जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 284/2015.
तक्रार दाखल दिनांक : 28/07/2015.
तक्रार आदेश दिनांक : 19/07/2016. निकाल कालावधी: 00 वर्षे 11 महिने 21 दिवस
(1) रविकांत माणिकराव ढोकर, वय सज्ञान,
व्यवसाय : सेवानिवृत्त, रा. टी.पी.एस. रोड, जालनेकर
यांचे घराजवळ, उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
(2) तृप्ती रविकांत ढोकर, वय 28 वर्षे,
व्यवसाय : शिक्षण, रा. टी.पी.एस. रोड, जालनेकर
यांचे घराजवळ, उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
(3) सुजाता रविकांत ढोकर, वय 50 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. टी.पी.एस. रोड, जालनेकर
यांचे घराजवळ, उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) मारुती सूर्यकांत चपाले, मॅनेजर, कोळपे-पाटील मल्टीस्टेट
को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे, शाखा काळा मारुतीजवळ,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद, रा. सरदारवाडी,
कासारशिरसी, ता. निलंगा, जि. लातूर.
(2) योगेश मधुकर देशमुख, कॅशिअर, कोळपे-पाटील मल्टीस्टेट
को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे, शाखा उस्मानाबाद.
प्रतिक हॉटेलच्या मागे, रुक्मिणी मंदिराजवळ, पिठाच्या
गिरणीजवळ, एस्.टी. कॉलनी, उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
(3) श्रीधर उध्दवराव कोळपे-पाटील, संस्थापक अध्यक्ष,
कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे,
युनीट नं. 317, महालक्ष्मी मार्केट, तिसरा मजला,
मार्केट यार्ड, पुणे – 411 037.
(4) सौ. सरस्वती श्रीधर कोळपे-पाटील, चेअरमन,
कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे,
युनीट नं. 317, महालक्ष्मी मार्केट, तिसरा मजला,
मार्केट यार्ड, पुणे – 411 037. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एल.एन. पांचाळ
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.व्ही. शिंदे
विरुध्द पक्ष क्र. 1, 3 व 4 अनुपस्थित / एकतर्फा
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, ते एकत्र कुटुंबातील सदस्य असून तक्रारकर्ता क्र.2 व 3 या तक्रारकर्ता यांच्या अनुक्रमे मुलगी व पत्नी आहेत. तक्रारकर्ता क्र.1 व 3 यांनी कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे यांचे उस्मानाबाद शाखेमध्ये दि.13/1/2014 व 5/5/2014 रोजी संयुक्त खाते उघडलेले असून ज्याचा क्रमांक अनुक्रमे 221017000030 व 221017000037 असा आहे. त्यांचे पुढे असे कथन आहे की, त्यांनी कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे यांचे उस्मानाबाद शाखेमध्ये मुदत ठेव पावत्यांद्वारे खालीलप्रमाणे रक्कम गुंतवणूक केलेली असून ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
तक्रारकर्ता क्र.1 व 3 यांचे नांवे :-
खाते क्रमांक | मुदत ठेव पावती क्रमांक | ठेव रक्कम | ठेव दिनांक | देय दिनांक |
221019000008 | 02 | रु.45,000/- | 13/1/2014 | 13/1/2015 |
221019000009 | 03 | रु.45,000/- | 13/1/2014 | 13/1/2015 |
221019000010 | 04 | रु.45,000/- | 13/1/2014 | 13/1/2015 |
221019000011 | 05 | रु.49,500/- | 13/1/2014 | 13/1/2015 |
तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांचे नांवे :-
खाते क्रमांक | मुदत ठेव पावती क्रमांक | ठेव रक्कम | ठेव दिनांक | देय दिनांक |
201034000001 | 1 | रु.45,000/- | 11/6/2014 | 11/7/2015 |
201034000002 | 2 | रु.45,000/- | 11/6/2014 | 11/7/2015 |
201034000003 | 3 | रु.45,000/- | 11/6/2014 | 11/7/2015 |
201034000004 | 4 | रु.36,500/- | 11/6/2014 | 11/7/2015 |
221019000033 | 03 | रु.49,700/- | 5/5/2014 | 5/5/2015 |
221019000034 | 04 | रु.49,700/- | 5/5/2014 | 5/5/2015 |
2. तक्रारदार यांचे पुढे असे वादकथन आहे की, उपरोक्त मुदत ठेवीकरिता द.सा.द.शे. 13.5 टक्के व्याज दर देय होता आणि त्या मुदत ठेवीचे व्याज प्रतिमहा तक्रारकर्ता यांच्या खात्यावर जमा होत असे. दि.1/10/2014 पर्यंत मुदत ठेवीचे व्याज त्यांच्या खात्यावर जमा झाले आणि त्यानंतर मागणी करुनही व्याज अप्राप्त आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी वारंवार मागणी करुनही मुदत ठेव व व्याज रक्कम देण्याकरिता विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ केलेली आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी मुदत ठेव तारण ठेवून विरुध्द पक्ष यांना रु.3,50,000/- कर्ज मागणी केली असता रु.3,50,000/- कर्ज मंजूर करुनही रु.1,00,000/- अदा केले आणि रु.2,50,000/- देण्याकरिता टाळाटाळ केली. विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचा वादविषय उपस्थित करुन मुदत ठेव पावत्यांची रक्कम दि.1/10/2014 पासून व्याजासह मिळावी आणि मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- नुकसान भरपाई व रु.5,000/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केलेली आहे.
3. विरुध्द पक्ष यांना मंचातर्फे नोटीसची योग्य बजावणी झालेली आहे. विरुध्द पक्ष क्र.1, 3 व 4 यांना उचित संधी देऊनही ते मंचापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करुन तक्रारीची सुनावणी पूर्ण केली.
4. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे ते कोणतीही मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी किंवा बँक चालवत नाहीत आणि तक्रारकर्ता हे त्यांचे ‘ग्राहक’ नाहीत. ते दि.13/।2/2013 ते 30/9/2014 या कालावधीकरिता कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे यांच्या उस्मानाबाद शाखेमध्ये मुदत करार पध्दतीने ‘कॅशिअर’ पदावर कार्यरत होते आणि दि.30/9/2014 रोजी त्यांच्या कराराचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्या सोसायटीशी त्यांचा कोणताही संबंध राहिलेला नाही. कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे यांच्या उस्मानाबाद शाखेने केलेल्या कोणत्याही व्यवहाराकरिता ते जबाबदार नाहीत. त्यांनी तक्रारकर्ता यांना सेवा पुरवलेली नाही आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. तक्रार खोटी व चूक असल्यामुळे खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी त्यांनी विनंती केली आहे.
5. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र.2 यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच उभय विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी मुदत ठेव व त्यावरील व्याज रक्कम अदा
न करुन तक्रारकर्ता यांना त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
6. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्ता यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे यांच्या उस्मानाबाद शाखेमध्ये दि.13/1/2014, 11/6/2014 व 5/5/2014 रोजी वेगवेगळ्या मुदत ठेव पावत्यांद्वारे रक्कम गुंतवणूक केल्याचे निदर्शनास येते. प्रामुख्याने विरुध्द पक्ष यांनी ठेव पावत्यांचे दि.1/10/2014 पर्यंत तक्रारकर्ता यांना व्याज दिले असून त्यानंतर ठेव रक्कम व त्याचे व्याज अप्राप्त आहे आणि विरुध्द पक्ष यांच्याकडे ठेव व व्याज रकमेची मागणी केली असता टाळाटाळ केली, असा त्यांचा मुख्य वादविषय आहे.
7. कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे या सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष, चेअरमन, मॅनेजर व कॅशिअर यांना प्रस्तत तक्रारीमध्ये ‘विरुध्द पक्ष’ असे समाविष्ठ केलेले आहे आणि जिल्हा मंचातर्फे त्यांना नोटीस योग्य बजावणी झालेली आहे. विरुध्द पक्ष क्र.1, 3 व 5 यांना उचित संधी देऊनही ते मंचासमोर उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी उत्तर दाखल केले नाही. वास्तविक पाहता तक्रारदार यांच्या तक्रारीचे खंडण करण्यासाठी लेखी उत्तर व पुराव्याची कागदपत्रे दाखल करण्यास त्यांना उचित संधी उपलब्ध होती. परंतु तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रांचे उचित पुराव्याद्वारे त्यांनी खंडन केलेले नाही आणि एका अर्थाने तक्रारदार यांची तक्रार, त्यातील कथने व दाखल कागदपत्रे विरुध्द पक्ष क्र.1, 3 व 5 यांना मान्य असल्याचे प्रतिकूल अनुमान काढणे न्यायोचित वाटते.
8. तक्रारकर्ता यांनी कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे यांच्या उस्मानाबाद शाखेमध्ये मुदत ठेव पावत्यांद्वारे रक्कम गुंतवणूक केलेली आहे आणि त्या रकमेवर तक्रारकर्ता यांना सोसायटीकडून व्याज देण्यात येत होते. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी सोसायटीकडून वित्तीय सेवा घेतलेली आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सातत्याने विनंती करुनही तक्रारदार यांना ठेव रक्कम परत करण्यात आलेली नाही. तक्रारदार हे ठेवीदार असल्यामुळे त्यांची ठेव रक्कम व्याजासह परत करणे ही कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. तक्रारदार यांना त्यांनी मुदत ठेव व त्यावरील व्याज रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार हे कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे यांच्या उस्मानाबाद शाखेकडून मुदत ठेव पावत्यांची रक्कम व्याजासह परत मिळविण्यास पात्र आहेत. सध्या राष्ट्रीयकृत बँकेचा प्रचलित व्याज दर पाहता देय ठेव रक्कम मुदत पूर्ण झाल्यानंतर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
9. कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे यांचे उस्मानाबाद शाखेद्वारे तक्रारकर्ता यांना देण्यात आलेल्या मुदत ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता त्या पावत्यांवर कोठेही नोंदणी क्रमांक नमूद नाही. परंतु सोसायटीचे नांवानुसार ती सोसायटी ‘मल्टी-स्टेट को-ऑप. सोसायटीज् अॅक्ट, 2002’ या कायद्यांतर्गत नोंदणी केली असावी, असे गृहीत धरणे योग्य वाटते. त्याप्रमाणे दखल घेतली असता त्या सोसायटीचे स्वत:चे कायदेशीर अस्तित्व निर्माण झालेले असल्यामुळे तिच्याकडे एक ‘कायदेशीर व्यक्ती’ म्हणून पाहता येईल. तसेच सर्व मुदत ठेव पावत्यांवर “This Certificate is governed by the rules framed by the Board of Directors of the Society.” असे नमूद केलेले आहे. याचाच अर्थ ठेव पावत्या उस्मानाबाद शाखेने निर्गमीत केलेल्या असल्या तरी सोसायटीच्या संचालक मंडळनिर्मित नियमास अधीन राहून ठेव प्रमाणपत्र दिलेले आहे, असे निदर्शनास येते. त्या दृष्टीने विचार केला असता तक्रारदार यांनी प्रस्तुत सोसायटीच्या संचालक मंडळास ‘विरुध्द पक्षकार’ म्हणून तक्रारीमध्ये समाविष्ठ केलेले नाही आणि तक्रारदार यांची ठेव रक्कम परत करण्याकरिता विरुध्द पक्ष यांना जबाबदार धरता येईल काय ? हा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित होतो.
10. आमच्या मते कोणतीही वित्तीय संस्था त्यांची कर्ज व ठेवीविषयक धोरणे संचालक मंडळाच्या सभेमध्ये कर्ज नियमावली, उपविधी व कायद्याला अधीन राहून निश्चित करत असते. संचालक मंडळाने सभासद, ठेवीदार, सोसायटी, उपविधी, कायदा व सामाजिक बांधीलकी या सर्वांचा नि:पक्षपाती विचार करुन प्रत्येक ठेवी व कर्ज प्रकरणावर निर्णय घेण्याचा असतो. निश्चितच अशा निर्णयाला केवळ आणि केवळ पूर्णपणे संचालक मंडळ हेच कायद्याने जबाबदार असते. यासाठी संचालक मंडळाने अत्यंत स्थितप्रज्ञाप्रमाणे ही भुमिका सातत्याने पार पाडण्याची असते. ठेवींचे वितरण व कर्ज वसुलीकरिता आवश्यक कार्यवाही करणे, ही संचालक मंडळाची कायदेशीर व नैतिक जबाबदारी व कर्तव्य असते. आमच्या मते सोसायटीच्या संचालक मंडळावर मोठी जबाबदारी निश्चितच करण्यात आलेली आहे आणि त्यांनी त्या जबाबदारी व कर्तव्यास अनुसरुन कार्य करणे अपेक्षीत व आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कर्तव्य व जबाबदारीमध्ये त्रुटी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संचालक मंडळावरच येते, मंचाचे स्पष्ट मत आहे.
11. उपरोक्त विवेचनावरुन कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. हे तक्रारदार यांची ठेव रक्कम परत करण्यास सर्वस्वी जबाबदारी असली तरी सोसायटीचे संचालक मंडळाचे सदस्य यांचीही जबाबदारी कायम राहते. तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष, चेअरमन, मॅनेजर व कॅशिअर यांच्याविरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता यांनी कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. व संपूर्ण संचालक मंडळास तक्रारीमध्ये ‘विरुध्द पक्ष’ असे समाविष्ठ केलेले नाही. विरुध्द पक्ष क्र. 3 व 4 यांनी मंचापुढे उपस्थित राहून तक्रारकर्ता यांची ठेव रक्कम परत करण्यासाठी ते वैयक्तिकरित्या जबाबदार नसल्याचे लेखी प्रतिपादन केलेले नाही किंवा तसे सिध्द केलेले नाही. तसेच सोसायटी व संचालक मंडळ आवश्यक पक्षकार असल्याची त्यांनी हरकत घेतलेली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांची ठेव रक्कम परत करण्यास विरुध्द पक्ष क्र.3 व 4 हे जबाबदार आहेत, या निर्णयाप्रत आम्ही येत आहोत.
12. विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या प्रतिवादाप्रमाणे ते कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे यांच्या उस्मानाबाद शाखेमध्ये दि.13/।2/2013 ते 30/9/2014 या कालावधीमध्ये मुदत करार पध्दतीने ‘कॅशिअर’ पदावर कार्यरत होते आणि दि.30/9/2014 रोजी त्यांच्या कराराचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्या सोसायटीशी त्यांचा कोणताही संबंध राहिलेला नाही. तसेच कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पुणे यांच्या उस्मानाबाद शाखेने केलेल्या कोणत्याही व्यवहाराकरिता ते जबाबदार नाहीत, असे त्यांचे कथन आहे. त्यापृष्ठयर्थ त्यांनी नियुक्ती पत्र अभिलेखावर दाखल केलेले आहे. त्याचे अवलोकन केले असता विरुध्द पक्ष क्र.2 हे सोसायटीचे केवळ नोकर आहेत, हे सिध्द होते. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 हे सोसायटीचे मॅनेजर असल्यामुळे तेसुध्दा नोकर आहेत, असे निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांची ठेव रक्कम परत करण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे वैयक्तिकरित्या जबाबदार ठरतात, असे कागदोपत्री निदर्शनास येत नाही. तसेच तक्रारकर्ता यांची ठेव रकमेचा विनियोग किंवा दुरुपयोग करण्यासाठी ते जबाबदार आहेत, असेही निदर्शनास येत नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांची देय मुदत ठेव रक्कम परत करण्याच्या दायित्वातून विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना मुक्त करणे न्यायोचित ठरेल, असे मंचाचे मत झाले आहे.
13. तक्रारकर्ता यांनी आपल्या तक्रारीमध्ये मुदत ठेव पावती तारण ठेवून विरुध्द पक्ष यांनी त्यांना रु.1,00,000/- कर्ज वितरीत केल्याचे नमूद केलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हे त्यांना वितरीत झालेले कर्ज व त्यावरील व्याज रक्कम परत करण्यास जबाबदार आहेत. उपरोक्त विवेचनावरुन आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(1) विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रारीमध्ये नमूद केलेल्या ठेव पावत्यांप्रमाणे देय ठेव रक्कम अदा करावी. तसेच प्रस्तुत ठेव पावत्यांच्या मुदत कालावधीकरिता द.सा.द.शे. 13.5 टक्के व मुदत पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण ठेव रक्कम परतफेड होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
ग्राहक तक्रार क्र.284/2015.
(2) तक्रारकर्ता यांनी कोळपे-पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. यांच्याकडून घेतलेले कर्ज रु.1,00,000/- व त्यावरील देय व्याज तक्रारकर्ता यांना आदेश क्र.1 प्रमाणे देय असणा-या रकमेतून वजावट किंवा समायोजित करण्यात यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.5,000/- द्यावेत.
(4) उपरोक्त आदेशांची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांनी आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क पुरविण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (सौ. व्ही.जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/स्व/26516)