जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ४५/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ०२/०३/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १३/०८/२०१४
ओम कलेक्शन शिरपूर तर्फे भागीदार
बबनलाल हिरालाल अग्रवाल वय वर्ष ५३,
ता.शिरपूर जि.धुळे . तक्रारदार
विरुध्द
१) मॅनेजर,
हॅवलेट पॅकर्ड, इंडिया सेल्स प्रा.लि.
२४, सालापुरिया, अरना, अडुगोडी, होसुर रोड,
बंगलोर, पीन नं.५६००३०.
२) मनोज चव्हाण
अल्फा कॉम्पुटर
बाबा वाईन शॉपचे मागे, शिरपूर
ता.शिरपूर जि.धुळे . सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.एम.सी. वैद्य)
(सामनेवाला नं.१ तर्फे – अॅड.एन.पी.आयाचित)
(सामनेवाला नं.२ तर्फे – अॅड.श्री.एम.एस. पाटील)
निकालपत्र
(दवाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
१. तक्रारदार यांनी खरेदी केलेले नादुरूस्त कॉमप्युटर बदलुन देण्याकामी सामनेवाला विरूध्द सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे ही तक्रारदार यांचे शिरपूर शहरात कापड दुकानाचे भव्य शोरूम आहे. त्यासाठी तक्रारदार यांनी सामनवाले क्र.१ यांच्याकडून एच.पी. कंपनीचा कॉमप्युटर दिनांक ०४/०१/२०११ रोजी खरेदी केला. सदर कॉमप्युटर सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदार यांच्या दुकानात इन्स्टॉलेशन करून दिला. त्यानंतर तक्रारदार यांच्या दुकानात कॉमप्युटरवर कामकाज सुरू झाले. दिनांक १०/०९/२००११ रोजी सदर कॉमप्युटर खराब झाला. कॉमप्युटर सिस्टीमवर अनावश्यक बाबी दिसू लागल्या व त्यावर लाईन येवू लागली. त्याच दिवशी सामनेवाले क्र.२ यांना कळविण्यात आले. तसेच कंपनीच्या नियमाप्रमाणे सदरची तक्रार रजिस्टर करण्यात आली. त्या तक्रारीवर नवीन कॉमप्युटर बदलुन देण्यात आला. परंतु सदर नविन कॉमप्युटर हा एक दिवस देखील चालला नाही. त्यानंतर दिनांक १८/११/११ रोजी त्याकामी सामनेवालेंकडे तक्रार केली. परंतु त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली नाही. सामनेवाले यांनी जाणीवपूर्वक कॉमप्युटर दुरूस्त करून दिला नाही व नवीन कॉमप्युटरही देत नाही. त्याकामी तक्रारदार यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच सामनेवाले यांना नोटीस पाठविण्यात आली. त्यानंतरही सदर नुकसान भरपाईची पुर्तता सामनेवाले यांनी केली नाही. त्यामुळे सदरचा अर्ज दाखल करावा लागला आहे.
तक्रारदार यांची विनंती अशी आहे की, सामनेवाले क्र.१ यांच्याकडून दि.०४/०१/११ रोजी विकत घेतलेला कॉमप्युटर खराब, ना नादुरूस्त असल्याने नुकसान भरपाई पोटी कॉमप्युटरची किंमत रूपये ६५,०००/- आणि शारिरीक, मानसिक व अर्जाचा खर्च अशी एकूण रक्कम रूपये १,६०,०००/- व्याजासह सामनेवालेंकडून मिळावी.
३. तक्रारदार यांनी शपथपत्र, दस्तऐवज यादीसोबत बिल, नोटीस इत्यादी कादपत्र दाखल केले आहे.
४. सामनेवाले क्र.१ यांचा लेखी खुलासा दाखल केला आहे. यामध्ये सदर अर्ज त्यांनी नाकारला व असा बचाव घेतला आहे की, सामनेवाला कंपनीतर्फे तयार करण्यात आलेले उपकरण बाजारा येण्याअगोदर योग्य परिक्षणे होवून व परीपुर्ण तपासणी करून बाजारात येत असतात. तक्रारदार यांनी सदर वस्तुबाबत दोष असल्याचा कोणताही अधिकृत अहवाल सादर केलेला नाही, त्यामुळे सदरची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. वस्तुची वॉरंटी कालावधी संपल्यानंतर त्यांना वॉरंटीप्रमाणे लाभ देता येत नाही. वॉरंटी कालावधीत कंपनी मोफत सेवा पुरवते व कालावधीनंतर कंपनी सेवा देण्यास बांधील नसते. तक्रारदारानी दिनांक ०४/०१/२०११ रोजी व त्यानंतर ज्या ज्या वेळी तक्रार केली त्या त्या वेळी सामनेवाला यांच्या अभियंतानी त्यांच्या तक्रारी दुर केल्या आहेत. त्याप्रमाणे त्याची संपुर्ण संगणकीय नोंद सामनेवाले यांच्याजवळ आहे. त्यामध्ये दि.१६/०९/२०११, दि.१८/११/११, दि.३०/११/११ दि.०६/०२/२०१२, दि.०७/०२/२०१२ व दि.२३/२/२०१२ रोजी आलेल्या तक्रारीप्रमाणे दोष दूर केलेले आहे. तक्रादाराकडे जावून कॉमप्युटरचे पार्ट बदलून दिलेले आहे. सदर कॉमप्युटर व्यवस्थित सुरू झालेला आहे. तक्रारदारने वॉरंटीच्या करारातील अटी व शर्ती मान्य केल्या आहेत. त्यानुसार तक्रारदार हे दाद मागण्यास पात्र आहे व त्यापलिकडे अप्रत्यक्ष होणा-या नुकसानीस सामनेवाले जबाबदार राहु शकत नाही. सदर मालामध्ये कोणताही उत्पादीत दोष दिसुन येत नसून किंवा तक्रारी शाबीत केलेल्या नाहीत. तसेच सदर अर्ज दिवाणी कोर्टास चौकशी होण्यास पात्र आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या तक्रारीप्रमाणे तक्रारीचे निकारण करून तक्रारदाराचे समाधान करून दिले आहे. सदर कॉमप्युटर मध्ये कोणताही दोष राहिलेला नसुन तक्रारदार यांनी अनधिकृत विक्रेत्याकडून कॉमप्युटर विकत घेतलेला आहे. सामनेवाले हे नुकसान भरपाई देण्यास पात्र नाही. वॉरंटी नियमाप्रमाणे तक्रारदार यांना नुकसान भरपाई मिळू शकत नाही. सबब सदर तक्रार खर्चासह रदद करण्याची विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
सामनेवाले यांनी शपथपत्र व संगणकीय नोंदीचे कागदपत्र दाखल केले आहेत.
५. सामनेवाले क्र.२ यांनी खुलासा दाखल केला आहे. त्यामध्ये त्यांनी असे नमुद केले आहे की, तक्रारदार यास सामनेवाले क्र.२ यांनी अर्जातील नमूद कॉमप्युटर तक्रादार यांना विकले आहे. सदर कॉमप्युटर हा सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादीत केला असून त्याची वॉरंटी व गॅरंटी सामनेवाले क्र.१ यांनी घेतलेली आहे. सामनेवाले क्र.२ हे केवळ एजंट असून त्यांची कॉमप्युटरच्या गुणवत्तेशी कोणतीही जबाबदारी नाही. सदर कॉमप्युटरमध्ये उत्पादन बिघाड असल्याने तो दुरूस्त होवू शकतो त्यामुळे सदर कॉमप्युटर बदलून देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.१ यांची आहे. सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ यांचे केवळ डिलर म्हणून काम पाहता. त्यामुळे सामनेवाले क्र.२ हे जबाबदार नसुन त्यांच्या विरूध्दची तक्रार रदद करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
६. सामनेवाले क्र.२ यांनी शपथपत्र व कागदपत्र दाखल केले आहे.
७. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी खुलाशासोबत दाखल केलेली कागदपत्रे, उभयपक्षांचा लेखी युक्तिवाद आणि उभयपक्षांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्यासमोर पुढील मुददे उपस्थित होतात.
मुददे निष्कर्ष
- तक्रादार हे ग्राहक आहेत काय ? होय
ब. सामनेवाले क्र.१ यांनी सेवेत त्रुटी
केली आहे ? होय
- तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून मानसिक त्रास
व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळण्यास
पात्र आहेत काय ? होय
ड. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
८. मुद्दा ‘अ’- तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादित केलेला कॉमप्युटर क्र.ए.आय.ओ.१२४० इन/एच.पी.३ सी.आर.०२१०एफ.एस १ हा सामनेवाला क्र.२ यांच्याकडून दि.०४/०१/२०११ रोजी खरेदी केला त्याबाबतची पावती नि.५/१ लगत दाखल केली आहे. सदर पावती पाहता तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून कॉमप्युटर खरेदी केला हे स्पष्ट होते. त्यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय असे देत आहोत.
९. मुद्दा ‘ब’- तक्रारदार यांनी सदर कॉमप्युटर खरेदी केल्यानंतर दि.१०/०९/२०११ रोजी नादुरूस्त झाला आहे. सदर कॉम्पुटरच्या स्क्रिनवर लाईन येवू लागल्याने तक्रादार यांनी सामनेवाले यांच्याकडे त्याबाबत तक्रार केली आहे. त्याकामी तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे सामनेवाले यांनी निराकरण म्हणून सामनेवाले क्र.१ यांनी नविन कॉमप्युटर बदलून दिला आहे. ही बाब सामनेवाले यांनीही खुलाशामध्ये मान्य केली आहे. परंतु सदर बदलून दिलेला कॉमप्युटर हा देखील चालू होत नव्हता. त्यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवेळी सामनेवाले यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत.
सामनेवाले क्र.१ यांनी खुलाशामध्ये असे नमूद केले आहे की, दिनांक ०४/०१/२०११ रोजी सदर कॉमप्युटर खरेदी केल्यानंतर तक्रारदार यांनी ज्या ज्या वेळी तक्रार केली त्या त्या वेळी सामनेवाला यांनी त्यांच्या तक्रारी दुर करून दिलेल्या आहे. त्याबाबतच्या संगणकीय नोंदी सामनेवाला यांच्याकडे असून त्या त्यांनी दाखल केलेल्या आहेत. यामध्ये दिनांक १६/०९/२०११ रोजी सी.ए. ११३१६३५ या तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी सदर कॉमप्युटरच्या पडद्यावर हिरव्या रेषा येतात अशी तक्रार दिली. तक्रारीप्रमाणे सामनेवाले यांनी दिनांक १८/१०/२०११ रोजी कॉमप्युटर दुरूस्त करून दिलेला आहे.
तसेच दिनांक १८/११/११ रोजीची तक्रार क्रमांक सी.ए.११५४१२१ या तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी सदर कॉमप्युटर बंद किंवा सुरू करण्यासाठी वेळ लागतो अशी तक्रार दिली. तक्रारीप्रमाणे सामनेवाले यांनी दिनांक २२/१२/११ रोजी कॉमप्युटरची तपासणी करून दोष दूर केलेला आहे.
दिनांक ३०/१२/११ रोजीची तक्रार क्रमांक सी.ए.११६६१५१ या तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी सदर कॉमप्युटरमध्ये डिसप्ले दिसत नाही अशी तक्रार दिली. त्यात उपकरण बदलून घेण्याचे सांगितलेले आहे.
दिनांक ०६/०२/२०१२ रोजी तक्रार क्र.सी.ए.११७७१०७ मध्ये पुर्वी सारखीच सदर कॉमप्युटरमध्ये डिसप्ले दिसत नाही अशी तक्रार केली आहे.. त्यात त्यांना कंपनीचा सोनीया माथुर यांचाशी संपर्क साधणेस सांगितला.
दिनांक ०७/०२/१२ रोजीची तक्रार क्रमांक सीए ११७७२६५ मध्ये पूर्वीप्रमाणे सदर कॉमप्युटरमध्ये डिसप्ले दिसत नाही अशी तक्रार केली आहे. त्याप्रमाणे पार्ट बदलून दिला व दि.०३/०३/२०१२ रोजी सदर तक्रार बंद करण्यात आलेली आहे.
या वरील संगणकीय नोंदी पाहता व सामनेवाला यांचा खुलासा पाहात तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या कॉमप्युटरमध्ये खरेदी केल्यापासून सतत वेगवेगळया प्रकारचे देाष येत आहे व ते दोष दूर करून सामनेवाले यांनी वेळोवेळी सेवा दिलेली आहे. परंतु सदर कॉमप्युटर हा आजतागयत पूर्णपणे दुरूस्त झालेला दिसत नाही. सदर कॉम्पुटर नादुरूस्त असून तो सामनेवाले क्र.१ यांच्याकडे आहे. याचाच अर्थ असा होतो की सदर कॉमप्युटरमध्ये कोणत्यातरी स्वरूपाचा तांत्रीक दोष हा निश्चित आहे व तो दोष दुरूस्त करून दूर होवू शकलेला नाही. सदर कॉमप्युटरमध्ये प्रत्येक वेळी दोष दूर करणे किेंवा त्यामधील त्याचा एखादा भाग बदलून देणे असे केल्याने देखील सदर कॉमप्युटर हा पूर्णपणे दुरूस्त होवू शकलेला नाही. याचा विचार होता सदर कॉमप्युटर हा दोषपुर्ण आहे व तो दुरूस्त होवू शकत नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी खरेदी केलेला कॉमप्युटर हा पूणपर्ण बदलून त्या ऐवजी नवीन कॉमप्युटर देणे किंवा त्याची किंमत परत करणे योग्य व रास्त होईल असे स्पष्ट होते.
१०. सामनेवाला यांनी असा बचाव घेतला आहे की, तक्रारदार हे खरेदी केलेल्या कॉमप्युटरच्या वॉरंटीमध्ये लिहीलेल्या अटी व शर्तींपलीकडे नुकसान भरपाई मागू शकत नाही. परंतु सदर कॉमप्युटर हा खरेदी केलेल्या दिनांका पासून सतत नादुरूस्त होत आहे. त्याकामी सामनेवाला यांनी दूरूस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु पूर्णपणे दुरूस्त होवू शकलेला नाही, हे सामनेवाला यांनी दाखल केलेल्या नोंदीप्रमाणे स्पष्ट होत आहे. सदर वस्तुमध्ये खरेदी केल्यापासून सतत दोष निमार्ण होतो व तो तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्त करून दिलेला असून त्यानंतरही दोष निर्माण झालेला आहे. यावरून सदर वस्तुमध्ये उत्पादीत दोष आहे हे स्पष्ट होते. तसेच सदर कॉमप्युटर हा सामनेवाला क्र.१ यांच्या ताब्यात दुरूस्तीकामी दिला आहे. तो सामनेवाले यांनी आजपावेतो दुरूस्त करून दिलेला नाही किंवा बदलून दिलेला नाही. तसेच त्यांनी सदर कॉमप्युटरमध्ये आजतागयत दोष आहे किंवा नाही याबाबतचा तज्ज्ञांचा अहवाल दाखल केलेला नाही. याचा विचार होता सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते असे आमचे मत आहे. म्हणून मुददा ‘ब’ चे उत्तर आम्ही होय असे देत आहोत.
११. मुद्दा ‘क’- तक्रादार यांना सदर कॉमप्युटर बदलून देणे आवश्यक आहे परंतु तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या मॉडेलचा कॉमप्युटर हा त्याच किंमतीला बाजारात उपलब्ध असण्याची शकत्या कमी आहे. त्याची किंमत सामनेवाले यांनी परत करणे रास्त होईल तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सदरच्या तक्रारीत त्यांना सामनेवाला विरूध्द नादुरूस्त कॉमप्युटरची किंमत मिळण्याकामी या मंचात दाद मागावी लागली आहे. सदर कॉमप्युटरची किंमत ही बिलाप्रमाणे रूपये ६५,०००/- नमूद केलेली आहे. परंतु यामध्ये व्हॅटच्या किंमतीचा समावेश केलेला आहे, त्यामुळे सदरची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम रूपये ६१,९०५/- तक्रारदार यांना देणे योग्य होईल. सदरचा कॉमप्युटर दुरूस्त न होता किंवा त्याची रक्कम न मिळाल्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.१०००/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘क’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
सामनेवाले क्र.२ हे डिलर आहेत. त्यांनी सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादित केलेला कॉम्प्युटर हा या ग्राहकाला विकलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये कोणताही दोष निर्माण झाल्यास त्याकामी सामनेवाले क्र.१ हे जबाबदार होवू शकतात. याचा विचार करता सामनवाले क्र.२ हे सदर नुकसान भरपाईस जबाबदार नाही त्यामुळे त्यांचे विरूध्द सदर तक्रार रदद करणे योग्य होईल असे आमचे मत आहे.
१२. मुद्दा ‘ड’- वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले क्र.२ यांचे विरूध्द सदर तक्रार रदद करण्यात येत आहे.
३. सामनेवाले क्र.१ यांनी आदेशाच्या दिनांकापासून पुढील ३० दिवसांचे आत खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
अ) तक्रारदार यांनी दिनांक ०४/०१/२०११ रोजी खरेदी केलेला कॉमप्युटर क्र.ए.आय.ओ.१२४० इन/एच.पी.३ सी.आर.०२१०एफ.एस याची किंमत रक्कम रूपये ६१,९०५/- (अक्षरी रूपये एकसष्ट हजार नऊशे पाच मात्र) ही परत करावी. सदर रक्कम मुदततीत परत न केल्यास त्यावर द.सा.द.शे ६ टक्के व्याज आकारले जाईल.
ब) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.२,०००/- (अक्षरी रूपये दोन मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.१०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र) द्यावे.
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.