- नि का ल प त्र -
व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी मनोरंजनासाठी खालील वर्णनाचे LED TV हे उपकरण खरेदी केले होते.
Panasonic – Model Th-32AS630D, Full HD Smart TV
Sr.No.14MCS01994
किंमत रु.35,500/-
बुकींग तारीख व रक्कम – रु.5,500/- दि. 24/10/14
उर्वरीत जमा रक्कम - रु.30,000/- दि. 25/10/14
मूळ बिल नं. 2788 ता.25/10/14
वि.प.क्र.1 यांचे वर नमूद पत्त्यावर कार्यालय असून, विविध कंपन्यांची घरगुती उपकरणे विक्री करण्याचा व्यवसाय आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने वि.प.क्र.1 हे मोठया प्रमाणावर टी.व्ही. या उपकरणाची विक्री करणे व ग्राहकांना विक्रीपश्चात उत्तम प्रकारची सेवा पुरविणे इ. कामे करीत असते. त्यासाठी वि.प.क्र.2 कंपनीने मान्यताप्राप्त विक्री केंद्र म्हणून वि.प.क्र.1 यांची नेमणूक केली आहे. यातील वि.प.क्र.3 हे वि.प.क्र.2 या मूळ कंपनीचे कोल्हापूरस्थित विक्री पश्चात सेवा केंद्र आहे. तक्रारदाराने वर नमूद केलेले टी.व्ही. उपकरण हे वि.प.क्र.1 कडून खरेदी केले व त्याची संपूर्ण किंमत वि.प.क्र.1 व 2 यांना दिलेली आहे. सदरचे उपकरण हे दि. 1/9/14 ते 31/10/14 या कालावधीत खरेदी केल्यास त्यास 2 वर्षाची वॉरंटी दिली होती. सदरचा टीव्ही दि. 27/9/16 रोजी रात्री अचानक बंद पडला म्हणून तक्रारदारांनी सदरची बाब वि.प. यांचे टोल फ्री नंबरवर कळविली. वि.प.क्र.2 यांनी सदरची तक्रार ही R-280916153028 या क्रमांकाने नोंद करुन घेतली. त्यानंतर वि.प. क्र.2 यांनी वि.प. क्र.3 यांचे सर्व्हिस सेंटरमधून सदर टी.व्ही. दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ पाठविला. त्याने टी.व्ही. खोलून पाहिला असता सदर टीव्हीचे LED Panel खराब झाले असून कंपनीकडून नवीन पॅनेल आल्यानंतर बसवून दिले जाईल असे त्याने सांगितले. परंतु तदनंतर वि.प. यांनी कोणताही प्रतिसाद दिला. तक्रारदारांनी पुनश्च टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदविली. परंतु वि.प. यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी वि.प. क्र.3 यांचे केअर सेंटरशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रारदारांनी, ज्या तुषार एजन्सीकडून टीव्ही खरेदी केला, त्याचे बिल नकली आहे असे सांगितले. ते एकून तक्रारदारांना धक्का बसला. म्हणून तक्रारदार यांनी याबाबत वि.प.क्र.1 यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी वेळकाढूपणा केला. त्यामुळे तक्रारदारास आपली फसगत झाल्याचे लक्षात आले. म्हणून तक्रारदारांनी वि.प. क्र.1 ते 3 यांना कायदेशीर नोटीसा पाठविल्या. परंतु तरीही त्यास वि.प. यांनी उत्तर दिले नाही. सबब, तक्रारदार यांनी वादातील टीव्ही दुरुस्त करुन मिळावा किंवा नवीन उपकरण मिळावे, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प.कडून मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत टी.व्ही बुक केलेची पावती, रकमा दिल्याची पावती, वॉरंटी प्रमाणपत्र, वि.प. यांना दिलेल्या नोटीसा, बँक खाते उतारा
इ. एकूण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व कागदयादीसोबत वि.प. यांनी तक्रारदारांच्या ईमेलला दिलेली उत्तरे यांच्या प्रती दाखल केल्या आहेत. ता.4/5/18 रोजी वि.प. यांनी तक्रारदारांचे ईमेलला दिलेल्या रिप्लायची प्रत दाखल केलेली आहे.
3. वि.प. क्र.1 यांना याकामी नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर राहिले नाहीत व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द नि.1 वर ता.7/9/17 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आला.
4. वि.प. क्र.2 यांनी याकामी हजर होवून दि.6/02/18 रोजी लेखी म्हणणे दाखल केले व तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांनी टी.व्ही बाबत तक्रार केलेनंतर वि.प. यांचे सर्व्हिस इंजिनिअरने ती अटेंड केली होती. त्यामध्ये एल.ई.डी पॅनेलमध्ये दोष असल्याचे आढळून आले. तक्रारदार यांनी सदरचा टी.व्ही. वॉरंटी कालावधीत आहे की नाही हे पाहण्यासाठी बिल हजर करणे आवश्यक होते. एल.ई.डी. च्या बिलांबाबत कन्फ्युजन असून प्रस्तुत वि.प. यांना असलेल्या माहितीप्रमाणे एल.ई.डी. चे युनिट हे तक्रारदार यांनी हेडा यांचेकडून विकत घेतलेले होते. पण त्याचे बिल तुषार इंजिनिअर्सने दिलेले होते. परंतु प्रस्तुत वि.प. यांचे असलेले सदर कन्फ्युजन वि.प.क्र.1 यांनी दूर केलेने सदरचे वि.प. हे तक्रारदार यांचे टी.व्ही.चे पॅनेल हे वॉरंटी काळात तक्रारदार यांचेकडून कोणतीही किंमत न भरुन घेता विनामोबदला करुन देणेस तयार आहेत. सबब, तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती वि.प.क्र.2 यांनी केली आहे.
5. वि.प.क्र.3 यांनी ता. 30/10/17 रोजी वि.प.क्र.2 यांचे वि.प.क्र.3 हे अधिकृत सर्व्हिस सेंटर असून त्यांचे नियमानुसार ग्राहकांसाठी सेवा पुरवितात. प्रस्तुत तक्रारीतील सेवा पुरवठयाबद्दल वि.प.क्र.2 यांचे नियमांना बांधील आहे. वि.प.क्र.2 हे म्हणणे मांडतील ते मला मान्य आहे असे वि.प.क्र.3 यांनी म्हणणे दाखल केले आहे.
6. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
3 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर |
कारणमिमांसा–
मुद्दा क्र. 1 –
7. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी मनोरंजनासाठी खालील वर्णनाचे LED TV हे उपकरण खरेदी केले होते.
Panasonic – Model Th-32AS630D, Full HD Smart TV
Sr.No.14MCS01994
किंमत रु.35,500/-
बुकींग तारीख व रक्कम – रु.5,500/- दि. 24/10/14
उर्वरीत जमा रक्कम - रु.30,000/- दि. 25/10/14
मूळ बिल नं. 2788 ता.25/10/14
वि.प.क्र.1 यांचे वर नमूद पत्त्यावर कार्यालय असून, विविध कंपन्यांची घरगुती उपकरणे विक्री करण्याचा व्यवसाय आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने वि.प.क्र.1 हे मोठया प्रमाणावर टी.व्ही. या उपकरणाची विक्री करणे व ग्राहकांना विक्रीपश्चात उत्तम प्रकारची सेवा पुरविणे इ. कामे करीत असते. त्यासाठी वि.प.क्र.2 कंपनीने मान्यताप्राप्त विक्री केंद्र म्हणून वि.प.क्र.1 यांची नेमणूक केली आहे. यातील वि.प.क्र.3 हे वि.प.क्र.2 या मूळ कंपनीचे कोल्हापूरस्थित विक्री पश्चात सेवा केंद्र आहे. वि.प.क्र.2 ही टी.व्ही. उपकरणाची नावाजलेली कंपनी असून तक्रारदार यांनी वर तपशीलात नमूद केलेले टी.व्ही. उपकरण रक्कम रु.35,500/- इतक्या रकमेस खरेदी केले. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत ता. 24/10/14 रोजी वि.प.क्र.1 यांचेकडे रक्कम रु.5,500/- भरुन टी.व्ही. बुक केलेची पावती दाखल आहे. तसेच ता. 24/10/14 रोजी रक्कम रु.35,500/- भरलेची पावती दाखल केलेली आहे. सदरच्या पावत्या वि.प. यांनी नाकारलेल्या नाहीत. पावतीवरील रकमेचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत हे स्पष्टपणे शाबीत होते.
8. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेमार्फत कॅपीटल फायनान्स कंपनी या वित्त पुरवठा करणा-या कंपनीचे कर्ज घेतलेले होते. त्यानुसार वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.35,500/- चे बिल नं. 2788/- दिले. सदरचे बिल तक्रारदार यांनी दाखल केलेल आहे. तक्रारदार यांनी सदरचा टी.व्ही ता. 25/10/14 रोजी खरेदी केला. ता. 27/9/16 रोजी सदरचा टी.व्ही. अचानक बंद पडला. तक्रारदार यांनी सदरचा टी.व्ही. दुरुस्ती करणेसाठी कंपनीचे टोल फ्री नं....18001081333 व 18001031313 ता. 28/9/16 रोजी कळविले. त्यानुसार वि.प. क्र.2 कंपनी यांनी सदरची तक्रार रजि. नं. R-280916153028 दाखल करुन घेतलेचे तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. वि.प. क्र.2 यांनी वि.प.क्र.3 यांचे सर्व्हिस सेंटर मधून सदरचे टी.व्ही दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ (Technician) पाठविला असता सदरचा टी.व्ही.खोलून पाहिला असता, सदरचे टी.व्ही. चे एल.ई.डी. पॅनेल खराब झाले असून कंपनीकडून नवीन एल.ई.डी. पॅनेल बसवून दिले जाईल असे तक्रारदार यांना सांगण्यात आले. तक्रारदार यांनी पुनश्च वि.प.क्र.2 कंपनीकडे तक्रार नोंदविली. परंतु वि.प.क्र.2 अथवा वि.प.क्र.3 यांचेकडून कोणतीही सकारात्मक कृती झालेली नाही. वि.प.क्र.3 यांनी सदरचे बिल बनावट असलेचे सांगितले. सदर टी.व्ही बंद पडल्यापासून 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत कोणतीही ठोस कृती वि.प. यांनी केलेली नाही. सबब, वि.प. क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना सदरचा दोषयुक्त टी.व्ही. देवून तसेच सदरचे टी.व्ही. चे उपकरणातील दोष त्वरित दूर करणेसाठी वेळोवेळी तक्रारदार यांनी वि.प. यांना सांगून देखील वि.प. यांनी आजतागायत सदरचे टी.व्हि.तील दोष दुरुस्त न करुन व विक्रीपश्चात सेवा न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.
9. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 यांना मंचाचे नोटीसची बजावणी होवून देखील ते गैरहजर असलेने त्यांचेविरुध्द ता. 7/9/17 रोजी एकतर्फा आदेश पारीत करणेत आला आहे. वि.प.क्र.3 यांनी वि.प.क्र.2 ने जे म्हणणे मांडतील ते मान्य असलेचे म्हणणे दाखल केले आहे. प्रस्तुतकामी वि.प.क्र.2 यांचे म्हणणेचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांचेकडून ता. 28/9/16 रोजी पहिली तक्रार स्वीकारणेत आलेली होती. त्यानुसार सदरची तक्रार सर्व्हिस इंजिनियरने अटेंड केलेली होती. सदरचे एल.ई.डी. चेक केल्यानंतर त्याचे पॅनेलमध्ये दोष असलेचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पॅनेल बदलणे आवश्यक होते असे वि.प. कं.2 यांनी कथन केलेले आहे. म्हणजेच सदरचे एल.ई.डी. उपकरणात दोष असलेचे वि.प. क्र.2 यांनी मान्य व कबूल केले आहे. वि.प. यांचे माहितीप्रमाणे एल.ई.डी. युनिट हे तक्रारदार यांनी हेडा यांचेकडून विकत घेतलेले होते. पण त्याचे बिल तुषार इंजिनियर्स या नावाने होते. परंतु प्रस्तुत वि.प. यांचेकडे असलेले सदर Confusion वि.प.क्र.1 यांनी दूर केले असलेने एल.ई.डी. चे पॅनेल त्याचे असलेल्या वॉरंटी काळात तक्रारदार यांचेकडून कोणतीही किंमत न घेता फ्रीमध्ये करुन देणेस तयार आहेत असे वि.प.क्र.2 यांनी मान्य केलेले आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी सदर उपकरणाची वॉरंटी ही 2 वर्षे असलेचे प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. सदरची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. प्रस्तुतकामी तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन केले असता, सदरचे तक्रारदारांचे बिल नकली/बनावट असलेचे वि.प. यांनी सांगितले असे कथन केले आहे. तसेच वि.प. यांनी देखील लेखी म्हणणेमध्ये सदरचे बिलाबाबत confusion होते असे मान्य केले आहे. सदरचा टी.व्ही. बंद पडल्यापासून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत तक्रारदारांची कोणतीही चूक नसताना वि.प. यांनी जाणीवपूर्वक तक्रारदारांचा जाकतुंबा केलेचा दिसून येतो. तक्रारदार यांनी प्रस्तुतकामी वि.प. यांनी ता. 03/10/16 रोजीपासून दि. 28/10/16 रोजीपर्यंत वेळोवेळी तक्रारदारांचे ईमेलला दिलेला रिप्लाय दाखल केलेला आहे. सदरचे ईमेल वि.प. यांनी नाकारलेले नाहीत. तसेच तक्रारदाराने वि.प.क्र.1 यांना ता. 26/1/16 रोजी व वि.प.क्र.2 व 3 यांना दि. 28/1/17 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविलेली आहे. सदरचे नोटीसीची प्रत तक्रारदारांनी या मंचात तक्रारीसोबत दाखल केलेल्या आहेत.
10. सबब, दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, सदर उपकरणातील दोष त्वरित दूर व्हावा यासाठी तक्रारदाराने वि.प.क्र.1, 2 व 3 यांना नोटीस पाठवून देखील वि.प. यांनी सदर नोटीसीस आजअखेर उत्तर दिलेले नाही अथवा सदरच्या एल.ई.डी. टी. व्ही. आजअखेर दुरुस्त केलेला नाही. Privity of contract चे तत्वानुसार कोणत्याही उपकरणाची विक्री करत असताना विक्रीपश्चात ग्राहकाला सेवा पुरविणेची जबाबदारी विक्रेत्यावर असते. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वेळोवेळी वि.प. यांना विनंती करुन देखील वि.प. यांनी विक्रीपश्चात तक्रारदारास सेवा न देवून तसेच सदोष एल.ई.डी. टी. व्ही. उपकरण देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारर्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
11. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. त्याकारणाने वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना सदरचे टी.व्ही उपकरणातील दोष तात्काळ दूर करुन द्यावा, दोष कायमस्वरुपी दूर करता येणे शक्य नसेल तर तक्रारदार यांना नवीन उपकरण द्यावे. प्रस्तुत कामी सदरचा टी.व्ही. 6 महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेने तक्रारदारांना मनोरंजनापासून वंचित रहावे लागले. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेल्या खातेउता-यावरुन तक्रारदार हे कॅपिटल फस्ट फायनान्स या कंपनीचे सदर उपकरणाचे नियमित हप्ते भरत होते. या सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारीचा खर्च रु. 3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 - सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांचे टी.व्ही. उपकरणातील दोष तात्काळ दूर करावा. दोष कायमस्वरुपी दूर करता येत नसेल तर तक्रारदार यांना नवीन उपकरण त्वरित अदा करावे.
- वि.प.क्र.1 व 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावेत.
- वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प.यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत वि.प. यांनी आदेशाची पूर्तता न केलेस तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 खाली दाद मागणेची मुभा राहिल.
- सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.