(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 11.08.2011) अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदाराचे सराफा लाईन, चंद्रपूर येथे ‘मे.लोढीया अन्ड सन्स ज्वेलर्स’ या नावाने सोन्या-चांदीचे दुकान आहे. अर्जदाराला त्याचे दुकान चालविण्याकरीता बरेच भांडवल लागते, त्याकरीता गैरअर्जदार क्र.1 चे बँकेत रुपये 30,00,000/- पर्यंतचे कॅश क्रेडिट लिमीट खाते आहे. सदरचे खाते गैरअर्जदार क्र.2 कडून विमाकृत करण्यात आले आहे आणि त्याबाबत विम्याचा हप्ता अर्जदाराचे त्याचे खात्यामधून गैरअर्जदार क्र.2 ला दिले. दि.24.10.09 ते 25.10.09 चे राञी अर्जदाराचे दुकानात चोरांनी सोन्या-चांदीच्या रुपये 9,23,141/- चे दागीन्याची चोरी केली. दि.25.10.09 रोजी सकाळी अर्जदाराचा भाऊ महेश लोढीया हा दुकान उघडण्याकरीता आला असता, त्याला दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले. याबाबत, पोलीसांना माहिती दिल्यानंतर लगेच पोलीस घटनास्थळी आले. पोलीसांनी सांगितल्यानंतर लगेच श्री महेश लोढीया यांनी दुकानामधील एक आलमारी उघडून पाहली असता, त्याला त्यावेळेस 50 ग्रॅम सोने कमी असल्याचे दिसले. त्यामुळे, त्याने रुपये 80,000/- चे दागिन्याची चोरी झाल्याबाबत पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिला. त्यावेळेस त्याने सदर रिपोर्ट मध्ये दुकानातील सगळ्या आलमा-यांची तपासणी केल्यानंतर चोरी गेलेल्या सगळ्या दागिण्याचे विवरण देण्याबाबत माहिती दिली होती. श्री महेश लोढीया यांनी दिलेल्या रिपोर्ट वरुन शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर यांनी गुन्हा क्र.219/10 नुसार कलम 380, 457 अन्वये गुन्हा दर्ज केला.
2. अर्जदाराने, रिपोर्ट दिल्यानंतर त्याचे दुकानातील आलमा-यांची बारकाईने पाहणी केली असता, त्याला त्याचे दुकानातील पुष्कळ सोन्या-चांदीचे दागिने चोरी गेल्याचे निदर्शनास आले. गुन्हाच्या तपासादरम्यान महेश लोढीया यांनी दि.30.10.09 चे पञान्वये दुकानातून चोरी गेलेल्या दागिण्याची यादी पोलीसांना दिली. दिलेल्या रिपोर्टनुसार दुकानात रुपये 9,23,141/- चे दागिण्याची चोरी झाल्याचे निश्चित झाले. अर्जदाराने चोरी झाल्याची माहिती गैरअर्जदार क्र.2 ला दिली आणि चोरीमुळे झालेल्या नुकसानाबाबत विम्याची रककम देण्याबाबत विनंती केली. गैरअर्जदार क्र.2 ने चोरीमुळे अर्जदाराला झालेल्या नुकसानीची चौकशी करण्याकरीता मे.कुनीनघम लिनडसे इनटनॅशनल प्रा.लि. या खाजगी एजन्सीला तपासणीचे काम दिले. अर्जदाराने, तपासाचे वेळचे गैरअर्जदार क्र.2 ला चोरी गेलेल्या सोने आणि चांदीच्या दागिण्यासंबंधीचे संपूर्ण कागदपञे आणि बिल दिले होते. चौकशी दरम्यान गैरअर्जदार क्र.2 ने दि.14.10.10 चे चेक क्र.117939 व्दारे रुपये 44,500/- अर्जदाराला झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून गैरअर्जदार क्र.1 कडे जमा करुन अर्जदाराचे खात्यात जमा करण्यास सांगितले. परंतु, गैरअर्जदार क्र.2 ने दिलेली नुकसान भरपाई ही न्यायोचीत नसल्यामुळे अर्जदाराने सदर रक्कम घेण्यास नकार दिला, त्यामुळे सदर चेक गैरअर्जदार क्र.2 ला परत पाठविण्यात आला. 3. अर्जदाराने दुकानाचा विमा रुपये 30,00,000/- चा गैरअर्जदार क्र.2 कडून काढलेला होता आणि विम्याचे तारखेत अर्जदाराचे दुकानात चोरी झाली, त्यामुळे झालेली पूर्ण नुकसान भरपाई अर्जदारास देण्यास गैरअर्जदार क्र.2 बंधनकारक आहे. अर्जदाराचे, गैरअर्जदार क्र.1 चे बँकेत खाते असल्यामुळे आणि ते खाते गैरअर्जदार क्र.2 कडून विमाकृत असल्यामुळे अर्जदार गैरअर्जदारांचा ग्राहक आहे. गैरअर्जदारांनी अर्जदारास दिलेल्या न्युनतापूर्ण सेवामुळे अर्जदारास रुपये 9,23,141/- चे नुकसान झाले आणि ती रक्कम गैरअर्जदारांनी अर्जदारास द्यावी. अर्जदाराने गैरअर्जदारास दि.10.1.11 रोजी अधि.सी.आर.पांडे यांचे मार्फतीने नोटीस पाठविला आणि त्याव्दारे झालेल्या नुकसानीची मागणी केली. गैरअर्जदार क्र.1 ला नोटीस मिळून सुध्दा अर्जदारास झालेल्या नुकसान भरपाई केली नाही. उलट, खोट्या मजकुराचे उत्तर पाठविले. गैरअर्जदार क्र.2 ला नोटीस मिळून सुध्दा नोटीसचे उत्तर दिले नाही. अर्जदाराचे दुकानात चोरी झाली आणि त्यामुळे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास दिलेली संपूर्ण सेवा ही सेवेतील न्युनता ठरविण्यात यावी. अर्जदाराला झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून रुपये 9,23,141/- ही 18 टक्के व्याजासह गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास द्यावी. अर्जदारास झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 1,00,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5000/- गैरअर्जदारांनी द्यावे, अशी मागणी केली आहे. 4. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठयर्थ नि.क्र.4 नुसार 22 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.17 नुसार लेखी उत्तर व नि.क्र.18 नुसार 6 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.15 नुसार लेखी उत्तर व नि.क्र.16 नुसार 2 दस्ताऐवज दाखल केले. 5. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराला त्याचे दुकान चालविण्याकरीता बरेच भांडवल लागते, त्याकरीता गैरअर्जदार क्र.1 चे बँकेत रुपये 30,00,000/- पर्यंतचे कॅश क्रेडीट लिमीटचे खाते आहे, हे म्हणणे गैरअर्जदार क्र.1 ने अमान्य केले. अर्जदाराचे, गैरअर्जदार क्र.1 चे बँकेत रुपये 25,00,000/- चे कॅश क्रेडीट लिमीट खाते आहे. दि.24.10.09 ते 25.10.09 चे राञी अर्जदाराचे दुकानात चोरांनी रुपये 9,23,141/- चे सोन्या-चांदीचे दागीण्याची चोरी केली हे विधान माहिती अभावी व खोटे असल्याने नाकबूल केले. सदरचे खाते गैरअर्जदार क्र.2 या विमा कंपनीनी विमाकृत केले असल्याने अर्जदाराने कथन केल्याप्रमाणे कथीत चोरीमुळे झालेल्या नुकसानीची जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 वर येत नाही. वास्तविक, खात्याचा विमा म्हणजे कर्जदाराचे असलेल्या संबंधीत दुकानातील वस्तुंचा व दुकानाचा विमा होय. अर्जदाराचा बँकेचा सभासद क्र.65278 हा आहे. 6. अर्जदाराने, कथन रक्कम मागणीकरीता अधि.सी.आर.पांडे यांचे मार्फतीने नोटीस दि.10.1.11 रोजी गैरअर्जदारास पाठविला हे विधान मान्य केले. सदर नोटीस मध्ये गैरअर्जदार क्र.1 वर लावलेले आरोप व टाकलेली जबाबदारी खोटी व चुकीची असल्याने, बँकेनी अधि.निलेश चोरे यांचे मार्फतीने दि.9.2.11 रोजी उत्तर पाठविले आहे. अर्जदार हा केवळ गैरअर्जदार क्र.1 बँकेचा सभासद असून गैरअर्जदार क्र.1 बँकेमार्फत अर्जदाराला सेवा देण्यास कोणतीही न्युनता राहीलेली नाही. संबंधीत विमा कंपनीच्या एजन्सीचे कागदपञांची पुर्तता करण्याबाबतचे अर्जदाराचे नांव असलेले पञाची प्रत गैरअर्जदार क्र.1 ला प्राप्त होताच बँकेने लगेच दि.23.3.2010 रोजी अर्जदाराला पञ देवून कळविले की, इंशुरन्स कंपनीला आवश्यक असलेल्या कागदपञांची पुर्तता करावी असे सुचीत केले. नुकसान भरपाईची जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 ची कदापीही नाही, त्यामुळे अर्जदाराला गैरअर्जदार क्र.1 बँकेने नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गैरअर्जदार क्र.1 बँकेने, अर्जदाराला या संबंधीत प्रकरणात वेळोवेळी सहाकार्य केलेले आहे. 7. अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक नसल्याने, गैरअर्जदार क्र.1 विरुध्द मंचात प्रस्तुत तक्रार दाखल करण्याचा अर्जदारास अधिकार नाही. अर्जदाराच्या तक्रारीचे बारकाईने निरिक्षण केले असता, कथीत रिपोर्ट पोलीसात देण्यापूर्वी पोलीसांच्या सुचनेप्रमाणे अर्जदाराचे भावाने आलमारी उघडून पाहिली व त्याला फक्त 50 ग्रॅम सोने कमी असल्याचे दिसले, असे कथन केले आहे. दुकानामधील सगळ्या आलमा-यांची तपासणी केल्यानंतर चोरी गेलेल्या सगळ्या दागिण्यांचे विवरण देण्याबाबत माहिती दिली, असे देखील कथन करण्यात आले आहे. परंतु, दागिण्याचे विवरण 5 दिवसांचे विलंबाने देण्याचे कोणतेही कारण प्रस्तुत तक्रारीत नमूद केले नाही. त्यामुळे, गैरअर्जदार क्र.2 कडून मोठी रक्कम नुकसान भरपाई स्वरुपात प्राप्त करण्याकरीता अर्जदाराच्या भावाने दि.30.10.09 रोजी दागिण्यांचे खोटे विवरणपञ पोलीसांशी हातमिळवणी करुन जाणून-बुजून विलंबाने सादर केल्याचे दिसते. कारण की, पोलीसांचा अंतिम अहवाल नमुना (अ फायनल क्र.1/2010) यात अर्जदाराने दि.30.10.09 रोजी दिलेल्या तक्रारीबद्दल कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे अर्जदार हा स्वच्छ हाताने मंचासमोर दाद मागण्यास आलेला नसल्याने, अर्जदाराची तक्रार जरबेचा खर्च रुपये 10,000/- सह खारीज करुन, सदर खर्चाची रक्कम गैरअर्जदार क्र.1 बँकेला प्रकरणात नाहक गोवण्यात आल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, अशी विनंती केली आहे. 8. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी बयानात नमूद केले की, अर्जदाराचे हे म्हणणे चुकीचे आहे की, अर्जदाराचा खाते गै.अ.क्र.2 कडून विमाकृत करण्यात आले आहे आणि त्याबाबत, विम्याचा हप्ता अर्जदार त्याचे खात्यातून गैरअर्जदार क्र.2 ला देतो. गैरअर्जदार क्र.2 ने दुकानातील मालाचा विमा काढला, बँकेतील खात्याचा नाही. हे म्हणणे खोटे असल्याने नाकबूल की, रिपोर्ट दिल्यानंतर अर्जदाराने त्याचे दुकानातील आलमा-यांची बारकाईने पाहणी केली असता, त्याला दुकानातील पुष्कळ सोन्या-चांदीचे दागीने चोरी गेल्याचे निदर्शनास आले. हे म्हणणे माहिती अभावी अमान्य की, गुन्ह्याच्या तपासा दरम्यान श्री महेश लोढीया यांनी दि.30.10.09 चे पञान्वये दुकानातून चोरी गेलेल्या दागिण्यांची यादी पोलीसांना दिली. हे म्हणणे खोटे असल्याने नाकबूल की, दिलेल्या रिपोर्ट आणि पञान्वये अर्जदाराचे दुकानातून रुपये 9,23,141/- चे दागिण्यांची चोरी झाल्याचे निश्चित झाले. हे म्हणणे खरे आहे की, गै.अ.क्र.2 ने दि.14.10.10 चे चेक क्र.117939 व्दारे रुपये 44,500/- अर्जदाराला झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून गैरअर्जदार क्र.1 कडे जमा करुन, अर्जदाराचे खात्यात जमा करण्यास सांगितले. हे म्हणणे खरे आहे की, अर्जदाराने त्याचे दुकानाचा विमा रुपये 30,00,000/- चा गै.अ.क्र.2 कडून काढलेला होता. परंतु, हे म्हणणे खोटे असून नाकबूल की, त्याचे विमाचे तारखेत अर्जदाराचे दुकानात चोरी झाली, त्याअर्थी झालेली पूर्ण नुकसान भरपाई अर्जदारास देण्यास गै.अ.क्र.2 हे बंधनकारक आहे. हे म्हणणे खोटे असल्याने नाकबूल की, अर्जदाराने झालेल्या नुकसानीबाबत संपूर्ण तपशिल गै.अ.क्र.2 कडे सादर केलेल्या अर्ज क्र.एस.एम.ई./0007799 आवश्यक कागदपञासह दाखल केला होता. अर्जदाराची तक्रार अर्ज व मागणी खोट्या कथनावर आधारीत आहे. तेंव्हा अर्जदाराची प्रार्थना अमान्य करण्यात यावी आणि अर्ज दंड खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
9. गै.अ.क्र.2 ने लेखी बयानात पुढे नमूद केले की, सदर तक्रार चालविण्याचा अधिकार ग्राहक मंचाला नाही, असा प्राथमिक आक्षेप घेतला. अर्जदाराने लोढीया अन्ड सन्स ज्वेलर्स या नावाने व्यवसाय आहे. तेंव्हा, अर्जदाराने व्यवसायीक कारणाकरीता पॉलिसी काढली होती. व्यवसायीक स्वरुप असल्याने अर्जदार हा ग्राहक या परिभाषेत मोडत नाही, करीता ही तक्रार चालविण्याचा अधिकार ग्राहक मंचाला नाही व ती खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदाराने स्वतः चोरी गेलेल्या दाग-दागीने व इतर वस्तुचे मुल्य रुपये 80,000/- काढले आणि आता मागाहून जास्त रक्कम मिळावी या वाईट हेतूने रुपये 8,43,141/- ची चोरी झाली आहे, असे खोटे व बनावटी कथन केले आहे. अर्जदाराने रेकॉर्डवर दाखल केले दस्तऐवज एकमेकांना साक्ष देणारे दस्तऐवज पुरावा नाही व त्यात विसंगती आहे. गै.अ.क्र.2 ने, अर्जदाराकडून चोरी झाल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर चौकशी करीता सर्व्हेअर म्हणून मे.कुनीनघम लीनडसे इंटरनॅशनल प्रा.लि. यांना नियुक्त केले व त्यांनी प्रत्यक्ष मोक्यावर निरिक्षण केले आणि उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे अहवाल गै.अ.क्र.2 कडे जमा केला व त्यांचे अंतीम अहवाल दि.11.10.10 प्रमाणे व विमा कराराप्रमाणे अर्जदाराचा नुकसान भरपाईचा क्लेम रुपये 44,500/- निघतो व त्याप्रमाणे, गैरअर्जदार क्र.2 ने दि.14.10.10 ला चेक क्र.117939 रुपये 44,500/- अर्जदाराला दिला. तेंव्हा, गै.अ.क्र.2 ने कोणत्याही प्रकारची न्युनतापूर्ण सेवा अर्जदाराला दिली नाही. तक्रार अर्ज हा खोटा व बनावटी कथनावर आधारीत आहे, तेंव्हा तक्रार अर्ज रुपये 10,000/- खर्चासह खारीज करण्यात यावा आणि गै.अ.क्र.2 ला शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 10,000/- द्यावे, असे निर्देश द्यावे, अशी विनंती केली आहे. 10. अर्जदाराने नि.क्र.22 वर शपथपञ दाखल केला. गै.अ.क्र.1 ने नि.क्र.23 नुसार शपथपञ दाखल केला. गै.अ.क्र.2 ने नि.क्र.24 नुसार शपथपञ दाखल केले. अर्जदाराने नि.क्र.30 नुसार 2 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदारांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ, व उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 11. अर्जदार हा मेसर्स, “लोढीया अन्ड सन्स ज्वेलर्स, चंद्रपूर” या नावाने सोना-चांदीचे दुकान असून, त्याचा मालक आहे. सदर दुकानामध्ये दि.24.10.09 ते 25.10.09 च्या राञी चोरी झाली. अर्जदाराचा भाऊ, महेश लोढीया यांनी चोरीबाबत पोलीस स्टेशन, चंद्रपूर शहर येथे रिपोर्ट दिला. पोलीसांनी चोरी संदर्भात गुन्हा क्र.219/09 कलम-380, 457 अन्वये गुन्हा दाखल केला. सदर चोरी संदर्भात पोलीसांनी तपास करुन आरोपीचा शोध न लागल्यामुळे ज्युडीसीयल मॅजीस्ट्रेट प्रथम श्रेणी, चंद्रपूर कडे फायनल अ समरी नं.1/2010 प्रमाणे सादर केले. अर्जदाराने, गै.अ.क्र.1 कडून लिमिटचे खाते काढले आहे, तसेच, अर्जदाराने गै.अ.क्र.2 कडून दुकाचा विमा उतरविला, याबाबत अर्जदार व गै.अ. यांचेमध्ये वाद नाही. 12. अर्जदाराचे दुकानात चोरी झाल्यानंतर विमा क्लेम मिळण्याकरीता, गै.अ.क्र.2 कडे सर्व दस्ताऐवज सादर केले आणि दुकानातील चोरी झालेल्या मालाची नुकसान रुपये 9,23,141/- मागणी केली. परंतु, गै.अ.क्र.2 यांनी, गै.अ.क्र.1 कडे दि.14.10.10 चेक क्र.117939 रुपये 44,500/- चा चेक पाठविला. गै.अ.क्र.2 यांनी पाठविलेला चेक हा न्यायोचीत नसल्यामुळे, अर्जदाराने रक्कम घेण्यास नकार दिला, आणि आपले वकीलामार्फत नोटीस पाठवून रुपये 9,23,141/- रुपयाची नुकसान भरपाईची मागणी केली, ती नुकसान भरपाईची रक्कम गै.अ.क्र.2 ने दिली नाही म्हणून प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. खरेदीचे बील सादर केले. 13. अर्जदाराने दुकानातील मालाचा विमा काढला होता. अर्जदाराचे दुकानात विमा कालावधीमध्ये चोरी झाली. गै.अ.क्र.2 यांनी क्लेम मंजूर केला नाही आणि जो क्लेम मंजूर केला, तो संयुक्तीक नाही. त्यामुळे, गै.अ.क्र.2 यांनी दुकानातून चोरी केलेल्या मालाची किंमत रुपये 9,23,141/- दिली नाही. त्यामुळे, अर्जदार व गै.अ.क्र.2 यांच्यात क्लेम रकमेबाबतचा वाद आहे. 14. अर्जदाराने चोरी झालेल्या मालाची नुकसान भरपाई ही रुपये 9,23,141/- ची मागणी केलेली आहे. त्याकरीता, अर्जदाराने फायनल–अ समरीची प्रत सादर केले आहे. त्यामध्ये, दि.25.10.09 ला दिलेल्या रिपोर्ट आणि त्यानंतर, दि.30.10.09 ला संपूर्ण चोरी गेलेल्या मालाचे विवरण पोलीसाला सादर केले, त्यावरुन मागणी केलेली आहे. अर्जदाराने, सदर फायनल अ समरीची प्रत अ-1 वर दाखल केली असून, अ-6 ते अ-22 वर खरेदी केलेल्या सोना-चांदीच्या दागिने व सामानाच्या बिलाच्या प्रती दाखल केल्या आहेत. सदर दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता, अ-6 नुसार हिराचंद सन्स, मुंबई यांचेकडून दि.27.3.09 ला खरेदी केलेल्या सोन्याच्या सामानाचा बिल आहे. अर्जदाराने दि.27.3.09 पासून 9.10.09 पर्यंतच्या खरेदी केलेल्या सोना-चांदीचे बिले दाखल केलेली आहेत. परंतु, सदर बिला प्रमाणे खरेदी केलेल्या सामानाची किती प्रमाणात विक्री झाली आणि चोरीचे दिवशी म्हणजे दि.24.10.09 ते 25.10.09 पर्यंत दुकानात किती माल होता, याचा कुठलाही पुरावा रेकॉर्डवर दाखल केलेला नाही. त्यामुळे, अर्जदाराने केलेली मागणी रुपये 9,23,141/- ची मंजूर करण्यास पाञ नाही. अर्जदाराने, खरेदी केलेल्या आणि विक्री केलेल्या मालाचा स्टॉक रजीस्टर सादर केला नाही, त्यामुळे चोरीचे दिवशी मागणी केलेल्या किंमती ऐवढा सामान दुकानात होता, असे समरी पध्दतीने तक्रार निकाली काढतांना पोलीस रिपोर्ट ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास पाञ नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 15. अर्जदाराने, सादर केलेला क्लेम गै.अ.क्र.2 यांनी आपल्या सर्व्हेअर कडून सर्व्हे केला. गै.अ.क्र.2 यांनी चौकशी करण्याकरीता मे.कुनीनघम लीनडसे इंटरनॅशनल प्रा.लि. यांची नियुक्ती केली व त्यांनी चोरी संदर्भात अर्जदाराचे दुकानात जावून सर्व्हे केला. गै.अ.क्र.2 यांनी, आपले लेखी बयानासोबत नि.16 च्या यादीनुसार ब-1 वर फायनल सर्व्हे रिपोर्ट सादर केला आहे. सदर सर्व्हे रिपोर्टचे अवलोकन केले असता, सर्व्हेअर यांनी 82,250/- रुपये देय आहे, असा रिपोर्ट दिला. अर्जदाराने, सर्व्हे रिपोर्टपेक्षा जास्त रकमेची नुकसान भरपाईची मागणी केली, त्याकरीता पोलीस स्टेशनला दिलेल्या रिपोर्टनुसार मागणी केली आहे. परंतु, पोलीस रिपोर्टला ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरुन, नुकसान भरपाई मिळण्यास अर्जदार पाञ नाही. अर्जदाराने दि.25.10.09 ला अपराध क्र.219/09 नुसार गुन्हा दाखल केला, त्यात महेश गिरिधर लोढीया यांनी तोंडी रिपोर्ट दिला, त्या रिपोर्टनुसार 50 ग्रॅम सोना किंमत रुपये 80,000/- चोरी गेल्याचे नमूद केले आहे. सदर रिपोर्ट दुकानात पाहणी केल्यानंतर दिलेली आहे. अर्जदाराने, त्यानंतर 5 दिवसा पर्यंत म्हणजेच दि.30.10.09 पर्यंत दुकानातील आलमारीची पाहणी केल्यानंतर चोरी गेलेल्या सोना-चांदीच्या मालाचे वर्णन पोलीस स्टेशनला दिले. त्यात, अर्जदाराने एकूण रुपये 8,43,141/- एवढया किंमतीचा माल चोरी गेल्याचे कळविले आहे. अर्जदाराने, त्याप्रमाणे नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. परंतु, फिर्यादी महेश लोढीया यांनी सकाळी दुकान खोलल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे कळले, त्याची रिपोर्ट दिली. पोलीसांनी त्याचदिवशी 19-15 वाजता गुन्हा दाखल केला. अर्जदाराने, नि.30 अ-2 नुसार प्रथम सुचना रिपोर्टची प्रत दाखल केली आहे. अर्जदारास घटनेची रिपोर्ट दिल्यानंतर दुकानातील सामानाची तपासणी करण्याकरीता 5 दिवसाचा कालावधी लागला व त्यानंतर जास्त रकमेचा माल चोरी गेल्याची सुचना पोलीसांना दिली. परंतु, घटनास्थळावर किती खाली डब्बे पडले होते, व दुकानाती काय परिस्थिती होती याबाबतचा घटनास्थळ पंचनाम्याची प्रत अर्जदाराने सादर केली नाही. त्यामुळे, पोलीस स्टेशनला दिलेल्या चोरीच्या मालाचे किंमतीचे विवरणावरुन ठोस पुरावा ग्राह्य धरुन, नुकसान भरपाई समरी पध्दतीने ठरविता येणार नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे. 16. अर्जदाराचे वकीलांनी युक्तीवादाचे वेळी खालील प्रमाणे न्यायनिवाडयाचा हवाल दिला. 1) सी.पी.जे (I) 2010 पेज क्र.180 2) सी.पी.जे (I) 2005 पेज क्र.27 (NC) 3) सी.पी.जे (II) 2009 पेज क्र.329 4) सी.पी.जे (II) 2011 पेज क्र.260 (एन.सी.) 5) सी.पी.जे (II) 2011 पेज क्र.265 हिमाचल प्रदेश. वरील प्रकरणांत दिलेले मत पूर्णपणे या प्रकरणाला लागू पडत नाही. 17. अर्जदाराने तक्रारीत केलेली मागणी रुपये 9,23,141/- एवढी ठोस पुराव्या अभावी मंजूर करण्यास पाञ नसली, तरी अर्जदार मे.कुनीनघम लिनड्से इंटरनॅशनल प्रा.लि. यांनी दि.11 ऑक्टोंबर 2010 ला दिलेल्या फायनल सर्व्हे रिपोर्टनुसार रुपये 82,250/- दि.14.10.10 पासून मिळण्यास पाञ आहे. अर्जदाराने आपले मागणी करीता ठोस पुरावा सादर केला नाही, अशास्थितीत सर्व्हेअरचा रिपोर्ट ठोस पुरावा म्हणून ग्राह्या धरण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. सर्व्हे रिपोर्टनुसार गै.अ.क्र.2 यांनी अर्जदारास रुपये 44,500/- चा धनादेश गै.अ.क्र.1 ला कर्जखात्यात जमा करण्याकरीता दिला. परंतु, सदर सर्व्हे रिपोर्टनुसार गै.अ.क्र.2 यांनी कपात केलेली रक्कम सुध्दा अर्जदार मिळण्यास पाञ आहे. सदर रिपोर्टनुसार विमा कंपनीची 100 % जोखीम असल्याचे मान्य केले आहे. तसेच, चोरीच्या केसमध्ये सालव्हेजचा (Salvage) मुद्दा राहात नाही असे मान्य केले आहे. अशास्थितीत, सर्व्हेअर यांनी केलेले असेसमेंट रुपये 82,250/- एवढी रक्कम गै.अ.क्र.2 देण्यास पाञ असतांनाही, गै.अ.क्र.2 यांनी कमी रक्कम देवून सेवेत न्युनता केली, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे. 18. प्रस्तुत प्रकरणात, उपलब्ध असलेल्या रेकॉर्डवरुन अर्जदार सर्व्हे रिपोर्टनुसार नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे. चोरीच्या प्रकरणात किंवा कुठल्याही विमा दाव्याच्या प्रकरणात नुकसान भरपाई निश्चित करण्याकरीता ठोस पुरावा असणे आवश्यक आहे आणि तसा पुरावा रेकॉर्डवर उपलब्ध नसल्यास सर्व्हेअरचा रिपोर्ट ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरावा असा प्रचलित कायदा (Settle Law) आहे. त्यामुळे, प्रस्तुत प्रकरणातही सर्व्हे रिपोर्ट हा ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. गै.अ.चे वकीलांनी युक्तीवादाचे वेळी सादर केलेले केस लॉ मध्ये याच आशयाचे मत दिले आहे. त्यात दिलेले मत, या प्रकरणाला लागू पडतात. सदर न्यायनिवाडे खालील प्रमाणे. 1) 2010 CPJ (IV) 299 NC 2) 2006 CPJ (IV) 86 NC 3) 2005 CPJ (II) 10 NC 4) 2006 CPJ (II) 193 NC 5) 2006 CPJ (IV) 84 NC 19. गै.अ.क्र.2 यांनी असा मुद्दा उपस्थित केला की, अर्जदाराने विमा पॉलिसी ही दुकानाच्या व्यवसायाकरीता (Commercial) घेतली होती. त्यामुळे, सदर तक्रार ही ग्राहक मंचाच्या अधिकार क्षेञात येत नाही. परंतु, गै.अ.ने उपस्थित केलेला मुद्दा संयुक्तीक नाही. अर्जदाराने विमा पॉलिसी ही दुकानातील सामानाचे सुरक्षाचे दृष्टीने घेतली होती. त्यामुळे, व्यवसायाचा मुद्दा या बाबीला लागू पडत नाही. अर्जदाराचे वकीलांनी युक्तीवादाचे वेळी हर्सोलिया मोटर्स –वि.- नॅशनल इंशुरन्स कं.लि., सी.पी.जे (I) 2005 पेज क्र.27 (NC), या प्रकरणाचा हवाला दिला. सदर प्रकरणात दिलेला मत या प्रकरणाला लागू पडते. सदर प्रकरणात, मा.सर्वोच्च न्यायालय यांनी लक्ष्मी इंजिनियरींग वर्क्स –वि.- पी.एस.जी.इंडस्ट्रीयल इंस्टीट्युट, या प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे. सदर न्यायनिवाड्यात दिलेल्या मतानुसार, गै.अ.क्र.2 ने उपस्थित केलेला व्यापारी (Commercial) मुद्दा ग्राह्य धरण्यास पाञ नाही. त्यामुळे, मंचाला तक्रार निकाली काढण्याचा अधिकार आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 20. गै.अ.क्र.1 कडे अर्जदाराचे दुकानाचे नावाने लिमीट खाते आहे. अर्जदाराने, गै.अ.क्र.1 ला केलेल्या मागणीनुसार पूर्ण सेवा दिली असे दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होतो. गै.अ.क्र.1 चे विरुध्द अर्जदाराची कुठलीही मागणी नाही, तसेच गै.अ.क्र.1 कुठलीही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. गै.अ.क्र.1 ने सेवा देण्यात न्युनता केलेली नाही, त्यामुळे उपलब्ध रेकॉर्डवरुन त्याचे विरुध्द तक्रार खारीज होण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 21. गै.अ.क्र.2 यांनी अर्जदाराकडून दुकानात चोरी झाल्याची सुचना दिल्यानंतर सर्व्हेअर नियुक्त केला. सर्व्हेअरनी जवळपास 1 वर्षानंतर म्हणजे दि.25.10.09 पासून 10.10.2010 पर्यंत रिपोर्ट सादर करण्यास विलंब केला. अर्जदाराचे दुकानाचा फायनल सर्व्हे रिपोर्ट करण्यात आला हे अर्जदाराने ही आपले तक्रारीत मान्य केले आहे. परंतु, त्या रिपोर्टवर कोणताही आक्षेप घेतला नाही. गै.अ.क्र.2 यांनी रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर क्लेमची रक्कम गै.अ.क्र.1 कडे पाठवीली. गै.अ.क्र.2 यांनी अर्जदाराचा क्लेम सेटल करण्यास विलंब केला आणि सर्व्हेअर रिपोर्ट मध्ये पूर्ण जोखीम स्विकारली असतांनाही कमी रक्कम दिली, या बाबीवरुन गै.अ.क्र.2 च्या सेवेतील न्युनता सिध्द होतो, गै.अ.क्र.2 च्या कृत्यांमुळे मानसिक, शारीरीक ञास सहन करावा लागला. तसेच, क्लेम लवकर न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान झाले, त्यामुळे गै.अ.क्र.2 नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे. 22. वरील कारणे व निष्कर्षावरुन गै.अ.क्र.2 यांनी सेवेत न्युनता केली, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, तक्रार अंशतः मंजूर करुन, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गैरअर्जदार क्र.2 ने, अर्जदारास रुपये 82,250/- दिनांक 14.10.2010 पासून 9 % व्याजाने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे. (2) गैरअर्जदार क्र.2 ने, अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी सर्व मिळून रुपये 25,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. (3) गैरअर्जदार क्र.1 चे विरुध्द तक्रार खारीज. (4) अर्जदार व गैरअर्जदारांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT | |