(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 14 नोव्हेंबर, 2017)
1. तक्रारकर्तीने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या च्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारकर्तीच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. विरुध्दपक्ष मॅट्रीक्स गोल्डन एनक्लेव्ह चे भागीदार श्री सुचितकुमार दिवाण रामटेके हे या कंपनीचे भागीदार आहेत. तक्रारकर्तीने यांच्या ज्या र्इमारतीमधील सदनिका विकत घेण्याचे ठरविले होते ती ईमारत मौजा – झरी येथे स्थित असून त्याचा प.ह.क्र.73 असा आहे. विरुध्दपक्ष क्र.2 ते 7 हे जमिनीचे मुळ मालक आहे. तक्रारर्तीशी झालेल्या करारावर मुळ मालकाची आममुखत्यारधारक तर्फे स्वाक्षरी आहे. त्यामुळे, मुळ मालकांची नावे सुध्दा विरुध्दपक्ष क्र.1 सोबत आवश्यक प्रतिपक्ष म्हणून या तक्रारीत नमूद केलेले आहे. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाचे वरील ईमारत नामे गोल्डन एनक्लेव्ह टॉवर नं.3 यातील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्रमांक टी-3-103 एकूण क्षेत्रफळ 913 + 400 चौरस फुट टेरेस तह. नागपुर (ग्रामीण), जिल्हा – नागपुर येथे एकूण रक्कम 12,50,000/- मध्ये आरक्षित केले. तक्रारकर्तीने दिनांक 16.8.2011 रोजी सदनिकेचा करारनामा करतेवेळी विरुध्दपक्षास रुपये 5,00,000/- रोख रक्कम दिली. करारनाम्यावर सर्व विरुध्दपक्ष क्र.1 ते 7 यांची स्वाक्षरी आहे आणि तक्रारकर्तीची सुध्दा स्वाक्षरी आहे. सदर करारनाम्याप्रमाणे भूखंडाची उर्वरीत रक्कम रुपये 7,50,000/- सारख्या मासिक हप्त्यामध्ये 24 महिन्याचे मुदतीत तक्रारकर्तीला अदा करावयाचे होते. त्यानंतर, विरुध्दपक्षाने त्याच्या नावे विक्रीपत्र करुन देण्याचे कबूल व मंजूर केले होते. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे दिनांक 16.8.2011 पर्यंत वेळोवेळी एकूण रुपये 5,00,000/- खाली दिलेल्या ‘परिशिष्ठ – अ’ प्रमाणे जमा केल्याचे दिसून येते व उर्वरीत रक्कम रुपये 7,50,000/- आजही द्यायला तयार आहे. तक्रारकर्तीने सदनिका क्रमांक टी-3-103 पोटी खालील ‘परिशिष्ठ - अ’ प्रमाणे विरुध्दपक्षांकडे रकमा जमा केलेल्या आहेत.
‘परिशिष्ठ – अ’
अ.क्र. | रसीद क्रमांक | रक्कम दिल्याची तारीख | धनादेश/डी.डी. क्रमांक | दिलेली रक्कम (रुपये) |
1 | 708 | 05.09.2010 | 407273 | 5000/- |
2 | 668 | 28.09.2010 | 502444 | 2,80,000/- |
3 | 498 | 16.08.2011 | 017936 | 2,15,000/- |
| | | एकूण रुपये | 5,00,000/- |
3. परंतु, विरुध्दपक्षाने रक्कम मिळूनही आजपर्यंत सदरहू र्इमारतीचे बांधकाम सुरु न केल्यामुळे आणि खरेदीपत्र करुन देवूनही सदनिकेचा ताबा सुध्दा देऊ शकण्याचा स्थितीत नसल्यामुळे तक्रारकर्तीने उर्वरीत रक्कम देण्याचे थांबविले. विरुध्दपक्षाने वेळोवेळी वेगवेगळ्या कारणे सांगून तक्रारकर्तीस आजतागायत सदनिकेचे बांधकाम व खरेदीपत्र ठरलेल्या मुदतीत करुन देऊन सदनिकेचा ताबा दिला नाही. त्यामुळे, तक्रारकर्ती सदनिकेच्या मालकी हक्काचा योग्य तो वापर करु शकत नाही आणि संपत्तीचा उपभोग घेऊ शकत नाही. यावरुन, विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करुन सेवेत त्रुटी केल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्तीने खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) मंचाने जाहीर करावे की, विरुध्दपक्ष क्र.1 ते 7 यांनी व्यवसायात अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.
2) मंचाने सर्व विरुध्दपक्ष क्र.1 ते 7 यांनी संयुक्तीकरित्या आणि वैयक्तीकरित्या तक्रारकर्तीस आवंटीत केलेली उपरोक्त सदनिका क्रमांक टी-3-103 याचे नोंदणीकृत खरेदीपत्र करुन देण्याचे आणि सदनिकेचा ताबा देण्याचे निर्देश द्यावे किंवा आजच्या सरकारी बाजारभावाप्रमाणे त्याचे मुल्य तक्रारकर्तीस देण्याचे निर्देश द्यावे.
3) तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 50,000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
4. तक्रारकर्तीच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 ते 7 यांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली. तसेच विरुध्दपक्ष क्र.1 ते 7 याचे विरुध्द मंचाची नोटीस दिनांक 14.1.2016 रोजी वृत्तपत्रातुन प्रसिध्द केल्यानंतर सुध्दा विरुध्दपक्ष क्र.1 ते 7 मंचात हजर झाले नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश निशाणी क्र.1 वर दिनांक 23.2.2016 ला पारीत केला.
5. सदर प्रकरणात तक्रारकर्तीच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. अभिलेखावर दाखल केलेली तक्रार व दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
6. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडून उपरोक्त सदनिका क्रमांक टी-3-103 आवंटीत केला होता. त्याकरीता, तक्रारकर्तीने स्वतः व तिचे पतीचे मार्फत विरुध्दपक्षाकडे ‘परिशिष्ठ-अ’ प्रमाणे दिनांक 16.8.2011 पर्यंत वेळोवेळी रक्कम रुपये 5,00,000/- जमा केल्याचे दिसून येते. तसे त्याचे करारपत्र दस्त क्रमांक 1 वरील विक्रीचा करारनाम्यात नमूद आहे. तसेच, दस्त क्रमांक 2 तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे भरलेल्या पैशाच्या रसिदा लावलेल्या आहेत. जिल्हाधिकारी नागपुर यांचेकडून निवासी प्रयोजनाकरीता वापर करण्याची परवानगी मिळण्यासंबंधीचे दस्ताऐवज दस्त क्रमांक 4 वर जोडलेले आहे. विरुध्दपक्षाने परवानगी मिळूनही बांधकाम का चालु केले नाही याचा खुलासा होऊ शकला नाही. विरुध्दपक्ष क्र.1 ते 7 यांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली, तसेच विरुध्दपक्ष क्र.1 ते 7 याचे विरुध्द मंचाची नोटीस दिनांक 14.1.2016 रोजी वृत्तपत्रातुन प्रसिध्द केल्यानंतर सुध्दा विरुध्दपक्ष क्र.1 ते 7 मंचात हजर झाले नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत केला. यावरुन विरुध्दपक्ष क्र.1 ते 7 यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करुन सेवेत त्रुटी केल्याचे दिसून येते. करीता उपरोक्त कारणास्तव मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 7 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी संयुक्तीकरित्या व वैयक्तीकरित्या सदनिका क्रमांक टी-3-103 पोटी उर्वरीत रक्कम रुपये 7,50,000/- तक्रारकर्तीकडून स्विकारुन, सदनिकेचे पूर्ण बांधकाम करुन त्याचे कायदेशिर नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्तीचे नावे करुन द्यावे व सदनिकेचा ताबा द्यावा.
हे कायदेशिररित्या शक्य नसल्यास विरुध्दपक्षाकडे तक्रारकर्तीची जमा असलेली रक्कम रुपये 5,00,000/- यावर शेवटचा हप्ताची रक्कम भरल्याचा दिनांक 16.8.2011 पासून द.सा.द.शे. 18 % टक्के व्याजाने रक्कम तक्रारकर्तीच्या हातात मिळेपर्यंत द्यावी.
(3) तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 ते 7 यांनी तक्रारकर्तीस झालेल्या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष क्र.1 ते 7 यांनी आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 14/11/2017