जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/185 प्रकरण दाखल तारीख - 20/07/2010 प्रकरण निकाल तारीख – 22/10/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य श्री.नरसींग पि.लक्ष्मणराव जाधव, वय वर्षे 60, धंदा शेती, रा.हा.मु.कवलासस मंडळ जुक्कल जि.निजामाबाद (आंध्रप्रदेश), अर्जदार. विरुध्द. 1. श्री.माता कृषी सेवा केंद्र, मोंढा, देगलूर ता.देगलूर जि.नांदेड., गैरअर्जदार तर्फे मालक. 2. अमर सिडस प्रा.लि. ऑफिस नं.103/104/105, पहिला मजला, शितल प्लाझा 1135 मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे – 4110110. तर्फे व्यवस्थापक. 3. जानकी सिडस अण्ड रिसर्च प्रा.लि. पातुर रोड, गोरक्षण जवळ, म्हसपुर फाटा, अकोला, तर्फे व्यवस्थापक. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.टी.कुलकर्णी. गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - अड. पी.एस.भक्कड. गैरअर्जदार क्र. 2 - स्वतः गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील - अड.एम.डी.कोडापे. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा शेतकरी असून तकडपल्ली मंडळ बिचकुंदा जि.निजामाबाद येथे सर्व्हे नं.54/11 मध्ये असणा-या 11 आर एकर 15 गुंठे शेतीचा मालक आहे. गैरअर्जदार क्र.1 बियाणे विक्रेते आहे व गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे बियाणे उत्पादक कंपनी आहे. अर्जदाराने खरीप व रब्बी सन 2009 च्या हंगामासाठी कापसाचे पिक घ्यावयाचे असल्याने दि.19/06/2009 रोजी श्री.माता कृषी सेवा केंद्र, देगलूर ता. देगलूर जि.नांदेड यांचेकडे गेला व त्यांना तेथुन अमर सिडस प्रा.लि. या कंपनीने उत्पादित व विपनन केलेले व सर्वसाधारण जाहीरातीद्वारे प्रती एकरी 12 क्विंटल कपाशीचे उत्पादनाचे आश्वासन दिलेले कपाशीचे ट्रूतफुल- वंडरव्हाईट जातीचे लॉट नं. सी डब्ल्यु- 002 असणा-या बियाणाच्या 450 ग्रॅम प्रतिबॅग मधुन असणा-या सहा बॅग ज्याची किंमत प्रति बॅग रु.370/- असे एकूण रु.2260/- देऊन विकत घेतले. तसेच सोबतच जानीक सिडस रिसर्च प्रा.लि. या कंपनीचे उत्पादित केलेले व जाहीरात केलेले टूथफूल जनक-2 या जातीचे लॉट नंबर टी.एस.आर.पी.एल.के.एच.08 के व लेबर नंबर 005265 च्या कपाशीच्या दोन बँक प्रति नग रु.370/- प्रमाणे एकूण रु.740/- विकत घेतल्या. दि.22.7.2009 रोजी तकडपल्ली येथे 8 एकर जमिनीत पेरणी केली. अर्जदारास दूकानदाराने एकूण रु.2960/- ची पावती दिली. अर्जदाराने सहा एकर जमिनी गेरअर्जदार क्र.2 यांचे व दोन एकरमध्ये गैरअर्जदार क्र.3 चे बियाणे पेरले. अर्जदाराने मशागत चांगली केली. परंतु आठ एकर जमिनीमध्ये कपाशीच्या पिकाला फूले व बोंडे आलीच नाही. त्यामूळे अर्जदारास निव्वळ एक क्विंटलचेही उत्पादन होऊ शकले नाही. अर्जदाराने पेरणी, खते, किटकनाशके बुरशी नाशके, निदंणी खूरपणीसाठी प्रति एकरी रु.6000/- खर्च केला तसेच किरकोळ खर्च प्रति एकर रु.2000/- इतका झाला. अर्जदारास गैरअर्जदार क्र.2 यांचे बियाणे पेरलेल्या सहा एकर शेत जमिनीतून रु.2,16,000/- एवढया उत्पन्नाची अपेक्षा होती आणि गैरअर्जदार क्र.3 यांचे बियाणे पेरलेल्या दोन एकर जमिनीतून रु.72,000/- एवढया उत्पन्नाची अपेक्षा होती. वरील सर्व बाब गैरअर्जदार क्र.1 यांचे निदर्शनास आणून दिली असता त्यांनी दूर्लक्ष केले म्हणून अर्जदाराने मंडळ कृषी अधिकारी, बिचकुंदा जि. निजामाबाद येथे तक्रार अर्ज दाखल केला. त्यांवर त्यांनी दि.9.11.2009 रोजी आपला अहवाल दिला तो सोबत जोडला आहे. अहवालामध्ये सूध्दा त्यांनी अर्जदाराच्या शेतात बियाण्याची पेरणी करुन सूध्दा फूले व बोंडे लागली नाही असा अहवाल दिला त्यामूळे अर्जदाराचे नूकसान झाले म्हणून ते नूकसान भरपाई मिळण्यास पाञ आहेत. अर्जदारास दिलेल्या निकृष्ट दर्जाचे बियाणेमूळे अर्जदारास शारीरिक, आर्थिक व मानसिक ञासा त्याबददल वरील सर्व रक्कमेवर 12 टक्के व्याज मिळावेत असे म्हटले आहे. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, पिक नूकसानी बददल रु.2,16,000/- तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी निकृष्ट दर्जाचे बियाणे पूरवील्याबददल रु.72,000/- व्याजासह दयावेत, तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.25,000/- व अर्जदारास प्रतिएकरी लागलेला लागवड खर्च रु.8,000/- प्रमाणे आठ एकराचे एकूण रु.64,000/- मिळावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. जोपर्यत संबंधीत बियाणे प्रयोगशाळेमध्हये पाठवून त्यांची तपासणी होत नाही तोपर्यत बियाण्यांचे दोष आहे हे बाब सिध्द होत नाही. अर्जदाराने किंवा कृषी अधिका-याने किंवा समितीने सदरचे बियाणे प्रयोगशाळेमध्ये तपासणीकरिता पाठविलेले नाही. कृषी अधिका-याने किंवा समितीने तर्काच्या आधारावर व कोणतेही शास्ञोक्त कारण न देता आपला अभिप्राय दिला आहे जे कायदयास अमान्य आहे. महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी जिल्हयामध्ये तज्ञ व्यक्तीची सिड समिती स्थापन केलेली आहे व सिड कमिटीने पण संपूर्ण कारणे लिहून आपला अभिप्राय देणे जरुरी आहे. अर्जदाराने दिलेला अहवाल कायदयाप्रमाणे वाचता येत नाही. कृषी विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेला अहवाल हा मोघम स्वरुपाचा आहे. बियाणे सदोष आहेत याबददल अर्जदाराने कोणताही पूरावा दिलेला नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खारीज करावी असे म्हटले आहे. शेतावर जाण्यापूर्वी गेरअर्जदार यांना नोटीस/सूचना दिलेली नाही व गैरअर्जदार यांचे माघारी पंचनामा व अहवाल ग्राहय धरत येत नाही व तो अहवाल व पंचनामा गैरअर्जदारावर बंधनकारक नाही. अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक नाही कारण त्यांनी कोणताही माल अर्जदारास विक्री केलेला नाही. अर्जदाराने सन 2009-10 ची 7/12 मंचासमोर दाखल केलेली नाही व सदरच्या जमिनीमध्ये कापूस पेरल्या बददलचा पुरावा मंचासमोर नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी सदरचे बियाणे शिव अग्रोसेल्स कार्पोरेशन नांदेड व हरीत क्रांती कृषी सेवा केंद्र नांदेड यांच्याकडून विकत घेतले आहे. गेरअर्जदार क्र.1 यांनी सदरचे बियाणे पॅक पाकीटात आणून पॅक पाकीट मध्ये अर्जदारास विक्री केले आहे. तसेच वरील दोन्ही कृषी सेवा केंद्राना तक्रारीमध्ये पक्षकार केलेले नाही.पक्षकार न केल्यामूळे तक्रार चालू शकत नाही व म्हणून ती खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही व त्यांनी आपले जवाब दाखल केला नाही प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रार बेकायदेशीर असून त्यांला कसलाही कायदेशीर अधिकार नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराला कोणतेही बियाणे विकलेले नाही. अर्जदाराचे बिल हे त्यांचे नांवाने नाही. म्हणून त्यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही.अर्जदार हा तकडपल्ली मंडळ बिचकुंदा जि. निजामाबाद येथील रहीवासी आहे म्हणून या मंचाच्या कक्षेत तक्रार येत नाही. मंडळ अधिकारी विचकुंडा यांनी दिलेल्या अहवालामध्ये कोणत्या कंपनीचे व कोणते बियाणे हे अर्जदाराने लावले आहे याबददल कोठेही स्पष्ट उल्लेख नाही. अहवाल मोघम असून गैरअर्जदार क्र.3 यांनी निर्मीत केलेले बियाणे हे दोषपुर्ण आहे असे कूठेही म्हटलेले नाही. अर्जदारास तकार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार वीशेष जिल्हा स्तरीय समितीचा अहवाल हा यांस लागू राहील.अर्जदाराने दाखल केलेला अहवाल हा लागू होत नाही.बियाणे कायदा कलम 23-ए प्रमाणे कृषी अधिका-याकडे शेतक-याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी लावलेल्या बियाण्याची व बिलाची पूर्णत खाञी करुन त्यानंतर लावलेले बियाण्यातील उरलेले बियाणे व बियाण्याचे खाली पाकीट, त्यांचे सिल, टॅग इत्यादी सर्व त्या शेतक-याकडून जप्त करुन ते उरलेले बियाणे , बियाणे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवीणे आवश्यक असते व त्यानंतर प्रयोगशाळेच्या आलेल्या अहवालावरुन स्वतःचा अहवाल दयावा.या तक्रारीमध्ये बियाणे प्रयोगशाळेमध्ये पाठविलेले नाही. गैरअर्जदार यांची व्हरायटी नांदेड व त्यांच्या आसपासच्या क्षेञामध्ये 264 पाकीटांची विक्री केली व त्यामधून फक्त अर्जदाराच्या शेतातच समस्या निर्माण झालेली आहे व इतर कोणत्याही शेतक-याची तक्रार नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खोटी व बनावट असून ती खर्चासह फेटाळावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी बियाणे खरेदी केल्याबाबतची पावती नंबर2385 दि.19.6.2009 ची दाखल केलेली असून यावर गैरअर्जदार क्र.2 अमर सिडस व गैरअर्जदार क्र.3 जानकी सिडस असे दोघाचे नांवे आहेत यापैकी उत्पादित कंपनी कोणती आहे हे स्पष्ट होत नाही. अर्जदाराने जो तक्रारी मध्ये 7/12 दाखल केलेलो आहे त्या 7/12 वर खरीप पिक कॉटन जून असा उल्लेख केलेलो आहे परंतु संबंधीत पिक कापूस हे पेरल्यानंतर अर्जदाराच्या तक्रारीप्रमाणे कापूस बियाणे निकृष्ट दर्जाचे आहेत व यांला फूले व बोंडे येत नाही अशा प्रकारची तक्रार सिध्द करण्यासाठी यात जिल्हास्तरीय कृषी अधिका-याने केलेला पंचनामा आवश्यक आहे. कारण पंचनामा करतानाच खरी परिस्थिती यांला फूले व बोंडे आले का नाही हे समजू शकते, परंतु प्रस्तूत तक्रारीत पंचनामा नाही, साक्षीदार नाही. त्यामूळे नेमकी पिकाची परिस्थिती काय होती हे समजू शकत नाही. मंडळ कृषी अधिकारी यांनी एक प्रमाणपञ सारखे प्रमाणपञ दिले असून यात दि.09.11.2009 रोजी सर्व्हे नंबर 54 मध्ये इन्स्पेक्शन केले असता कापसावर फूले आले नाही असे म्हटले आहे. प्रमाणपञ हा पूरावा होऊ शकत नाही कारण यावर पंचाची सही नाही, जिल्हास्तरीय कमिटीची सही नाही त्यामूळे हे प्रमाणपञ ग्राहय धरल्या जाऊ शकत नाही. गैरअर्जदार क्र.3 यांनी देखील परिच्छेद क्र.10 मध्हये असा आक्षेप घेतला आहे की, कोणत्याही कंपनीचे बियाणे यांचा उल्लेख नाही असे म्हटले आहे. याशिवाय त्यांचा असाही आक्षेप आहे की, उरलेले बियाणे, टॅन जप्त केलेला नाही शिवाय ते बियाणे प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविण्यात आलेले नाही. अहवाल तर नाहीच परंतु प्रमाणपञ देखील सिड मध्ये काय दोष आहे यांचा उल्लेख केलेला नाही. शेताची मशागत, त्यांची पत, देण्यात आलेली खते,किटकनाशके यांचा कसा किती वापर केला यावरुन पेरणीनंतर झाडास फूले बोंडे येणे अवलंबून असते. अर्जदार यांची तक्रार स्पष्ट नाही, कूठलाही सबळ असा पूरावा त्यांचे तर्फे दाखल करण्यात आलेला नाही, म्हणून सबळ पूराव्याअभावी खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |