तक्रार दाखल तारीख – 27/03/14
तक्रार निकाली तारीख – 31/01/2018
न्या य नि र्ण य
(द्वारा - मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून सिव्हील इंजिनिअर व कॉन्ट्रॅक्टर आहे. तक्रारदार यांनी वि.प.क्र.3 यांचेकडून MARUTI SX4 ZDI Car आणि दोन Swift D-zire car खरेदी केलेल्या होत्या. तक्रारदार हे सिव्हील कॉन्स्ट्रॅक्टर असलेने वेगवेगळया ठिकाणांचे प्रोजेक्ट असलेने त्यांनी सदरचे वाहन खरेदी केले. तक्रारदार हे गेली 20 वर्षापासून मारुती कंपनीचे विविध प्रॉडक्टस वापरत आहेत. वि.प. यांचे चांगले सेवेमुळेच (good services) सदरचे वाहन तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून खरेदी केले होते. तक्रारदार यांनी MARUTI SX4 ZDI वाहन साई स्टेशन येथून ता.06/06/12 रोजी खरेदी केले. सदरचे कारचा Engine No. D13A1622247 and Chasis No. MASFFEB1S0018985 असा आहे. सदरचे वाहनास घेतलेपासून गिअर बॉक्स, क्लच प्लेट, स्टीअरिंग रॉड असे विविध दोष असल्याने तक्रारदारांनी वाहन साई सर्व्हिसिंग स्टेशन यांचेकडे रिपेअरिंगसाठी सोडले होते. सदरचे दोषांकरिता (problems) वेळोवेळी सदरचे वाहन ऑथोराईज्ड सर्व्हिस स्टेशनकडे सोडणेत आलेले होते. ता.26/12/12 रोजी गडहिंग्लज येथे 38922 किमी इतके सदरचे वाहनाचे रनिंग झालेवर सदरचे वाहनात दोष उत्पन्न झाले. म्हणून तक्रारदार यांनी रक्कम रु.10,827/- सर्व्हिसींगसाठी दिले. ता.14/1/13 रोजी पुन्हा तोच दोष उत्पन्न झाला. त्यावेळी वाहनाचे रनिंग 43899 किमी होते. तक्रारदार यांनी वि.प. नं.3 यांचेकडे ता.13/6/13 ते 24/6/13 पर्यंत सदरचे वाहन सर्व्हिसिंगकरता दिलेले होते व त्यानुसार सदरचे वाहनातील दोषही सांगितले होते. परंतु सदरचे दोष दुरुस्त करणेस वि.प. असमर्थ ठरले. ता.3/8/13 रोजी तक्रारदार बेळगांव येथे गेले असता त्यांचे वाहनाचे ब्रेक डाऊन झाले. त्यानंतर सदरचे वाहन संतेषा मोटर अॅथोराईज्ड सर्व्हिसिंग (Santesha Motor Pvt.Ltd.) यांचेकडे टोईंग करुन नेण्यात आले. सदरचे अॅथोराईज्ड सर्व्हिस स्टेशन यांनी सदरचे गिअर बॉक्समध्ये गिअर ऑईल नसलेने गिअर बॉक्स हा जॅम (jammed) होवून सदरचे वाहन खराब झालेचे कथन केले. सदरची बाब समजलेनंतर तक्रारदार यांनी सदरचे वाहन सर्व्हिस स्टेशनमधून दुरुस्त करुन घेतले व त्यानंतर ता. 21/8/13 रोजी वि.प. यांना कायदेशीर नोटीस पाठविली. वि.प.क्र.3 यांनी सदरची नोटीस नाकारली असून सर्व जबाबदारी नाकारलेली आहे. वि.प.क्र.1 ते 3 यांचे गैरकृत्यामुळे तक्रारदारास रक्कम रु. 81,320/- भरावे लागले. त्याकारणाने वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केलेने सदरची तक्रार मंचात दाखल केलेली आहे. वि.प. यांनी तक्रारदारास रक्कम रु. 1,00,000/- मानसिक व शारिरिक त्रासापोटी द्यावेत अशी तक्रारदाराने मा. मंचाकडे विनंती केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत तक्रारदाराने वकीलामार्फत वि.प. यांना पाठविलेली नोटीस, वि.प. यांचे आलेले नोटीस उत्तर, टॅक्स इन्व्हॉईस, वाहनाचे वर्क ऑर्डर, वि.प. कंपनीशी केलेला पत्र व्यवहार, पॉलिसी सर्टिफिकेट इ. एकूण 12 कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने दि.19/1/17 रोजी साई सर्व्हिस तसेच संतेषा मोटार्स यांची बिले तसेच ता.12/2/16 रोजीचा KIT College of Engineering Kolhapur यांचा अभिप्राय दाखल केला आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 व 2 यांनी ता. 17/7/14 रोजी म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराने सदरचे वाहन कमर्शिअल कारणाकरिता खरेदी केलेले होते. सदरचे वाहन हे ऑफिशियल कारणाकरिता खरेदी केलेले होते. तक्रारदारांची तक्रार मुदतीत नाही. तक्रारदारांनी सदरचे वाहन ता.28/5/11 रोजी खरेदी केलेले होते. सदरचे वाहनाची वॉरंटी सदरचे वाहनाचे रनिंग 40000 किमी झालेनंतर डिसेंबर 2013 मध्ये संपलेली होती. तक्रारदाराचे तक्रारीस Mis-joinder of parties या तत्वाची बाधा येते. सदरचे वाहन कमर्शिअल कारणाकरिता ता. 23/7/13 रोजीपासून 59,532 किमी जादा वापरलेले होते. तक्रारदाराने सदरचे वाहन निष्काळजीपणाने शिकाऊ ड्रायव्हरकडे चालविणेस दिलेले होते. तक्रारदार यांनी दुसरे Free Inspection Service 5000 km रनिंग झालेवर किंवा 6 महिनेनंतर करुन घेतलेले नव्हते. तक्रारदारांनी सदरचे वाहन वि.प. क्र.3 यांचेकडे ता. 26/11/12 रोजी 38,922 किमी रनिंग झालेवर पैसे देवून सर्व्हिसिंग करुन घेतलेले होते. तक्रारदारांचे सदरचे गिअर बॉक्समध्ये आवाज येत असलेचे सांगितलेने सदरचा गिअर बॉक्स दुरुस्ती करुन, ऑईल व कुलंट बदल करुन दिलेले होते. त्यानुसार वि.प. यांनी तक्रारदारांना वॉरंटीचे बेनिफिट दिलेले होते. ता. 14/1/13 रोजी वॉरंटी पिरेड संपलेनंतर वि.प. यांनी दुरुस्ती करुन दिलेली होती. तक्रारदार यांचे सदरचे वर्कशॉप पूर्णपणे स्वतंत्र असून त्याचा वि.प. यांचेशी कोणताही संबंध नाही. 40000 किमी रनिंग झालेवर सन 2012 मध्ये वॉरंटी संपलेली होती. वि.प. नं. 3 यांनी सदरचे गिअर बॉक्सची पाहणी (inspection) केली असता सदरचे गिअर बॉक्समध्ये ऑईल नसलेचे सदर गिअर बॉक्स seized झाले होते. सदरची बाब तक्रारदारांना माहित होती. त्याकारणाने तक्रारदार यांचेकडून रक्कम स्वीकारुन सदरचे वाहनात दुरुस्ती करणेत आली. सबब, सदरची तक्रार या मंचात चालणेस पात्र नसलेचे तसेच वि.प. यांना मानसिक त्रास देणेकरिता सदरची तक्रार तक्रारदार यांनी या मंचात दाखल केलेली असल्याने सदरची तक्रार नामंजूर करण्यात यावी असे वि.प.क्र.1 व 2 यांनी म्हणणे दाखल केलेले आहे.
4. वि.प.क्र.3 यांनी ता.17/7/14 रोजी म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांचे तक्रारीस Non-joinder of necessary parties या तत्वाची बाधा येत असलेने सदरची तक्रार चालणेस अपात्र आहे. सदरचे वाहन हे उत्तम परिस्थितीत होते. सदरचे वाहनाचे पेड सर्व्हिसिंगमध्ये ऑईल, ऑईल फिल्टर, तसेच गिअर ऑईल, सर्व काही तपासलेले असून सदरचे वाहन Perfect condition मध्ये होते. त्यानुसार तक्रारदार यांची जॉब कार्डला satisfaction note पण घेणेत आलेली होती. तक्रारदारांनी मा. मंचापासून अनेक बाबी लपवून ठेवलेल्या आहेत. तक्रारदार यांनी सदरचे वाहन संतेषा मोटार प्रा.लि. बेळगांव यांचेकडे ता.23/7/13 रोजी दुरुस्तीकरिता दिले होते. सदरचे वाहन ता.1/8/13 रोजी दुरुस्त झाले. म्हणजेच वि.प. क्र.3 यांचेकडून सर्व्हिंस रिपेअरिंग झालेनंतर तब्बल एक महिना सदरचे वाहन चालू स्थितीत सुस्थित होते. ता.13/6/13 ते 24/6/13 रोजीचे कालावधीमध्ये सदरचे वाहनाचे गिअर ऑईल व इंजिन ऑईल बदलणेत आलेले होते. त्या कारणाने वि.प. नं.3 यांनी कोणतीही चूक केलेली नाही. वि.प. क्र.3 हे वि.प. क्र.1 व 2 यांचे ऑथोराईज्ड डिलर व सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. जर काही उत्पादित दोष असेल तर त्यास वि.प.क्र.3 हे जबाबदार नाहीत. वि.प.क्र.3 यांनी सर्व्हिसिंग वेळी सदर वाहनाची योग्य ती काळजी घेवून योग्य ती सेवा दिलेली असलेने वि.प.क्र.3 यांना प्रस्तुतकामी जबाबदार धरता येणार नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी असे वि.प. क्र.3 यांनी कथन केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
1 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय, वि.प. क्र.1 व 2 यांनी |
2 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून सदरचे गिअर बॉक्सची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय, वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय, वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर |
वि वे च न –
मुद्दा क्र. 1 –
6. प्रस्तुतकामी तक्रारदार ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून सिव्हील इंजिनियरिंग व कॉन्ट्रॅक्टर आहेत. तक्रारदार यांनी सदरचे वाहन वि.प. नं.3 यांचेकडून सदरचे वाहन खरेदी केलेले होते. तथापि, वि.प. नं.3 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये सदरचे वाहन तक्रारदार यांनी लक्ष्मी सिव्हील इंजिनिअर्स या कंपनीचे ऑफिस कामासाठी सदरचे कंपनीचे नावाने खरेदी केलेले होते. सबब, सदरचे कंपनीचे ऑफिस कारणाकरिता म्हणजेच कमर्शिअल कारणाकरता सदरचे वाहन खरेदी केलेले असलेने तक्रारदार हे ग्राहक होत नाही. सबब, तक्रारदार हे ग्राहक आहेत का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्या अनुषंगाने तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन केले असता, तक्रारदारांनी सदरचे वाहन हे स्वतःचे वापराकरिता घेतलेचे कथन केलेले आहे. तसेच ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(एम) नुसार कंपनी ही कायदेशीररित्या Juristic person आहे. त्याअनुषंगाने हे मंच प्रस्तुत न्यायनिवाडयाचा आधार घेत आहे.
(1) 2009 (2) Mah L.R.I. (SC)
Karnataka Power Transmission Corporation and another
Vs.
Ashok Iron Works Pvt. Ltd.
Term – Person – scope – Remedy under Act 1986 is an additional to provision of any other law. Term person is inclusive and not exhaustive and would cover the juristic person like company. The General Clauses Act 1897 Sec 3(42) defines Person “Person shall include any company or association or body of individual whether incorporated or not.”
(2) Madan Kumar Singh through L.R.
Vs.
District Magistrate Sultanpur – Supreme Court
Consumer – The buyer of goods or commodities for ‘self consumption’ in economic activities in which they are engaged would be consumer as desired in Act. The Appellants had bought the truck for a consideration which was paid by him, to be used exclusively for the purpose of earning his livelihood by means of self-employment. Buyer of goods or commodities for self consumption in economic activities in which they are engaged would be consumer as desired in Act.
तक्रारदार यांनी प्रस्तुतकामी सदरचे वाहन हे कंपनीच्या व्यवसायासाठी घेतले नसून स्वतःचे वापराकरिता घेतलेले आहे असे कथन केलेले आहे. सदरचे वाहन तक्रारदारांनी केवळ कमर्शियल कारणाकरिता वापरलेचे अनुषंगाने वि.प. यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा या मंचात दाखल केलेला नाही. सबब, कागदोपत्री पुराव्याचे अभावी वि.प. यांचे सदरचे कथन हे मंच विचारात घेत नाही. प्रस्तुतकामी तक्रारदा यांनी सदरचे वाहन वि.प. नं.3 यांचेकडून खरेदी केलेचे वि.प. यांनी मान्य केलेले आहे. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार हे ता.03/08/2013 रोजी बेळगांवकडे जात असताना सदरचे वाहन अचानक बंद पडले. सदरचे वाहनास दुस-या गाडीने दुरुस्तीसाठी मारुती कंपनीचे अॅथोराइज्ड डिलर संतेषा मोटर्स यांचेकडे नेले असता, सदरचे वाहनाचे गिअर बॉक्समध्ये गिअर ऑईल नसलेने गिअर बॉक्स जॅम (jammed) झाला असलेचे कथन करुन सदर संतेषा मोटार्स यांनी वाहनाची दुरुस्ती करुन संपूर्ण गिअरबॉक्स बदलला. त्यावेळी सदरचे गिअर बॉक्स पोटी तक्रारदारांनी रक्कम रु.81,320/- इतकी रक्कम दिली. तक्रारदार यांनी वि.प.नं.3 यांना वारंवार सदर गिअर बॉक्सची तक्रार सांगूनही वॉरंटी पिरियडमध्ये सदरचा गिअर बॉक्स रिपेअर न केलेने सदरचा प्रसंग तक्रारदार यांचेवर आला. सबब, वि.प. यांचे सदरचे कृतीमुळे तक्रारदार यांना सदरचा गिअर बॉक्स बदलणे भाग पडले. त्या कारणाने वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदरचे मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये सदरचे वाहन वि.प. यांचेकडे दुरुस्तीस आलेचे स्पष्ट कबूल केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे व पुराव्याचे शपथपत्रावरुन सदरचे वाहन वि.प. यांचेकडे वेळोवेळी रिपेअरला दिलेचे दिसून येते. ता. 23/4/12, ता.27/8/12, 27/11/12 इ. रोजी पेड सर्व्हिसिंग केलेचे दिसून येते. ता. 19/1/17 रोजी तक्रारदार यांनी जादा पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले असून सदर शपथपत्रामध्ये ता. 13/6/13 रोजी मटेरिअलमध्ये क्लच आणि बूट कंपोनंट मध्ये शिफ्ट लेवल, गिअर बॉक्समधील पार्ट बदलल्याचे नमूद आहे. त्यावेळी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.7,307/- घेतले. तसेच ता.24/6/13 रोजी वाहन पूर्णपणे दुरुस्त केल्याचे सांगून तसेच ते योग्य पध्दतीने कुशल इंजिनिअरकडून तपासले असल्याचे सांगून वाहन ताब्यात दिले. सदरचे कागदपत्रांवरुन वि.प. क्र.3 यांनी सदरचेा वाहनाचे गिअर बॉक्स तपासलेचे दिसून येते. तथापि वि.प. नं.3 यांनी दाखल केलेले म्हणणेचे अवलोकन केले असता वि.प. नं.3 यांनी सदरचे पेड सर्व्हिसिंग मध्ये ऑईल, ऑईल फिल्टर तसेच गिअर ऑईल या सर्व गोष्टी तपासलेल्या होत्या. तक्रारदार यांनी सदरचे वाहन संतेषा मोटार्स प्रा.लि. बेळगांव यांचेकडे ता. 23/7/13 रोजी दुरुस्तीस दिलेले असून ते ता.1/8/13 रोजी दुरुस्त झाले. सदरची बाब तक्रारदाराने नाकारलेली नाही. वि.प. क्र.3 यांचे म्हणणेचे अवलोकन केले असता वि.प. नं.3 यांनी ता.13/6/13 ते 24/6/13 रोजीपासून सदरचे वाहनाचे गिअर ऑईल व इंजिन ऑईल बदलले होते. तसेच वि.प. नं.3 यांचेकडे तब्बल 1 महिने वाहन सुस्थितीत चालू होते. वि.प. नं.3 हे वि.प. 1 व 2 यांचे डिलर व सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. प्रस्तुतकामी तक्रारदार यांचे मागणीप्रमाणे ता. 12/2/16 रोजी KIT College of Engineering Kolhapur यांचेकडील तांत्रिक अभिप्राय घेतलेला असून सदरचे अभिप्रायाचा/अहवालाचे या मंचाने अवलोकन केले असता, there was no evidence that gear box was empty and not having lubricating oil असे नमूद आहे. तसेच सदरचे अहवालावरुन तक्रारदारांचे वाहनातील गिअर बॉक्स हा पूर्णपणे सुस्थित असलेचा दिसून येतो. तक्रारदार यांनी दि.19/1/17 रोजी संतेषा मोटर्स, बेळगांव यांचेकडील बिल दाखल केलेले आहे. सदर बिलावर संतेषा मोटर्स प्रा.लि. हे मारुती सुझुकी यांचे अॅथोराईज्ड डिलर असलेचे नमूद आहे. सदर बिल हे एकूण रक्कम रु.81,320/- चे असलेचे दिसून येते. तसेच Recommendation :- Vehicle failed to move due to gearbox got seized as there was no oil in gear box असे नमूद असलेचे दिसून येते. सदरचे बिलावर Full cash advanced paid in A/c असे नमूद असून त्यावर सदरचे डिलरची सही आहे.
सबब, वरील सर्व कागदपत्रांवरुन वि.प. क्र.3 हे वि.प. क्र.1 व 2 यांचे डिलर व सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. परंतु वि.प. नं.3 यांनी सदरचे वाहन रिपेअर केलेनंतर सदर वाहन सुस्थित होते. त्या कारणाने वि.प. नं.3 यांना प्रस्तुतकामी जबाबदार धरता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. परंतु संतेषा मोटार्स प्रा.लि. हे वि.प. क्र.1 व 2 यांचे अॅथोराईज्ड डिलर आहेत. सदरची बाब वि.प. नं.1 व 2 यांनी नाकारलेली नाही. KIT College of Engineering मधील तांत्रिक अभिप्रायानुसार सदरचा गिअर बॉक्स योग्य असल्याचे व त्यामध्ये कोणताही दोष नसलेचे दिसून येते. तथापि दाखल कागदपत्रांवरुन वि.प. नं.1 व 2 यांचे अधिकृत डिलर संतेषा मोटर्स प्रा.लि. यांनी सदरचा गिअर बॉक्स बदलण्यास तक्रारदार यांना भाग पडले. सबब, संतेषा मोटर्स प्रा.लि. हे वि.प. क्र.1 व 2 यांचे अॅथोराईज्ड डिलर आहेत. सदरची बाब वि.प. क्र.1 व 2 यांनी नाकारलेली नाही. या सर्व बाबींचा विचार करता, वि.प. क्र.1 व 2 कंपनी ही त्यांचे अॅथोराईज्ड डिलरचे कृत्यास जबाबदार आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 व 4
8. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. त्या कारणाने तक्रारदार हे वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून संयुक्तिकरित्या सदरचे गिअर बॉक्सची किंमत रक्कम रु.81,320/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल ता.27/3/14 रोजीपासून सदची संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत. तसेच वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी दिलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार या मंचात दाखल करणे भाग पडले. या कारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- मिळणेसही तक्रारदार पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 व 4 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रक्कम रु.81,320/- अदा करावेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 27/03/2014 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्केप्रमाणे व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या यांनी तक्रारदाराला रक्कम रु. 8,000/- (रक्कम रुपये आठ हजार मात्र) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार मात्र) अदा करावी.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. क्र.1 व 2 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.