जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ७७/२०११
तक्रार दाखल दिनांक – २०/०४/२०११
तक्रार निकाली दिनांक – २३/०८/२०१३
अशोक रामचंद्र जोशी. उ.व.—३०
धंदा -– मजूरी
रा.- ग.न.१ ज्ञानेश्वर मंदिरा जवळ
गजानन मोरे हयांचे घर
सुभाषनगर, जुने धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
मयुर सेल्स कॉर्पोरेशन साक्री रोड धुळे
प्रो. नंदुभाऊ सरदार उ.व.सज्ञान,
धंदा व्यापार. रा.लेन न.१
भिमनगर जवळ, साक्रीरोड, धुळे. ............ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.ए.एम. हातेकर)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड.एम.बी. चौधरी)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून पे ऑर्डरप्रमाणे रक्कम मिळणेसाठी व न दिलेल्या मालाच्या कर्जापोटी जे हप्ते भरले ते सामनेवाला यांचेकडून मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यास केटरिंगचा व्यवसाय सुरू करावयाचा असल्याने त्याने महानगरपालिका धुळे मार्फत राबविल्या जाणा-या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळणेसाठी महानगरपालिकेकडे रू.२,००,०००/- कर्ज मिळणेकरिता दि.१३/०७/२००९ रोजी सर्व आवश्यक कागदपत्र व सामनेवाला यांचे फर्म कडून केटरिंगचे साहित्य विकत घेण्याचे कोटेशन सोबत अर्ज सादर केला. त्यानुसार महानगरपालिकेने अर्थसहाय्य म्हणून रू.५०,०००/- बॅंक ऑफ महाराष्ट्र मार्फत रू.१,४०,०००/- आणि तक्रारदारचा मार्जिन मनी रू.१०,०००/- असे एकूण रू.२,००,०००/- मंजूर केले.
२. त्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळेने दि.२३/०२/२०१० ला पे ऑर्डर क्रं.३४९२२१ व पे ऑर्डर क्रं.३४९२२२ प्रत्येकी रू.१,००,०००/- मयूर सेल्स कॉर्पोरेशनच्या नावाने तक्रारदारकडे दिल्या आणि पे ऑर्डर मिळाल्यावर त्याच्या पावत्या सादर करावयास सांगितल्या. सदर पे ऑर्डस् तक्रारदारने सामनेवाला यांना दिल्या असता पे ऑर्डस् खात्यावर जमा होताच कोटशन प्रमाणे केटरिंगचे साहित्य तो देईल असे सामनेवाला यांनी तक्रारदारास सांगितले. तक्रारदार आठ दिवसानंतर सामनेवाला यांचेकडे गेला असता अदयाप पे ऑर्डर जमा झालेली नाही, जमा होताच निरोप देईल असे सामनेवाला यांनी सांगितले.
३. तक्रारदारचे पुढे असे म्हणणे आहे की, त्यानंतरही सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी संपर्क केला असता, पे ऑर्डर जमा न झाल्याचे उत्तर त्यांनी तक्रारदारास दिले. अशातच तक्रारदारला बॅंकेचे दि.३०/०३/२०१० रोजीचे कर्ज मंजूर होवूनही व पे ऑर्डर देवूनही अदयाप माल घेतल्याच्या पावत्या सादर केल्या नाहीत. त्या त्वरीत सादर करण्याबाबत आणि कर्ज फेडीचा हप्ता भरणे बाबतचे पत्र मिळाले. त्यानुसार तक्रारदारने सामनेवाला यांची भेट घेतली असता सामनेवाला यांनी पूर्वीचेच उत्तर दिले. तक्रारदारने पुन्हा सामनेवाला यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, सामनेवाला हे भेट घेण्याचे टाळत असे. त्यामुळे तक्रारदारने दि.२६/०७/२०१० रोजी बॅंकेला कर्ज मंजूरीनंतर दिलेले चेक कोणत्या बॅंकेमार्फत वटविण्यास आले व कर्ज खात्याचे खाते उता-याची सही शिक्कयाची प्रत मिळणेसाठी पत्र दिले.
४. त्यानुसार बॅंकेने दि.०६/०८/२०१० रोजीच्या पत्रान्वये पे ऑर्डर्स दि.२४/०२/२०१० रोजी त्यांचे खात्यावर जमा झाली तसेच सदर पे ऑर्डर्स जळगाव जनता सहकारी बॅंक धुळे मार्फत वटविण्यास आल्याबाबतचा खुलासा तक्रारदारास केला.
वरील परिस्थिती असतांना सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रक्कम रू.२,००,०००/- मिळूनही त्याला कोटेशनप्रमाणे माल अदा केलेला नाही मात्र त्याचे कर्जाच्या रकमेच्या हप्त्याचा बोझा तक्रारदार वर पडलेला असुन दरमहा तक्रारदारास कर्ज हप्ता भरावा लागत आहे. त्यामुळे तक्रारदारास सामनेवाला यांचेकडून रक्कम रू.२,००,०००/- तसेच मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रू.१,००,०००/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. १२% प्रमाणे व्याज मिळावे. तक्रार अर्जाचा खर्च रू.५,०००/- मिळावा. तसेच तक्रारदारने मालाच्या कर्जापोटी जे हप्ते बॅंकेत भरले ते सामनेवाला यांचेकडून मिळण्याचा आदेश व्हावा. अशी विनंती केली आहे.
५. तक्रारदारने आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.४ सोबत नि.४/१ वर कर्जाच्या अर्जाची झेरॉक्स प्रत, नि.४/२ वर कोटेशनची झेरॉक्स प्रत, नि.४/३ वर बॅंकेच्या पत्राची झेरॉक्स प्रत, नि.४/४ वर तक्रारदारने बॅंकेला दिलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत, नि.४/५ वर बॅकेने तक्रारदारास दिलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत, नि.१० वर प्रतिज्ञापत्र तसेच नि.११ सोबत नि.११/१ वर सामनेवाला विरूध्द केलेल्या केसची सही शिक्क्याची प्रत, नि.११/२ वर व्हेरिफिकेशनची झेरॉक्स प्रत, नि.११/३ वर मे.ज्युडी. कोर्टाने सामनेवाला विरूध्द केलेल्या आदेशाची सही शिक्कयाची प्रत, नि.१५ वर लेखी युक्तीवाद, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
६. सामनेवाला यांनी आपला खुलासा नि.७ वर दाखल केला असून त्यात त्यांनी तक्रारदार यास पे ऑर्डर खात्यावर जमा होताच कोटेशनप्रमाणे केटरिंगचे साहित्य देईल असे कधीही सामनेवाला याने सांगितले नव्हते व नाही. तक्रारदारचे शालक नितीन सुरेश जोशी यांचे मार्फत कर्ज प्रकरण केलेले होते. तक्रारदारचे शालक यांनी ब-याच वेळा सामनेवाला कडून कोटेशन व माल घेतलेला आहे. त्यामुळे तक्रारदारच्या शालकाच्या सांगण्यावरून तक्रारदार यांना केटरिंगच्या सामानाचे कोटेशन दिले होते.
७. तक्रारदारच्या बॅंकेने कोटेशनप्रमाणे सामनेवाला यांचे नावे पे ऑर्डर दिल्या होत्या त्या तक्रारदारने सामनेवाला यांना दिल्या. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दि.२७/०२/२०११ रोजी केटरिंगचे कोटेशनप्रमाणे रू.२,००,०००/- चा सामान दिला व त्याच दिवशी सामान दिल्याच्या पावत्या तक्रारदार यांना दिलेल्या आहे. तक्रारदार यास बॅंकेचे कर्ज बुडवायचे होते म्हणून तक्रारदार यांनी खोटापुरावा तयार करण्यासाठी सामनेवाला यांनी माल दिला नाही असा खोटा बहाणा करून सदरचा खोटा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तक्रारदारचा अर्ज खर्चासह रदृ व्हावा तसेच आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासापोटी तक्रारदार कडून रू.२,०,०००/- देण्याचा हुकुम व्हावा असे नमूद केले आहे.
८. तक्रारदारची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा, दाखल कागदपत्रे पाहता व तक्रारदारचे वकिलांचा युक्तिवाद, ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात. त्याची उत्तरे आम्ही सकारण खलीलप्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय
२. तक्रारदारकोणता अनुतोष मिळण्यास
पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे
३. आदेशकाय? खालीलप्रमाणे
९. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, तक्रारदार याने महानगरपालिका धुळे यांचे कडे सुवर्ण जयंती शहरी रोजगार हमी योजनेअंतर्गत कर्ज मिळणेकरिता सर्व कागदपत्रांसह व केटरिंगचे साहित्य विकत घेण्याच्या कोटेशनसह दि.१३/०७/२००९ रोजी अर्ज सादर केला. सदर कर्ज मंजूर झाल्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र धुळेने दि.२३/०२/२०१० ला पे ऑर्डर क्र. क्रं.३४९२२१ आणि पे ऑर्डर क्रं.३४९२२२ प्रत्येकी रक्कम रू.१,००,०००/- म्हणजे एकूण रू.२,००,०००/- च्या मयूर सेल्स कॉर्पोरेशनच्या नावाने तक्रारदारकडे दिल्या आणि पे ऑर्डर प्रमाणे माल मिळाल्यावर त्याच्या पावत्या सादर करावयास सांगितल्या. त्याप्रमाणे तक्रारदारने सदर पे ऑर्डर सामनेवाला यांना दिल्या व वेळोवेळी सामनेवाला यांचेकडे जावून पे ऑर्डर बाबत चौकशी केली. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारास पे ऑर्डर जमा होताच निरोप देईल असे सांगितले.
१०. त्यानंतर बॅंकेने दि.३०/०३/२०१० रोजीचे पत्र देवून पे आर्डर देवूनही अदयाप त्याप्रमाणे माल घेतल्याच्या पावत्या सादर केल्या नाहीत. त्या सादर करण्याबाबत व कर्ज हप्ता भरणेबाबत कळविले असता तक्रारदारने सामनेवाला यांची पुन्हा भेट घेतली. त्याही वेळेस त्यांनी तक्रारदारास पुर्वीचेच उत्तर दिले. त्यानंतरही तक्रारदारने सामनेवाला यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सामनेवाला तक्रारदारची भेट घेण्यास टाळत असल्याने तक्रारदारने दि.२६/०७/२०१० रोजी बॅंकेला चेक कोणत्या तारखेला वटविला गेले व कोणत्या बॅंकेमार्फत वटविले गेले, तसेच कर्ज खात्याचे खाते उता-याचे सही शिक्कयाची नक्कल प्रत मिळणेसाठी पत्र दिले. त्यावर बॅंकेने दि.०६/०८/२०१० रोजीच्या पत्रान्वये पे ऑर्डर दि.२४/०२/२०१० रोजी जळगांव जनता सहकारी बॅंकेमार्फत वटविण्यात आल्याबाबतचे तक्रारदारास कळविले.
अशाप्रकारे सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रक्कम मिळूनही कोटेशनप्रमाणे माल अदा केलेला नाही.
११. या संदर्भात सामनेवाला यांनी आपल्या खुलाश्यात त्यांनी दि.२७/०२/२०११ रोजी केटरिंगचे कोटेशन प्रमाणे तक्रारदारास रू.२,००,०००/- चा सामान दिला व त्याच दिवशी सामान दिल्याच्या पावत्या दिल्या आहेत असे नमुद केले आहे.
१२. याबाबत आम्ही तक्रारदारने दाखल केलेल्या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदारने नि.४/३ वर बॅंक ऑफ महाराष्ट्र चे पत्र दाखल केले आहे. सदर पत्रात बॅंकेने कर्ज रकमेच्या पे ऑर्डर मयूर सेल्स कॉर्पोरेशन यांचे नावाने देण्यात आलेल्या आहेत असे नमूद आहे. तसेच नि.४/५ वरील बॅंक ऑफ महाराष्ट्र चे पत्रावरून सदरच्या पे ऑर्डर दि.२३/०२/२०१० रोजी दिलेल्या असून दि.२४/०२/२०१० रोजी त्या पे ऑर्डर जळगाव जनता सहकारी बॅंकेमार्फत सामनेवाला यांचेकडे वटविण्यात आल्याचे नमूद केल्याचे दिसून येत आहे. परंतु सामनेवाला यांनी आपल्या खुलाश्यात नमूद केल्याप्रमाणे दि.२७/०२/२०११ रोजी तक्रारदारास सामान दिल्याच्या आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे या केस कामी दाखल केलेले नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास कोटेशनप्रमाणे माल दिला हे म्हणणे केवळ त्यांच्या खुलाश्यात नमूद केल्यामुळे ग्राहय धरण्यास कोणताही कायदेशीर पुरावा नसल्याने सामनेवाला यांनी पे ऑर्डर्स मिळूनही तक्रारदारास कोटेशनप्रमाणे केटरिंगचा माल दिलेला नाही असे आम्हांस वाटते. यावरून सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत कमतरता केली आहे या मतास आम्ही आलो आहोत म्हणून मुदृा क्रं.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१३. मुद्दा क्र.२- तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून रक्कम रू,२००,०००/-, मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रू.१,००,०००/- वरील रकमेवर द.सा.द.शे. १२% प्रमाणे व्याज, तक्रार अर्जाचा खर्च रू.५,०००/- तसेच कर्जापोटी जे हप्ते तक्रारदारने बॅंकेत भरले ते सर्व मिळावे अशी विनंती केली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार सामनेवाला यांचेकडून पे ऑर्डस् ची रक्कम रू.२,००,०००/- व त्यावर दि.२४/०२/२०१० पासून ६% दराने व्याजासहीत रक्कम पूर्ण फेडहोईपावेतो या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत मिळण्यास पात्र आहेत. तसेच मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रू.५,०००/-, व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रू.१,०००/- या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत मिळण्यास पात्र आहे असे आम्हांस वाटते.
१४. मुद्दा क्र.३- वरील सर्व विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदारची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला मयूर सेल्स कॉर्पोरेशन यांनी तक्रारदारास पे ऑडर्स ची रक्कम रू.२,००,०००/- व त्यावर दि.२४/०२/२०१० पासून ६% दराने व्याजासहीत रक्कम पूर्ण फेडहोईपावेतो या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत दयावेत.
३. सामनेवाला मयूर सेल्स कॉर्पोरेशन यांनी तक्रारदारास मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रू.५,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रू.१,०००/- या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत
दयावा.
धुळे
दि.२३/०८/२०१३
(श्री.एस.एस. जोशी ) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.