::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सदस्या. कल्पना जांगडे (कुटे))
(पारीत दिनांक :-२८ /०२/२०१८)
१. अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
२. अर्जदार हे चंद्रपूर येथे राहतात. गैरअर्जदार क्र१. हे मे. मॅट्रिक्स इन्फ्राकेअर (इं) प्रा.लि. या नावाने चंद्रपूर जिल्ह्यात प्लॉट व त्यावर सदनिका व बंगले बांधून विकण्याचा व्यवसाय करतात. गैरअर्जदार क्र २ ते ७ हे गैरअर्जदार क्र१ यांचे संचालक आहेत. गैरअर्जदारांनी मौजा दाताळा, तालुका व जि.चंद्रपूर येथील खसरा क्र.१६८ आराजी ०.७४ आणि खसरा क्र.१६९ आराजी ०.१९ एकूण आराजी ०.९३ जागा रहिवासी प्रयोजनाकरीता विकसीत करून त्यावर सदनिका आणि बंगले बांधून विकणार आहेत व बंगले बांधण्याची योजना मार्च ,एप्रील २०१२ मध्ये सुरु केली आणि त्यासाठी आगावू बुकिंग सुरू आहे अशा जाहिराती केल्या .त्यानुसार अर्जदाराने गैरअर्जदारांची भेट घेतली व गैरअर्जदारांनी ग्राहकांना प्रलोभीत करणारी बुकलेट अर्जदाराला दिली. त्यामुळे आकर्षीत होऊन व जाहिरातीवर विश्वास ठेऊन अर्जदाराने गैरअर्जदारांचा दि ब्रिझ मधील प्रस्तावीत सदनिकेतील सदनिका क्र.१०३ रू.१,०१,०००/- या किंमतीत बुक केला. त्यानुसार अर्जदाराने गैरअर्जदारांना चंद्रपूर येथे सदर सदनिकेच्या किंमतीपोटी रू.१,०१,०००/- (रूपये एंक लक्ष एंक हजार फक्त) खालीलप्रमाणे दिले असून त्यानुसार गैरअर्जदारांनी अर्जदारांस पावत्या दिल्या.
अ.क्र. रक्कम रू. पावती क्र. दिनांक
१. रू.११,००० /- ११४७ ११/११/२०१२
२. रू.४०,०००/- ११५५ १/१२/२०१२
३ . रू.५०,०००/- ११०२ १६/१२/२०१२
______________________________________________________________________________
एकूण रु. १,०१ ,००० /-
______________________________________________________________________________
३. उपरोक्त सदनिका खरेदीकरिता अर्जदाराने गैरअर्जदारांना अग्रिम रक्कम म्हणून एकूण रु. १,०१,०००/- दिले .. गैरअर्जदारांनी आश्वासन दिले कि करारापासून 2 वर्षात बांधकाम सदनिका पूर्ण करून विक्री करून देतो . गैरअर्जदारांनी प्रत्येकवेळी आश्वासन दिले कि ,योजना काही कारणाने थांबली आहे.लवकरच योजना चालू करून उर्वरित रक्कम स्विकारून सदनिकेची विक्री करून अधीकृत ताबा देतो अर्जदाराला सदर प्रस्ताव योग्य न वाटल्याने गैरअर्जदार क्र.१ यांनी अर्जदाराकडून घेतलेली अग्रिम रक्कम रु. १,०१,०००/-अर्जदारास दि. १६/०४/२०१३ रोजी धनादेशाद्वारे परत केले परंतु सदर धनादेश गैरअर्जदाराच्या खात्यात रक्कम अपुरी या कारणास्तव न वट्वीता परत आला. अर्जदाराकडून उर्वरित रक्कम स्विकारून सदनिकेची विक्री करून अधीकृत ताबा देणे शक्य नाही असे गैरअर्जदारांच्या लक्षात आल्यावरही त्यांनी अर्जदाराला उपरोक्त रक्कम परत केली नाही . गैरअर्जदारांनी त्यांचे मालकीचा नसलेला जागेचा सौदा करून अर्जदारासोबत अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंब केला तसेच वचनाची पूर्तता न करून सेवेत त्रुटी दिली.अर्जदाराने वकीलामार्फत दि.१९/०५/२०१४ रोजी गैरअर्जदारांना नोटीस पाठवून त्यामध्ये उपरोक्त रक्कम व्याजासह परत करण्याची मागणी केली . परंतु गैरअर्जदारांनी सदर नोटीसला खोटे उत्तर देऊन सदर रक्कम देण्यास नकार देऊन त्याची त्यांनी पुर्तता केलेली नाही. सबब अर्जदाराने मंचासमक्ष तक्रार दाखल केली.
४ . अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्र. १ते ७ यांनी वैयक क्तिक व संयुक्तपणे अर्जदाराला सदनिका क्र.१०३ करिता घेतलेली अग्रिम रक्कम रु.१,०१,०००/- व त्यावर दि.१६/१२/२०१२ पासून १२ %व्याज द्यावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रू.२५००० /- आणि तक्रारीचा खर्च रू.१०,०००/- गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे.
५ . अर्जदाराने सदर प्रकरणात नि.क्र.४वर एकूण ७ दस्तावेज दाखल केलेले आहेत.
६. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले वर गैरअर्जदार क्र. १ते ७ हजर झाले . गैरअर्जदार क्र. १ने लेखी उत्तर दाखल केले. त्यामध्ये अर्जदाराने शेतजमीन मालकाला पक्ष केले नाही असा प्राथमिक आक्षेप घेतला व तक्रारीतील कथने खोटी असल्याने सदर तक्रार अमान्य असून खारीज करण्यात यावी असे कथन केले. गैरअर्जदार क्र. २ते ७ प्रकरणात हजर होऊनही त्यांनी लेखीकथन दाखल न केल्याने दि.१४.०७.२०१६ रोजी . नि.क्र.१ वर गैरअर्जदार क्र. २ते ७ विरूध्द प्रकरण लेखी उत्तराशिवाय चालविण्याचा आदेश पारीत.
७. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, व अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र यालाच अर्जदाराचा लेखी युक्तीवाद समजण्यांत यावा अशी अर्जदाराने पुरसीस दाखल केली. तसेच गैरअर्जदार क्र. १यांचे लेखीकथन व लेखीकथनलाच , शपथपञ व लेखी युक्तीवाद समजण्यांत यावा अशी गैरअर्जदाराने पुरसीस दाखल केली.तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार क्र. १यांचे कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
- अर्जदार गैरअर्जदार क्र.१ते ७ यांचा ग्राहक आहे काय ? होय
(2) गैरअर्जदार क्र.1 ते ७ यांनी अर्जदाराप्रती न्युनतापूर्ण सेवा व
अनुचित व्यापार पध्दती अवलंबिली आहे काय ? होय
(3) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? अंतीम आदेशानुसार
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
८ . अर्जदाराने गैरअर्जदारांकडे मौजा दाताळा, तालुका व जि.चंद्रपूर येथील खसरा क्र.१६८ व १६९ मधील प्रस्तावीत दि ब्रीझ मधील सदनिका क्र. १०३ रु.१,०१,०००/- या किंमतीत बुक केली. त्यानुसार अर्जदाराने गैरअर्जदारांना सदनिकेच्या किमतीपोटी एकुण रु.१,०१,०००/- (रूपये एक लक्ष एक हजार फक्त) गैरअर्जदारांना दिले व त्यानुसार गैरअर्जदारांनी अर्जदारांस पावत्या दिल्या आहेत. सदर पावत्या प्रकरणात नि.क्र. ४ वर दस्त क्र.१ ते ३ वर अर्जदाराने दाखल केल्या आहेत त्यावर गैरअर्जदारांची सही आहे. सदर सदनिका क्र१०३ बाबत अर्जदाराने रु.१,०१,०००/- गैरअर्जदारांना दिले आणि ती रक्कम गैरअर्जदारांनी स्विकारलेली आहे, हे वरील दस्तावेजांवरून सिध्द होत असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे. सबब, मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. २ बाबत ः-
९ . अर्जदाराने गैरअर्जदारांकडील मौजा दाताळा, तालुका व जि.चंद्रपूर येथील खसरा क्र. १६८ व १६९ मधील प्रस्तावीत दि ब्रीझ सदनिकेतील सदनिका क्र. १०३ रु.१,०१,०००/-(रूपये एक लक्ष एक हजार फक्त) या किंमतीत अग्रिम रक्कम देऊन बुक केली. त्यानुसार अर्जदाराने सदर सदनिकेच्या खरेदी किमतीपोटी एकूण रक्कम रु.१,०१,०००/- (एक लक्ष् एक हजार फक्त) गैरअर्जदारांना दिले व त्याबद्दलच्या पावत्या गैरअर्जदारांनी अर्जदारांस दिल्या. गैरअर्जदारांनी नमूद जागेवर काम सुरू केले नाही व त्याबद्दल काहीही सुचना अर्जदाराला दिली नाही. अर्जदाराने गैरअर्जदारांना अधिवक्त्यामार्फत नोटीस पाठवली सदर नोटीस नि.क्र.४ वरील दस्त क्र.६ वर दाखल आहे. परंतु गैरअर्जदारांनी त्याची दखल घेतली नाही. गैरअर्जदारांनी नमूद जागेवर बांधकाम करून अर्जदारांस सदनिका क्रमांक १०३ चे विक्रीपत्र करून ताबा दिला नाही. तसेच गैरअर्जदारांनी अर्जदाराकडून सदर सदनिकेचे बांधकामाकरीता घेतलेली रक्कम १,०१,०००/- अर्जदाराने मागणी केल्यानंतरही अर्जदारांस परत केली नाही, हे दाखल दस्तावेजांवरून सिध्द होत आहे. गैरअर्जदाराने सदर जागा त्याचे नावे नसताना देखील नमूद जागेबाबत अर्जदारासोबत खोटी आश्वासने देऊन रक्कम स्वीकारून अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करून सेवेत त्रुटी दिली. याशिवाय अर्जदाराने गैरअर्जदारांविरूध्द मंचात तक्रार दाखल केल्यानंतर गैरअर्जदारांना नोटीस तामील झाल्यानंतर हजर होऊन सुध्दा गैरअर्जदार क्र. २ ते ७ यांनी आपले बचावाकरीता अर्जदाराचे तक्रारीतील कथन खोडून काढलेले नाही. सबब गैरअर्जदारांनी अर्जदाराप्रति अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंब करून सेवेत न्युनता दिली हे सिध्द होते असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. ३ बाबत ः-
१० . मुद्दा क्रं. १ व २ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(१) अर्जदाराची तक्रार क्र. १२५/१४ अंशतः मंजूर करण्यात येते .
(२) गैरअर्जदार क्र.१ ते ७ हयांनी व्यक्तीगत अथवा संयुक्तरीत्या अर्जदाराला
प्रस्तावित सदनिका क्र. १०३ करिता घेतलेले रू १,०१,०००/- व त्यावर तक्रार दाखल झाल्याचे दिनांक २६/०८/२०१४पासून आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत द.सा.द.शे. ९% व्याजासह परत करावी. आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून ३० दिवसाचे आत करावे.
(३) अर्जदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च असे एकत्रीत रक्कम रु.३०,०००/- गैरअर्जदार क्र.१ते ७ यांनी व्यक्तीगत अथवा
संयुक्तरीत्या अर्जदाराला आदेशाची प्रत मिळाल्यापासून ३० दिवसाचे आत अर्जदाराला दयावे.
(४) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
अधि. कल्पना जांगडे (कुटे) उमेश वि. जावळीकर अधि. किर्ती वैद्य (गाडगिळ)
मा.सदस्या. मा अध्यक्ष मा.सदस्या.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.