न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे तक्रारीत नमुद पत्त्यावर राहतात. तक्रारदार हे शेती करतात व त्यांचा मुलगा शिकागो येथे शिक्षणासाठी गेला आहे. तक्रारदारांना सन-2017 मध्ये दिवाळीत मुलाला फराळ व आवश्यक स्टेशनरी पाठविणेची होती. कारण स्टेशनरी साहित्य शिकागो येथे अत्यंत महाग आहे. वि प कुरिअर क्षेत्रात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. त्यांचे कोल्हापूर येथे कार्यालय आहे. त्यामुळे सदरचा दिवाळी फराळ व स्टेशनरी साहित्य वि प यांचेमार्फत मुलाला पाठविणेचे तक्रारदार यांनी ठरविले. याबाबत वि प यांचे कोल्हापूर शाखेत विनोद पवार या प्रतिनिधीशी सविस्तर चर्चा केली. चर्चेमध्ये ठरल्याप्रमाणे फराळाचे साहित्य व स्टेशनरी घेऊन दि.10/10/2017 रोजी तक्रारदारांनी विनोद पवार यांचे ताब्यात दिले. सदर साहित्य विनोद पवार यांनी तक्रारदारांच्या समोर पॅक केले. वि प यांनी 5 ते 6 दिवसात कुरीअर पोहोचेल अशी हमी तक्रारदारास दिली. फराळाचे व स्टेशनरीचे मुल्यांकन रु.14,970/- केले व कुरिअर चार्जेस रु.5,950/- झाले. तक्रारदारांनी त्याप्रमाणे पैसे देऊन पावती घेतली व मुलाला फोन करुन सांगितले. त्यानंतर 5 ते 6 दिवसांनी तक्रारदाराचे मुलाला कुरिअर न मिळालेने तक्रारदार यांनी शिकागो येथील कार्यालयात मुलामार्फत चौकशी केली असता.तेथील वि प यांचे कार्यालयाने स्क्रॅप्ड व डॅमेज्ड असे पत्र दिले. त्यामुळे तक्रारदार व त्यांचे मुलाला दिवाळी कष्टप्रद व मानसिक त्रासाची गेली. याबाबत वि प यांनी कोणताही सकारात्मक तोडगा न काढलेने तक्रारदार यांनी दि.09/01/2018 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीसला वि प यांनी कोणतीही दाद दिली नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली असलेने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज या मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने याकामी कुरिअर चार्जेसची रक्कम रु.6,000/-, नाश झालेल्या सहित्याची रक्कम रु.15,000/- तक्रारदाराच्या मुलाचा शिकागो येथील प्रवास खर्च व तक्रारदारांचा फोनचा व प्रवास खर्च रु.5,000/- मनसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- असे एकूण रक्कम रु.41,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळावेत अशी विनंती याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वादातील कुरिअरने पाठविलेल्या सामानाची यादी, कुरिअरची पावती, डिलीवरी ट्रॅकींग रिपोर्ट, शिपमेंट स्टेटसबाबतची काढलेली माहिती, डिलीव्हरी इन्फर्ममेशनबाबत वि प यांच्या शिकागो कार्यालयाचे दिलेले पत्र, वि प यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, त्याची पोचपावती व वि पयांचे व्हिजीटींग कार्ड इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. सरतपासाचे अॅफिडेव्हीट तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व सरतपासाचे अॅफिडेव्हीट व लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नाही. वि.प. यांचे म्हणणेप्रमाणे तक्रारदार यांनी त्यांच्या घरातूनच पॅकींग करुन आणलेली वस्तु कुरिअर करणेसाठी वि प यांचेकडे दिलेली होती. संबंधीत व्यक्तीस सदरचे पॅकींग मिळण्यासाठी 20 दिवस लागणार असे तक्रारदारास सांगण्यात आले होते. तक्रारदार यांनी सदर कुरिअरमध्ये फराळाचे साहित्य असल्याची माहिती वि प यांना दिलेली होती. सदरचे फराळाचे साहित्य खराब झालेस वि प हे जबाबदार नाहीत असे सांगूनदेखील तक्रारदार यांनी सदरचे कुरिअर पाठविले होते. सदर कुरिअरमध्ये तक्रारदार यांनी जोडलेल्या वर्णनानुसार रु.8,920/- किंमतीचा फराळ असलेचे दिसून येते. तर तक्रारीच्या तपशिलामध्ये नाश झालेल्या सहित्याची किंमत रु.15,000/- नमुद केलेली आहे. यावरुन तक्रारदार यांना वि प यांचेकडून रक्कम हडप करण्यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. सदर कुरिअर वि पयांनी वेळेत पाठविलेले आहे. परंतु शिकागोमध्ये सदरचे कुरिअर गेलेनंतर संबंधीत तक्रारदार यांचे दिलेल्या पत्तयावर पार्सल घेऊन गेले असता तक्रारदार यांचा मुलगा भेटला नाही. त्यामुळे तक्रारदाराचे मुलाशी फोनवरुन संपर्क करुन तसेच ई मेलव्दारे पार्सल घेऊन जाणेबाबत कळवूनही त्यांनी पार्सन न नेलेने ते त्याचठिकाणी पडून राहिले. यात तक्रारदाराच्या मुलाची चुकी आहे. तसेच कुरिअर पाठविण्यापूर्वी तक्रारदारास कुरिअरचे सर्व्हीसचे अटी व शर्तीबाबत सुचना केली होती. त्या अटी व शर्ती तक्रारदार यांना मान्य व कबुल केल्यानंतरच सदर वि प यांनी तक्रारदार यांचे कुरिअरव्दारे पार्सल पाठविले होते. सदर अटी व शर्तीनुसार तक्रारदार यांनी पार्सलबाबतची तक्रार 30 दिवसात केलेली नाही. त्यामुळे सदरची तक्रार चालवण्यास पात्र नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सेवेत त्रुटी/कमतरता दिली आहे काय? | होय. |
3 | तक्रारदार वि.प. यांचेकडून कुरिअर पॅकींग साहित्याची रक्कम, कुरिअर चार्जेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
मुद्दा क्र.1 ते 4
6. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी कागदयादीसोबत अ.क्र.1 कडे दाखल केलेल्या वि प यांच्या एक्सप्रेस कुरिअर सर्व्हीसेस च्या दि.10/10/17 रोजीच्या पावतीचे अवलोकन केले असता सदरची पावती तक्रारदारचे नांवे असून कुरिअर पाठविण्याचा पत्ता युएसए व कुरिअर मिळणा-या व्यक्तीचे नांव धनंजय पाटील वजन 9.670 कि.ग्र. चार्जेस रु.5,950/- नमुद असलेचे दिसून येते. तसेच वि प यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदार यांनी कुरिअर पाठविल्याचे मान्य केलेले आहे. यावरुन तक्रारदार हे वि प यांचे ग्राहक असलेचे सिध्द होते. तक्रारदार व वि प यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असलेने स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र.1चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. नि.4/1 ला दाखल केलेल्या फराळाची यादीवरुन असे दिसते की, तक्रारदाराने वि प कुरिअरमार्फत रक्कम रु.8,920/- चे फराळाचे व स्टेशनरी साहित्या पाठविलेले होते. तसेच नि.4/2 कडील वि प यांचे पावतीवरुन सदरचे साहित्या दि.10/10/17 रोजी पाठविलेचे दिसते त्यासाठी कुरिअर चार्जेस रक्कम रु.5,950/- इतके तक्रारदाराने वि प यांना अदा केलेचे स्पष्ट होते. नि.4/3 कडे तक्रारदाराने FexEx यांचा ट्रॅकींग रिपोर्ट दाखल केलेला आहे. सदर ट्रॅकींग रिपोर्टचे अवलोकन केले असता दि.20/10/17 रोजी शिकागो येथे पार्सल डिलीवरी झालेबाबत दिसून येते. तसेच नि.4/4 कडे शिपमेंट स्टेटसची प्रत दाखल केलेली आहे. तसेच नि.4/4 कडे डिलीव्हरी इर्न्फमेशन चा रिपोर्ट दाखल केला आहे. त्यावर डॅमेज्ड अॅन्ड स्क्रॅप्ड शेरा असलेचे दिसते. यावरुन तक्रारदार यांना कुरिअर सेवा देणेमध्ये वि.प. असमर्थ ठरले आहेत ही बाब सिध्द होते. तक्रारदाराने सादर केलेला पुरावा हा त्याची संपूर्ण केस शाबीत करण्याकरिता पुरेसा आहे. हा सर्व पुरावा जसाच्या तसा मान्य करण्यासारखा आहे, कारण वि प यांनी तक्रारदाराची तक्रार खोटी असलेचे शाबीत करणेकरिता म्हणणे व शपथपत्राव्यतिरिक्त कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तसेच म्हणणेमध्ये तक्रारदाराचे फराळ व स्टेशनरीचे कुरिअर शिकागो येथे पाठविलेचे मान्य व कबूल केले आहे. तसेच सदरचे पार्सल तक्रारदाराचे मुलाने घेतले नसलेबाबतचा कोणताही पुरावा वि प यांनी सदर प्रकरणी दाखल केलेला नाही. त्यामुळे वि.प. हे तक्रारदारास कुरिअरची सेवा देण्यास असमर्थ ठरले आहेत हे सिध्द होते. सबब, तक्रारदाराने आपली केस पूर्णतया शाबीत केलेली असून वि.प. यांनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे असा या मंचाचा निष्कर्ष आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
8. तक्रारदाराने वि.प. यांचेकडून याकामी कुरिअर चार्जेसची रक्कम रु.6,000/-, नाश झालेल्या सहित्याची रक्कम रु.15,000/- तक्रारदाराच्या मुलाचा शिकागो येथील प्रवास खर्च व तक्रारदारांचा फोनचा व प्रवास खर्च रु.5,000/- मनसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- असे एकूण रक्कम रु.41,000/- ची मागणी वि.प. यांचेकडून केली आहे. तक्रारदाराने नि.4/1 कडे दाखल केलेल्या कुरिअरने पाठविलेल्या यादीचे अवलोकन केले असता फराळ व स्टेशनरी साहित्याचे मिळून रक्कम रु.8,920/- व कुरिअर चार्जेसची रक्कम रु.5,950/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे. तसेच सदर रकमेवर तक्रारदार हे पार्सल पाठवले त्या तारखेपासून म्हणजे दि.10/10/2017 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेसही पात्र आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे. परंतु तक्रारदाराने मानसिक त्रासापोटीची रक्कम रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- ची मागणी ही अवास्तव व अवाजवी वाटते. प्रस्तुत प्रकरणाचा एकूण सारासार विचार करता तक्रारदाराला मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.3,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- वि.प. ने तक्रारदारास अदा करणे न्यायाचित वाटते. म्हणून मंच मुद्दा क्र.3 चे उत्तर होय अंशत: असे देऊन प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श –
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प.यांनी तक्रारदाराला कुरिअरच्या पार्सलची किंमत रु.8,920/-(रक्कम रुपये आठ हजार नऊशे वीस फक्त) व कुरिअर चार्जेस रु.5,950/- (रक्कम रु.पाच हजार नऊशे पन्नास फक्त) अदा करावी व सदर रकमेवर पार्सल कुरिअर केले तारखेपासून म्हणजे दि.10/10/17 पासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) वि.प. यांनी तक्रारदाराला मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार फक्त) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- (रक्कम रुपये दोन हजार फक्त) अदा करावी.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27
प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.