जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्या – श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – 99/2011
तक्रार दाखल दिनांक – 18/05/2011
तक्रार निकाली दिनांक – 30/11/2012
श्री.उखाजी झिंगा महाजन. ----- तक्रारदार
उ.व.79 वर्षे,धंदा-शेती,
रा.प्लॉट नं.24,दुध डेअरी कॉलनी,
मांडळ रोड,मु.पो.शिरपुर,ता.शिरपुर,जि.धुळे.
विरुध्द
मार्केटींग मॅनेजर, ----- विरुध्दपक्ष
नापतोल ऑन लाईन शॉपींग प्रा.लि.,
युनिट क्र.418,बि.नं.2,सेक्टर-1,
मिलीनियम बिजनेस पाक महापेठ,
नवी मुंबई-4000710
न्यायासन
(मा.अध्यक्षः श्री.डी.डी.मडके.)
(मा.सदस्याः श्रीमती.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.सुमंत एस.जोशी)
(विरुध्दपक्ष – वकील श्री.राजेष एन.अग्रवाल)
--------------------------------------------------------------------
निकालपत्र
(1) मा.अध्यक्ष,श्री.डी.डी.मडके. – विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना योग्य व तत्पर सेवा देण्यात कसुर केली म्हणून नुकसानभरपाई मिळणे करिता, तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, विरुध्दपक्ष यांचा विविध प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तु, उपकरणे, घरगुती वापराच्या वस्तु, वैद्यकिय उपकरणे व जिवनावश्यक वस्तुंची वृत्तपत्रात जाहिरात करुन विक्री करण्याचा व्यवसाय आहे. सदर विक्री वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या जाहिरातीतील सूचना नुसार व दिलेल्या फोन क्रमांकावर दुरध्वनीसंपर्क साधून, वस्तुंची किंमत अदा करुन वस्तु प्राप्त करुन घ्यावयाची असते. अथवा दुरध्वनीवर मागणी केलेले उत्पादन विरुध्दपक्षाच्या त्या त्या भागातील एजंटनुसार किंमत स्वीकारुन ग्राहकांपर्यंत डिलेव्हरी केले जाते.
(3) विरुध्दपक्षाचे धुळे शहरात वेलकम इंडिया नावाचे वितरक एजंट आहेत. त्या एजंटचा झिप नं.424001 असा असून सेलर रेफरन्स नं.790253 असा आहे. तक्रारदारास वयोमानानुसार गुढघे दुखीचा त्रास असल्याने त्यांनी विरुध्दपक्षाने वर्तमानपत्रात जाहिरात दिलेल्या सूचने नुसार बायोमॅग्नेटीक टॉटेनियम ब्रेसलेट बी-001 किंमत रु.2,999/- खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली. सदर उपकरण सांधेदुखी, रक्ताभिसरण यावर चांगले गुणकारी आहे व रुग्णास फायदा होतो असे जाहिरातीत म्हटल्याने, तक्रारदाराने सदरची ऑर्डर दिली. सदरचे उत्पादन तक्रारदारास विरुध्दपक्षाच्या धुळे शहरातील वेलकम इंडिया या वितरकाकडून धुळे येथे दि.23-09-2010 रोजी प्राप्त झाले. ते तक्रारदाराने रक्ताभिसरण व गुढगे दुखी करिता तीन महिने वापरुन देखील विरुध्दपक्षाने वृत्तपत्रात नमुद केलेल्या वैशिष्ठयाप्रमाणे व शास्त्रीय गुणधर्मानुसार गुण मिळाला नाही व तक्रारदारास त्याचा काही एक फायदा झाला नाही. म्हणून तक्रारदाराने विरुध्दपक्ष कंपनीशी व त्यांच्या धुळे शहरातील वितरकाशी संपर्क साधून उपकरणाचा फायदा मिळत नसल्याबद्दल तोंडी तक्रार केली. त्यावर अजून थोडे दिवस थांबा फायदा होईल, विश्वास ठेवा असे आश्वासन विरुध्दपक्षाने दिले. परंतु फायदा न मिळाल्याने दि.29-03-2011 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठवून भरपाईची मागणी केली. तरीही विरुध्दपक्ष यांनी नुकसान भरपाई दिली नाही व वस्तु बदलून दिली नाही.
(4) विरुध्दपक्ष यांनी वस्तुची जाहिरपणे प्रसिध्दी करुन, प्रलोभन दाखविले तथापि वैशीष्टयाप्रमाणे वस्तुचा गुण मिळत नसल्याने फसवणुक केली. त्यामुळे तक्रारदारास मानसिक, शारीरिक त्रास झाला आहे. म्हणून विरुध्दपक्ष यांचेकडून नुकसानीपोटी रक्कम रु.10,000/- तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळावेत आणि इतर योग्य ते न्यायाचे हुकूम तक्रारदाराचे लाभात व्हावेत अशी शेवटी विनंती केली आहे.
(5) तक्रारदार यांनी आपल्या कथनाचे पृटयार्थ शपथपत्र तसेच दस्तऐवजाच्या यादीनुसार एकूण सहा कागदपत्रे पुराव्यासाठी दाखल केली आहेत. त्यात विरुध्दपक्ष यांनी दिलेल्या जाहिरातीचे पेपर, ऑर्डर नंबरची पावती, सिस्टम चलन, पर्चेस चलन, रॅपर व त्यावरील डिटेल, नोटिस या छायांकीत प्रती आहेत.
(6) विरुध्दपक्ष यांनी आपला खुलासा दाखल केला असून, त्यात त्यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदारांनी सेलर रेफरन्स नं.790253 अन्वये वस्तु खरेदी केली आहे. मात्र दि.29-03-2011 रोजी त्याची वॉरंटी संपल्याने त्यासाठी कोणतीही दुरुस्ती अथवा वस्तु बदलून देणे किंवा पैसे देण्याची आता त्यांची जबाबदारी नाही. ते कोणत्याही उत्पादनाचे उत्पादक नाहीत. तक्रारदाराने योग्य पध्दतीने तक्रार केली नाही. तक्रारीस नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज व मिस जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाचा बाध येत आहे. तक्रारदारास गुण न मिळाल्याचे कथन खरे नाही. तसे कसे व कोणते गुण व फायदा तक्रारदारास अपेक्षीत होते व आहे याचा तपशील तक्रारदाराने नमुद केलेला नाही. कोणत्याही गोष्टीचे गुण वयोमान, शारीरिक परिस्थिती, वातावरण, व्यक्ती परत्वे शरीर, मानसिकता, वापरण्याची पध्दत, यापुर्वीचे आजार, शारीरिक दोष, व्याधी, उपकरणाची माहिती व ज्ञान तसेच वापरण्याची त-हा यावर तसेच इतरही अनेक गोष्टीवर अवलंबून असते. सदर उत्पादन आजपर्यंत शेकडो व्यक्तींना दिलेले आहे परंतु आजपर्यंत कोणाचीही तक्रार नाही. इत्यादी कथन करुन तक्रार नाकारली आहे आणि शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
(7) विरुध्दपक्ष यांनी शपथेवर आपला खुलासा दाखल केला आहे. परंतु पुराव्यासाठी कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
(8) तक्रारदारांची कैफीयत, विरुध्दपक्ष यांचा खुलासा तसेच दाखल कागदपत्रांवरुन आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? | ःहोय. |
(ब)तक्रारदार खरेदी केलेल्या वस्तुची किंमत व नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? | ःहोय. |
(क)आदेश काय ? | ःअंतिम आदेशानुसार |
विवेचन
(9) मुद्दा क्र. ‘‘अ’’ - तक्रारदारांनी वर्तमानपत्रातील विरुध्दपक्ष यांची जाहीरात पाहून त्यांचेकडून ऑर्डर देऊन बायोमॅग्नेटीक टॉटेनियम ब्रेसलेट बी-001 हे किंमत रु.2,999/- देऊन खरेदी केल्याचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. तसेच विरुध्दपक्ष यांनीही ते मान्य केले आहे. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(10) मुद्दा क्र. ‘‘ब’’ - तक्रारदारांना गुढघे दुखीचा त्रास आहे. बायोमॅग्नेटीक टाइटेनियम ब्रेसलेट बाबत वर्तमानपत्रातील विरुध्दपक्षाची जाहिरात वाचून त्यात दिलेल्या गुणधर्माप्रमाणे गुढघेदुखीपासून आराम मिळावा या हेतून, बायोमॅग्नेटीक टाइटेनियम ब्रेसलेट बी-001 किंमत रु.2,999/- चे विकत घेणेसाठी विरुध्दपक्षाच्या धुळे येथील वेलकम इंडिया नावाच्या झिप नं.424001 या एजंट मार्फत सेलर रेफरन्स नं.790253 अन्वये ऑर्डर देऊन खरेदी केल्याचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. तसेच जाहीरातीत दिल्याप्रमाणे तक्रारदारांना गुढघेदुखीवर त्याचा काहीही गुण मिळाला नाही व वैशिष्टया प्रमाणे आणि शास्त्रीय गुणधर्मानुसार फायदा झाला नाही. बायोमॅग्नेटीक टाइटेनियम ब्रेसलेट बी-001 वापरुनही फायदा न झाल्याने विरुध्दपक्षाच्या धुळे येथील वितरकाशी संपर्क साधून तोंडी तक्रार केली, जाहिरातीत नमुद केलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधला असता उत्तर मिळाले नाही, तसेच विरुध्दपक्षास दि.29-03-2011 रोजी वकीला मार्फत नोटिस पाठवूनही वस्तुची किंमत व नुकसान भरपाई मिळाली नाही हे तक्रारदारांनी शपथेवर कथन केले आहे.
(11) विरुध्दपक्ष यांनी त्यांचे खुलाशात म्हटल्या प्रमाणे ते केवळ वस्तुचा मागणी प्रमाणे पुरवठा करतात ते उत्पादक नाहीत. हे कथन जरी थोडयावेळा साठी स्वीकारले तरीही, ते वितरीत व पुरवठा करीत असलेल्या वस्तुंची जाहीरात संबंधीत वस्तुच्या उत्पादकांनी दिलेली नसून ती विरुध्दपक्ष यांनीच दिलेली आहे हे दाखल वर्तमानपत्रातील जाहिरातीवरुन स्पष्ट होते. त्यामुळे जाहिरातीत दिलेल्या वस्तुच्या गुण वैशिष्टयांची हमी ही संबंधीत वस्तुच्या उत्पादकाच्या वतीने विरुध्दपक्ष यांनीच दिली आहे असे म्हणणे योग्य होईल. कारण तक्रारदाराने सदर प्रकरणी दाखल केलेल्या जाहिरातीचे व कागदपत्रांचे बारकाईने निरीक्षण केले असता हे स्पष्ट होते की, जाहिरातीमध्ये केवळ विरुध्दपक्ष यांचेच नाव व पत्ता आहे. त्या जाहिरातीत कोठेही, वर्णन केलेल्या वस्तुच्या उत्पादकाचा पत्ता, वस्तुचे वजन, वस्तु बनविल्याचा दिनांक, वस्तु कालबाहय होण्याचा दिनांक इत्यादी विक्री विषयक महत्वाच्या व अत्यावश्यक कायदेशीर बाबीची कोणतीही माहिती नमूद केलेली नाही. यावरुनही हेच दिसून येते की, विक्री करतेवेळी संबंधीत वस्तुच्या उत्पादकाने त्या वस्तुबाबत कोणतीही हमी स्वीकारलेली नाही. त्यामुळे विक्री पश्चात सेवा पुरविणे ही विरुध्दपक्ष यांचीच कायदेशीर जबाबदारी व कर्तव्य आहे.
(12) तक्रारदाराने स्वतःचा गुढघे दुखीचा त्रास कमी व्हावा या हेतूने वर्तमानपत्रातील विरुध्दपक्षाच्या जाहिरातीत वर्णन केलेले गुणधर्म व शास्त्रीय उपयुक्तता (प्रतिबंध, उपचार, वेदनामुक्ती, वेदनांपासून मुक्ती, अँटी-एजिंग गुणधर्म, रेडियेशन कंट्रोल करतो, रक्ताभिसरण वाढवते) याकडे आकर्षीत होऊन धुळे येथील विरुध्दपक्षाच्या प्रतिनिधी मार्फत बायोमॅग्नेटिक टाइटेनियम ब्रेसलेट खरेदी केले आहे. त्यामुळे या न्यायमंचाचे कार्यक्षेत्रात व्यवहार झाला असल्यासने, सदर तक्रार चालविण्याचा या न्यायमंचास पुर्ण अधिकार आहे. सदर वस्तुचा वापर करुनही गुढघे दुखीचा त्रास कमी होत नसल्याने निराश होऊन व आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यावर तक्रारदाराने विरुध्दपक्षाच्या धुळे प्रतिनिधीशी संपर्क साधला, दुरध्वनीद्वारे विरुध्दपक्षाशी संपर्क साधला तसेच वकीला मार्फत नोटिसही पाठविली, तरीही विरुध्द यांनी तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. तक्रारदारास त्यांनी विकत घेतलेल्या वस्तुच्या उत्पादक कंपनीचा पत्ता कळविला नाही, किंवा तक्रारदार व सदर वस्तुची उत्पादक कंपनी यांचेमध्ये वस्तु बदलून देणे किंवा वस्तुचे पैसे परत करणे या बाबत समझोता/समन्वय साधण्याचे कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. तसेच विरुध्दपक्ष यांनी विक्री केलेली वस्तु खरोखरीच, मानवी शरीराचे विकार, व्याधी, दुखणे यावर जाहीरातीत नमूद केल्या प्रमाणे वैद्यकीय दृष्टया उपयोगी व सक्षम असल्याचे कोणत्याही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाचे शपथपत्र अथवा वैद्यकीय लिखीत साहित्य दाखल केलेले नाही. याचाच अर्थ सदर वस्तुमध्ये जाहिरातीत वर्णन केल्या प्रमाणे वैद्यकीय गुणधर्म नाहीत अथवा सदर वस्तुमध्ये उत्पादीत दोष आहे याची विरुध्दपक्षास संपूर्ण जाणीव आहे असेच म्हणावे लागेल. या सर्व बाबीवरुन विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेत त्रृटी असल्याचे स्पष्ट होते.
(13) तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून नोटिस खर्च रु.1,500/-, वस्तुची किंमत रु.2,999/-, तक्रारीचा खर्च रु.3,000/-, नुकसान भरपाई रु.10,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे. परंतु आमच्या मते तक्रारदार वस्तुची किंमत रु.2,999/- परत मिळण्यास तसेच शारीरिक, मानसिक त्रासासाठी नुकसानीपोटी रु.1,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु.500/- मिळण्यास पात्र आहेत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(14) मुद्दा क्र. ‘‘क’’ – उपरोक्त सर्व विवेचनावरुन न्यायाचे दृष्टीने हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(ब) विरुध्दपक्ष यांनी, या आदेशाच्या प्राप्ती पासून पुढील 30 दिवसांचे आत.
(1) तक्रारदारास बायोमॅग्नेटिक टाइटेनियम ब्रेसलेटच्या किमतीपोटी रक्कम 2,999/-( अक्षरी रुपये दोन हजार नऊशे नव्यान्नव फक्त) परत द्यावेत. (ही रक्कम मिळाल्यानंतर तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून प्राप्त झालेले बायोमॅग्नेटिक टाइटेनियम ब्रेसलेट व त्यासोबत इतर काही उपकरणे मिळाली असल्यास त्यासह विरुध्दपक्षास स्वखर्चाने पोहोचदेय डाकेने त्यांचे पत्त्यावर परत पाठवावे )
(2) तक्रारदारास मानसिक, शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम 500/- (अक्षरी रुपये पाचशे फक्त) द्यावेत.
(3) उपरोक्त आदेश कलम 1 व 2 मध्ये नमूद केलेली रक्कम मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखे पासून ते संपूर्ण रक्कम देईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज तक्रारदारास द्यावे.
धुळे.
दिनांकः 30-11-2012.
(श्रीमती.एस.एस.जैन.) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.