(आदेश पारीत व्दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्य )
1. तक्रारदार हिने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदार हिचे तक्रारीतील सविस्तर कथन असे की,-
तक्रारदार ही मौजे वेळू ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर येथील रहिवासी असून तिचे वडीलोपार्जित शेती व्यवसाय असल्यामुळे शेती व्यवसाय करीत आहे. तक्रारदार हिचे मालकीचे मौजे वेळू ता.श्रीगोंदा येथील श्रीगोंदा वेळू रोडवर गट नं.1963 मध्ये त्यांचे नावे असलेली 1 हेक्टर 39 आर क्षेत्र असून त्यापैकी 1 हेक्टर क्षेत्रावर तक्रारदार हिने डाळींबाची 1 हजार झाडांची लागवड केली आहे. तक्रारदार हिने जमीनीचा पोत सुधारण्याकामी व पाण्याच्या सोयीसाठी भारतीय स्टेट बँक शाखा-श्रीगोंदा यांचेकडून कर्ज घेतलेले आहे. दिनांक 19.07.2015 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदार हिस त्यांचे दुकानातील बिल नं.1145 अन्वये सदर डाळींब बागेसाठी फवारणीकामी ग्रीन प्लस कंपनीचे बोर्डो व अॅरीज कंपनीचे चिलॅमिन ही औषधे दिली. तक्रारदार हिने दिनांक 22.07.2015 रोजी सामनेवालाचे सल्ल्यानुसार सदर बागेवर फवारणी करुन त्यांची नोंदणी व्यवस्थापन नोंदवही अहवालामध्ये लिहून दिली व सामनेवालाने दिलेल्या वेळेनुसार व प्रमाणानुसार वर नमुद औषधांची फवारणी केली. त्यानंतर चौथ्या दिवशी तक्रारदार हिच्या डाळींबाच्या झाडावरील फळांवरती काळा डाग येत असल्याचे तक्रारदार हिचे निदर्शनास आले. सदरचे चिलॅमिन हे औषध मुदत बाह्य झाल्याचे त्यांचे बिलावरुन तक्रारदार हिचे निदर्शनास आले. सदरचे काळया डागाबाबत तक्रारदार हिने सामनेवालाकडे चौकशी केली असता, फवारणीचे प्रमाण कंपनीच्या परीपत्रकाप्रमाणे नसून सामनेवाला यांनी तक्रारदार हिस चुकीचे प्रमाण सांगितलेले दिसून आले. वास्तविक पाहता ग्रीन प्लस कंपनीचे बोर्डोचे प्रमाण हे 2 ते 3 ग्रॅम प्रतिलिटर घ्यावे असे नमुद असतांनाही सामनेवाले यांनी तक्रारदार हिला बोर्डोचे प्रमाण 10 ग्रॅम प्रतिलिटर व चिलॅमीनचे प्रमाण 0.5 ग्रॅम प्रतिलिटर घ्यावे असे सांगितले. सामनेवाला यांचे सांगण्यानुसार तक्रारदार हिने वरील औषधाची फवारणी केल्यामुळे डाळींबे काळी पडली व ती विक्री योग्य आलेली नाही. सदर घटनेबाबत तक्रारदार हिने गुणवत्ता नियंत्रक अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे. तसेच तालुका स्तरीय निवारण समिती यांना देखील दिनांक 20.08.2015 च्या लेखी पत्र देवुन सदर घटनेची हकीगत कळविली. त्यानंतर तालुका तक्रार निवारण समितीने दिनांक 14.09.2015 रोजी त्यांच्या अधिका-यांसमवेत तक्रारदार हिच्या डाळींबाच्या बागेत येऊन पाहणी केली व त्यासंबधीचा अहवाल तयार केला. व त्यानुसार सदर बागेत फवारणी करण्यासाठी एक हजार लिटर पाण्यातून 10 किलो बोर्डो व 500 ग्रॅम झिंक याचा वापर करण्यात आला हे प्रमाण दुप्पट आहे असे नमुद केले आहे. तक्रारदार हिचे शेतातील डाळींब फळावर काळे चटटे पडल्याने 65 टक्के नुकसान झालेले आहे व सदरचे नुकसान हे औषधाची मात्रा जादा झाल्याने व झिंक मिसळल्याने झाल्याचे दिसुन येते असा सदर समितीने निष्कर्ष काढला. अशा प्रकारे सामनेवाला यांनी तक्रारदार हिस दुषीत सेवा दिली व सेवेत त्रुटी ठेवून डाळींब या पिकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. चालू वर्षी तक्रारदार हिस तिचे क्षेत्रात असलेल्या डाळींबाचे 50 ते 60 टन उत्पादन अपेक्षित होते. व चालू वर्षानुसार 30 ते 35 लाख उत्पन्न मिळाले असते. परंतू सामनेवाला यांनी दिलेल्या औषधाचे चुकीचे प्रमाणामुळे तक्रारदार हिचे डाळींब पिकांचे संपुर्ण नुकसान झाले आहे. म्हणून यात तक्रारदार हिने डाळींब पिकांची नुकसान भरपाई सामनेवालाकडून रक्कम रुपये 20 लाख देण्याची जबाबदारी वैयक्तिकरित्या सामनेवाला यांची आहे. याबाबत सदर नुकसान भरपाईच्या रकमेची तक्रारदार हिने सामनेवालाला मागणी केली असता, सामनेवाला यांनी कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून तक्रारदार हिने सामनेवाला यांना वकील श्री.संदीप मुळे यांचे मार्फत दिनांक 27.10.2015 रोजी नोटीस पाठवुन नुकसानीची रक्कम आणून देण्याबाबत कळविले. सदरची नोटीस सामनेवाला यांनी स्विकारली मात्र नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही. उलट सदरची जबाबदारी टाळण्यासाठी सामनेवाला यांनी वकील श्री.एस.डी.बोरुडे यांचेमार्फत खोटया व बनावट स्वरुपाचे नोटीस उत्तर दिनांक 14.11.2015 रोजी पाठविले आहे. त्यामुळे तक्रारदार हिने सदर मंचात सामनेवालाकडे डाळींब या पिकाची झालेली नुकसानीची रक्कम रुपये वीस लाख सामनेवाला यांचेकडून देण्याचा आदेश सामनेवाला विरुध्द करण्यात यावा व वरील रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम वसुल होई पावेतो नुकसान दाखल व्याज द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे तक्रारदार हिस सामनेवालेकडून देण्यात यावे. तक्रारदार हिस झालेला शारीरीक, मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई सामनेवाला यांचेकडून देण्यात यावी. व या अर्जाचा खर्च तक्रारदार हिस सामनेवाला यांचेकडून देण्यात यावा अशी मागणी तक्रारदार हिने सदरचे तक्रारीत केलेली आहे.
3. सदरचे तक्रारीसोबत निशाणी 6/1 ते 6/8 अन्वये कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात तक्रारदार हिचे नावाचा 8-अ चा उतारा, 7/12 उतारा, सामनेवाला यांनी दिलेल्या बिलाच्या झेरॉक्स प्रति, व्यवस्थापन नोंदवहीची झेरॉक्स प्रत, गुणवत्ता नियंत्रक यांना दिलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे पाहणीचा अहवालाची झेरॉक्स प्रत, तक्रारदार हिने पाठविलेली नोटीसची झेरॉक्स प्रत, सामनेवाला यांनी दिलेल्या नोटीस उत्तराची झेरॉक्स प्रत, इत्यादी कागदपत्रे जोडलेली आहेत.
4. मे.मंचातर्फे सामनेवाला यांना नोटीस काढण्यात आल्या. त्यानुसार सामनेवाला हे मे.मंचात हजर झाले. सामनेवाला यांनी हजर होऊनही दिनांक 12.01.2016 रोजी मुदतीत कैफियत दिली नाही, म्हणून सामनेवाला यांचे विरुध्द निशाणी 1 वर दिनांक 02.04.2016 रोजी विना कैफियत मंचाने आदेश पारीत केला. त्यानंतर निशाणी 13 ला सामनेवालाने त्यांचे म्हणणे मांडण्याची नैसर्गिक न्याय तत्वास अनुसरुन योग्य ती संधी देण्यास गरजेचे आहे. म्हणून नो डब्ल्यु एस आदेश सेट असाईड करुन कैफियत देण्यास परवानगी देण्यात यावी असा अर्ज व अॅफिडेव्हीट दाखल केले. त्यावर मे.मंचाने तक्रारदाराने दिनांक 24.08.2016 ला खुलासा देऊन सामनेवाला यांना वेळोवेळी संधी देऊनही त्यांचे म्हणणे दाखल केलेले नाही म्हणून सदरचा अर्ज रद्द करण्यात यावा याबाबत खुलासा दिला. मे.मंचाने दोन्ही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून दिनांक 24.08.2016 रोजी विना कैफियत केलेला आदेश रद्द करुन सामनेवाला यांना रुपये 300/- कॉस्ट तक्रारदार हिस देण्याचा आदेश मंचाने पारीत केला. सदरची कॉस्ट दिनांक 18.01.2017 रोजी कॉस्टची रक्कम तक्रारदार तर्फे स्विकारण्यात आली. निशाणी 15 ला दिनांक 02.04.2016 रोजी सामनेवाला यांनी दिलेली कैफियत, दिनांक 18.01.2017 रोजी Read & Record करण्यात आली. निशाणी 16 ला अॅफिडेव्हीट दाखल केले ते सुध्दा दिनांक 18.01.2017 रोजी Read & Record मंचातर्फे करण्यात आले. त्यानुसार सामनेवालाचे म्हणणे असे की, सदर तक्रारीमधील तक्रारदार हिने नमुद केलेली दाव्यातील कथने, हकीगत आणि दाव्यास कारण सामनेवाला यांना मुळीच मान्य नाही, कबलू नाही. सामनेवाला ते फेटाळून जावीत आहे. सदर केसमध्ये तक्रारदार व सामनेवाला यांच्यात ग्राहक व सेवा पुरवठादार म्हणून कोणत्याही प्रकारे संबंध येत नाही. तसेच माल विक्री संदर्भात जर मालाबाबत काही तक्रार असेल तर त्याबाबत उत्पादित कंपनीला पार्टी करणे गरजेचे आहे, येथे तक्रारदार हिने माल विक्री संदर्भात जर मालाबाबत काही तक्रार असेल तर त्याबाबत उत्पादित कंपनीला पार्टी करणे गरजेचे आहे, येथे तक्रारदार हिने माल उत्पादित केलेल्या कंपनीला नेसेसरी पार्टी केलेले नाही. त्यामुळे डयू टू नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीजच्या तत्वाची बाध येत आहे. त्यामुळे दावा अॅबेट होत असून तो रद्द करण्यात यावा. तक्रारदार ही सामनेवाला यांच्याकडे औषध घेण्यासाठी तसेच सल्ला घेण्यासाठी किंवा प्रिस्क्रीप्शन नोट घेण्यासाठी कधीही स्वतः आलेली नव्हती व नाही. संदिप औटी हे सदर औषध घेण्यासाठी सामनेवाला यांच्या दुकानात आलेले होते आणि सदर संदिप औटी यांनी डाळींबाचे पीक कधीही घेतलेले नव्हते व नाही आणि संदिप औटी यांनी त्यांच्या मिळकत क्षेत्रामध्ये वांगे आणि मका लावलेला आहे व ते वांगे व मक्याचेच पीक घेत होते. परिणामी संदिप औटी यांनी डाळींबाची बाग लावली व पीक घेतले याचा सकृतदर्शनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार ही प्रत्यक्षात सामनेवाला यांच्या दुकानात कधीही आलेली नव्हती व नाही. तसेच तक्रारदार हिची शेती तिच्या पतीने केली याचा देखील कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सदर तक्रारदार हिने केलेला पंचनामा पाहता व त्यातील जबाब पाहता तक्रारदार हिच्या शेजारी वांगे आणि मका याचे पीक लावलेले आहे. त्यामुळे वांगे आणि मका यावर औषध फवारणी केलेली आहे. तीच फवारणी जर डाळींबावर झालेली असेल त्याची शक्यता बिलकुल नाकारता येत नाही. तक्रारदार हिने स्टेट बँक ऑफ इंडीया यांच्याकडून फक्त शेतजमीन मिळकतीसाठीच कर्ज काढले आणि त्यासाठीच त्या कर्जाचा उपयोग केला असा कुठलाही पुरावा तक्रारदार हिने दाव्यासोबत दाखल केलेला नाही. तसेच सामनेवाला यांना देखील त्याची कल्पना दिलेली नाही. संबंधित पंचनामा, जबाब तसेच प्रत्यक्ष पाहणी अहवाल आणि पाहणी करणारे तज्ञ यांची गुणवत्ता, वेळ आणि त्यांना असणारे अधिकृत अधिकार याबाबत कुठल्याही प्रकारे स्वतंत्र तपासणी, जबाब झालेले नाहीत. झिंकमुळे कॅनॉपीची वाढ होऊन म्हणजेच पर्णसंभार म्हणजे पानांची वाढ होते. आणि पानांच्या सावलीमुळे फळाचे तापमान निश्चित राहण्यास मदत होते. येथे पंचनाम्यात आणि जबाबाबतच असा उल्लेख आहे की, झाडाची पाने काढून टाकण्यात आली होती, झाडे उघडी पडलेली होती तसेच औषध आणि पाणी हे प्रमाणापेक्षा जास्त दिले याचा अर्थ एक्सेस डोस दिला, यामध्ये प्रिस्क्रीप्शन एक्सेस असल्याचा कुठेही उल्लेख नाही. तसेच पंचनाम्यामध्ये इतर घटकांच्या विचार केला. परंतु पाण्याचे प्रमाण किती होते याचे मात्र केमिकल अॅनालिसीस रिपोर्ट कोठेही आलेला नाही. म्हणजेच पाणी कमी होते का जास्त होते. जर औषधाचे डोस सापडतात तर पाण्याचा डोस का नाही सापडत. याबाबत पंचनाम्यात नमुद आहे. पंचनामा पुर्णपणे पुर्वग्रह दुषीत मानाने केलेला आहे. तसेच सदर पंचनाम्यामध्ये लिहिलेल्या हस्ताक्षरामध्ये बदल दिसून येताना दोन तीन पेनव्दारे वेगवेगळया शाईने, वेगवेगळया व्यक्तींनी त्यामध्ये जाणीवपुर्वक नंतर काही वाक्य समाविष्ट केल्याचे दिसून येत आहे. हस्ताक्षरामध्ये तफावत आहे, त्या बाजुला संबंधित व्यक्तींच्या सहया व तारखा नाही. त्यामुळे पंचनामा हा चुकीच्या पध्दतीने झालेला असून तो खोटा आहे. औषध खरेदी दिनांक 19.07.2015 व पंचनामा 14.09.2015 मात्र फवारणीचा योग्य तो अधिकृत पुरावा तोंडी कथनाशिवाय तक्रारदार हिने दाखल केलेला नाही आणि मध्यांतरीच्या दोन महिन्याच्या काळात काय काय घटना घडल्या, कुठली कुठली औषधे मारली आणि वांगी, मका व इतर पीकांवर मारण्यात येणा-या औषधी, औषध फवारणीचा परिणाम वा-याने सरकून तसेच त्यातील वास व त्यामुळे त्याचे बाष्पात होणारे विलीनीकरण याचा देखील प्रभाव पडू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वांगी, मका व इतर भाजीपाला आणि डाळींबाची बाग यामध्ये किमान 14 फुटाचे अंतर पाहिजे ते अंतर आहे का याचा पंचनाम्यात कोठेही उल्लेख नाही. डाळींबाची बाग खराब होणेकामी तक्रारदार हिने केलेली नुकसान व नुकसान भरपाईचा क्लेम सामनेवाला यांना मुळीच मान्य नाही, कबूल नाही, सामनेवाला ते फेटाळून लावीत आहे. डाळींबाच्या बागेवर औषध मारताना पाण्याचे प्रमाण किती होते व औषधाचे प्रमाण किती होते त्याचा अधिकृत पुरावा दाव्यात दाखल केलेला नाही. तसेच डाळींबाच्या बागेत औषध मारताना त्यावेळची वेळ, तापमान आणि दोन झाडातील अंतर कुठल्याही प्रकारे पुराव्यासोबत सदर केसमध्ये दाखल नाही. सदर रोप खरेदीची बिले आणि रोप केव्हा लावले ते कुठल्या तापमानात लावले आणि फवारणीच्या दिवशी त्याची काय परिस्थिती होती की ती तत्पुर्वीच जळालेली होती किंवा काळी पडली होती याचा देखील अधिकृत पुरावा सदर केसमध्ये तक्रारदार हिने दाखल केलेला नाही व तो पंचनाम्यामध्ये ती केव्हा काळी पडली, त्याची वेळी ही केमिकल अॅनालिसीस रिपोर्टच्या मदतीशिवाय त्याचा पुरावा विचारात घेता येणार नाही. सबब तक्रारदार हिने केलेली तक्रार ही केवळ सामनेवाला यांना बदनाम करण्यासाठी व त्याची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी केलेली असून तक्रारीस कोणतेही वास्तव कारण घडलेले नाही. सबब सदरची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी आणि चुकीची व खोटया माहितीच्या आधारे तक्रार करुन सामनेवाला यांना सदर केसमध्ये उत्तर देण्यास भाग पाडले. म्हणून तक्रारदार हिने सामनेवाला यांना हेवी कॉस्ट द्यावी म्हणून मे.कोर्टाने आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
5. सामनेवाला यांनी निशाणी 17 सोबत अॅफिडेव्हीट दाखल केले आहे. त्यानंतर तक्रारदार हिने निशाणी 19 वर तक्रारदार हिने डाळींबाचे विक्री केलेल्या आदीती फ्रुट अॅन्ड व्हेजीटेबल्स यांनी दिलेल्या बिलांच्या झेरॉक्स प्रती दाखल केले आहेत. तसेच निशाणी 22 वर तक्रारदार हिने फवारणी केलेल्या औषधाचे पाकीटाची कलर झेरॉक्स कॉपी दाखल केली आहे. सामनेवालाने निशाणी 24 वर दिनांक 06.09.2018 रोजी लेखी उत्तर अंतिम निकालासाठी स्विकारण्यात यावे असा अर्ज दिला आहे व त्यावर मे.मंचाने तक्रारदार हिचे म्हणणे मागविले. त्यानुसार तक्रारदार हिने सदरचा प्रकरण निकालासाठी ठेवल्यानंतर कोणत्याही कारणाने प्रकरणाची स्टेज बदलता येणे शक्य नाही. लेखी युक्तीवादाचे झेरॉक्स प्रति यांचे निकाल देताना कोणताही विचार करण्यात येऊ नये असा खुलासा दिनांक 06.10.2018 रोजी दाखल केला. त्यावर मे.मंचाने दिनांक 06.10.2018 रोजी रुपये 1000/- दंडासह सदरचा अर्ज मंजुर केला. सामनेवाला यांनी दिनांक 05.12.2018 रोजी आदेशाप्रमाणे दंड मे.मंचात लिगल एडमध्ये पावती क्र.9205724 नुसार भरला. त्यामुळे निशाणी 25 चा लेखी युक्तीवाद सामनेवालाचा दाखल करुन घेणेत आला. लेखी युक्तीवादासोबत सामनेवालाने एप्रिल-जुन 2015 चे डाळींब पिकाचे माहितीपत्रकाची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे.
6. तक्रारदार हिने दाखल केलेली तक्रार, कागदपत्राचे अवलोकन केले. त्यांनी केलेला युक्तीवाद ऐकला, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदत्रे, त्यांचे म्हणणे व लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले. तसेच त्यांचा युक्तीवाद ऐकला. व न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारदार ही सामनेवालेचा “ग्राहक” आहे काय.? | ... होय. |
2. | तक्रारदार ही तक्रारीत केलेली मागणी मिळणेस पात्र आहे काय.? | ... अंशतः होय. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
7. मुद्दा क्र.1 – तक्रारदार हिने दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता सदरील डाळींब पिकावर फवारणी केलेले औषध हे जरी संदिप औटी यांनी खरेदी केले असेले तरी सदरचे औषध फवारणी ही तक्रारदार हिने तिचे शेतात केली व सामनेवाला यांनी संदिप औटी हे तक्रारदार हिचे पती असल्याचे म्हटंले आहे असे कैफियतीवरुन दिसते. त्यामुळे तक्रारदार ही (बेनिफिशरी) लाभार्थी असल्यामुळे त्या कागदपत्रावरुन दिसत आहे. तसचे औषधे सामनेवालाकडून खरेदी केलेली असल्यामुळे ग्राहक आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
8. मुद्दा क्र.2 – सामनेवालाने त्याचे कैफियतीत असा मुद्दा उपस्थित केला आहे की, माल विक्री संदर्भात जरी मालासंदर्भात काही तक्रार असेल तर त्याबाबत उत्पादन कंपनीला पार्टी करणे गरजेचे आहे. यात तक्रारदार हिने माल उत्पादन केलेल्या कंपनीला नेसेसरी पार्टी केलेले नाही. त्यामुळे डयु टू नॉन जॉंईंडर ऑफ नेसेसरी पार्टी ची बाध येत आहे. आणि हा दावा अॅबेट असून तो रद्द करावा अशी मागणी युक्तीवादात सामनेवाला यांनी केली आहे. परंतू सदर तक्रारीचे संपुर्ण अवलोकन केले असता, सदरील उत्पादीत मालासंदर्भात मुद्दा नसून सदर उत्पादीत माल हा डाळींब पिकांसाठी लागणा-या चिलॅमिन हे औषध एक्सपायरी डेट निघून गेल्यावर सुध्दा विक्रेता मार्फत फवारणीचे औषध विकले गेलेले आहे व विक्रेता हा सामनेवालाच असून तसे तक्रारदार हिने दाखल केलेले माल विक्री पावतीवरुन दिसून येते. त्यामुळे नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरीची बाध या तक्रारीस लागू होत नाही. तसेच सामनेवालाने तक्रारदार हिस मुदत बाहय औषध फवारणीचे चिलॅमिन हे औषध विक्री करुन सामनेवाला यांनी तक्रारदार हिस दुषीत सेवा दिलेली आहे व सेवेत त्रुटी दिलेली आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
9. मुद्दा क्र.3 – सामनेवाला यांनी मुदत बाहय चिलॅमिन हे औषध दिनांक 19.07.2015 रोजी तक्रारदार हिस दिले. तक्रारदार हिने दाखल केलेले निशाणी 6/3 वरुन निदर्शनास येते की, चिलॅमिन हे औषध बॅच नं.968 असे असून त्याची एक्सपायरी डेट (मुदत बाहयता) दिनांक 30.09.2014 अशी दिसून येते. या संदर्भात उभय पक्षकारांचा युक्तीवाद ऐकला. मुदत बाहयता निघून गेल्यावर तक्रारदार हिस चिलॅमिन हे औषध विक्री केल्याचे दिसून येते व दिलेल्या औषधाचे विक्रीची रक्कम रुपये 490/- अशी दिसून येते. म्हणून सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार ही सामनेवालाकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
10. तक्रारदार हिने डाळींब पिकाचे नुकसानीचे संदर्भात कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तसेच तक्रारदार हिने निशाणी 19 ला दाखल केलेले 27.08.2014, 25.08.2014, 27.08.2014 व 17.08.2014, 12.08.2014, 11.08.2014, 10.08.2014 रोजीची डाळींब पिकांची बिले दाखल केलेली आहेत. परंतु ती बिले सन 2014 चे संदर्भात असून तक्रारदार हिने ती सन 2015 चे बाजारभावा संदर्भाची कागदपत्रे जोडलेली नाहीत. डाळींबावर काळे डाग होते असे म्हटंले आहे, परंतु त्याबाबत किंवा उत्पादन आले व नुकसानीचा अहवाल किती रुपयाचे नुकसान झाले याबाबत तक्रारदार हिने पुरेसा पुरावा दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदार हिचे तक्रारीत 20,00,000/- रुपयाची मागणी ग्राहय धरता येणार नाही.
11. सामनेवालाने दिलेल्या चिलॅमिन हे औषध मुदत बाहय झाल्यावरही विक्री केली हे औषध विक्री बिलावरुन सिध्द झाल्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाईची व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये 10,000/- हे दिनांक 19.07.2015 पासून रक्कम द.सा.द.शे.9 टक्के दराने नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तसेच सदर तक्रारीचा खर्च तक्रारदार हिने नमुद केलेला नाही. सदर खर्चाचे संपुर्ण खर्च सामनेवाला यांनी तक्रारदार हिस रक्कम रु.5,000/- द्यावा. सबब मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.3 चे उत्तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श –
1. तक्रारदार हिची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांनी तक्रारदार हिस मुदत बाहय डाळींब पिकाचे चिलॅमिन औषध विक्री केल्यामुळे तक्रारदार हिस आर्थिक नुकसान सहन करावे लागले म्हणून रक्कम रु.10,000/- (रक्कम रु.दहा हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत दयावा. मुदतीत रक्कम न दिल्यास त्या रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह दिनांक 19.07.2015 पासून रक्कम अदाईकीपर्यंत तक्रारदार हिस दयावा.
3. सामनेवाला यांनी तक्रारदार हिस झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- (रक्कम रु.दहा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च 5,000/- (रक्कम रु.पाच हजार फक्त ) तक्रारदार हिस द्यावा.
4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
6. तक्रारदार हिस या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.