ग्राहक तक्रार क्र. 136/2014. तक्रार दाखल दि. 03/07/2014. आदेश दिनांक : 15/10/2015. कालावधी: 01 वर्ष 03 महिने 12 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
सौ. शिला रामचंद्र पेंढारकर, वय सज्ञान, व्यवसाय : घरकाम,रा. एम.आय.डी.सी. प्लॉट नं. 16, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारदार
विरुध्द
(1) मारुती अॅटोमोबाईल्स् सर्व्हीस सेंटर, एस.एफ.एस. शाळेजवळ, जालना रोड, औरंगाबाद.
(2) चव्हाण मोटर्स, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद.
(3) मॅनेजिंग डायरेक्टर, मारुती मोटर्स कंपनी लि. इंडिया, वसंतकुंज, 1, नेल्सन मंडेला रोड, दिल्ली – 110 070. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- मा. श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्षमा. सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्यमा. श्री. एम.बी. सस्ते, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फ विधिज्ञ : एम.जी. कठारे
विरुध्द पक्ष क्र.1 तर्फे विधिज्ञ : ए.ए. पाथरुडकर विरुध्द पक्ष क्र.2 तर्फे विधिज्ञ : जी.एच. कुलकर्णी
विरुध्द पक्ष क्र.3 तर्फे विधिज्ञ : ए.जे. देशपांडे
न्यायनिर्णय
मा. श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-1. विरुध्द पक्षकार (विप) क्र.2 यांच्याकडून मारुती अल्टो 800 कार विकत घेताना गाडीमध्ये बिघाड व नुकसान झाल्यास कॅशलेस दुरुस्ती करुन देण्याचे कबूल करुनही विरुध्द पक्ष क्र.2 उस्मानाबाद येथील विक्रेते यांनी तसे केले नाही व विरुध्द पक्ष क्र.1 औरंगाबाद येथील सर्व्हीस सेंटर यांनी गाडीची चांगल्याप्रकारे दुरुस्ती केली नाही व सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक्रारदार (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडून मारुती अल्टो 800 ही गाडी दि.10/6/2013 रोजी घेतली. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी गाडीचा विमा उतरवला व गाडीमध्ये बिघाड अगर नुकसान झाल्यास कॅशलेस दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले. दि.8/5/2014 रोजी तक्रारदार खाजगी कामासाठी औरंगाबाद येथे जात होते. सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान मुरमा, ता. पैठण येथे एस.टी. बस क्र.एम.एच.14/एन.9907 ने कारला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. गाडीमधील व्यक्तींना जबरदस्त मुक्का मार लागला. तक्रारदार यांच्या पाठीतील मणक्यात अंतर पडले, असे डॉक्टरांनी सांगितले व त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी घटनेबाबत गुन्हा नोंद केला. थोडया वेळाने तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांना अपघाताची फोन करुन माहिती दिली. विरुध्द पक्ष क्र.2 चे प्रतिनिधी यांनी गाडी अधिकृत सर्व्हीस सेंटर विरुध्द पक्ष क्र.1 औरंगाबाद येथे घेऊन जाण्यास सांगितले. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी 7 दिवसात गाडी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. 7 दिवसानंतर तक्रारदार यांना पुन्हा 8 दिवसांनी येण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा 8 दिवसांनी येण्यास सांगितले. दि.4/6/2014 रोजी तक्रारदार औरंगाबादला गाडी आणण्यासाठी गेल्या. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना दुरुस्तीचा खर्च देण्यास सांगितले. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांना कॅशलेस दुरुस्ती करुन देण्याबद्दल सांगितल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दुरुस्तीचा खर्च वसूल केला. तक्रारदार यांना औरंगाबाद येथे 3 वेळा जाणे भाग पडले व प्रत्येकवेळी रु.6,000/- खर्च आला. तक्रारदार यांना सोबत घरातील 1 व्यक्ती घेऊन जाणे गरजेचे होते.
3. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी गाडी व्यवस्थित दुरुस्त केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.5/6/2014 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे गाडी दाखवली. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी गाडी त्यांच्या सोलापूर येथील वर्कशॉपला नेण्याबद्दल सांगितले. तक्रारदार यांनी दि.6/6/2014 रोजी गाडी सोलापूर येथे नेली. तेथे दुरुस्तीचा रु.28,400/- चे इस्टीमेट करुन देण्यात आले. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांची दिशाभूल केली. तक्रारदार यांना सोलापूर येथे जाण्यासाठी रु.1,500/- खर्च आला. तक्रारदार यांनी उत्पादक विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडे तक्रार केली. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा संपर्क साधला असता नाशिक येथील कार्यालयास संपर्क साधण्याबद्दल सांगितले. तेथेही टोलवाटोलवी केलेली आहे. तक्रारदार यांना औरंगाबाद व सोलापूर येथे जाण्यासाठी रु.19,500/- खर्च आला. तक्रारदार यांनी खाजगी वर्कशॉपमध्ये रु.27,500/- खर्च करुन गाडी दुरुस्त करुन घेतली. ती रक्कम विरुध्द पक्ष यांच्याकडून मिळणे जरुर आहे. तक्रारदार यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु.1,00,000/- मिळणे जरुर आहे. या तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळणे जरुर आहे. म्हणून तक्रारदार यांनी ही तक्रार दि.8/7/2014 रोजी दाखल केलेली आहे.
4. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत ड्रायव्हींग लायसेन्स, आर.सी. बूक, विमा पॉलिसी, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दिलेली पावती, विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दिलेले इस्टीमेट, दि.13/6/2014 रोजी दिलेली नोटीस, दि.18/6/2014 रोजी दिलेली नोटीस, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दिलेले उत्तर इ. कागदपत्रांच्या प्रती हजर केल्या आहेत.
5. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दि.24/2/015 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रारदारांचा तक्रारीमधील मजकूर नाकबूल केलेला आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे विनामुल्य दुरुस्त करुन दिली जात नाही. विनामुल्य पॉलिसी सिस्टीमनुसार प्रत्येक अधिकृत सर्व्हीस केंद्रावर विनामुल्य पॉलिसी सिस्टीम बंधनकारक नाही, हे विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना सांगितलेले होते. तक्रारदार यांनी असे सांगितले की, दुरुस्ती विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडेच करावयाची आहे. इन्शुरन्ससाठी लागणारे सर्व पेपर्स तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे दिले. त्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 यांनी विमा प्रस्ताव इन्शुरन्स कंपनीकडे पाठवला. इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार यांना रु.38,000/- दिलेले आहेत. यावरुन तक्रारदार यांनी खोटी तक्रार केली, हे सिध्द होत आहे. तक्रारदार यांच्या गाडीचे काम दि.26/5/2014 रोजी पूर्ण झाले होते. त्याबद्दल विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना मेसेज व फोन करुन कल्पना दिली. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना सांगितले की, त्या दिल्लीला जाणार आहेत व आल्यानंतर गाडी घेऊन जातील. त्यप्रमाणे दि.4/6/2014 रोजी तक्रारदार दिल्ली येथून औरंगाबादला विमानाने आल्या. चालकाला उस्मानाबाद येथून बोलावून घेतले. गाडी संपूर्ण तपासून घेतली. काम व्यवस्थित झाल्याची खात्री करुनच गाडी ताब्यात घेतली. विरुध्द पक्ष क्र.1 हे तक्रारदार यांना कोणतीही भरपाई देण्यासाठी जबाबदार नाहीत. उलट विरुध्द पक्ष क्र.1 यांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व नोटीस खर्च रु. 4,000/- मिळण्याचा अधिकार आहे.
6. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दि.28/10/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रारदारांच्या तक्रारी अमान्य केलेल्या आहेत. अपघातानंतर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांना फोनवरुन माहिती दिली व विरुध्द पक्ष क्र.2 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे गाडी घेऊन जाण्याचा सल्ला दिला, हे मान्य केले आहे. परंतु सल्ला ऐकण्याचे बंधन तक्रारदार यांच्यावर नव्हते. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी गाडीची दुरुस्तीसाठी कॅशलेस काम केले जाईल, असे सांगितलेले नव्हते. तक्रारदार यांना 3 वेळा औरंगाबादला जावे लागले व त्यासाठी रु.18,000/- खर्च आला, हे कबूल नाही. कॅशलेस दुरुस्ती ही योजना विमा कंपनीची असते. वाहनास नुकसान अगर अपघात झाल्यास त्याची कल्पना विमा कंपनीस दिल्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधी मार्फत वाहनाची तपासणी करुन सर्व्हीस सेंटरला दुरुस्तीचा खर्च अदा करतात. ती सर्वस्वी जबाबदारी विमा कंपनीची असते. त्यासाठी विरुध्द पक्ष क्र.2 कुठल्याही प्रकारे जबाबदार नाहीत. ता. 5/6/2014 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांनी सोलापूर येथील वर्कशॉपमध्ये गाडी दाखवावी, असे सांगितले हे मान्य नाही. सोलापूर येथील वर्कशॉपने रु.28,400/- चे इस्टीमेट दिले, याबद्दल वाद नाही. तक्रारदार यांना सोलापूर येथे जाण्यासाठी रु.1,500/- खर्च आला, हे मान्य नाही. तक्रारदारांनी खोटी तक्रार केली म्हणून त्यांच्याकडून नुकसान भरपाई रु.25,000/- मिळावेत, असे विरुध्द पक्ष क्र.2 यांनी म्हटले आहे.
7. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी दि.25/11/2014 रोजी आपले लेखी म्हणणे दिलेले आहे. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारदार यांना वॉरंटी दिलेली नव्हती, असे म्हटले आहे. वॉरंटीमधून अॅक्सीडेंटमधील रिपेअर्स वगळण्यात आलेले आहेत. उत्पादकाविरुध्द तक्रार चालणार नाही. विक्रेते हे उत्पादकाचे प्रतिनिधी म्हणून काम करीत नाहीत. तक्रारदार यांनी स्वत: इन्शुरन्स कंपनीशी करार केलेला होता. विरुध्द पक्ष क्र.3 यांचा त्या कराराशी संबंध नाही. तक्रारदार स्वच्छ हाताने आलेले नाहीत. अधिकृत वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी काही वेळ लागतो. मात्र तक्रारदार यांनी स्वत: अनधिकृत व्यक्तीकडून गाडीची दुरुस्ती करुन घेतलेली आहे. विरुध्द पक्ष क्र.3 हे तक्रारदार यांना कोणतीही भरपाई देण्यास जबाबदार नाहीत आणि त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
8. तक्रारदार यांची तक्रार, दिलेली कागदपत्रे व विरुध्द पक्ष यांचे म्हणणे यांचे अवलोकन करता आमच्या विचारार्थ खालील मुद्दे निघतात. त्यांची उत्तरे त्यांच्यासमोर खालील दिलेल्या कारणांसाठी लिहिलेली आहेत.
मुद्दे उत्तरे
1. विरुध्द पक्ष यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे काय ? नाही. 2. तक्रारदार अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
9. मुद्दा क्र.1 व 2 :- तक्रारदार यांचे म्हणणे की, त्यांनी त्यांची कार विक्रेते विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून घेतली, त्यावेळेस विरुध्द पक्ष क्र.2 यांनी गाडीला काहीही झाल्यास कॅशलेस दुरुस्ती करुन दिली जाईल, असे सांगितले होते. गाडीचा विमा विरुध्द पक्ष क्र.2 यांनी गाडी खरेदी करताना उतरवला होता. गाडीचे रजिस्ट्रेशन दि.24/6/2013 रोजी झाल्याचे दिसते. विमा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे उतरवल्याचे दिसते. ती पॅकेज पॉलिसी असून कालावधी दि.10/6/2013 ते 9/6/2014 असल्याचा दिसतो. यामध्ये कॅशलेस दुरुस्ती केली जाईल, अशी अट दिसून येत नाही. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी आपल्या म्हणण्यात स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडे कॅशलेस दुरुस्ती केली जात नाही. अशी पॉलिसी त्यांच्यावर बंधनकारक नाही. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दिलेल्या बिलाप्रमाणे एकूण रु.42,772/- चे होते. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी पुढे म्हटले आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांचा विमा प्रस्ताव इन्श्युरन्स कंपनीकडे पाठवला व इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार यांना रु.38,000/- दिलेले आहेत, हा मजकूर चुकीचा आहे असे प्रतिज्ञापत्र तक्रारदार यांच्यातर्फे देण्यात आलेले नाही. त्यामुळेच इन्शुरन्स कंपनीला पक्षकार न केल्याचे दिसते.
10. विरुध्द पक्ष क्र.1 यांचे म्हणणे आहे की, दुरुस्तीचे काम दि.26/5/2014 रोजी पूर्ण झाले होते. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक ला कल्पना दिली होती की, त्यांचे नामांकीत सर्व्हीस स्टेशन असल्यामुळे गाडी पूर्णपणे दुरुस्त झाल्यानंतर तक्रारदार यांना दिली जाणार. दि.26/5/2014 रोजी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिल्ली येथे असल्याचे सांगितले. तसेच दिल्ली येथून आल्यानंतर दि.4/6/2014 रोजी त्यांनी गाडी ताब्यात घेतली. तक्रारदारांची तक्रार अशी आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी प्रथम 7 दिवसांनी, नंतर 8 दिवसांनी, पुन्हा 8 दिवसांनी गाडी दुरुस्त होईल, असे सांगितले. प्रत्यक्षात दि.4/6/2014 रोजी गाडी दुरुस्त केली. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडील जॉबकार्ड तक्रारदार यांनी हजर केलेले नाही. त्यामुळे 7 दिवसात गाडी दुरुस्त होर्इल, असे सांगितल्याबद्दल कागदोपत्री पुरावा नाही. तसेच तक्रारदार यांना 3 वेळो औरंगाबादला जावे लागले व प्रत्येकवेळी रु.6,000/- खर्च आला, हे दाखवण्यासाठी सुध्दा तक्रारदार यांनी कागदोपत्री पुरावा दिलेला नाही.
11. असे दिसते की, विरुध्द पक्ष क्र.2 यांचे सोलापूर येथील वर्कशॉपमध्ये इिद.6/6/2014 रोजी रु.28,400/- चे इस्टीमेट देण्यात आले. तक्रारदार यांच्या गाडीला एस.टी. बसने पाठीमागून धडक दिली होती, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दिलेल्या पावतीप्रमणे 20 आयटेमचे 21 नग लागले होते व त्याची किंमत रु.12,172/- होती. मात्र अंतीम बील रु.42,172/- झाले. वाढलेले रु.30,000/- मजुरीचे होते किंवा कसे, याबद्दल खुलासा होत नाही. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दिलेल्या इस्टीमेटमध्ये 16 आयटेम दाखवलेले असून त्याची किंमत रु.17,200/- दाखवलेली आहे. एकूण इस्टीमेट रु.28,400/- चे आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांना हे इस्टीमेट कबूल आहे. मात्र ते वेगळयाच आयटेमचे दिसून येते. ती दुरुस्ती करण्यासाठी काय गरज होती ? याबद्दल पुरेसा पुरावा नाही.
12. हैद्राबाद मोटार गॅरेजच्या पावत्या तक्रारदार यांनी हजर केल्या आहेत. त्यामध्ये पाठीमागील व पुढच्या भागातील आयटेमचा समावेश आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे सुध्दा ते आयटेम बसवल्याचे दिसते. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडील जॉबकार्ड हजर न केल्यामुळे काय काय दुरुस्ती जरुरी होती, हे कळून येत नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.2 यांचे सोलापूर वर्कशॉपला सुध्दा पक्षकार करण्यात आलेले नाही. हैद्राबाद मोटार गॅरेजचे सुध्दा जॉबकार्ड हजर करण्यात आलेले नाही. त्यामुळे गाडीची आणखी दुरुस्ती जरुरी होती, हे दाखवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही.
13. वर म्हटल्याप्रमाणे कॅशलेस दुरुस्तीची हमी विरुध्द पक्ष्यांनी घेतल्याबद्दल पुरेसा पुरावा नाही. विरुध्द पक्ष क्र.1 यांचे म्हणणे की, इन्शुरन्स कंपनीकडून तक्रारदार यांना रु.38,000/- भरपाई मिळाली आहे, हे तक्रारदार यांनी खोडून काढलेले नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दुरुस्ती केल्यानंतर आणखी दुरुस्ती जरुरी होती, हे दाखवण्यासाठी तज्ञाचा पुरावा नाही. त्यामुळे तक्रारदार विरुध्द पक्ष यांच्याकडून भरपाई मिळण्यास पात्र नाही, हे सिध्द होते. विरुध्द पक्ष यांनी सेवेत त्रुटी केली, असे आमचे मत नाही. त्याच प्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दिलेले वॉरंटी कार्ड तक्रारदार यांनी हजर केलेले नाही. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी वॉरंटी दिली होती, हे दाखवण्यासाठी कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. इन्शुरन्स कंपनीला सामील करणे जरुरी असताना तक्रारदारांनी तक्रारीत सामील केलेले नाही. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी अपघातामधील भरपाई देण्याचे कबूल केले, हे दाखवण्यासाठी पुरावा नाही. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते.2. खर्चासंबंधी कोणतेही आदेश नाहीत.3. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद