नि.19 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 17/2011 नोंदणी तारीख – 28/1/2011 निकाल तारीख – 5/5/2011 निकाल कालावधी – 97 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री बाळकृष्ण कृष्णा सपकाळ 2. सौ कुसुम बाळकृष्ण सपकाळ दोघेही रा. यशवंतनगर, वाई, ता. वाई जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री एम.डी.निवंडकर) विरुध्द 1. मराठा सहकारी पतसंस्था लि. सातारा शाखा वाई करिता शाखाप्रमुख श्री बाळासाहेब गंगाराम जाधव मार्केट यार्ड वाई ता.वाई जि. सातारा 2. मराठा सहकारी पतसंस्था लि. सातारा शाखा वाई करिता व्यवस्थापक श्री दिलीप आनंदराव देशमुख रा.मराठा भवन, 506/10, प्लॉट नं.8, एस.टी.स्टँडमागे, सदरबझार, सातारा 3. चेअरमन, श्री नरेंद्र मोहन पाटील रा.27, मॅगझीन कॉलनी, सदर बझार, सातारा 4. व्हा.चेअरमन, श्री अशोक रामचंद्र जाधव रा.154, रविवार पेठ, सातारा ----- जाबदार न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. तसेच अर्जदार यांचे जाबदार संस्थेतील बचत खात्यामध्ये काही रक्कम शिल्लक आहे. अर्जदार यांना कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याकरिता पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी ठेव रकमेची व बचत खात्यातील रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, बचत खात्यातील रक्कम मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 4 यांनी नि.13 कडे लेखी म्हणणे देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. व्याजाच्या रकमा अर्जदार यांना अदा झालेल्या आहेत. ठेवींच्या रकमा मुदतपूर्व मागण्याचा अर्जदार यांना हक्क नाही. जाबदार यांनी रकमा देण्याचे कधीही नाकारले नाही. एकरकमी रक्कम परत करण्याचे बंधन जाबदार यांचेवर नाही. जाबदार यांचे विशेष सर्वसाधारण सभेमध्ये दि.16/5/10 रोजी पारीत झालेल्या ठरावाचे अवलोकन केले असता जाबदार यांनी स्थिती अतिशय हलाखीची आहे, त्यातील निर्णयाप्रमाणे जाबदार रक्कम परत करणेस तयार आहेत. जाबदार क्र.2 व 3 हे याकामी आवश्यक पक्षकार नाहीत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. अर्जदार व जाबदारतर्फे तोंडी युक्तिवाद ऐकणेत आला तसेच दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 4. जाबदार क्र.1 ते 4 यांनी नि.13 कडे म्हणणे तसेच नि.14 कडे शपथपत्र देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. 5. निर्विवादीतपणे जाबदार क्र.1 ते 4 यांनी म्हणणेमध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. अर्जदार नं.1 व 2 हे पती पत्नी दिसतात, एकत्र राहतात, सबब एकत्रित अर्ज चालणेस पात्र आहे. जाबदार क्र. 2 ते 4 हे जाबदार संस्थेचे विद्यमान संचालक आहेत. सबब जाबदार संस्थेच्या कसल्याही कृत्यास, चांगल्या अथवा वाईट कृत्यास ग्राहक संरक्षण कायद्यानुसार संचालक हे वैयक्तिक जबाबदार आहेत. सबब जाबदारचे कथनात तथ्य नाही. तसेच संस्था आर्थिक अडचणीत आहे, सबब रक्कम देवू शकत नाही याही जाबदारचे कथनात तथ्य नाही. कारण संस्थेची आर्थिक अडचण हे कारण कायदेशीर कारण होवू शकत नाही. मुदतपूर्व रकमा मागणेचा अर्जदारला अधिकार नाही याही अर्जदारचे कथनात तथ्य नाही. कारण ठेवीदार यास स्वतःचे ठेवीची रक्कम केव्हाही मागणी करणेचा अधिकार आहे व कायद्याने ठेवीदारचे इच्छेविरुध्द संस्था ठेवीदाराची रक्कम अडवू शकत नाही. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अर्जापूर्वी नोटीसची आवश्यकता नाही. 6. जाबदारचे कथनानुसार दि.16/5/2010 रोजी विशेष सर्वसाधारण सभा होवून त्यामधील ठरावानुसार जाबदार रक्कम देणेस तयार आहेत असे कथन आहे. निर्विवादीतपणे दि.16 मे 2010 रोजीचे ठराव नं.1 चे लागूपुरता उता-याची प्रत नि.16 कडे दाखल आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये अनेक बाबी असून पैकी मुदतपूर्व ठेवी मोडता येणार नाहीत परंतु संचालक मंडळाचे मान्यतेने आजारपण, शैक्षणिक खर्च, लग्न वगैरे साठी 25 टक्के ते 50 टक्के रक्कम देणेत येईल. तसेच मुदत पूर्ण झालेल्या ठेवींसठी मागणी केलेनंतर 30 टक्के रक्कम देणेत येईल व उर्वरीत सेव्हिंग्ज खातेवरती वर्ग करणेत येईल व ती रक्कम 5 लाख पासून पुढे असेल तर दरमहा रु.10 हजार, रु.3 लाख ते 5 लाख असेल तर रु.5 हजार, रु.2 लाख ते 3 लाख असेल तर दरमहा रु.3 हजार वगैरे प्रमाणे वाटप करणेत येईल, अशा अनेक बाबी नमूद आहेत. निर्विवादीतपणे सदर ठरावास जिल्हा उपनिबंधक यांची मंजूरी संस्थेने घेणेस पाहिजे. त्यानंतर रजिस्टर्ड असलेल्या संस्थेच्या पोटनियमामध्ये मुदतपूर्व ठेवी व मुदत पूर्ण झालेल्या ठेवी याबाबत जे नियम अस्तित्वात आहेत, त्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे, ती दुरुस्ती पुन्हा मंजूर करुन घेतली पाहिजे अशा कोणत्याही कायदेशीर बाबी पूर्ण केलेला पुरावा संस्थेने दाखल केला नाही. केवळ कोणताही ठराव जो ठेवीदारांचे हिताचे विरुध्द आहे असा ठराव करायचा व तो ठेवीदारांवरती बंधनकारक आहे असे म्हणायचे व कैफियतीमध्ये कथन करायचे अशा कथनात काहीही तथ्य नाही. कोणतेही बेकायदेशीर ठराव ठेवीदारांवरती बंधनकारक नाहीत असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. 7. जाबदार संस्थेने दि. 26/8/2010 रोजीचा एक प्रिंटेड मजकूर असलेला कागद दाखल केला असून त्यामध्ये दि. 17/5/2010 चे परिपत्रकाची प्रत मला मिळाली असून ती मी वाचली आहे, त्यातील अटी व नियम मला मान्य व कबूल आहेत, माझी हरकत अगर तक्रार नाही असा मजकूर असून खाली अर्जदारचे सहीसारखी सही आहे. निर्विवादीतपणे दि.17/5/2010 चे परिपत्रक जाबदारने दाखल केले आहे. तथापि, मुळातच बेकायदेशीर व केवळ संस्थेच्या व्यवस्थापकाचे सहीचे कसलेही परिपत्रक ठेवीदारांवरती बंधनकारक असणेचे कारण नाही. सबब दि.26/8/2010 चे कागदावरती जरी अर्जदारची सही आहे असे जरी गृहित धरले तरी अर्जदाराचे वय (अनुक्रमे 69 व 65) विचारात घेता त्यांना संपूर्ण रकमेची आवश्यकता भासू शकते यात शंका घेणेचे कारण नाही. सबब उर्वरीत रकमेची जर ते पुन्हा मागणी करत असतील तर यात गैर काहीही दिसून येत नाही. 8. निर्विवादीतपणे अर्जदारने शपथपत्राने जाबदारकडे वेळोवेळी रकमेची मागणी केली आहे व जाबदारने देणेस टाळाटाळ केली आहे असे कथन केले आहे. सबब अर्जदारने वेळोवेळी रकमची मागणी करुनही जाबदारने रक्कम देणेस टाळाटाळ करुन अर्जदारास सदोष सेवा दिली आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 9. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 व 3 कडे शपथपत्रे दाखल केली असून नि. 6 सोबत नि. 7 ते 9 कडे ठेव पावत्यांच्या मूळ प्रती व बचत खात्याचे पासबुक दाखल केले आहेत. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच बचत खात्याचे पासबुकाचे अवलोकन केले असता त्या खात्यामध्येही रक्कम शिल्लक असल्याचे दिसत आहे. सबब, नि. 2 व 3 कडील अर्जदार यांची शपथपत्रे पाहिली असता अर्जदार यांनी ठेव रकमेची व बचत खात्यातील रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब अर्जदारने वेळोवेळी मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम व बचत खात्यातील रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 6 सोबतच्या नि. 7 ते 9 कडील ठेवींची रक्कम व बचत खात्यातील रक्कम व्याजासह द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 10. अशा प्रकारे जाबदार क्र.1 ते 4 यांना स्वतंत्र व संयुक्तरित्या अर्जदारच्या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 11. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 4 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र.795, 796, 8920, 1106, 1107 कडील रकमा ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्याजासह द्यावी व ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 3. बचत खाते क्र. 12/1367 कडील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 4. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 10,000/- (दहा हजार) द्यावी. 5. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 5/5/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |