ग्राहक तक्रार क्र. 99/2013
अर्ज दाखल तारीख : 11/07/2013
अर्ज निकाल तारीख: 05/02/2015
कालावधी: 01 वर्षे 06 महिने 24 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) उमाबाई आण्णासाहेब भोसले,
वय-50 वर्षे, धंदा – घरकाम,
रा.गावसूद, ता. जि. उस्मानाबाद,
2) अरविंद आण्णासाहेब भोसले,
वय 29 वर्षे, धंदा शेती, रा. सदर.
3) गणेश आण्णासाहेब भोसले,
वय -25 वर्षे, धंदा शेती व रा. सदर
4) अमोल आणासाहेब भोसले,
वय -23 वर्षे, धंदा शेती, रा. सदर. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) मारुती भिकाजी खामकर,
चेअरमन,
एम.एस.ई.बी.स्टाफ को.ऑप. क्रेडिट सोसा. लि.,
वय- 58 वर्षे, धंदा- पेन्शनर, रा. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.डी.मोरे.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.एस.एम.माने.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
1) विरुध्द पक्षकार (विप) MSEB Staff coop. Credit Society) यांनी मयत लाईनमन आण्णासाहेब याच्या जनता अपघात विम्याची रक्कम त्याचे वारस तक्रारकर्ते (तक) यांना मिळणे कामी मदत न करुन सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळणेसाठी त्यांनी ही तक्रार दिलेली आहे.
2) तक यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे. तक क्र.1 चा पती व तक क्र.2 ते 4 यांचे वडील आण्णासाहेब म.रा.वि.वि. कंपनीमध्ये लाईनमन म्हणून नोकरीला होता. त्यामुळे तो विप पतसंस्थेचा सभासद होता. विप ने आपल्या कर्जदार सभासदांचा जनता अपघात विमा न्यु इंडीया इन्शूरन्स कंपनी उस्मानाबाद शाखा यांच्याकडे पॉलिसी क्र.151305/47/06/61/00005167 तसेच वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी क्र.151305 /42/0603/0000154 अन्वये काढलेला होता. जनता अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- तर वैयक्तिक अपघात विम्याची रक्कम रु.50,000/- होती.
3) दि.20/10/2007 रोजी आण्णासाहेब याचा खून झाला अशा प्रकारे त्याचा मृत्यू झाल्यामुळे विमा कंपनीकडून विमा रक्कम मिळणेस तक पात्र होते. तक यांनी विप मार्फत कंपनीकडे विमा रकमेची मागणी केली. मात्र मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे तक यांनी तक्रार क्र.239/2011 विमा कंपनी विरुध्द दाखल केली. प्रस्तुत विपला तक क्र.5 म्हणून सामील केले. प्रस्तुत विप यांनी विमा पॉलिसीचीकागदपत्रे दाखल करतो असे सांगितले होते. मात्र अशी कागदपत्रे दाखल केली नाहीत. त्यामुळे मंचाने ता.08/02/2012 रोजी तक्रार रदद केली.
4) प्रस्तुत विप कडे विमा पॉलिसीची कागदपत्रे उपलब्ध होती ती दाखल करण्याचे त्यांनी कबूलही केले होते. मात्र कागदपत्रे दाखल केली नाहीत म्हणून तक यांना विमा रकमेपासून वंचीत रहावे लागले. अशा प्रकारे विप यांनी तक यांना आण्णासाहेब यांचे लाभार्थी असतांना सेवा देण्यात त्रुटी केली. त्यामुळे विमा रक्कम रु.1,00,000/- अधिक रु.50,000/- तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.50,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रु.10,000/- विप कडून तक यांना मिळावे म्हणून ही तक्रार दाखल केलेली आहे.
5) तक्रारीसोबत तक यांनी तक्रार क्र.239/2011 मधील तक्रारीची नक्कल, निकालपत्राची नक्कल, दाखल कागदपत्राच्या यादीची नक्कल, या कामातील विप यांच्या म्हणण्याची नक्कल व लेखी युक्तिवादाची नक्कल, विमा कंपनीच्या पत्राची नक्कल, एफ. आय. आर. ची नक्कल, पंचनाम्याची नक्कल, शवचिकित्सा अहवालाची नक्कल, मृत्यू प्रमाणपत्राची नक्कल, हजर केलेली आहे.
6) विप यांनी हजर होऊन दि.09/12/2011 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे तक व विप यांचे मध्ये ग्राहकाचे नाते नाही. मयत आण्णासाहेब विप संस्थेचे सभासद होते व विप ने सभासदांचा एकत्रित जनता अपघात विमा प्रत्येकी रु.1,00,000/- चा व एकत्रित वैयक्तिक अपघात विमा प्रत्येकी रु.50,000/- चा सभासदांच्या हितासाठी न्यु इंडीया इन्शुरंन्स कंपनी उस्मानाबाद यांचेकडून काढला होता. तक्रार क्र.239/2011 मध्ये विमा कंपनीने याबाबत इन्कार केलेला नाही. तक हे विमा कंपनीचे ग्राहक आहेत मात्र विप चे नाही.
7) आण्णासाहेब यांच्या मृत्यू नंतर तक यांना विम्याची रक्कम मिळणेकामी विप ने मदत केली. दि.23/11/2007 रोजी क्लेम फॉर्मची मागणी केली. तक ने कागदपत्रे सादर केल्यावर दि.26/06/2009रोजी विमा कंपनीकडे ती सादर करुन विमा रकमेची मागणी केली. मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दि.18/09/2009 रोजी सादर करण्यात आले. मात्र दि.29/09/2009 रोजी कंपनीने पुन्हा मृत्यू प्रमाणपत्राची मागणी केली. तेव्हा विप ने मध्यस्थी केल्यावर विमा कंपनीने रक्कम अदा करतो असे सांगितले. मात्र दि.04/01/2010 रोजीचे पत्रानुसार उशीराचे कारणावरुन क्लेम ना मंजूर केला.
8) तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून तक यांनी प्रस्तुत विप यांना त्या अर्जाचे कामी तक्रारदार म्हणून सामील केले होते. तक यांच्या मागणी प्रमाणे विमा पॉलीसीची झेरॉक्स प्रत प्रस्तुत विपने त्यांना दिली होती. तसेच जरुर ती सर्व कागदपत्रे दाखल केली होती. प्रस्तुत विप ने पॉलिसी प्रत दाखल न करण्याचा प्रश्नच उदभवला नाही व कागदपत्रे स्वत: दाखल करतो असे आश्वासन दिले नव्हते.विप यांनी तक यांना प्रामाणिकपणे सहकार्य केले होते. वास्तविक पॉलिसीच्या अटी व शर्ती सादर करण्याची जबाबदारी विमा कंपनीवर होती. त.क्र.239/2011 मधील निर्णयाच्या विरुध्द तक यांनी राज्य आयोगाकडे अपील दाखल करावयास पाहीजे होते. प्रस्तूत विप यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही व तक यांना संपुर्ण सहकार्य केले होते. त्यामुळे तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
9) तक यांची तक्रार त्यांनी दाखल केलेली कागदपत्र व विप यांचे म्हणणे यांचा विचार करता आमचे विचारार्थ खालील मुददे निघतात त्यांचे उत्तरे आम्ही त्यांच्यापुढे खाली दिलेल्या कारणासाठी लिहली आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
2) तक्रारदार अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
10) तक क्र.1चे पती व तक क्र.2 ते 4 चे वडील ‘’आण्णासाहेब’’ महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी’’ त लाईनमन असलेमुळे विप पतसंस्थेचे सभासद होते व विप मार्फत त्याचा विमा न्यु इंडीया इंन्शूरंन्स कंपनीकडे काढल्याचे तक चे कथन आहे. विप ने आपल्या सभासदांचा एकत्रित जनता अपघात विमा काढला होता व पॉलिसी क्र.151305/47/06/61/00005167 व 151305/42/06/03/0000154 होता असे विप नेच म्हंटले आहे. विमा रक्कम प्रत्येकी रु.1,00,000/- तर वैयक्तिक अपघातासाठी प्रत्येकी रककम रु.50,000/- होती त्याबाबत तक नी पुर्वी विमा कंपनीवर तक्रार क्र.239/2011 ची दाखल केली होती ती रदद झाली. तक ला क्लेम मिळण्यासाठी विप ने मदत केली व सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही अस विप चे म्हणणे आहे.
11) तक चे म्हणणे आहे की विप ने तक्रार क्र.239/2011 चे कामी विम्याची कागदपत्रे दाखल करतो असे आश्वासन दिले व पाळले नाही म्हणून सेवेत त्रुटी केली. तक्रार क्र. 239/2011 चे निकालपत्राप्रमाणे तो निकाल दि.08/02/2012 रोजी झाला. निकापत्रावरुन असे दिसते की विमा कंपनीचे म्हणणे प्रमाणे आण्णासाहेब याचा खून झाला असल्यामुळे भरपाई देणेस विमा कंपनी जबाबदार नव्हती. निकालात स्पष्टपणे म्हंटले आहे की आताच्या विप ला तक क्र.5 म्हणून सामील केले होते. पॉलिसी हजर करणेची त्याची जबाबदारी होती.
12) प्रस्तुत प्रकरणी विप ने म्हंटले आहे की त्याने पॉलीसीची प्रत तक यांना दिली होती. तक यांनी पुर्वीच्या निर्णयाविरुध्द राज्य आयोगाकडे अपील करणे जरुर होते. आण्णासाहेब याचा मारहाणीत मृत्यू झाल्यामुळे त्याची जबाबदारी विमा कंपनीने घेतली नाही हे शाबीत करण्याची जबाबदारी विमा कंपनीवर होती. प्रस्तुत विप ने कोणताही कसूर केली नाही.
13) हे लक्षात घेतले पाहिजे की प्रस्तुत विप हा पुर्वीचे तक्रारीचे कामी तक क्र.5 म्हणून सामील झाला होता व प्रस्तूत तक ला मदत करीत होता जर त्याने पॉलीसीची प्रत हजर केली नाही तर त्याला विप करण्याबददल तक ला अर्ज देता आला असता शिवाय विमा कंपनीने पॉलीसी प्रत हजर करावी असाही अर्ज देता आला असता. प्रस्तुत तक ने तसे केल्याचे दिसत नाही. प्रस्तुत विप बददल काही तक्रार होती तर ती पुर्वीच्याच तक्रारीत मांडणे जरुर होते त्या वेळी शांत राहून आता विप विरुध्द तक्रार करणे योग्य दिसत नाही.
14) आण्णासाहेब याला मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे दिसते म्हणजेच आण्णासाहेब याचा खून झाला होता अशी जोखीम स्विकारली नाही असे विमा कंपनीचे म्हणणे होते ते संयुक्तिक वाटते. कारण खून झाला असेत तर अपघाताने मृत्यू आला असे कसे म्हणता येईल ? काहीही असले तरी हा मुद्दा पुर्वीच्याच तक्रारीत मांडणे जरुर होते व अपीलात जाणे जरुर होते. पुन्हा त्याच मुद्दयावर ही तक्रार चालू शकणार नाही म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार रदद करण्यात येते.
2) खर्चाबददल कोणताही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.