निकालपत्र :- (दि.09.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2 व 13 यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला संस्थेने प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करीता तक्रारदारांकउून प्रत्येकी रक्कम रुपये 1,45,000/- दि.01.04.2005 पावती क्र.0840 व 0841 ने स्विकारली आहे. सदरच्या ठेवी या तक्रारदारांचे आजोबा मयत श्री.पांडुरंग गोविंद संकपाळ यांनी ठेवल्या असून ठेवीवर सुरवातीला तक्रारदाराचे अ.पा.क. म्हणून मयत पांडुरंग गोविंद संकपाळ यांचे नांव नमूद होते. श्री.पांडुरंग संकपाळ दि.17.09.2005 रोजी मयत झाले असून त्यांचे पश्चात मयत पांडुरंग संकपाळ यांची मुलगी म्हणजेच अर्जदार यांची आत्या, सौ.सरस्वती शांताराम देसाई यांचे नांव अ.पा.क.म्हणून नांव नमूद झाले आहे. सदरच्या ठेवींची मुदत 36 महिने असून ती दि.31.03.2008 रोजी संपलेली संपलेली आहे. सदर ठेवीवर द.सा.द.शे.13 टक्के व्याज देण्याचे सामनेवाला संस्थेने कबूल केले होते. सदर ठेवींची मुदत संपूनही सामनेवाला संस्थेने तक्रारदारांची संपूर्ण ठेव रक्कम व्याजासह परतफेड केलेली नाही. तक्रारदारांनी सदर ठेव रक्कमेची मागणी केली असता सामनेवाला संस्थेने दि.17.02.2009 रोजीअखेर दोन्ही ठेव पावत्यांच्या रक्कम फेडीपोटी फक्त रुपये 60,000/- इतकी रक्कम फेड केली असून दोन्ही पावत्यांच्या मुद्दल व व्याज अशी रक्कम रुपये 3,43,100/- इतकी येणे बाकी आहे. त्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे ठेव रक्कम व त्यावरील व्याजाची मागणी दि.04.01.2010 रोजी लेखी नोटीस देवून केली असता सामनेवाला यांनी रक्कम परतफेड करणेस टाळाटाळ केली आहे. तदनंतरही तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडें वेळोवेळी ठेव रक्कमेची मागणी केली असता सामनेवाला यांनी ठेव रक्कम परत करणेस असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, सन 2003-04 चा मयूर दुध उत्पादक संघाचा अहवाल, दि.26.10.2006 चा एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर यांचे सहीच्या चेकची झेरॉक्स कॉपी इत्यादींच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवालाक्र.2 व 13 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुत सामनेवाला हे सामनेवाला क्र.1 संस्थेचे संचालक अथवा चेअरमन नाही. तक्रारदार यांचा अज्ञान पालक कर्ता म्हणून त्यांची आत्या सौ.सरस्वती शांताराम देसाई यांना कोणताही अधिकार कायद्याने पोहचत नाही. त्यांनी तक्रारदारांचे अज्ञान पालक कर्ता म्हणून सक्षम कोर्टाकडून ठरवून घेणे आवश्यक असून तो अधिकार या मंचाला नाही. त्याचप्रमाणे अज्ञानाची ठेव रक्कम काढणेसाठी अथवा मिळकत विक्री करणेसाठी सक्षम कोर्टाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असून अशी कोणतीही परवानगी घेतल्याचा पुरावा हजर केलेला नाही. तक्रारदारांनी खोटया व चुकीच्या माहितीआधारे सामनेवाला यांचेविरुध्द तक्रार दाखल करुन सामनेवाला यांना नाहक आर्थिक व मानसिक खर्चात टाकल्याने तक्रारदार यांचेकडून प्रत्येकी रुपये 5,000/- नुकसान भरपाई सामनेवाला यांना मिळणे व तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणे न्यायोचित होणार आहे. (6) सामनेवाला यांनी तक्रारीत नमूद ठेवींची रक्कम अद्याप मागणी करुनही तक्रारदारांना दिलेली नाही. त्यामुळे तक्रारीस अद्यापि सातत्याने कारण घडत आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार मुदतीत आहे. (7) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला क्र.2 व 13 यांचे म्हणणे व उपलब्ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्कमांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत व सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यात तक्रारदार यांचा अज्ञान पालक कर्ता म्हणून त्यांची आत्या सौ.सरस्वती शांताराम देसाई यांना कोणताही अधिकार कायद्याने पोहचत नसल्याचे कथन केले आहे. सौ.सरस्वती शांताराम देसाई यांनी तक्रारदारांच्या अ.पा.क. म्हणून प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांच्या आत्या, सौ.सरस्वती शांताराम देसाई यांचे नांव अ.पा.क. म्हणून नोंद असलेचे दिसून येते. त्यामुळे सौ.सरस्वती शांताराम देसाई यांना प्रस्तुतची तक्रार दाखल करणेबाबत व ठेव रक्कम मागणीबाबत वैध स्थिती (Locus-standi)येते या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 1 ते 3 व 5 ते 13 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.4 हे संस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (8) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर पावत्या या सामनेवाला संस्थेने ‘प्रकल्प उभारणीसाठी मुदतबंद ठेव पावती’ या नांवे असून तक्रारदारांकडून पावती क्र.0840 व 0841 या पावत्यांन्वये प्रत्येकी रुपये 1,45,000/- स्विकारलेचे दिसून येते. सदर पावत्यांची मुदत ही दि.01.4.2005 ते दि.31.03.2008 रोजीअखेर होती व सदर पावतीवर द.सा.द.शे.13 टक्के व्याज देय असल्याचे दिसून येते. तसेच, तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये दि.17.02.2009 रोजीअखेर रुपये 60,000/- इतकी रक्कम सदर दोन ठेव पावत्यांच्या परतफेडीपोटी सामनेवाला यांचेकडून मिळालेचे कथन केले आहे. इत्यादी विवेचन विचारात घेता तक्रारदार हे त्यांच्या ठेव पावती क्र.840 व 841 वरील एकूण रक्कम रुपये 2,90,000/- वर दि.01.4.2005 ते दि.31.03.2008 या कालावधीकरीता द.सा.द.शे.13 टक्के व्याज व तदनंतर संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज मिळणेस पात्र राहतील. तथापि, तक्रारदारांना सदरील संपूर्ण व्याजासह रक्कम करतेसमयी तक्रारदारांना अदा केलेली रक्कम रुपये 60,000/- तदवेळी वळती करुन घेणेचा सामनेवाला यांचा अधिकार सुरक्षित ठेवणेत यावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (9) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र. 1 ते 3 व 5 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.4 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना ‘प्रकल्प उभारणीसाठी मुदतबंद ठेव पावती’ क्र.0840 व 0841 वरील प्रत्येकी रक्कम रुपये 1,45,000/- प्रमाणे रुपये 2,90,000/- (रुपये दोन लाख नव्वद हजार फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.01.4.2005 ते दि.31.03.2008 या कालावधीकरीता द.सा.द.शे.13 टक्के व्याज व तदनंतर संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज अदा करावे. सदर संपूर्ण रक्कम अदा करतेसमयी सामनेवाला यांनी रक्कम रुपये 60,000/- (रुपये साठ हजार फक्त) वळते करुन घ्यावेत. (3) सामनेवाला क्र. 1 ते 3 व 5 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.4 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |