(पारीत दिनांक : 13 मार्च, 2019)
आदेश पारीत व्दारा – श्रीमती स्मिता एन.चांदेकर, सदस्या -
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये विरुध्दपक्षाविरुध्द दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हा चंद्रपुर येथील रहिवासी आहे. विरुध्दपक्ष क्रं. 1 हे कार उत्पादन करणारी भारतातील नामांकित कंपनी आहे. विरुध्दपक्ष क्रं.2 हे विरुध्दपक्ष क्रं.1 चे नागपुर येथील अधिकृत विक्रेता (Dealer) व सेवाकेंद्र आहे. विरुध्दपक्ष क्रं.3 हे विमा कंपनी असुन विरुध्दपक्ष क्रं.4 ही मध्यस्थ विमा कंपनी आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 2.1.2016 रोजी विरुध्दपक्ष क्रं.1 निर्मित मारुती एस क्रास (S Cross) कार विरुध्दपक्ष क्रं.2 कडून एकुण रुपये 13,40,000/- ला खरेदी केली होती. सदर एस क्रॉस कारचा इंजिन क्रं.016AA 7364042 व चेसिस क्रं.MA3FN JJ IS0011022JF असा आहे. तसेच तक्रारकर्त्याच्या कारची दोन वर्षाची किंवा रुपये एक लाख किलोमिटर अंतर यापैकी जो कालावधी पहिले येणार त्या कालावधीकरीता वॉरंटी/गॅरंटी होती.
3. तक्रारकर्ता पुढे असे कथन करतो की, विरुध्दपक्ष क्रं.2 ते 4 च्या म्हणण्यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं.3 ची वाहन पॉलिसी विमा क्रं.31260031150303497571 नियमित हप्त्यावर वरचे रुपये 7,539/- चा अतिरिक्त हप्ता भरुन विकत घेतली. तक्रारकर्त्याला त्याच्या पॉलिसीवर Zero Debt cover मिळणार होते. त्यामुळे विम्याच्या अटीनुसार तक्रारकर्त्याचे अपघात झाल्यास किंवा ते क्षतिग्रस्त झाल्यास तक्रारकर्त्याला रुपये 500/- ते रुपये 2000/- ची ठराविक (Fixed) फी भरल्यास कार विना शुल्क दुरुस्त करुन मिळणार होती.
4. दिनांक 27.6.2016 रोजी तक्रारकर्ता नागपुर वरुन भंडा-याला जात असतांना भंडा-याला त्याचे कारमधुन तेल गळती (Oil Leak) होत असल्याचे लक्षात आले म्हणून त्याने कार रस्त्याचे बाजुला लावली व त्याबाबत विरुध्दपक्ष क्रं.1 चे भंडारा येथील सर्वीस स्टेशनला कळविले. भंडारा येथील तंत्रज्ञाने येवून तक्रारकर्त्याच्या कारची पाहणी केली व कार नागपुर येथील वर्कशॉपमध्ये टोचन करुन नेण्याचा सल्ला दिला. भंडारा येथील तंत्रज्ञाने तक्रारकर्त्याला असे सांगितले की, त्याचे कारला कोणताही अपघातील क्षति झाली नसुन जास्त उष्णतेमुळे किंवा दुस-या कोणत्या कारणांमुळे चेंबरमधुन तेलाची गळती होत असल्यामुळे ते बदलविणे गरजेचे आहे व सदर सोय भंडारा येथे नसल्यामुळे कार दुरुस्तीकरीता नागपुर घेवून जावी. त्यामुळे तक्रारकर्त्याने त्याची कार टोचन करुन नेण्यास परवानगी दिली. नागपुर येथे कार आणल्यावर तक्रारकर्त्याला असे दिसुन आले की, जॉब कार्डवर विरुध्दपक्षाच्या प्रतिनिधीने भंडारा येथे कार चालु स्थितीत नसल्याचा चुकीचा शेरा लिहिलेला होता. तक्रारकर्त्याला दिनांक 6.7.2016 ला जॉब कार्डची प्रत देण्यात आली. विरुध्दपक्ष क्रं.2 ने तक्रारकर्त्याला असे ही कळविले की, त्यांनी दुरुस्तीचा क्लेम विरुध्दपक्ष क्रं.3 कडे पाठविला होता, त्यानुसार त्यांनी श्री एस.एस. तुली यांना नियुक्त करुन दुरुस्ती खर्चाचे असेसमेंट केले व केवळ Oil pan Assembly व ती बदलविण्याचा खर्च तसेच भंडा-याहून नागपुर येथे वाहन टोचन करुन आणण्याचा खर्च मंजुर केला व बाकी दुरुस्त्यांचा खर्च मंजुर न केल्यामुळे त्या दुरुस्त्या तक्रारकर्त्याच्या परवानगीनेच करण्यात येतील. विरुध्दपक्ष क्रं.2 ने तक्रारकर्त्याच्या गाडीच्या दुरुस्तीचा खर्च अंदाजे रुपये 2,05,000/- एवढा काढला व तो पुन्हा दुरुस्त (Revised) करुन रुपये 2,04,669.72 चे दुरुस्ती खर्चाचे इस्टीमेट पाठविले व त्यापैकी केवळ रुपये 25,000/- विमा कंपनी वर नमुद केल्याप्रमाणे दोन खर्चाचे पैसे देणार होते व उर्वरीत खर्च देण्याचे लिखित आश्वासन दिल्यावरच विरुध्दपक्ष क्रं.2 हे तक्रारकर्त्याची गाडी दुरुस्त करतील असे विरुध्दपक्ष क्रं.2 ने तक्रारकर्त्याला कळविले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं.2 ला त्याची कार ही वॉरंटी कालावधीत असुन विमाकृत आहे त्यामुळे खर्चाचा मुद्दा विरुध्दपक्षांनी आपसात सोडवून तक्रारकर्त्याला गाडी दुरुस्त करुन द्यावी अश्या आशयाचा नोटीस विरुध्दपक्ष क्रं.1 ते 4 ला पाठविला व गाडी बिनामुल्य दुरुस्त करुन देण्याची मागणी केली. परंतु, विरुध्दपक्षाने त्यांच्या नोटीसला उत्तर दिले नाही व त्याची कारही दुरुस्त करुन दिली नाही त्यामुळे त्याने पुन्हा सर्व विरुध्दपक्षांना दिनांक 19.8.2016 ला र्इ-मेल पाठविला. दरम्यानच्या काळात तक्रारकर्त्याला असे कळले की, विरुध्दपक्ष क्रं.1 कंपनीने एस क्रॉस गाडीची किंमत रुपये 2,00,000/- ने कमी केली असुन इतर अनेक सुट देखील देत आहेत, तसेच तक्रारकर्त्याला सर्व्हीस प्रतिनिधीकडून असेही कळले की, सदर कारच्या ब्रेकच्या भागांमध्ये प्रॉम्ब्लेम असल्यामुळे कंपनीने 20000 चे वर कार परत मागविल्या आहेत त्या कारमध्ये देखील तक्रारकर्त्याच्या कार प्रमाणे Brake Fluid व Oil Leakage चा दोष होता.
5. तक्रारकर्त्याने असेही कथन केले आहे की, त्याची कार जर अपघातामुळे क्षतिग्रस्त झाले असे समजले तर विरुध्दपक्ष क्रं.3 व 4 हे दुरुस्ती खर्च भरुन देण्यास जबाबदार आहेत व जर कारमध्ये निर्मिती दोष आहे तर विरुध्दपक्ष क्रं.1 व 2 हे दुरुस्तीकरीता जबाबदार आहेत. विरुध्दपक्षांना वारंवार विनंती केल्यावरही विरुध्दपक्ष क्रं.2 ने तक्रारकर्त्याला वाहन दुरुस्त करुन न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असुन विरुध्दपक्ष क्रं.1 व 2 ने तक्रारकर्त्याला रुपये 15,59,258/- द.सा.द.शे. 18% व्याजदराने प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द्यावे किंवा विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला त्याच मॉडेलची कार बदलवून नवीन कार द्यावी. विरुध्दपक्ष क्रं.1 ते 4 ने वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला कार वापरापासून वंचित ठेवल्यामुळे दिनांक 27.6.2016 पासुन प्रतिदिन रुपये 2000/- देण्याचा आदेश व्हावा, विरुध्दपक्षांना त्यांनी इतर ग्राहकांपेक्षा तक्रारकर्त्याकडून जास्त घेतलेली रक्कम रुपये 2,05,000/- दिनांक 1.1.2016 पासुन व्याजासह देण्याचा आदेश व्हावा, तसेच तक्रारीचा खर्च रुपये 20,000/- व शारिरीक, मानसिक त्रासापोटी रुपये 5,00,000/- देण्याचा आदेश व्हावा इत्यादी मागण्या केल्या आहेत.
6. तक्रारकर्त्याची तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्दपक्ष यांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार विरुध्दपक्ष क्रं.1 ने त्यांचे लेखीउत्तर निशाणी क्रं.16 नुसार दाखल केले असुन तक्रारकर्त्याच्या तक्रारीला सक्त विरोध केला आहे. विरुध्दपक्ष क्रं.1 ने त्याचे लेखीउत्तरात असा आक्षेप नोंदविला आहे की, तक्रारकर्त्याने गाडी खरेदीचा व्यवहार हा सदर विरुध्दपक्षासोबत केला नसुन तक्रारकर्त्याकडून त्याने मोबदला स्विकारला नाही. तसेच तक्रारकर्त्याने सदर विरुध्दपक्षांकडून कोणतीही सेवा घेतली नाही. तक्रारकर्त्याचा संपूर्ण व्यवहार हा स्वतंत्रपणे विरुध्दपक्ष क्रं.2 ते 4 सोबत झाला होता त्या करारात विरुध्दपक्ष क्रं.1 हा सामील नव्हता. सदर विरुध्दपक्ष व विरुध्दपक्ष क्रं.2 डिलर यांचे संबंध Principal to Principal तत्वानुसार आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं.1 चा ग्राहक होत नाही, म्हणून सदर तक्रार विरुध्दपक्ष क्रं.1 विरुध्द खारीज करण्यात यावी.
7. विरुध्दपक्ष क्रं.1 ने पुढे असे नमुद केले आहे की, सदर विरुध्दपक्ष हे वाहन निर्मिती करणारी कंपनी असुन त्यांनी उत्पादीत केलेली वाहनाची उत्पादनाच्या प्रत्येक स्तरावर चोख क्षमता चाचणी घेण्यात येते, तसेच त्यांनी ISO/TS 16949 प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं.1 ने तक्रारकर्त्याच्या वादातीत कारची वॉरंटी ही दोन वर्षे किंवा 1 लक्ष किलोमिटर यापैकी जो लवकर घडेल अशी आहे हे अमान्य केले असुन वाहनाची वॉरंटी 24 महिने किंवा 40000 कि.मी. यापैकी जे पहिजे घडेल ती आहे असे नमुद केले आहे. त्याचप्रमाणे वॉरंटीच्या Clause 3 नुसार वाहनाच्या ज्या भागात निर्मिती दोष आढळला त्यात विनामुल्य दुरुस्ती करणे किंवा तो भाग बदलवून देणे ही विरुध्दपक्ष क्रं.1 कंपनीची जबाबदारी आहे. वॉरंटी ही वाहन विक्रीच्यावेळी दिलेल्या मॅन्युअलमधील अटी, शर्तीनुसार तक्रारकर्ता व विरुध्दपक्षावर बंधनकारक आहे, असे नमुद केले आहे. विरुध्दपक्ष क्रं.1 ने तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील इतर परिच्छेद निहाय कथन अमान्य केले आहे.
8. विरुध्दपक्षाने पुढे असे कथन केले की, तक्रारकर्त्याचे वाहन अधिकृत वर्कशॉपमध्ये टोचन करुन आणल्याचे जॉबकार्डवरुन स्पष्ट होते. सदर वाहन हे वर्कशॉपमधील सर्व्हीस इंजिनियरने व्यवस्थित तपासुन ऑईल चेंबर हे बाह्य आघातामुळे क्षतिग्रस्त झाल्याचे नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने सदर जॉबकार्डवर सही केलेली आहे. त्याचप्रमाणे सदर बाब ही तक्रारकर्त्याने त्याचा विमा दाव्याच्या फॉर्ममध्ये देखील नमुद केली आहे. तक्रारकर्त्याचे वाहन हे 10370 कि.मी. चालले असुन त्या दरम्यान तक्रारकर्त्याने वाहनाविषयी कोणतीही तक्रार केलेली नाही. तक्रारकर्त्याने स्वतः त्याचे वाहन विरुध्दपक्ष क्रं.2 चे वर्कशॉप में. आर्या मोटर्स मध्ये टाकून ठेवलेले आहे व विरुध्दपक्ष क्रं.2 ने अनेकदा कळवूनही सदर वाहन तेथुन हलविले नाही, तसेच वाहनातील दुरुस्तीकरीता परवानगी देखील दिली नसुन त्याच्या बेकायदेशिर मागण्या विरुध्दपक्षावर बळजबरीने लादण्याचा प्रयत्न करीत आहे. विरुध्दपक्ष क्रं.1 ने पुढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याच्या वाहना संदर्भात ब्रेकबाबत कोणतीही तक्रार नव्हती. तक्रारकर्त्याच्या वाहनात बाह्य आघातामुळे ऑईल गळती झाली आहे. विरुध्दपक्ष कंपनीने त्याच्या काही वाहनात आढळुन आलेल्या Faulty भाग हे वॉरंटीनुसार सर्व्हीस अभियान (Campaign) घेवून बदलवून दिलेले आहेत, तसेच एस क्रॉस वाहन मालकांना त्यांचे वाहनात सदर बिघाड आढळल्यास त्यांनी त्यांचे वाहन Campaign मध्ये तपासुन घ्यावे असे विरुध्दपक्ष कंपनीने वृत्तपत्रातुन जाहिर केले आहे. तक्रारकर्त्याने हा सदर सर्व्हीस अभियान (Campaign) मध्ये कधीही भाग न घेतल्यामुळे तक्रारकर्त्याच्या कारमध्ये निर्मिती दोष असल्याचे तक्रारीला कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारकर्त्याने सदर विरुध्दपक्षाकडून कोणतीही सेवा घेतलेली नाही. तसेच विरुध्दपक्ष क्रं.1 ने सेवेत त्रुटी केली नाही, त्यामुळे त्याचेविरुध्द सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी विरुध्दपक्ष क्रं.1 ने विनंती केली आहे.
9. विरुध्दपक्ष क्रं.2 ने त्याचे लेखीउत्तर निशाणी क्रं.14 वर दाखल केले असुन तक्रारकर्त्याच्या तक्रारीस सक्त विरोध केला आहे. सदर विरुध्दपक्ष हे विरुध्दपक्ष क्रं.1 चे नागपुर येथील अधिकृत विक्रेता असल्याचे मान्य केले असुन ते ग्राहकांना जास्त भाव लावून वाहन विक्री करतात हे अमान्य केले आहे. तक्रारकर्ता हा वादातीत एस क्रॉस कारचा मालक असुन तक्रारकर्त्याने वाहन खरेदी, नोंदणी व विमाकृत करण्यास केलेला खर्च हा कार खरेदी करतांना प्रत्येकाने करणे अपेक्षित आहे असे नमुद केले आहे. तसेच तक्रारकर्ता हा बिना अपघात बोनस करीता पात्र असुन नवीन वाहन घेताना सदर लाभ पुढे चालु राहतो हा अभिलेखाचा भाग आहे असे नमुद केले आहे. विरुध्दपक्ष क्रं.2 ने हे देखील मान्य केले की, तक्रारकर्त्याला Zero Depreciation विम्याबाबत कळविण्यात आले असता सदर विम्याचा लाभ घेण्याकरीता त्याने अतिरिक्त रुपये 7,539/- Zero Depreciation करीता भरले होते. तक्रारकर्त्याचे कारमध्ये दिनांक 27.6.2016 ऑईल Leak गळती झाली हे मान्य केले असुन सदर गळती ही तक्रारकर्त्याने कार क्षतिग्रस्त केल्यामुळे झाले असे नमुद केले आहे. जॉबकार्ड मध्ये तक्रारकर्त्याने नमुद केल्याप्रमाणे तक्रारकर्त्याच्या कारला भंडारा येथे जात असतांना अपघात झाला होता व त्यात ऑईल चेंबर क्षतिग्रस्त झाले होते. तरी देखील तक्रारकर्ता कार चालवित राहिला त्यामुळे संपूर्ण ऑईल वाहून गेल्यामुळे इंजिनात बिघाड निर्माण झाला. विरुध्दपक्ष क्रं.2 ने पुढे असे नमुद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याला दिनांक 6.7.2016 रोजी जॉबकार्ड दिले होते. विरुध्दपक्ष क्रं.2 हे विम्याशी संबंधित नसुन ते वाहन दुरुस्तीचे काम करतात त्यामुळे तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्ती खर्चाची रक्कम ही विमा कंपनीकडे मागावयास हवी. विरुध्दपक्ष क्रं.3 च्या सर्व्हेअरने वाहन निरिक्षण करुन रुपये 2,05,000/- दुरुस्तीचा खर्च नामंजुर केला होता. त्याबाबत सदर विरुध्दपक्ष क्रं.2 ने तक्रारकर्त्याला पत्र पाठवून कळविले होते व वाहन दुरुस्तीकरीता मंजुरी मागितली होती. तक्रारकर्त्याचे वाहन विरुध्दपक्ष क्रं.2 कडे पडून असल्यामुळे त्यांना वाहन पार्किंग की लावावी लागली असे विरुध्दपक्ष क्रं.2 ने नमुद केले आहे.
10. विरुध्दपक्ष क्रं.2 ने पुढे असे नमुद केले आहे की, वाहनाची किंमत ही मारुती सुझुकी विरुध्दपक्ष क्रं.1 कंपनीने ठरविलेली असते. तक्रारकर्त्याने वाहन खरेदी करतांना तक्रारीतील परिच्छेद क्रं.2 मध्ये नमुद केलेली रक्कम देणे कबुल केले होते व त्यानुसार तक्रारकर्त्याला योग्य किंमतीत वाहन विकण्यात आले होते.
11. तक्रारकर्त्याचे वाहन ऑंईल गळती झाल्यावरही चालविल्यामुळे वाहनातील संपूर्ण ऑईल वाहत गेल्यामुळे इंजिनात बिघाड निर्माण झाला. तक्रारकर्त्याच्या स्वतःच्या चुकीकरीता विरुध्दपक्षाला दोष देता येणार नाही. तसेच, तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील कथनावरुन त्याने तक्रार कारमध्ये निर्मिती दोष होता कि त्याचे कारचा अपघाती विमा देण्यात आला नाही या सेवेतील त्रुटीकरीता दाखल केली आहे, या बाबी स्पष्ट होत नाही करीता सदर तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विरुध्दपक्ष क्रं.2 ने विनंती केली आहे.
12. विरुध्दपक्ष क्रं.3 ने त्यांचे लेखीउत्तर निशाणी क्रं.20 वर दाखल केले असुन तक्रारकर्त्याच्या तक्रारीला सक्त विरोध केला आहे. विरुध्दपक्ष क्रं.4 हे विमा ब्रोकींग कंपनी असल्याचे मान्य केले असुन विरुध्दपक्ष क्रं.4 व सदर विरुध्दपक्ष क्रं.3 मध्ये Tie up आहे हे अमान्य केले आहे. सदर विरुध्दपक्ष विमा कंपनीचा तक्रारकर्त्याच्या जुन्या वाहनाच्या विम्याशी काहीही संबंध येत नाही. तक्रारकर्त्याने स्वतःहून विमा पॉलिसी घेतली असुन त्यातील अटी व शर्ती तक्रारकर्त्याने मान्य केल्या होत्या असे नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने मुळ प्रिमियमवर अतिरिक्त प्रिमियम रक्कम रुपये 7,539/- भरल्यामुळे विम्यात Zero Debt अंतर्भुत होते व त्यानुसार वाहनाला अपघात झाल्यास ठराविक रक्कम भरुन तक्रारकर्त्याला कार बिनामुल्य दुरुस्त करुन मिळणार होते, ही बाब विरुध्दपक्ष क्रं.3 ने अमान्य केली आहे. विमा पॉलिसी ही निर्मिती दोषाकरीता नुसन अपघाती क्षतिकरीता असते असे विरुध्दपक्षक्रं.3 ने नमुद केले आहे. सदर विरुध्दपक्ष क्रं.3 ने तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील इतर परिच्छेद निहाय कथन अमान्य केले आहे व असे कथन केले आहे की, तक्रारकर्त्याच्या कारला झालेले नुकसान हे अपघातामुळे झालेले नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या फोटोवरुन देखील वाहनाला नुकसान हे अपघाताने झाले नसुन त्यात कोणताही बाह्य बिघाड नाही. तक्रारकर्त्याचे वाहनातील बिघाड हा अपघातामुळे नुसन निर्मिती दोषामुळे झाला असल्यामुळे सदर विरुध्दपक्ष क्रं.3 विमा कंपनी ही तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. सदर विरुध्दपक्षाने त्यांचे सेवेत कमतरता केली नाही त्यामुळे सदर तक्रार त्यांचे विरुध्द खारीज करण्यात यावी अशी विरुध्दपक्ष क्रं.3 ने विंनती केली आहे.
13. विरुध्दपक्ष क्रं.4 ने त्यांचे लेखीउत्तर निशाणी क्रं.19 वर दाखल केले असुन तक्रारकर्त्याच्या तक्रारीस सक्त विरोध केला आहे. विरुध्दपक्ष क्रं.4 ने असे नमुद केले आहे की, ते विमा ब्रोकिंग कंपनी आहे. त्यांचे काम हे केवळ ग्राहकांना विविध विमा कंपनीच्या वाहन विम्यांची माहिती पुरविणे एवढेच आहे. त्यानंतर, ग्राहक हे स्वमर्जीने त्यांना हव्या असलेल्या विमा कंपनीकडून वाहनाचा विमा घेत असतात. तक्रारकर्ता हा सदर विरुध्दपक्षाचा ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक होत नाही. तक्रारकर्त्याने सदर विमा ब्रोकिंग कंपनीकडून मोबदला देवून कोणतीही सेवा घेतलेली नाही. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्रं.1 निर्मित व विरुध्दपक्ष क्रं.3 कडे विमाकृत असेलेले वाहन हे विरुध्दपक्ष क्रं.2 कडे दुरुस्तीकरीता पडले असुन विरुध्दपक्ष क्रं.1 ते 3 हे त्याकरीता जबाबदार आहे. सदर विरुध्दपक्षासोबत तक्रारकर्त्याचा कोणताही करार झालेला नाही असे विरुध्दपक्ष क्रं.4 ने त्याचे लेखी उत्तरात नमुद केले आहे. विरुध्दपक्ष क्रं.4 ने तक्रारीतील इतर परिच्छेद निहाय कथन नाकबुल केले आहे व तक्रारकर्त्याची तक्रार त्याचेविरुध्द खारीज करण्याची विनंती केली आहे.
14. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. उभय पक्षाचे कथन, अभिलेखावरील लेखी युक्तीवाद, दस्तऐवज, तोंडी युक्तीवादाचे अवलोकन केले असता मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे.
- निष्कर्ष –
15. तक्रारकर्ता हा मारुती एस-क्रॉस कार इंजिन क्रं.016AA 7364042 आणि चेसिस क्रं.MA3FN JJ IS0011022JF चा मालक आहे. सदर कार ही विरुध्दपक्ष क्रं.1 निर्मित असुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं.2 कडून दिनांक 2.1.2016 रोजी खरेदी केली आहे. तसेच, तक्रारकर्त्याची कार ही विरुध्दपक्ष क्रं.3 विमा कंपनीकडे विमाकृत आहे हे वादातीत नाही. तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेल्या बिलाची पावती व विमा पॉलिसीच्या प्रतींवरुन सदर बाब स्पष्ट होते.
16. विरुध्दपक्ष क्रं.1 ने त्याचे लेखीउत्तरात असा आक्षेप घेतला आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं.2 कडून कार खरेदी केले असुन विरुध्दपक्ष क्रं.2 ला मोबदला दिला आहे. विरुध्दपक्ष क्रं.1 व 2 यांच्यातील करार हा Principal to Principal या तत्वावर झाला आहे. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्रं.1 मध्ये कार खरेदीचा कोणताही व्यवहार झाला नाही म्हणून तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं.1 चा ग्राहक होत नाही.
यावर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने त्याच्या कारमध्ये निर्मिती दोष आहे असे तक्रारीत नमुद केले आहे. सदर कार ही विरुध्दपक्ष क्रं.1 ने उत्पादीत केली आहे व कारची वॉरंटी देखील विरुध्दपक्ष क्रं.1 ने दिली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं.1 चा ग्राहक होतो म्हणून विरुध्दपक्ष क्रं.1 चा वरील आक्षेप निरस्त ठरतो.
17. तक्रारकर्त्याचे म्हणणे असे आहे की, दिनांक 27.6.2016 रोजी तो नागपुर वरुन भंडारा येथे जात असतांना त्याला भंडारा येथे कारमधुन ऑईल गळती होत असल्याचे लक्षात आले, त्यामुळे त्याने विरुध्दपक्ष क्रं.1 चे भंडारा येथील सर्व्हीस स्टेशनला कळविले. भंडारा येथील तंत्रज्ञाने गाडी तपासुन तक्रारकर्त्याला असे सांगितले की, कार अतिउष्ण झाल्यामुळे किंवा इतर कारणाने चेंबरमधुन ऑईल गळती होत आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याला कार नागपुर येथे दुरुस्तीकरीता न्यावी लागेल. त्यानुसार त्याची कार टोचन करुन विरुध्दपक्ष क्रं.2 यांचे आर्या सेंट्रल सर्व्हीस वर्कशॉपमध्ये आणली. भंडारा येथील तंत्राज्ञाने तक्रारकर्त्याच्या कारमध्ये अपघाती क्षति झाली नसुन अतिउष्णतेमुळे ऑईल लिक झाले असे सांगितले असतांना विरुध्दपक्ष क्रं.2 ने जॉबकार्डवर चुकीचे नमुद केले होते. त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष क्रं.2 ने कार दुरुस्तीचा अंदाजे खर्च रुपये 2,05,000/- काढला, तसेच विरुध्दपक्ष क्रं. 3 ने केवळ दोन खर्चाची विमा रक्कम मंजुर केल्याचे कळविले. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या कारमध्ये अपघातामुळे बिघाड आला नसुन कारमध्ये निर्मिती दोष असल्यामुळेच सदर बिघाड आला आहे. सदर कार वॉरंटी कालावधीत असल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं.1 व 2 ने सदर कार दुरुस्ती विनामुल्य करुन द्यावयास हवी, तसेच जरी अपघातामुळे कारमध्ये बिघाड झाला असे समजले तर कार विमाकृत असल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं.3 व 4 ने दुरुस्ती खर्च रक्कम देवून तक्रारकर्त्याला विनामुल्य कार दुरुस्त करुन द्यावयास हवी होती.
18. तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील मागणीचा विचार करता तक्रारकर्त्याने त्याला विरुध्दपक्षाकडून कारची संपुर्ण किंमत रक्कम रुपये 15,59,258/- कारमध्ये बिघाड आल्याचे दिवसापासुन 18 % वार्षिक व्याजासह मिळावी किंवा विरुध्दपक्षांनी त्याची कार बदलवून त्याच मॉडेलची नवीन कार द्यावी, तक्रारकर्ता कार वापरापासुन वंचित असल्यामुळे प्रतिदिन रुपये 2,000/- खर्च, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याकडून कारची जास्त घेतलेली रक्कम रुपये 2,05,000/- तसेच नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळावा अशी विनंती केली आहे. सदर मागणीचे स्वरुप बघता तक्रारकर्त्याने त्याची तक्रार ही विरुध्दपक्षाने त्याला निर्मिती दोष (Manufacturing Defect) असलेले सदोष वाहन पुरविले, याकरीता असल्याचे दिसुन येते. तक्रारकर्त्याच्या वकीलांनी त्यांचे युक्तिवादातही वाहनात निर्मितीदोष असल्याचे सांगितले व त्यावरच भर दिला. तक्रारकर्त्याच्या वरील प्रमाणे युक्तिवादाचा विचार केल्यास जर कारमध्ये निर्मिती दोष असेल तर विरुध्दपक्ष क्रं.2 ते 4 यांच्याविरुध्द तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
19. तक्रारकर्त्याने त्याचे कारमध्ये निर्मिती दोष आहे व विरुध्दपक्ष क्रं.2 ने जॉबकार्ड मध्ये चुकीची माहिती लिहिली याबाबत कुठेही लेखी तक्रार केल्याचे दिसुन येत नाही. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं.1 कडे तशी लेखी तक्रार केली व विरुध्दपक्ष क्रं.1 ला कायदेशिर नोटीस पाठविल्याचे सुध्दा अभिलेखावरुन दिसुन येत नाही. त्याचप्रमाणे कारमध्ये निर्मिती दोष होता हे सिध्द करण्यासाठी तक्रारकर्त्याने मंचासमक्ष तज्ञाचे मत/अहवाल (Expert Opinion) दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याने केवळ आपली भिस्त विरुध्दपक्ष क्रं.1 यांनी तक्रारकर्त्याकडे असलेल्या एस-क्रॉस कारचे त्याच निर्माण कालावधीतील वीस हजाराचे वर वाहन निर्मिती दोष असल्यामुळे परत बोलाविले या बातमीवर ठेवली आहे. तसेच त्याने तक्रारीसोबत दाखल केलेल्या कारच्या फोटोवरुन त्याच्या कारला बाह्य आघात झाल्याचे दिसु येत नाही, त्यामुळे कारमधील बिघाड हा निर्मिती दोष असल्यामुळेच झाल्याचे म्हटले आहे. विरुध्दपक्ष क्रं.1 ने त्याचे लेखीउत्तरात निर्मिर्ती दोष असलेल्या वाहनांबाबत खुलासा केला असुन त्या वाहनांमध्ये ब्रेकच्या भागात दोष होता व तो त्यांनी सदर वाहन परत बोलावून त्यातील दोष दुर करुन दुरुस्त केल्याचे म्हटले आहे. तसेच तक्रारकर्त्याची कार विरुध्दपक्षाच्या सदर अभियानात त्यांनी वाहन धारकांस सुचना दिल्याप्रमाणे सामिल नव्हती असे देखील विरुध्दपक्षाचे म्हणणे आहे. त्यामुळे तज्ञाचे अहवालाशिवाय (Expert Opinion) मंच केवळ तक्रारकर्त्याच्या वरील प्रमाणे युक्तिवादावरुन त्याचे कारमध्ये निर्मिती दोष होता असा निष्कर्ष काढु शकत नाही. तक्रारकर्ता हा योग्य पुराव्याअभावी त्याचे कारमध्ये निर्मिती दोष होता हे सिध्द करण्यास असमर्थ ठरला आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा त्याचे मागणीनुसार दाद मिळण्यास पात्र नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
20. तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, जर त्याच्या कारमध्ये अपघातामुळे बिघाड आला असेल तर त्याची कार ही वॉरंटी कालावधीत असल्यामुळे तसेच विरुध्दपक्ष क्रं.3 कडे विमाकृत असल्यामुळे तो कार विनामुल्य दुरुस्त करुन मिळण्यास पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं.3 ने मात्र त्यांचे लेखीउत्तरात तक्रारकर्त्याच्या कारमध्ये तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार निर्मिती दोष असल्यामुळे ते नुकसार भरपाईकरीता जबाबदार नाही असे म्हटले आहे. असे जरी असले तरी तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीत विरुध्दपक्ष क्रं.3 विरुध्द कोणताही मागणी केल्याचे दिसुन येत नाही. तसेच तक्रारकर्त्याने कारमध्ये निर्मिती दोष आहे व तसे नसल्यास अपघाती बिघाड जरी असेल तरी दोन्ही परिस्थितीत विरुध्दपक्ष क्रं.1 ते 4 सर्वस्वी नुकसान भरपाई करुन तक्रारकर्त्याला कार बिनामुल्य दुरुस्त करुन मिळण्यास पात्र आहे असे म्हटले, परंतु कारमधील दोषाचे नेमके कारण शोधुन काढण्यासाठी आवश्यक असलेले तज्ञाचे मत मंचासमक्ष दाखल केले नाही. अशापरिस्थितीत, योग्य पुराव्याअभावी तसेच मागणीअभावी तक्रारकर्ता त्याचे वरील प्रमाणे कथनानुसार दाद मिळण्यास पात्र नाही, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच येते.
21. विरुध्दपक्ष क्रं.2 ने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13 (3-b) नुसार तक्रारकर्त्याचे वाहन त्यांचे परिसरातुन काढण्याचा आदेश होण्याकरीता अर्ज दाखल केला आहे. मंचा तर्फे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येत आहे, त्यामुळे सदर अर्जावर आदेश करण्याची मंचास गरज भासत नाही.
22. सबब, वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आदेश –
- तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.