::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-13 फेब्रुवारी, 2017)
01. तक्रारदारानीं प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द विमा दावा फेटाळल्याचे कारणास्तव मंचा समक्ष दाखल केली.
02. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत मोतीराम पटेल हा, तक्रारकर्ती क्रं-2) मंजूबाई यशवंत पटेल हिचा पती आहे, ज्याचा मृत्यू सदर तक्रार ग्राहक मंचा समक्ष प्रलंबित असताना झालेला आहे आणि त्यामुळे त्याचे मुल व मुली यांना वारसदार म्हणून अभिलेखावर आणण्यात आले आहे.
दिनांक-24/11/2008 रोजी तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल (सध्या मृतक) याने विरुध्दपक्ष विमा कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधी कडून युनिट लिंक विमा पॉलिसी क्रमांक-709430342 काढली. विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता रुपये-35,000/- एवढा होता आणि जो दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात देय होता. तक्रारकर्ता यशवंत पटेल याने पॉलिसीचे पहिल्या हप्त्यापोटी रुपये-35,000/- भरले होते. पॉलिसी मध्ये तक्रारकर्ती क्रं-2) मंजूबाई यशवंत पटेल हिला “नामनिर्देशित” (Nominee) म्हणून दर्शविले होते. ज्यावेळी विमा पॉलिसीचा नोव्हेंबर-2009 मध्ये विमा हप्ता देय होता, त्यावेळी तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल (सध्या मृतक) याने विरुध्दपक्ष विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता त्याने पॉलिसीचा हप्ता भरण्यास एक-दोन महिन्याचा विलंब झाला तरी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. जानेवारी-2010 मध्ये त्या प्रतिनिधीने तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल (सध्या मृतक) याचे कडून विम्याचे हप्त्याचा धनादेश स्विकारला तसेच विलम्ब झाल्या बद्दल काही कागदपत्रांवर त्याची स्वाक्षरी घेतली. त्यानंतर नोव्हेंबर, 2010 चे वेळी पॉलिसीचा हप्ता भरताना तक्रारकर्त्याने पुन्हा त्या प्रतिनिधी सोबत संपर्क साधण्याचा प्रत्यन केला परंतु संपर्क होऊ न शकल्यामुळे शेवटी तो स्वतः विरुध्दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात विम्याचा हप्ता भरण्यास गेला, त्यावेळी त्याला असे सांगण्यात आले की, त्याच्या पॉलिसीचा नोव्हेंबर-2009 चा विमा हप्ता सुध्दा भरलेला नाही, चौकशीअंती असे माहिती पडले की, तक्रारकर्ती क्रं-2) मंजूबाई यशवंत पटेल हिचे नावे आणखी एक विमा पॉलिसी क्रं-769646290 जारी केलेली असून, ज्या धनादेशाची रक्कम तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याने त्याच्या नावाच्या पॉलिसीमध्ये भरण्यासाठी दिली होती, ती धनादेशाची रक्कम रुपये-35,000/- तक्रारकर्ती क्रं-2) मंजूबाई यशवंत पटेल हिचे नावाने काढण्यात आलेल्या पॉलिसी मध्ये भरण्यात आली. वास्तविक पाहता तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल (सध्या मृतक) याने विरुध्दपक्ष विमा कंपनीला, तक्रारकर्ती क्रं-2) मंजूबाई पटेल हिचे नावाने पॉलिसी काढण्यास कधीच सांगितले नव्हते. तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याने विरुध्दपक्ष विमा कंपनीला विनंती केली की धनादेशाची जी रक्कम तक्रारकर्ती क्रं-2) हिच्या
नावाचे पॉलिसी मध्ये भरल्या गेली ती तक्रारकर्ता क्रं-1) च्या विमा पॉलिसी मध्ये हस्तांतरीत करण्यात यावी परंतु त्याची विनंती नाकारण्यात आली, त्यावेळी त्याला असे सांगण्यात आले की, जर त्याला त्याच्या नावाची पॉलिसी पुन्हा सुरु ठेवावयाची असेल तर त्याला रुपये-35,000/- भरावे लागतील, त्यानुसार त्याने दिनांक-15/05/2011 रोजी रुपये-35,000/- विम्याचे हप्त्याचा भरणा केला परंतु त्यावर विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्याला सांगितले की, ती रक्कम पुरेशी नसून त्याला आणखी रुपये-35,000/- विम्याचे हप्त्यापोटी भरावे लागतील, त्यानुसार त्याने दिनांक-01/07/2011 ला आणखी रुपये-35,000/- रकमेचा भरणा केला. अशाप्रकारे तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल (सध्या मृतक) याने त्याच्या नावाच्या विमा पॉलिसीपोटी एकूण रुपये-1,05,000/- एवढया रकमेचा भरणा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे केला. परंतु त्यानंतर सुध्दा विरुध्दपक्ष विमा कंपनीने दिनांक-16.08.2011रोजीचे पत्रा नुसार त्याला कळविले की, त्याचे नावे काढलेली विमा पॉलिसी ही पुर्नजिवित होऊ शकत नाही आणि म्हणून त्याच्या पॉलिसीपोटी भरलेली आंशिक रक्कम रुपये-70,000/- परत करण्यात आली, परंतु त्याच्या पॉलिसी पोटी भरलेली उर्वरीत विमा हप्त्याची रक्कम रुपये-35,000/- आणि तक्रारकर्ती क्रं-2) मंजूबाई पटेल हिच्या नावे असलेल्या पॉलिसी मध्ये जमा करण्यात आलेली रक्कम रुपये-35,000/- अशा रकमांचा परतावा विरुध्दपक्ष विमा कंपनीने दिला नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष विमा कंपनीने अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन सेवेत कमतरता ठेवली आणि त्याने दिलेल्या विम्या हप्त्याची रक्कम त्याच्या पॉलिसी मध्ये जमा करण्या ऐवजी तक्रारकर्ती क्रं-2) मंजुबाई पटेल हिचे नावे नविन पॉलिसी काढण्यात येऊन त्यात भरण्यात आली म्हणून तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याने त्याच्या नावे पॉलिसी मध्ये भरलेली उर्वरीत देय रक्कम रुपये-35,000/- आणि तक्रारकर्ती क्रं-2) हिच्या पॉलिसी मध्ये भरलेली रक्कम रुपये-35,000/- वार्षिक-18% दराने व्याजासह परत मागितली असून झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मागितला आहे.
03. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे मंचा समक्ष लेखी उत्तर सादर करुन त्यात असे नमुद केले की, तक्रारकर्ती क्रं-2) मंजुबाई यशवंत पटेल हिचे नावे त्यांना मिळालेल्या तिच्या स्वाक्षरीच्या प्रस्ताव फॉर्म वरुन पॉलिसी क्रं- 769646290 जारी करण्यात आली. पॉलिसी अंतर्गत देण्यात आलेल्या
15 दिवसांच्या फ्री लुक पिरियेड (Free look period) मध्ये चुकीच्या नावाने
पॉलिसी देण्यात आल्या नंतर किंवा त्या बद्दल धोखागडी करण्यात आल्या बद्दलची कुठलही तक्रार तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याचे कडून त्यांना प्राप्त झालेली नाही. ज्यावेळी विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे तक्रार प्राप्त झाली, त्यावेळी त्यांनी तक्रारकर्ती क्रं-2) मंजुबाई पटेल हिच्या 10 नमुना स्वाक्ष-या (Specimen signature) तपासणीसाठी/चौकशीसाठी देण्याची विनंती केली परंतु तक्रारकर्त्यानीं नमुना स्वाक्ष-या दिल्या नाहीत किंवा त्यांच्या विनंतीला उत्तरही दिले नाही, त्यामुळे त्यांचे तक्रारीवर चौकशी होऊ शकली नाही. तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याने 15 दिवसांचा फ्री लुक पिरियेड संपल्या नंतर तक्रारकर्ती क्रं-2) मंजूबाई यशवंत पटेल हिचे नावे जारी केलेली पॉलिसी रद्द करण्याची विनंती केली आणि म्हणून सदर तक्रारीला कुठलेही कारण उदभवत नाही. तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याचे पॉलिसीचे विम्याचा हप्ता देय असल्या बद्दल तसेच त्याच्या नावाची पॉलिसी खंडीत झाल्या बद्दलची सुचना तक्रारकर्त्यानां डिसेंबर-2009 आणि नोव्हेंबर-2010 ला देण्यात आली होती. जर तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याने विम्याचा हप्ता नविन पॉलिसी करीता दिला नव्हता तर त्याच्या नावे असलेल्या पूर्वीच्या पॉलिसीसाठी दिला होता तर त्याने अगोदरच यावर हरकत उपस्थित करावयास हवी होती. विरुध्दपक्षाने हे कबुल केले की, दिनांक-25/10/2010 ला तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याने त्यांना सुचित केले होते की, त्याने भरलेली रक्कम त्याचे नावे असलेल्या पूर्वीच्या पॉलिसीच्या विम्या हप्त्यासाठी दिली होती परंतु त्याऐवजी नविन पॉलिसी तक्रारकर्ती क्रं-2) मंजुबाई यशवंत पटेल हिचे नावे देण्यात आली, त्याने फसवणूक केल्याची तक्रार केली आणि नविन पॉलिसी रद्द करुन त्यात भरलेली रक्कम त्याचे नावे असलेल्या पूर्वीच्या पॉलिसीमध्ये हस्तांतरीत करण्याची विनंती केली, त्यावेळी विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्याला सांगितले की, त्याने तसे लेखी निवेदनाचे पत्र विरुध्दपक्ष क्रं-2) हिचे नावे जारी केलेली पॉलिसी रद्द करण्यासाठी आणि त्यातील रक्कम तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याचे नावे जारी केलेल्या जुन्या पॉलिसीत हस्तांतरीत करण्यात यावी परंतु तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याने केलेली विनंती 15 दिवसांचा फ्री लुक पिरियेड संपल्या नंतर केल्यामुळे पॉलिसी रद्द करण्याची विनंती
नाकारण्यात आली. विरुध्दपक्ष विमा कंपनीने घेतलेल्या निर्णयाची सुचना तक्रारकर्त्यांना देण्यात आली. तसेच नविन पॉलिसी पुन्हा चालू करण्यासाठी विम्याचा हप्ता भरण्यास सांगितले. अशाप्रकारे तक्रार नामंजूर करुन ती खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याच्या वकीलांनी मौखीक युक्तीवादा संबधाने पुरसिस दाखल केली. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. उभय पक्षाचे वकीलांनी आप-आपला लेखी युक्तीवाद सादर केला. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
:: निष्कर्ष ::
05. तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत मोतीराम पटेल (सध्या मृतक) याने आपल्या तक्रारीचे समर्थनार्थ त्याच्या आणि तक्रारकर्ती क्रं-2) मंजुबाई यशवंत पटेल यांच्या विमा पॉलिसीचे प्रस्ताव फॉर्मच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याच्या पॉलिसी नुसार पॉलिसीचा वार्षिक देय हप्ता हा रुपये-35,000/- एवढया रकमेचा असून तो दरवर्षी नोव्हेंबर महिन्या मध्ये देय होता. ज्याअर्थी तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याने विरुध्दपक्ष विमा कंपनीच्या सांगण्या वरुन त्याच्या विमा पॉलिसी क्रमांक-709430342 चे देय नोव्हेंबर-2009 ते नोव्हेंबर-2010 चे विमा हप्ते भरलेले आहेत, त्याअर्थी विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्याची सदरची विमा पॉलिसी पुर्नजिवित का केली नाही या बद्दल स्पष्ट खुलासा विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून आलेला नाही.
06. तक्रारकर्ती क्रं-2) मंजुबाई यशवंत पटेल हिचे नावे जारी करण्यात आलेली तथाकथीत पॉलिसी क्रं-769646290 ची प्रत अभिलेखावर दाखल केलेली नाही परंतु केवळ प्रस्ताव फॉर्म तक्रारकर्त्याने दाखल केला आहे, ज्यावर तक्रारकर्ती क्रं-2) मंजुबाई पटेल हिची इंग्रजी मध्ये असलेली स्वाक्षरी
दिसून येते. परंतु तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याचे म्हणण्या नुसार, तक्रारकर्ती क्रं-2) मंजुबाई पटेल हिला इंग्रजी मध्ये सही करता येत नाही व ती इंग्रजी मधील सही तक्रारकर्त्यांनी पूर्णपणे नाकारलेली आहे. तक्रारीवर तक्रारकर्ती क्रं-2) मंजुबाई यशवंत पटेल हिने मराठीतून स्वाक्षरी केलेली आहे, त्यामुळे तो प्रस्ताव फॉर्म खरोखरीच तक्रारकर्ती क्रं-2) मंजुबाई पटेल हिने भरुन दिला होता या बद्दल शंका उपस्थित होते. तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याच्या ज्यावेळी ही बाब लक्षात आली की, तक्रारकर्ती क्रं-2) मंजुबाई पटेल हिचे नावाने नविन पॉलिसी क्रं-769646290 जारी करण्यात आली आहे, तेंव्हा ती पॉलिसी रद्द करण्याची विनंती करण्या बद्दलचे पत्र त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिले होते, ज्यावर विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्याला सदरील पॉलिसी रद्द करण्या बद्दल एक लिखित पत्र तक्रारकर्ती क्रं-2) मंजुबाई यशवंत पटेल हिचे सहिने देण्यास सांगितले होते. विरुध्दपक्ष विमा कंपनीच्या म्हणण्या नुसार तक्रारकर्त्याने नविन पॉलिसी रद्द करण्याचे पत्र नंतर दिले होते पण ते 15 दिवसांच्या फ्री लुक पिरियेड नंतर दिल्यामुळे सदर पॉलिसी क्रं-769646290 रद्द करण्यात आली नाही.
07. या ठिकाणी हे नमुद करावेसे वाटते की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने आपल्या लेखी उत्तरामध्ये अनेक दस्तऐवजांचा उल्लेख केला असून त्याच्या प्रती “Annexure-A To Annexure-Q” पर्यंत दाखल केल्याचे नमुद केलेले आहे परंतु अभिलेखावर विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे एकही दस्तऐवज दाखल नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने या तक्रारीत घेतलेल्या त्यांचा बचावाला समर्थन मिळत नाही कारण की एकही दस्तऐवज आमच्या समोर आलेला नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीच्या युक्तीवादाला केवळ त्यांच्या लेखी जबाबा वरुन फारसे महत्व मिळत नाही.
08. विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल (सध्या मृतक) याचे नावे जारी केलेल्या पॉलिसी क्रं-709430342 पोटी त्याला आंशिक रक्कम रुपये-70,000/- परत केलेली आहे परंतु तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल याचे तक्रारी नुसार त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीचे सांगण्या वरुन त्याच्या विमा पॉलिसी पोटी एकूण रक्कम रुपये-1,05,000/- जमा केलेले आहेत, ही बाब विरुध्दपक्ष विमा कंपनीने आपल्या लेखी जबाबामध्ये नाकारलेली नाही, त्यामुळे तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत पटेल (सध्या मृतक) याचे म्हणण्या प्रमाणे त्याचे स्वतःचे पॉलिसीपोटी उर्वरीत देय रक्कम रुपये-35,000/- आणि तक्रारकर्ती क्रं-2) मंजुबाई पटेल हिची पॉलिसी क्रं-769646290 मध्ये भरण्यात आलेली रक्कम रुपये-35,000/- असे मिळून एकूण रक्कम रुपये-70,000/- विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत.
09. विरुध्दपक्ष विमा कंपनीने आपल्या लेखी जबाबा मध्ये जे काही नमुद केले आहे, त्या बद्दल कुठलेही दस्तऐवज समोर आलेले नसल्याने त्यांच्या
जबाबाला कुठल्याही प्रकारे समर्थन मिळत नाही आणि तक्रारदारांची ही तक्रार मंजूर करीत आहोत, यावरुन मंच प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता क्रं-1) श्री यशवंत मोतीराम पटेल (सध्या मृतक) तर्फे कायदेशीर वारसदार तक्रारदार क्रं-(1)(अ) ते क्रं-(1)(ड) आणि तक्रारकर्ती क्रं-(2) यांची, विरुध्दपक्ष मॅक्स न्यूर्याक लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, शाखा श्रीराम टॉवर, सदर नागपूर यांचे विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे संबधित शाखा व्यवस्थापकानां आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ता क्रं-1) यशवंत मोतीराम पटेल (सध्या मृतक) याचे पॉलिसी क्रं-709430342 पोटी उर्वरीत देय रक्कम रुपये-35,000/- आणि तक्रारकर्ती क्रं-(2) मंजूबाई यशवंत पटेल हिचे नावे पॉलिसी क्रं-769646290 मध्ये भरलेली रक्कम रुपये-35,000/- असे मिळून एकूण रक्कम रुपये-70,000/- (अक्षरी एकूण रुपये सत्तर हजार फक्त) दिनांक-08/01/2010 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह तक्रारदारांना परत करावी.
(03) तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे तक्रारदारांना द्दावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे संबधित शाखा व्यवस्थापकानीं निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.