(द्वारा घोषित श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष ) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी गैरअर्जदाराकडून पॉलिसी घेतली होती त्या पॉलिसीचे नांव Life Maker premium Unit Linked Investment असे आहे. ही पॉलिसी 10 वर्षासाठी होती. तक्रारदारानी रु 99,000/- गैरअर्जदाराकडे भरले. तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, पॉलिसी घेतेवेळेस गैरअर्जदाराच्या प्रतिनिधीने त्यांना रु 99,000/- या रकमेमध्ये वाढ होईल असे सांगितले होते. परंतु एका वर्षाच्या आंतच या 99000/- चे कमी होऊन रु 27000/- इतकीच त्याची किंमत झाली. प्रतिनिधीने असेही सांगितले होते की, ही सिंगल प्रिमीयम पॉलिसी आहे . परंतु गैरअर्जदाराकडून त्यांना पॉलिसीचा दुसरा हप्ता भरण्यासंदर्भात नोटीस आली. गैरअर्जदारानी अशा प्रकारे त्यांची फसवणूक केल्यामुळे ते रु 99000/- परत मागतात. तक्रारदारानी त्यांच्या तक्रारीसोबत शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदारांनी त्यांचा लेखी जवाब शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केला. पॉलिसी घेतेवेळेस तक्रारदारास पॉलिसीची सर्व माहिती सांगितली होती. त्यानंतर त्यांना पॉलिसीची कागदपत्रे देण्यात आली. तक्रारदारास सदरील पॉलिसी नका असल्यास 15 दिवसाच्या फ्रीलूक पिरीयडमध्ये पॉलिसी रद्द करुन पैसे परत मागता आले असते परंतु तक्रारदाराने तसे केले नाही. पॉलिसीच्या सर्व अटी व शर्ती हया (IRDA) आयआरडीए नुसार केलेल्या असतात. असे असूनसुध्दा तक्रारदारानी ही खोटी केस केली आहे त्यामुळे सदरील केस कॉस्टसह नामंजूर करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदारानी तक्रारदाराच्या पॉलिसीची कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. पॉलिसीची कागदपत्रे पाहता त्यावर Life Maker premium Unit Linked Investment 10 Yrs. ही पॉलिसी तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून घेतलेली होती हे दिसून येते. तसेच पॉलिसीचा हप्ता हा वार्षिक असे पॉलिसीसमोर नमुद केलेले आहे. असे असतानाही तक्रारदारानी सिंगल प्रिमीयम पॉलिसी म्हणून पैसे भरल्याचे त्यांच्या तक्रारीत म्हणतात. तसेच हा प्लॅन युनीट लिंक इन्व्हेस्टमेंट म्हणून 10 वर्षाच्या कालावधीसाठी आहे व अशा प्रकारच्या प्लॅनमध्ये युनीटची किंमत कमी जास्त झाल्याप्रमाणे त्याच्या हप्त्यांची किंमत सुध्दा कमी जास्त होते. त्यानुसार कदाचित त्याच्या रकमेची किंमत रु 27000/- झाली असावी. पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदारास 15 दिवसांचा फ्रीलूक पिरियड सुध्दा दिलेला होता. त्या कागदपत्राची जर तक्रारदारानी पाहणी केली असती किंवा अभ्यास केला असता तर त्यांना असे समजून आले असते की, ही पॉलिसी कुठल्या प्रकारची आहे किंवा त्यांना पटली नसल्यास 15 दिवसाच्या कालावधीत ती रद्द करता आली असती. परंतु तक्रारदारानी कदाचित सदरील कागदपत्रांचा अभ्यास केला नसल्यामुळे ही तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदारानी अटी व शर्तीनुसार व प्लॅननुसार तक्रारदाराकडून रक्कम घेतलेली असल्यामुळे ती आता तक्रारदारास परत करता येत नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालीलपमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
| [ Rekha Kapadiya] Member[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |