सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 175/2014.
तक्रार दाखल दि.03-11-2014.
तक्रार निकाली दि.09-10-2015.
श्री. संपत कृष्णा गायकवाड,
रा.चिंचणेर वंदन, ता.जि.सातारा. ... तक्रारदार.
विरुध्द
1. कस्टमर केअर ऑफीसर,
मायक्रोमॅक्स इन्फॉरमॅटीक्स लिमीटेड,
21/24 अ, फेज-2, नरीना इंडस्ट्रीयल एरीया,
दिल्ली -110 028.
2. टच तेल सेल्युलर सेल्स अँण्ड सर्व्हीस,
रा. शॉप नं.6, मरीआई कॉम्प्लेक्स,
पोवई नाका, सातारा. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.व्ही.ए. देशमुख.
जाबदार क्र. 1 तर्फे – अँड.एस.एम.क्षीरसागर.
जाबदार क्र. 2 तर्फे – अँड.जे.एन.पार्टे.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे चिंचनेर वंदन, ता.जि.सातारा येथील कायमचे रहिवाशी आहेत. त्यांनी दि.5/11/2013 रोजी मायक्रोमॅक्स ए-35 हा मोबाईल जाबदार क्र. 2 कडून रक्कम रु.4,500/- (रुपये चार हजार पाचशे मात्र) रोख देऊन खरेदी केला आहे. सदर मोबाईल खरेदीची बॅच नं.68677 व चलन नं.01485 जाबदार क्र. 2 ने तक्रारदाराला पावतीही दिली आहे. सदरचा मोबाईल फोन टच स्क्रीनचा आहे. प्रस्तुत मोबाईल तक्रारदाराने खरेदी केलेपासून 1 महिना वापरला. त्यानंतर प्रस्तुत मोबाईल हा चार्जींग होत नव्हता त्याबाबत जाबदार क्र. 2 कडे दुरुस्तीसाठी दिला व दुरुस्त झाले का पाहण्यासाठी बरेच हेलपाटे मारले. दुरुस्तीनंतीही प्रस्तुत मोबाईलची स्क्रीन लुकलुकू लागली. त्यावेळी मोबाईल सदोष असलेचे तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ला सांगीतलेनंतर प्रस्तुत मोबाईल जाबदार क्र. 2 ने स्वतःकडे ठेऊन घेतला. त्यानंतर तक्रारदाराने जाबदाराकडे मोबाईल व्यवस्थीत दुरुस्त करुन देणेची अथवा दुसरा हॅण्डसेट देणेची विनंती केली. त्यावेळी मोबाईल डिफेक्टीव्ह असल्याने जाबदार क्र. 2 चे अधिकृत सेंटर, शिवकाल मोबाईल सर्व्हीसींग सेंटर यांचेकडे दुरुस्तीस देण्यास सांगितले. दि. 29/5/2014 रोजी सदर मोबाईल प्रस्तुत शिवकाल मोबाईल सर्व्हीसींग सेंटर यांचेकडे दुरुस्तीस दिला. त्यांनी प्रस्तुत मोबाईल दुरुस्त होऊन आलेने ताब्यात घेणेबाबत कळविले. परंतू मोबाईल ताब्यात घेतला असता, तो नादुरुस्त असलेचे लक्षात आले व दोषविरहीत झाला नसलेचे लक्षात आले. जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडे मोबाईल दुरुस्तीसाठी वारंवार हेलपाटे मारले परंतू सदर जाबदार यांनी तक्रारदाराला विक्री पश्चात सेवा देणेत कसूर केली व तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रास दिला आहे. त्यामुळे दि.2/7/2014 रोजी तक्रारदाराने जाबदार क्र. 1 व 2 यांना रजि.नोटीस पाठवून सदर मोबाईल नादुरुस्त असलेचे कळविले व मानसीक त्रासापोटी व गैरसोयीपोटी रक्कम रु.15,000/- व मोबाईलची किंमत रक्कम रु.4,500/- तसेच नुकसानभरपाई मिळावी म्हणून जाबदार यांना नोटीस पाठविली. परंतू जाबदाराने नोटीसला उत्तर दिले नाही व कोणतीही रक्कम तक्रारदाराला अदा केली नाही. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदाराला दिले सदोष सेवेपोटी जाबदार यांचेकडून नुकसानभरपाई मिळणेसाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/5 कडे अनुक्रमे तक्रारदाराने जाबदार क्र. 2 कडून मोबाईल खरेदी केलेची पावती, अधिकृत मोबाईल सर्व्हीसींग सेंटरची दुरुस्तीची पावती, तक्रारदाराने जाबदारांना वकीलामार्फत पाठवले नोटीसची स्थळप्रत, जाबदारांना नोटीस पोहोचल्याच्या पोहोचपावत्या, नि. 20 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 28 कडे लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केली आहेत.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडून रक्कम रु.43,000/- (रुपये त्रेच्याळीस हजार मात्र) मोबाईलची किंमत, नुकसानभरपाई व मानसीकत्रास याबाबत मिळावेत अशी विनंती केली आहे.
4. जाबदार क्र. 1 ने नि.19 कडे म्हणणे, नि.19/1 कडे म्हण्ण्याचे अँफीडेव्हीट, नि.22 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.25/1 कडे अधिकारपत्र, नि.26 कडे पुरावा संपलेची पुरसिस, नि.27 कडे पुराव्याचे कागदपत्र व अँफीडेव्हीट हाच लेखी युक्तीवाद समजणेत यावा म्हणून पुरसीस, जाबदार क्र. 2 ने नि.15 कडे म्हणणे, नि. 15/1 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि.23 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.29 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे याकामी जाबदाराने दाखल केली आहेत.
जाबदार क्र. 1 व 2 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत. तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथन मान्य व कबूल नाही. वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे,- जाबदार ही देशातील नामांकीत मोबाईल कंपनी आहे. त्यांची सर्व उत्पादने उच्च दर्जाची असतात. तक्रारदाराने दि. 5/11/2013 रोजी मायक्रोमॅक्स Y-35 मोबाईल जाबदार क्र. 2 कडून खरेदी केला. त्याची किंमत रक्कम रु.4,500/- होती. मोबाईल खरेदी केलेपासून 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ मोबाईल तक्रारदाराने वापरला आहे हे कागदपत्रांवरुन दिसून येते. तक्रारदाराने योग्य दर्जाचा व क्षमतेचा मोबाईल चार्जर वापरला नसल्याने व योग्य त्या व्होल्टेजमध्ये मोबाईल चार्जींगला लावला नसल्याने तसे मोबाईलचा पाण्याशी संपर्क आल्याने म्हणजेच तक्रारदाराचे स्वतःच्या निष्काळजीपणामुळे, हयगयीमुळे, हलगर्जीपणामुळे सदरचा दोष निर्माण झाला आहे. मोबाईल खरेदीवेळी सर्व सूचना तक्रारदाराला देऊनही तक्रारदाराने मोबाईल व्यवस्थीत वापरला नाही. त्यामुळे त्यात बिघाड निर्माण झाला याची सर्वस्वी जबाबदारी तक्रारदाराची आहे. त्यामुळे तक्रारदाराला कोणताही मानसिकत्रास, आर्थिकत्रास झालेला नाही. सबब प्रस्तुत तक्रारदाराने विनाकारण जाबदार विरुध्द सदरचा केलेला तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे जाबदार क्र. 1 व 2 यांनी म्हणणे दिले आहे.
5. प्रस्तुत कामी वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
पुरविली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदाराने दि.5/11/2013 रोजी जाबदार क्र.1 कंपनीचा मायक्रोमॅक्स ए-35 हा मोबाईल जाबदार क्र. 2 यांचेकडून रक्कम रु.4,500/- (रुपये चार हजार पाचशे मात्र) रोख रक्कम देवून खरेदी केला आहे ही बाब जाबदारांनी मान्य व कबूल केली आहे तसेच खरेदीची मूळ पावती तक्रारदाराने नि.5/1 कडे दाखल केली आहे. यावरुन तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदार क्र. 1 व 2 हे सेवापुरवठादार आहेत हे निर्विवाद सिध्द होते. तसेच प्रस्तुत मोबाईल हा तक्रारदाराने दुरुस्तीसाठी जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडे दिला असता प्रस्तुत जाबदार यांनी सदर मोबाईलमधील दोष काढून दुरुस्त करुन दिलेला असतानाही प्रस्तुत मोबाईलमधील चार्जींग न होणेचा दोष, तसेच स्क्रीन लुकलुकत असलेचा दोष निघालेला नसून सदरचा मोबाईल हा सदोष असलेचे कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे. प्रस्तुत जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामधील केलेले कथन हे पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर पहाता तसेच पुराव्याची कागदपत्रे यांचा विचार करता, प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष मोबाईल विक्री करुन अनुचित व्यापारी व्यवस्थेचा अवलंब केलेचे व मोबाईलची दुरुस्ती योग्य प्रकारे न करता, दोष काढून न दिलेमुळे जाबदार क्र. 1 व 2 ने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे हे स्पष्ट व सिध्द होते. सबब जाबदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना त्यांचे मोबाईलची किंमत रक्कम रु.4,500/- (रुपये चार हजार पाचशे मात्र), गैरसोय, नुकसानभरपाई व मानसिक त्रास व अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार मात्र) अदा करणे न्यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.4,500/- (रुपये चार हजार
पाचशे मात्र) मोबाईलची किंमत परत अदा करावी. प्रस्तुत रकमेवर अर्ज
दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हातीपडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
अदा करावे.तसेच तक्रारदाराने त्याचे ताबेतील वादातीत मोबाईल हॅण्डसेट
जाबदारांकडे जमा करावा.
3. तक्रारदाराची गैरसोय, मानसीक-आर्थीक त्रास, अर्जाचा खर्च याकरीता
नुकसानभरपाई म्हणून जाबदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना रक्कम
रु.10,000/- (रुपये दहा हजार मात्र) अदा करावेत.
4. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45
दिवसात करावी.
5. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
7. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 09-10-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.