नि.17 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 271/2010 नोंदणी तारीख – 8/12/2010 निकाल तारीख – 7/2/2011 निकाल कालावधी – 90 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री मधुकर धाकोजीराव राजेकदम रा.विकासनगर, खेड ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री अभिजित बाबर) विरुध्द 1. मराठा सहकारी पतसंस्था लि.सातारा तर्फे मराठा भवन, 506/10, प्लॉट नं.8, एस.टी.स्टँड मागे, सदर बझार, सातारा तर्फे व्यवस्थापक, श्री दिलीप आनंदराव देशमुख रा. मराठा भवन, 506/10, प्लॉट नं.8, एस.टी.स्टँड मागे, सदर बझार, सातारा तर्फे व्यवस्थापक, श्री दिलीप आनंदराव देशमुख 2. चेअरमन, श्री नरेंद्र मोहन पाटील रा.27, मॅगेझीन कॉलनी, सदर बझार, सातारा फलटण जि. सातारा तर्फे 3. व्हा.चेअरमन, श्री अशोक रामचंद्र जाधव रा.154, रविवार पेठ, सातारा ----- जाबदार न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत दोन वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. तसेच अर्जदार यांचे जाबदार संस्थेतील बचत खात्यामध्ये काही रक्कम शिल्लक आहे. ठेवींची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, बचत खात्यातील रक्कम मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1 ते 3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.11 कडे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचा कारभार पारदर्शी असाच होता. परंतु कर्ज येणे थकबाकी यामुळे जाबदार यांचे आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला. अर्जदारची रक्कम एकरकमी परत करणे शक्य नाही याची अर्जदार यांना जाणीव होती. जाबदार संस्थेचे दि.16/5/2010 रोजीचे विशेष सर्वसाधारण सभेमधील ठरावाप्रमाणे अर्जदार यांची कथने प्रामाणिकपणाची नाहीत. जाबदार यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही. सद्यस्थितीत जाबदार संस्थेचा कारभार प्रशासकीय अधिका-यांमार्फत चालत असते. सबब जाबदार क्र.2 व 3 यांना याकामी अनावश्यक पक्षकार केलेले आहे. अर्जदार हे दि.10/5/2007 ते 4/2/2008 या कालावधीत जाबदार संस्थेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. या कालावधीतील लेखा परिक्षणातील दोषावरुन त्यांचेविरुध्द चौकशी सुरु आहे. दि.16/5/2010 चे ठरावानुसार जाबदार संस्थेचा कारभार चालू आहे. त्यानुसार जाबदार हे अर्जदार यांना त्यांचे बचत खात्यावरील रक्कम देणेस तयार आहेत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. अर्जदारचे विधित्याचा युक्तिवाद ऐकला. तसेच नि.16 कडील जाबदारची पुरसिस पाहिली. तसेच दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 4. जाबदार क्र.1 ते 3 यांनी नि.11 कडे कैफियत देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदारने अर्जदार दि.10/5/2007 ते 4/2/2008 या काळात व्यवस्थापक होते व त्यांचे काळात लेखापरिक्षणात दोष आढळलेने सहायक निबंधक यांनी कलम 88 प्रमाणे चौकशी लावली व ती प्रलंबित आहे. दि. 16/5/2010 रोजी सभासदांचे सभंत ठराव झाले आहेत ते सर्वांवर बंधनकारक आहेत. सदर ठरावाप्रमाणे सेव्हिंग्ज खातेवरील रक्कम देणेस संस्था तयार आहे. अर्जदारची मागणी कबूल नाही. ती प्रामाणिकपणाची नाही, सामनेवाला क्र.2, 3 आवश्यक पक्षकार नाहीत. तक्रार फेटाळावी अशी कैफियत दिसते. 5. निर्विवादीतपणे नि.5 कडे अर्जदारने कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.6 कडे मूळ ठेवपावत्या असून नि.7 कडे सेव्हिंग्ज खाते पुस्तक आहे. ठेवपावतीवरील ठेव ठेवलेची तारीख पाहता ती 9/2/2009 अशी आहे. सबब जाबदार संस्थेतून नोकरी सोडलेनंतर 1 वर्षांनी ठेव ठेवलेचे दिसते. तसेच दि.16/5/2010 च्या ठरावाची नक्कल पाहता अर्जदार व्यवस्थापक होते म्हणून संस्था आर्थिक अडचणीत आली आहे असे नमूद असलेचे दिसून येत नाही. जाबदार कथन करतात त्याप्रमाणे अर्जदारचे दोषामुळे संस्था अडचणीत आली असती तर तसे ठरावामध्ये संस्थेने नमूद करणेस हरकत नव्हती. निर्विवादीतपणे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम 88 बाबतची कोणतीही कागदपत्रे कामात दाखल नाहीत. सबब जाबदारचे कथनात तथ्य दिसून येत नाही असे या मंचाचे मत आहे. 6. निर्विवादीतपणे ग्राहकाला आपली संपूर्ण रक्कम मागणेचा अधिकार कायद्याने आहे असे अधिकार केवळ ठराव करुन संस्था डावलू शकत नाही. 7. अर्जदार यांनी नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि. 6 व 7 कडे ठेव पावत्यांच्या मूळ प्रती व बचत खात्याचे पासबुक दाखल केले आहे. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्पष्ट दिसत आहे. तसेच नि. 7 कडील बचत खात्याचे पासबुकाचे अवलोकन केले असता त्या खात्यामध्येही रक्कम शिल्लक असल्याचे दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र पाहिले असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब ठेवीची मुदत संपलेनंतर अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 5 सोबतच्या नि. 6 कडील ठेवींच्या रकमा पावत्यांवरील नमूद व्याजासह द्यावी व ठेवीची मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्याव्यात तसेच नि. 7 कडील बचत खात्यातील शिल्लक रक्कम व्याजासहित द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 8. जाबदार क्र.1 हे व्यवस्थापक असून संस्थेचे संचालक नाहीत किंवा ते संचालक असलेबाबतचा कोणताही पुरावा अर्जदारने दाखल केला नाही. सबब जाबदार क्र.1 यांना वैयक्तिक अर्जदारची ठेव रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत नसून संस्थेसाठी त्यांना रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे. सबब जाबदार क्र. 2 व 3 यांना स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र. 1 यांना अर्जदारच्या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 9. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 2 व 3 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र. 1 यांनी अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र.1251 व 1252 कडील रक्कम ठेव ठेवलेल्या तारखेपासून ठेवीची मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवरील नमूद व्याजासह द्यावी तसेच मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 3. बचत खाते क्र.7342/83 कडील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 4. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- द्यावी. 5. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 7/2/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |