(घोषित दि. 22.01.2015 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
अर्जदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जात असे नमुद केले आहे की, अर्जदार यांनी प्रतिपक्ष यांचेकडून दिनांक 05.07.2013 रोजी बजाज कंपनीचे इंडक्शन कुकर रुपये 2,850/- विकत घेतले. सदर कुकरला एक वर्षाची वॉरंटी देण्यात आलेली होती ज्याचा वॉरंटी क्रमांक 9403031777 दिनांक 05.07.2013 असा आहे. वॉरंटी कार्डवर प्रतिपक्ष यांचे दुकानाचा रबरी शिक्का आहे. सदर इंडक्शन कुकर वारंवार नादुरुस्त होत असल्याने अर्जदार यांनी प्रतिपक्ष यांना याबाबत माहिती दिली होती व कुकर कंपनीकडून दुरुस्त होईल असे प्रतिपक्ष यांनी सांगितले होते. पण प्रत्येकवेळी प्रतिपक्ष यांनी दुरुस्तीचा खर्च घेतला परंतु कुकर दुरुस्त झाले नाही. त्यामुळे अर्जदार यांनी दिनांक 06.01.2014 रोजी व त्यानंतर दोन-तिन वेळा समक्ष भेटुन कुकर बदलून देण्याबाबत विनंती केली. मात्र प्रतिपक्ष यांनी कुकर बदलून देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे दिनांक 20.05.2014 रोजी रजिस्टर पोस्टाने लेखी स्वरुपात कुकर बदलून देण्याबाबत विनंती केली. परंतु सदर टपाल प्रतिपक्ष यांनी स्विकारले नाही.
त्यामुळे अर्जदार यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. म्हणून अर्जदार यांनी मंचाकडे कुकर बदलून देण्याबाबत विनंती केली व शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 2,000/- ची मागणी केली आहे.
प्रतिपक्ष यांना नोटीस काढल्यानंतर गैरअर्जदार यांनी त्यांचा लेखी जबाब विद्यमान न्याय मंचात दाखल केला. ते आपल्या जबाबात म्हणतात की, अर्जदार यांनी त्यांचेकडून इंडक्शन कंपनीचे कुकर खरेदी केले आहे व त्यांना एक वर्षाचे वॉरंटी कार्ड देण्यात आले आहे आणि त्यावर दुकानाचा रबरी शिक्का आहे ही बाब त्यांना मान्य आहे. परंतु सदर कुकरची वॉरंटी बजाज कंपनीची आहे. त्यामुळे बजाज कंपनी ही सदर प्रकरणात आवश्यक पार्टी असुन प्रतिपक्ष हे बजाज कंपनीचे किरकोळ विक्रेते आहेत. म्हणून सदर प्रकरणात आवश्यक पार्टी न केल्याने तक्रार अर्ज चालू शकत नाही. अर्जदार हे दोन वेळेस प्रतिपक्ष यांचेकडे कुकर दुरुस्ती बाबत आले होते. तेंव्हा त्यांना कंपनीचे दुरुस्ती केंद्र (सर्विस सेंटर) येथे पाठविण्यात आले होते. सदर सर्विस सेंटरशी प्रतिपक्ष यांचा काहीही संबंध नाही. कुकरची दुरुस्ती वॉरंटी कालावधीमध्ये केली असल्याने दुरुस्तीचा खर्च सर्विस सेंटर घेऊच शकत नाही. तसेच दिनांक 06.01.2014 रोजी अर्जदार हे त्यांना भेटलेले नाहीत. त्यामुळे अर्जदार यांना कुकर बदलून देण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. तसेच कुकर बदलून देण्याची जबाबदारी ही कंपनीची आहे आणि अर्जदार यांनी कंपनीशी कसलाही संपर्क केलेला नाही. वॉरंटी कार्डवर प्रतिपक्ष यांनी जो शिक्का मारलेला आहे तो सदर उत्पादन हे प्रतिपक्ष यांनी विक्री केलेले आहे यासाठी हा शिक्का आहे. तसेच दिनांक 21.05.2014 ची कोणतीही नोटीस प्रतिपक्ष यांना मिळालेली नाही.
अर्जदार यांनी प्रतिपक्ष यांचे विरुध्द ही खोटी तक्रार दाखल केली असून, अर्जदार यांचेकडून प्रतिपक्ष यांना रुपये 5,000/- नुकसान भरपाई मिळावी व अर्जदार यांची तक्रार खर्चासह फेटाळण्याची विनंती प्रतिपक्ष यांनी केली आहे.
या बाबत अर्जदार यांना त्यांचा लेखी/तोंडी युक्तीवाद दाखल करण्यासाठी अनेक संधी देण्यात आल्या. परंतु अर्जदार यांनी लेखी/तोंडी युक्तीवाद दाखल केलेला नाही. म्हणुन प्रकरणातील दाखल दस्तऐंवजावरुन हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अर्जदार व प्रतिपक्ष यांनी प्रकरणात दाखल केलेल्या दस्तऐवजांवरुन खालील मुद्दे मंचाने निकालासाठी विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.अर्जदार यांनी बजाज कंपनी यांना पार्टी
करणे आवश्यक होते काय ? होय
2.प्रतिपक्ष यांनी तक्रारदारास द्यावयाच्या
सेवेत त्रुटी केली आहे का ? नाही
2.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी – अर्जदाराने व प्रतिपक्षाने दाखल केलेल्या जबाबाचा व दस्ताऐवजांचा विचार केला असता असे दिसुन येते की, अर्जदार यांनी प्रतिपक्ष यांचेकडून दिनांक 05.07.2013 रोजी बजाज कंपनीचे इंडक्शन कुकर रुपये 2,850/- विकत घेतले. सदर कुकरला एक वर्षाची वॉरंटी देण्यात आलेली होती ज्याचा वॉरंटी क्रमांक 9403031777 दिनांक 05.07.2013 अशी आहे. वॉरंटीवर कार्डवर प्रतिपक्ष यांचे दुकानाचा रबरी शिक्का आहे. सदर इंडक्शन कुकर वारंवार नादुरुस्त होत असल्याने अर्जदार यांनी प्रतिपक्ष यांना याबाबत माहिती दिली होती व कुकर कंपनीकडून दुरुस्त होईल असे प्रतिपक्ष यांनी सांगितले होते. त्याच प्रमाणे प्रतिपक्ष यांनी अर्जदारास सदर इंडक्शन कुकरची उत्पादक कंपनी ही बजाज कंपनी असल्याने व सदर इंडक्शन कुकरची वॉरंटी ही कंपनीने दिलेली असल्याने बजाज कंपनीचा पत्ता व फोन नंबर ग्राहकास दिला व कंपनीच्या सर्विस सेंटर मार्फत अर्जदारास सदर इंडक्शन कुकर दुरुस्तीसाठी आवश्यक ती सेवा दिली असे दिसुन येते. त्याच प्रमाणे सदर इंडक्शन कुकरमध्ये उत्पादन दोष असल्याची बाब अर्जदाराच्या अर्जावरुन दिसुन येते. याबाबत अर्जदाराने विद्यमान मंचात उत्पादक कंपनी बजाज इलेक्ट्रीकल्स लि. 45-47 वीर नरिमन रोड, मुंबई यांना पार्टी करण्या करीता नि.12 वर अर्ज केला. सदर अर्ज विद्यमान मंचाने मंजूर केला. त्यानंतर अर्जदार हे विद्यमान मंचा समोर हजर झाले नाही व वारंवार संधी देऊनही त्यांनी त्यांचा लेखी/तोंडी युक्तीवाद मंचा समोर दाखल केला नाही. तसेच अर्जदार यांनी उपरोक्त उत्पादक कंपनीला पार्टी म्हणून प्रकरणात समाविष्ट केलेले नाही. सदर इंडक्शन कुकरची वॉरंटी ही उत्पादक कंपनी बजाज इलेक्ट्रीकल्स लि. यांनी दिलेली असल्यामुळे त्यांना सदर प्रकरणात आवश्यक पार्टी म्हणून समाविष्ट करणे आवश्यक होते. प्रतिपक्ष हे बजाज इलेक्ट्रीकल्स लि. यांनी उत्पादीत केलेल्या इंडक्शन कुकरचे केवळ विक्रेते असल्यामुळे उत्पादनातील दोषाची जबाबदारी त्यांचेवर निश्चित करता येऊ शकत नाही. परंतु अर्जदार यांनी बजाज इलेक्ट्रीकल्स लि. यांनाच पार्टी म्हणून समाविष्ट केले नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होय असे देण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 साठी – प्रतिपक्ष हे बजाज इलेक्ट्रीकल्स लि. यांनी उत्पादीत केलेल्या इंडक्शन कुकरचे केवळ विक्रेते आहेत. तसेच त्यांनी सदर इंडक्शन कुकर बद्दल काही तक्रार असल्यास व सदर इंडक्शन कुकर हा वॉरंटी कालावधी मध्ये असल्यास त्याबाबत बजाज इलेक्ट्रीकल्स कंपनी लि. यांची जवाबदारी असल्याची माहिती व कंपनीचे फोन क्रमांक व पत्ता प्रतिपक्ष यांना दिला होता. तसेच सदर इंडक्शन कुकरचा प्रतिपक्ष हा केवळ विक्रेता असल्यामुळे उत्पादनातील दोषाची जबाबदारी त्याचेवर निश्चित करता येऊ शकत नाही. त्याच प्रमाणे अर्जदार यांनी त्यांच्या अर्जामध्ये असे नमुद केले आहे की, प्रतिपक्ष यांनी अर्जदार यांचेकडून सदर इंडक्शन कुकरच्या दुरुस्ती पोटी दुरुस्ती खर्च वसुल केला आहे. परंतु त्याबाबतचा कोणताही पुरावा अर्जदार यांनी प्रकरणात दाखल केलेला नाही. त्याच प्रमाणे नि.10 वर समत पी.शेख अहेमद यांनी दिलेल्या साक्षीनुसार ते बजाज इलेक्ट्रीकल्स लि. या कंपनीने उत्पादीत केलेल्या व वॉरंटी कालावधीमध्ये असलेल्या उपकरणांची दुरुस्ती करुन देतात. त्यानुसार त्यांनी अर्जदाराचे इंडक्शन कुकर दोन वेळा दुरुस्त करुन दिले होते असे दिसुन येते. त्यामुळे प्रत्यक्षात प्रतिपक्ष यांचा सदर दुरुस्तीशी कोणताही संबंध असल्याची बाब स्पष्ट होत नाही. त्यामुळे प्रतिपक्ष यांनी अर्जदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही. करीता मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर नाही असे देण्यात येते. वरील दोनही मुद्यांचे अवलोकन करता हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.