(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका कि. बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 06 ऑक्टोंबर 2016)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. तक्रारकर्ता वरील दर्शविलल्या पत्यावर राहणारा असून तक्रारीचे कारण मा. मंचाचे कार्यक्षेञात घडलेले आहे. विरुध्दपक्ष हा मॅक्सवर्थ ट्रेडिंग कंपनी असून होम अप्लायसेंस विकते या कपंनी तर्फे प्रिटी होम, वानखेडे हॉल, नॉर्थ अंबाझरी रोड, नागपूर येथे स्टॉल लावला होता व त्या स्टॉलमध्ये ‘’एकविरा टॉवर फॅन’’ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
2. तक्रारकर्ता हे सुशिक्षीत गृहस्त असून नागपूरची गरमी लक्षात घेता जरुरत म्हणून ‘’प्रिटी होम प्रदर्शनी’’ मधून पंखा दिनांक 4.10.2010 रोजी विकत घेतला. विरुध्दपक्षाने त्याचदिवशी तक्रारकर्त्याचे घरी पंखा घरपोच पोहचवून दिला, त्याकरीता तक्रारकर्त्याने रुपये 3400/- बिल क्रमांक 276 व्दारे दिला आहे. विकत घेतलेला पंखा सुरुवातीला एक महिना व्यवस्थित चालला, नंतर हिवाळ्याचे दिवस आल्यामुळे पंखा बंद ठेवण्यात आला. त्यानंतर पुन्हा गरमीचे दिवस आल्याने एप्रिल 2011 मध्ये तक्रारकर्त्याने पंखा पुन्हा सुरु केला, त्यानंतर देखील पंखा एक महिना व्यवस्थित चालला. तक्रारकर्त्याकउे उन्हाळ्यात अमिरिकेत असलेला मुलगा नागपूरला वास्तव्यासाठी आला होता, अशा अत्यंत जरुरीचे वेळी नवीन घेतलेला ‘’एकविरा टॉवर फॅन’’ खराब झाला, त्यातून घर-घर आवाज येण्यास सुरुवात झाला व तो जागेवरच जोरात कंपन (Vibrate) करु लागला. अशारीतीने पंख्याने जोरात कर्कश आवाज केला व जागेवर तो बंद झाला.
3. तक्रारकर्त्याने याबाबत कंपनीने दिलेल्या बिलावरुन तक्रार केंद्रावर फोन केला असता, ते म्हणाले की, मी दुरुस्तीकरीता माणसाला दोन दिवसांत पाठवितो. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास वारंवार संपर्क केला असता, त्यांनी टाळाटाळ केली व तक्रारकर्त्याने ‘’एकविरा टॉवर फॅन’’ खराब झाल्याचे वारंवा तक्रार केल्यानंतर देखील आजपर्यंत तक्रारीचे निवारण करण्यासाठी विरुध्दपक्षाकडून कोणीही आले नाही. तक्रारकर्त्याने नागपूर येथे सर्व्हीस सेंटर संबंधी विचारले असता त्यांनी ‘’हनी अर्चना अर्पाटमेंट’’ मेडिकल चौक, नागपूरचा पत्ता दिला, परंतु तेथे चौकशी केल्यानंतर तक्रारकर्त्याने प्रत्यक्षात तिथे सर्व्हीस सेंटर असल्याचे दिसून आले नाही व त्यानंतर विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा फोन उचलने बंद केले. तक्रारकर्त्याच्या प्रार्थनेनुसार त्यांनी फॅनची किंमत रुपये 4,400/- द्यावे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसानी पोटी रुपये 25,000/- द्यावे. तसेच दुःखापोटी, छळापोटी, हयगयपोटी रुपये 15,000/- आणि असुविधा, हताशापोटी रुपये 10,000/- असे एकूण रुपये 53,400/- मागितले आहे.
4. तक्रारकर्त्याचे तक्रारीचे अनुषंगाने विरुध्दपक्षाचे विरुध्द मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली. विरुध्दपक्ष मंचासमोर उपस्थित होऊन निशाणी क्र.17 नुसार लेखीउत्तर दाखल केले. त्यात विरुध्दपक्षाच्या म्हण्यानुसार तक्रारकर्त्याने दिनांक 4.10.2010 रोजी ‘’प्रिटी होम प्रदर्शनी’’ येथून आपल्या स्टॉलमधून रुपये 3,400/- मध्ये ‘’एकविरा टॉवर फॅन’’ खरेदी केल्याचे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे विरुध्दपक्षाने सादर केले की, ‘’एकविरा टॉवर फॅन’’ हा गॅरंटी सह खरेदी केला होता, त्याप्रमाणे त्याचा फॅन खराब झाला असता तर त्यांनी तो फॅन गॅरंटी पिरेडमध्ये दुरुस्त करुन घ्यावयास होते. विरुध्दपक्षाचे म्हणण्यानुसार फॅनच्या सर्व्हीसिंगची गॅरंटी ही केवळ 6 महिण्याची असून, तसेच गॅरंटी कार्डच्या कलम 1(1) मध्ये स्पष्ट नमूद आहे. सदर सर्व्हीसींग ही मॅक्सवर्थ ट्रेडींग कंपनीला बंधनकारक नाही, कारण ही कंपनी केवळ ट्रेडींगचा व्यवसाय करते. सदर फॅनमध्ये बिघाड झाल्याने ती फक्त ग्राहकाच्या हितासाठी गुडफेथमध्ये सर्व्हीसींगची मदत करते. सर्व्हीसींग किंवा दुरुस्तीची जबाबदारी ही ‘’एकविरा टॉवर फॅन’’ कंपनीची आहे, त्यास विरुध्दपक्ष म्हणजे मॅक्सवर्थ ट्रेडींग कंपनी जबाबदार नाही.
5. त्याचप्रमाणे ‘’एकविरा टॉवर फॅन’’ गॅरंट कार्डमध्ये कलम - 8 मध्ये स्पष्ट नमूद केले की, जर ‘’एकविरा टॉवर फॅन’’ च्या संबंधाने जर काही वाद झाला तर तो मुंबई येथील सक्षम न्यायालय किंवा मुंबई येथील ग्राहक मंचात तक्रार दाखल करावी. अशाप्रकारे या तक्रारीचे अधिकारक्षेञ मुंबई येथील ग्राहक मंच किंवा न्यायालय हे आहे, त्यामुळे सदर तक्रार ही नागपूर येथील ग्राहक मंचाला चालविण्याचा अधिकार नाही, त्यामुळे नागपूर येथील ग्राहक मंचाने सदर तक्रार खारीज करावी. त्याचप्रमाणे विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार हे खोटे आहे की, तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक ञास झाला आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकत्यास विकलेला फॅन हा सुरुवातीला एक महिना चालू होता, त्याचप्रमाणे हिवाळा झाल्यानंतर देखील एक महिना पुन्हा चालला. फॅनमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला किंवा फॅनमध्ये प्रचंड आवाज आला, कंपन झाले किंवा त्याने कर्कश आवाज करुन बंद पडला हे संपूर्ण चुकीचे व खोटे आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास फॅन सर्व्हीसींगकरीता नागपूर येथील कोणताही पत्ता दिला नाही.
6. त्याचप्रमाणे विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्षाने फॅन दुरुस्ती करण्याकरीता विरुध्दपक्षाने मेकॅनिक पाठविला होता व फॅनव दुरुस्ती करुन दिले होते. परंतु, तक्रारकर्त्याचे समाधान न झाल्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास नवीन फॅन देण्याची तयारी दर्शविली, परंतु ती तक्रारकर्त्याने साफ धुळकावली. त्यामुळे तक्रारकर्त्यास कोणताही मानसिक, शारिरीक ञास झाला नाही व अशाप्रकारे आर्थिक नुकसानी संबंधाने विरुध्दपक्ष तक्रारकर्त्याच्या कोणत्याच मागणीस पाञ नाही व ही तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने ही तक्रार हेतुपुरस्पर दाखल केलेली आहे व त्याला ञास देवून लबाडी युक्त्या करुन व त्याचेकडून सबळ कारणाशिवाय पैसा उकळण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे सबब ही तक्रार खारीज करण्यात यावी.
7. तक्रारकर्त्याचे वकीलाचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्षास मौखीक युक्तीवादाकरीता संधी मिळूनही युक्तीवाद केला नाही. दोन्ही पक्षाचे अभिलेखावर दाखल केलेल्या लेखी बयान, दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : नाही.
2) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
// निष्कर्ष //
8. तक्रारकर्त्याने दिनांक 4.10.2010 ला मॅक्सवर्थ ट्रेडींग कंपनीकडून ‘’प्रिटी होम प्रदर्शनी’’ वानखेडे हॉल, नॉर्थ अंबाझरी रोड, नागपूर येथे लावलेल्या स्टॉलवरुन ‘’एकविरा टॉवर फॅन’’ रुपये 3,400/- ला विकत घेतला. त्याची पावती निशाणी क्र.3 वरील दस्त क्र.1 वर दाखल आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे यात वाद नाही. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार सदर फॅन हा एक महिना व्यवस्थीत चालला व हिवाळा आल्या कारणाने तो फॅन व्यवस्थीत ठेवून दिला व पुन्हा उन्हाळा आल्यानंतर त्यांनी फॅन चालू केला असता तो फॅन एक महिना पुन्हा व्यवस्थीत चालाला. परंतु त्यानंतर प्रचंड आवाज करुन तो पंखा बंद पडला. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांचेकडे मेकॅनिक पाठवून तो फॅन दुरुस्तीकरुन देण्यात आला. तक्रारकर्त्याचे समाधान न झाल्यामुळे विरुध्दपक्षाने त्यांना नवीन फॅन देण्याची तयार दर्शविली, परंतु तक्रारकर्त्याने ती साफ धुळकावून लावली. तक्रारकर्त्याच्या प्रतीउत्तरा प्रमाणे पंखा दुरुस्त करण्यास आजपर्यंत कोणताही मेकॅनिक आला नाही. त्याचप्रमाणे मॅक्सवर्थ कंपनीचे किंवा ‘’एकविरा टॉवर फॅन’’ यांचे नागपूर मध्ये कोणतेही सर्व्हीसींग सेंटर प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास पंखा आणून देतो असे कधीही म्हटले नाही.
9. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे गरमीच्या दिवसांत देखील फॅन 1 महिना व्यवस्थीत चालला व त्यानंतर तो कर्कश आवाज येऊन कंपनासहीत बंद पडला. यावरुन असे दिसते की, ही ञुटी उत्पादकाची आहे. विरुध्दपक्षाने सेवा देण्याकरीता तक्रारकर्त्याकडे आपला तांञिक माणूस सुध्दा पाठविला होता, त्यामुळे विरुध्दपक्षाची ञुटी दिसून येत नाही आणि तक्रारकर्त्याने उत्पादकास पार्टी बनविले नाही. तक्रारकर्त्याने उत्पादकाविरोधात मंचात प्रकरण चालविणे आवश्यक होते. कारण, ही ञुटी डिलरची नसून उत्पादकाची आहे.
करीता, विरुध्दपक्षाचे विरुध्द तक्रार खारीज होण्यास पाञ आहे, असे मंचाचे मत आहे. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 06/10/2016