नि का ल प त्र :- (दि. 30/09/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व सामनेवाला क्र. 2 यांचे वकिलांनी युक्तिवाद केला. उर्वरीत सामनेवाला गैरहजर. (2) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला क्र. 1 हे टाटा इंडिका व्हिस्टा या वाहनाचे उत्पादक कंपनी असून सामनेवाला क्र. 2 हे सामनेवाला क्र. 1 चे डिलर आहेत. सामनेवाला क्र. 3 हे सामनेवाला क्र. 1 कंपनीचे वाहनाचे चाकाचे उत्पादक आहेत. तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 1 यांनी उत्पादित केलेली टाटा इंडिका व्हिस्टा चेसीस नं.608521/KIR/8014 , इंजिन नं. 4751DT 14HR ZP हे वाहन सामनेवाला क्र. 2 डिलरकडून दि. 28/02/2010 रोजी खरेदी घेतले आहे. सदरचे वाहन खरेदी घेतल्यानंतर 3-4 महिन्यातच व्हायब्रेट होऊ लागले. गाडीची चारीही चाकामध्ये अशी समस्या निर्माण झाली. सदरची बाब लक्षात आलेनंतर सामनेवाला क्र. 2 यांचेकडे तक्रार केली. सामनेवाला क्र. 2 यांनी व्हिल अलॉईनमेंट करुन दिले. परंतु चाकामधील दोष दुर झालेले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 2 यांनी सदरची चाके सामनेवाला क्र. 3 यांनी उत्पादित केली असल्यामुळे तक्रारदारांना त्यांचेंकडे पाठविले. त्यावेळेस दि. 15/09/2009 रोजी “डिफेक्ट नॉन टेक्नीकल” असा अहवाल दिलेला आहे. सामनेवाला क्र. 2 यांचेकडून वाहनाचे पुढील स्ट्रक्चरर्स निट व्यवस्थित बसवून दिलेले नाही. सबब, तक्रारदारांनी घेतलेले वाहन टाटा इंडिका व्हिस्टा बदलून देण्याचा आदेश व्हावा अथवा खरेदी किंमत परत करण्याचा आदेश व्हावा व सामनेवाला यांनी मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रु. 50,000/- द्यावेत. व तक्रार खर्च रु. 3,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदारांचे गाडीचे टायर्सबाबत दिलेला रिपोर्ट, तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 2 कडून करवुन घेतलेले व्हील अलाईनमेंटची बीले, सामनेवाला क्र. 2 यांना तक्रारदारतर्फे पाठविलेली वकिल नोटीस व त्याची पोहोच पावती इत्यादीच्या झेरॉक्स प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र. 1 यांनी त्यांचे म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. (5) सामनेवाला क्र. 2 यांनी त्यांचे म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. तक्रारदार यांनी गाडीचे कंपनीच्या नियमानुसार पहिले सर्व्हिसिंग सामनेवाला क्र. 1 यांनी दिलेल्या ओनर्स मॅन्युअल मधील वॉरंटीचे कंडिशनचा भंग केलेला आहे. तक्रारदार यांना सर्व्हिंसिंगच्या वेळी सर्व सुविधा पुरविल्या आहेत. तक्रारदारांनी गाडीच्या टायरबाबत तक्रार केलेमुळे टायर कंपनीला कळवून टायरची तज्ञाकडून पाहणी केली असता अनइवन डायग्नोली पॅच वेअर डयु टू जॉमेट्रीक और मेकॅनिकली हेन्स नॉट कन्सिडर अंडर वॉरंटी असा रिपोर्ट सादर केला आहे. टायरमधील दोष चाकामध्ये कमी हवा भरलेमुळे उदभवल्याचे तज्ञांनी रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. तक्रारदारांनी फ्री सर्व्हिंसिंग व्यतिरिक्त इतर कामे करुन घेतली आहेत. प्रस्तुत तक्रारीत टायर कंपनीला पक्षकार केलेले नाही. तक्रारदारांनी गाडीच्या इंजिनबाबत, उत्पादन दोषाबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा अशी विनंती केली आहे. (6) सामनेवाला त्यांच्या म्हणणेसोबत जॉब कार्डर्स, गुड इयर इंडिया लि. स्पॉट इन्पेक्शन रिपोर्ट, वॉरंटी टर्म अन्ड कंडिशनस, कंझुमर मॅन्युअल, इनव्हाईस बिले इत्यादीच्या झेरॉक्स प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (7) प्रस्तुत प्रकरणाचे अवलोकन केले असता तक्रारदारांची तक्रार ही सामनेवाला क्र. 1 कंपनीने उत्पादित केलेले वाहन टाटा इंडिका व्हिस्टा या वाहनाची चाके सदोष असलेबाबत तक्रारदारांनी त्यांची तक्रार दाखल केली आहे. व सदरचे वाहन बदलून मागितलेले आहे अथवा त्याची खरेदीची किंमत परत मागितलेली आहे. तक्रारदारांची तक्रार व सामनेवाला यांचे म्हणणे, व उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी खरेदी घेतलेल्या वाहनामध्ये उत्पादित दोष आहे याबाबत कोणताही संयुक्तिक पुरावा प्रस्तुत कामी दाखल केलेला नाही. तसेच तज्ञ मतांचा अहवालही प्रस्तुत कामी दाखल केलेला नाही. उत्पादित दोषाबाबत तज्ञ मताचा अहवाल नसल्यामुळे वाहनामध्ये उत्पादित दोष आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. सबब, आदेश. आ दे श 1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते. 2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |