रक्रीया करण्यात आली व तसे प्रमाणपत्र अर्जदार यांना गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी दिले. काही महिन्यानंतर अर्जदाराची पत्नी गरोदर असल्याचे अर्जदार व त्यांच्या पत्नीस जाणवले. म्हणून अर्जदार त्वरीत गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन गैरअर्जदार यांना भेटला असता गैरअर्जदार यानी कुठलीही दखल घेतली नाही. अखेर अर्जदार यांच्या पत्नीला दिनांक 24.08.2012 रोजी नको असलेले अपत्य जन्मले. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्या निष्काळजीपणामुळे अर्जदार व त्यांच्या पत्नीला नको असलेले स्त्री जातीचे अपत्य जन्मले आहे. त्यामुळे चुकीच्या शस्त्रक्रीयेव्दारे जन्मलेल्या स्त्री जातीच्या अपत्याचे पालन पोषण शिक्षण,अन्न,वस्त्र,निवारा व इतर खर्चयाची संपूर्ण जबाबदारी गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांची आहे. गैरअर्जदार क्र. 1, महाराष्ट्र शासन यांनी गैरअर्जदार क्र. 4 यांचेकडे सदरील योजनेंतर्गत विमा योजनेसाठी प्रिमियम भरलेले होते व सरकारी योजनेखाली जर काही नुकसान झाले तर सदरील नुकसान भरपाई ही गैरअर्जदार क्र. 1 हे न देता सदरील रक्कम गैरअर्जदार क्र. 4 यांचेकडून मिळेल अशा प्रकारचा शासनाचा जी.आर. आहे. अर्जदार हा अज्ञानी आहे. अर्जदार गैरअर्जदार यांचेकडे गेला असता गैरअर्जदार यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्या गलथान कारभार व निष्काळजीपणामुळे अर्जदार हा विमा रक्कमेपासून वंचित राहिला आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे विमा संबंधी अनेक चकरा मारल्या तसेच गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेशी संपर्क साधला परंतु गैरअर्जदार यांनी तुम्हाला कुटूंब नियोजन विम्याचा लाभ घेता येणार नाही असे सांगितले. अर्जदारास खुप आर्थिक अडचण भासत आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास विम्याच्या लाभापासून वंचीत ठेवल्यामुळे सेवेत त्रुटी दिलेली असल्याने अर्जदाराने तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांचेकडून नुकसान भरपाई म्हणुन रक्कम रु.1,70,000/- अर्जदाराच्या चौथ्या अपत्याचे पालन पोषण, शिक्षण,लग्नाचा खर्च यापोटी रक्कम रु.3,00,000/- तसेच महाराष्ट्र शासनाचा ठराविक विमा रक्कम रु.30,000/- असे एकूण रक्कम रु.5,00,000/- गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी अर्जदारास द्यावेत अशी मागणी तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांच्या वतीने †ò›ü.आर.के.मालेगांवकर यांनी दिनांक 25.01.2014 रोजी हजर होऊन अर्ज दिला. गैरअर्जदार क्र. 2 यांनी प्रकरणात हजर होऊन अर्ज दिलेला आहे. परंतु अनेक संधी देऊनही आपला लेखी जबाब मंचासमोर दाखल केलेला नाही. गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांना नोटीस तामील न झाल्याने गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांना वर्तमानपत्राव्दारे जाहीर नोटीस काढण्यात आली. परंतु गैरअर्जदार क्र. 3 व 4 हजर झालेले नाहीत.
4. अर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र , कागदपत्रे व लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
5. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेकडे दिनांक 02.02.2009 रोजी पुरुष नसबंदी शस्त्रक्रीया (बिनटाका) केलेली असलेचे प्रमाणपत्रावरुन सिध्द होते. सदरील शस्त्रक्रीयेनंतरही अर्जदार व त्यांच्या पत्नीस चौथे अपत्य झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार विमा रक्कम मिळावी व नको असलेले स्त्री अपत्य जन्मल्यामुळे त्याची पालन पोषण,शिक्षण,लग्नाचा खर्च इत्यादीसाठीची रक्कम मिळावी यासाठी अर्जदाराने तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्रे क्र. 5 व 6 चे अवलोकन केले असता वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, अर्धापूर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग यांना दिनांक 23.11.2012 रोजी पत्राव्दारे अर्जदारास विमा योजनेचा लाभ मिळणेसाठी मान्यता द्यावी असे कळविलेले आहे. दिनांक 06.12.2012 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा परिषद नांदेड यांनी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धापूर यांना पत्राव्दारे कळविलेले आहे की, गैरअर्जदार क्र. 4 आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इंशुरन्स कंपनी लि. मुंबई येथे शस्त्रक्रीया असफल झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर 90 दिवसाच्या आंत प्रस्ताव प्राप्त होणे अपेक्षित आहे. परंतु विहित मुदतीत प्रस्ताव न आल्यामुळे लाभार्थी योजनेचा लाभ मिळणेबाबत अनुज्ञेय नसल्यामुळे प्रस्ताव सादर करता येत नाही. त्यामुळे सदरील प्रस्ताव परत करण्यात येत आहे असे कळविलेले आहे. वास्तविक पाहता जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रस्ताव विमा कंपनीस पाठविणे आवश्यक होते. परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही. प्रस्ताव प्राप्त न झाल्यामुळे विमा कंपनीने अर्जदारास रक्कम दिलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 4 यांनी सेवेत त्रुटी दिलेली नाही असे मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी तक्रारीमध्ये नको असलेले स्त्री जातीचे अपत्य जन्माला आल्यामुळे त्याच्या पालन पोषण शिक्षण,लग्नाचा खर्च याची संपूर्ण जबाबदारी गैरअर्जदार यांची असल्याने खर्चाची मागणी गैरअर्जदाराकडून केलेली आहे. ही बाब अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. कारण प्रत्येक पाल्याचे आई-वडील हे Natural guardian असतात व आई-वडीलांशी प्रत्येक पाल्याशी भावनिक जवळीक असून आई-वडीलांनी पाल्याचे योग्य पालन पोषण करणे हे आई-वडीलांचे प्रमुख कर्तव्य आहे असे असतांनाही स्त्री जातीचे अपत्याची जबाबदारी नाकारणे ही बाब अत्यंत निंदनिय आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे अर्जदाराची मागणी योग्य नाही. परंतु महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार विमा रक्कम मिळणेस लाभार्थी असल्याचे मंच खालील आदेश देत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 1, जिल्हा आरोग्य अधिकारी,नांदेड यांनी अर्जदाराचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र. 4 विमा कंपनी यांचेकडे आदेश तारखेपासून 15 दिवसांत पाठवावा.
3. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 4 विमा कंपनी यांनी 30 दिवसांत गुणवत्तेवर निर्णय द्यावा.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.