न्यायनिर्णय
(मा.सौ.सविता भोसले,अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे. प्रस्तुत तक्रार अर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे फलटण, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी असून त्यांचा मोबाईल रिचार्ज करणेचा व्यवसाय आहे. प्रस्तुत व्यवसाय हा राहुल एंटरप्रायझेस नावाने ते स्वतः चालवतात. सदर व्यवसाय तक्रारदार हे कुटूंबाच्या उदरनिर्वहासाठी करत आहेत. तक्रारदार यांना जाबदार नं. 1 कंपनीकडून दि.2/10/2014 रोजी त्यांचे वैयक्तिक मोबाईल नंबरवर एक एस.एम.एस. आला व त्याव्दारे जाबदार क्र. 1 कंपनीने दरमहा रक्कम रु.18,000/- ते रु.45,000/- कमविण्याची संधी असल्याची जाहीरात केली म्हणून तक्रारदाराने त्याबाबत चौकशी केली असता जाबदार क्र. 1 कंपनीने तक्रारदाराला सांगितले की, जर तुम्ही आवश्यक त्या कागदपत्रांसह जाबदारांकडे अर्ज भरुन रक्कम रु.20,000/- भरले तर तुम्हाला रेल्वे, विमान तिकीट दिली, बुकींग, मनी ट्रान्स्फर सुविधा केंद्र (रिटेलरशिप) एका आठवडयात उपलब्ध करुन देऊ तसेच जाबदार क्र.1 कंपनीकडून दि. 27 व दि.29/10/2014 रोजी तक्रारदारांना ई-मेलव्दारे सदर सुविधा केंद्र (रिटेलरशीप) बाबत जाहीराती पाठवण्यात आल्या. तक्रारदाराने जाबदाराचे सांगण्यावर विश्वास ठेऊन दि.28/10/2014 रोजी त्यांच्या अँक्सीस बँक लि. या बँकेतील खाते नं.135010100184069 या खातेतील धनादेश क्र. 173771 रक्कम रु.20,000/- चा धनादेश आवश्यक त्या कागदपत्रांसह, अर्जासह जाबदार क्र. 1 कंपनीकडे जाबदार क्र. 3 मार्फत म्हणजेच जाबदार कंपनीचे डिस्ट्रीक्ट सेल्स को-ऑर्डीनेटर यांचेमार्फत दिला. जाबदार क्र1 कंपनीने सर्व कागदपत्रे व अर्ज स्विकारुन दि.29/10/2014 रोजी धनादेश वटवून रक्कम स्विकारली व त्यानंतर जाबदार क्र. 1 कंपनीने तक्रारदारांना जाबदार कंपनीचेडिस्ट्रीक्ट सेल्स को-ऑर्डीनेटर, श्रीपाल विलास तळेकर (जाबदार क्र.3) यांचेमार्फत एक आठवडयाचे प्रशिक्षण घेणेस सांगितले व त्यानंतर रेल्वे, विमान तिकीट बुकींग, डी.टी.एच. रिचार्ज व मोबाईल पोस्टपेड बिल भरणा केंद्र तसेच येस बँक व एम.बी.आय.बँकांचे मनी ट्रान्सफर केंद्र या सुविधा (रिटेलरशिप) सुरु करण्यात येतील असे सांगितले.
जाबदार क्र. 1 ही नोंदणीकृत कंपनी असून तीचा लोकांकडून पैसे स्वीकारुन त्याबदल्यात त्यांना विमान तिकीट बुकींग, डी.टी.एच रिचार्ज व मोबाईल पोस्टपेड बील भरणा केंद्र तसेच येस बँक व एस.बी.आय बँकांचे मनी ट्रान्स्फर केंद्र (रिटिलरशिप) उपलब्ध करुन देणे व त्या माध्यमातून नफा कमविणेचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने जाबदार क्र. 1 कंपनीकडे रक्कम रु.20,000/- भरले आहेत. त्याबदल्यात जाबदारकडून तक्रारदाराला रिटेलरशीप मिळणार होती. म्हणजेच तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत. तर जाबदार हे सेवापुरवठादार आहेत. तक्रारदाराने जाबदार क्र.1 चे सांगण्यावरुन जाबदार क्र. 3 कडून 1 आठवडयाचे प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र सदर प्रशिक्षणांनंतरही जाबदार क्र.1 कंपनीने तक्रारदाराला रेल्वे, विमान तिकीट बुकींग, डी.टी.एच. रिचार्ज व मोबाईल पोस्टपेड बिल भरणा केंद्र या सुविधा (रिटेलरशिप) दिली नाही. तक्रारदाराने चौकशी केलेवर जाबदार क्र. 1 कंपनीने जाबदार क्र. 2 कडे चौकशी करण्यास सांगीतले. जाबदार क्र. 2 कडे तक्रारदाराने चौकशी केली असता, त्यांनी नीट उत्तरे दिली नाहीत व त्यांनी रक्कम रु.20,000/- कंपनीकडे भरले नाहीत असे सांगितले ते ऐकून तक्रारदाराला धक्का बसला त्यामुळे तक्रारदाराने जाबदार क्र.1 कडे पत्र पाठवून चौकशी केली असता पैसे मिळालेचे जाबदार क्र. 1 ने सांगितले व सदर रिटेलरशीप सुरु होणेसाठी पुन्हा अर्ज कागदपत्रांसह देणेस सांगीतले. त्यानुसार तक्रारदाराने पुन्हा सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. प्रस्तुत अर्ज व कागदपत्रे मिळणेबाबत दि.21/11/2014 रोजी जाबदार क्र. 3 कडून ई-मेल प्राप्त झाला. दरम्यान तक्रारदाराने जाबदार क्र. 2 व 3 यांना रक्कम रु.20,000/- भरलेची पावती कंपनीकडून मिळणा-या सुविधा, येस बँक व एस.बी.आय. बँकांचे मनि ट्रान्स्फर केंद्र (रिटलरशीप) सुरु होण्याच्या तारखा कागदपत्र इ. चा खुलासा करावा असा ई- मेल दि.20/11/2014 रोजी केला व त्याबाबत दि.26/11/2014 रोजी स्मरणपत्र पाठविलेवर जाबदार क्र. 2 यांनी ई-मेलने कळविले की, कंपनी पैसे स्विकारलेची पावती देत नाही. हा मेल म्हणजेच आपण पैसे भरलेचा पुरावा आहे. तसेच तुम्हास सर्व सुविधा ठरलेप्रमाणे कंपनीकडून मिळतील व प्रस्तुत रिटेलरशिप/सुविधा केंद्र दि.1 डिसेंबर,2014 रोजी सुरु होईल. परंतु जाबदाराने आश्वासन दिलेप्रमाणे 1 डिसेंबर,2014 रोजी कोणतीही सुविधा (रिटेलरशीप) जाबदाराने तक्रारदाराला दिलेली नसलेने तक्रारदाराने दि.2/12/2014 रोजी व दि.30/12/2014 रोजी जाबदार क्र.1 ते 3 यांना ई मेलने स्मरणपत्रे पाठवली व दुरध्वनीवरुन संपर्क केला. मात्र जाबदाराने कोणतीही दाद दिली नाही व तक्रारदाराला सर्व नमूद सुविधा केंद्र (रिटेलरशिप) सुरु केली नाही. मात्र जाबदाराने तक्रारदाराला अरेरावीची उत्तरे दिली. त्यामुळे जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांची फसवणूक केलेचे तक्रारदाराचे लक्षात आले. तक्रारदाराला जाबदाराने पैसे स्विकारुनही सुविधा केंद्र (रिटेलरशिप सुरु करुन दिले नाही. त्यामुळे सदोष सेवा पुरविली आहे. सबब तक्रारदाराने या मे. मंचात प्रस्तुत तक्रार अर्ज जाबदारांविरुध्द दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 3 यांचेकडून तक्रारदाराने सुविधाकेंद्रासाठी जाबदारांकडे जमा केलेली रक्कम रु.20,000/- परत देणेचे आदेश जाबदारांना व्हावेत, तक्रारदार यांना प्रस्तुत रक्कम रु.20,000/- वर दि.29/10/2014 ते तक्रार अर्जाचा निकाल लागेपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्के प्रमाणे व्याज जाबदारकडून मिळावे, तक्रारदाराला झाले मानसीक व आर्थिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.2 लाख जाबदारांकडून मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च जाबदारांकडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने याकामी नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि. 5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/11 कडे अनुक्रमे जाबदार क्र. 1 ने तक्रारदारास ई-मेल ने पाठवलेल्या जाहीराती, तक्रारदाराने जाबदाराला दिलेला धनादेश, तक्रारदार व जाबदार यांचेत झालेला पत्रव्यवहार, जाबदार कंपनीने तक्रारदाराकडून रक्कम मिळालेचा पाठवलेला ई-मेल, तक्रारदाराकडून कागदपत्रे मिळण्याचा जाबदाराचा ई-मेल, तक्रारदाराने जाबदाराला खुलासा मागवणेसाठी केलेला ई-मेल, तक्रारदाराने जाबदारांना पाठवलेले ई-मेल पत्राचे उत्तर, तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ते 3 याना पाठवलेली नोटीस, जाबदार क्र.2 ने नोटीस स्विकारलेची पोहोच, जाबदार क्र. 1 ने दिलेली नोटीस उत्तर, नि. 15 चे कागदयादीसोबत जाबदार क्र. 3 ला दिलेली जाहीर नोटीस, नि. 16 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.17 कडे पुरावा बंद पुरसिस, नि. 18 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केलीआहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र.1 ते 3 यांना तक्रार अर्जाची नोटीस लागू होऊनही जाबदार क्र. 1 ते 3 हे मंचात हजर राहीले नाहीत. तसेच त्यांनी तक्रार अर्जावर म्हणणे/कैफीयत दाखल केले नाही. सबब प्रस्तुत जाबदार क्र.1 ते 3 यांचेविरुध्द नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत झाले आहेत. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.
5. प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी मंचाकडे दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला.
मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदार यांचे आहेत काय?- होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय?- होय.
3. अंतिम आदेश? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहेत कारण- तक्रारदाराने जाबदार यांचेकडून रेल्वे-विमान तिकीट बुकिंग येस बँक, ट्रान्सफर पोष्टपेड मोबाईलचे बील भरणा केंद्र डि.टी.एच रिचार्ज इ. सुविधा पुरविण्याचे (रिटेलरशीप) सुविधा केंद्र सुरु होऊन मिळणेसाठी रक्कम रु.20,000/- अँक्सीस बँकेचा धनादेश क्र. 173771 हा जाबदार यांचेकडे नावावर दि.28/10/2014 तक्रारदाराने दिलेला होता. प्रस्तुत चेकची झेरॉक्स प्रत दाखल आहे. तसेच जाबदाराने त्यांचे नि.5/3 कडील ई-मेल मध्ये प्रस्तुत धनादेश वटलेचे व रक्कम रु.20,000/- मिळालेचे स्पष्ट केले आहे. म्हणजेच प्रस्तुत सुविधा जाबदाराने तक्रारदाराला पुरविणेसाठी तक्रारदाराने जाबदाराला प्रस्तुत रक्कम रु.20,000/- चा धनादेश अदा केला होता. त्याची रक्कम जाबदाराला मिळाली आहे हे जाबदाराने वरीलप्रमाणे मान्य केले आहे. सबब तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक असून जाबदार हे तक्रारदाराचे सेवा पुरवठादार आहेत हे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत रक्कम तसेच रिटेलरशिप (सुविधा केंद्र) सुरु करुन मिळणेसाठी आवश्यक तो अर्ज व सर्व कागदपत्रे तक्रारदाराने जाबदारांकडे सादर केली आहेत हे नि. 5 चे कागदयादीकडील सर्व कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे. परंतू असे असतानाही जाबदाराने आश्वासन दिलेप्रमाणे तक्रारदाराला रेल्वे-विमान तिकीट बुकींग सेवा, येस बँक, मनि ट्रान्सफर सुविधा, पोस्टपेड मोबाईल बील भरणा केंद्र, डी.टी.एच. रिचार्ज करणे अशा सुविधा पुरविणारे सुविधा केंद्र (रिटेलरशीप) जाबदाराने तक्रारदाराला सुरु करुन दिले नाही. त्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे, रक्कम व अर्ज तक्रारदाराने योग्यरित्या जाबदारांकडे सादर करुनही तक्रारदार यांना प्रस्तुत जाबदार यांनी अद्याप पर्यंत प्रस्तुत सुविधा पुरविणारे केंद्र (रिटेलर) सुविधा केंद्र तक्रारदाराकडून योग्य ती सर्व रक्कम मिळाली असतानाही अद्यापपर्यंत सुविधा केंद्र चालू करुन दिलेले नाही. तक्रारदाराने वारंवार चौकशी केली असता जाबदाराने तक्रारदाराला उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. सबब तक्रारदार या सर्व बाबी तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांवरुन स्पष्ट झाल्या आहेत. याकामी जाबदार क्र. 1 ते 3 हे मे. मंचात नोटीस लागू होऊनही राहीले नाहीत तसेच जाबदार नं. 1 ते 3 ने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढले नाही. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना रिटेलर (सुविधा केंद्र) सुरु करुन दिले नसलेने सेवेत त्रुटी/कमतरता केली आहे हे स्पष्ट होते. सबब आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
7. वरील सर्व मुद्दे व विवेचन विचारात घेता यातील जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविलेचे स्पष्ट होते. सबब तक्रारदार हे जाबदार नं. 1 ते 3 कडून तक्रारदाराने जाबदारकडे जमा केलेली रक्कम रु.20,000/- व्याजासह मिळणेस पात्र असून मानसिक शारिरिक त्रास व अर्जाचा खर्च अशी नुकसानभरपाई मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहेत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराला रक्कम
रु.20,000/- (रुपये वीस हजार मात्र) अदा करावेत.
3. प्रस्तुत रक्कम रु.20,000/- (रुपये वीस हजार मात्र) वर दि. 39/10/2014
पासून आदेश पारीज तारखेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज जाबदार क्र.1 ते
3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराला अदा करावेत.
4. जाबदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना शारिरीक
व आर्थिका त्रासापोटी रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र)
तक्रारदाराला अदा करावेत.
5. तक्रार अर्जाचे खर्चापोटी जाबदार यांनी रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार
फक्त) तक्रारदार यांना अदा करावेत.
6. वर नमूद आदेशाचे पालन आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसात करावे.
7. रक्कम मुदतीत अदा करणेत कसूर केलेस अर्जदार यांना ग्राहक संरक्षण
कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा
राहील.
8. प्रस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
9. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 07-01-2016.
सौ.सुरेखा हजारे, श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.